श्री महादेव म्हणाले,
‘‘शंभर योजने, चारशे कोस लांब असलेला समुद्र. त्यात मकरादिकांची वस्ती, तरी सुद्धा आनंदाचे निधानच की काय, अशा त्या वायुपुत्र मारुतीने तो सागर उल्लंघून जाण्याचा विचार केला. परमात्मा रामाचे ध्यान करून तो म्हणाला की, ‘‘रामाच्या अमोघ अर्थात कधीच व्यर्थ न जाणाऱ्या बाणाप्रमाणे मी आकाशमार्गाने जात आहे. सर्व वानरवीर मला पाहोत. सर्व वानरहो! आजच जनकनंदिनी, रामपत्नी सीतामाता मला दिसेल. त्यानंतरच मला कृतकृत्य झाल्यासारखे वाटेल. कृतार्थ होऊन मी पुनः रामाला भेटेन. प्राण जाण्याच्या वेळी ज्याच्या नावाचे एकवार जरी स्मरण झाले तरी देखील मनुष्य अपार असा हा संसारसागर तरून जाऊन त्याच्या पदाला प्राप्त होतो. मी तर त्याचा दूत आहे. मग माझी गोष्टच कशाला? तसेच त्याच्या अवयवरूपी अंगुलीतील मुद्रिकासुद्धा माझ्याजवळ आहे. त्याचेच ध्यान करून मी ह्या अल्प सागराला तरून जाईन.’’ असे म्हणून मारुतीने बाहू पसरविले व शेपूट लांब केले. त्या पराक्रमी पवनतुल्य मारुतीने मान सरळ करून वर दृष्टी लावून आणि दोन्ही पाय आखडून दक्षिणेकडे तोंड केले आणि एकदम उडी मारली. तो जात असताना आकाशातील देवांची दृष्टी त्याच्यावर पडली. वायुवेगाने जाणाऱ्या पवनतनयाला, मारुतीला पाहून त्याच्या शक्तीची कसोटी लावण्याची इच्छा होऊन ते म्हणाले, ‘‘हा महाबुद्धिमान व वायुपराक्रमी वानर चालला आहे. तर लंकेत प्रवेश करण्यास हा समर्थ आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी ह्याच्या सामर्थ्याची आपण परीक्षा करू या.’’ असा विचार करून नागांची आई सुरसा हिला ते सर्व देव मोठ्या उत्सुकतेने म्हणाले की, ‘‘तू जा आणि ह्या वानरश्रेष्ठाला काही तरी विघ्न कर. त्याचे सामर्थ्य आणि बुद्धि ही कशी काय आहे ते बघून परत ये.’’ देवांनी असे सांगितल्यावर ती सुरसा हनुमंताला विघ्नबाधा करण्याच्या हेतूने निघाली. मारुतीचा मार्ग अडवून ती त्याच्यापुढे उभी राहिली आणि म्हणाली, ‘‘हे महाबुद्धिमंता! ये आणि माझ्या मुखात लवकर प्रवेश कर. माझे प्राण भुकेने व्याकूळ झाले आहेत. तेव्हा देवांनीच माझे भक्ष्य म्हणून तुझी योजना केली असावी.’’ तेव्हा हनुमंत तिला म्हणाला, ‘‘माते! रामाच्या आज्ञेनुसार मी जानकीला शोधण्यासाठी जात आहे. मी लवकरच परत येईन. प्रथम मी रामाला तिचे कुशल कळवितो आणि मग परत आल्यावर तुझ्या मुखात मी प्रवेश करतो. माझा रस्ता सोड. तुला सुरसेला माझा नमस्कार असो.’’ असे मारुतीने सांगितल्यानंतर सुरसा पुन्हा म्हणाली, ‘‘मी अत्यंत क्षुधित झाले आहे. माझ्या मुखात प्रवेश करून सुटला तरच तू जा. नाही तर मी तुला खाऊन टाकीन.’’ असे तिने म्हटल्यावर मारुती तिला म्हणाला, ‘‘लवकर तुझे तोंड उघड. तुझ्या तोंडात प्रवेश करून आता मी सत्त्वर निघून जातो.’’ असे बोलून योजनाएवढा देह मोठा करून तो तिच्यापुढे उभा राहिला. हनुमंताचे ते रूप पाहून सुरसेने आपले मुख पाच योजने इतके मोठे केले. हनुमंताने आपले शरीर दुप्पट मोठे केले. तेव्हा सुरसेने आपले मुख वीस योजनांइतके मोठे केले. मारुतीनेही आपले शरीर तीस योजने इतके मोठे केले. नंतर सुरसेने पन्नास योजनांइतके तोंड मोठे केले. तेवढ्यात मारुतीने आपले शरीर अंगठ्याइतके लहान केले. तो तिच्या मुखात शिरला आणि पुन्हा बाहेर येऊन तिच्यापुढे उभा राहिला. म्हणाला, ‘‘देवि! तुझ्या तोंडात प्रवेश करून हा मी बाहेर आलो आहे.’’ असे बोलणाऱ्या मारुतीकडे पाहून ती त्याला म्हणाली, ‘‘तू बुद्धिमंतामध्ये श्रेष्ठ आहेस. जा. रामाचे कार्य सिद्धिला ने. वानरा! देवांनी तुझे सामर्थ्य जाणून घेण्याच्या इच्छेने मला पाठविले आहे. तू आता जा.’’ असे बोलून ती देवलोकाला गेली. वायुपुत्र पुनः पक्षिराज गरुडाप्रमाणे वायुमार्गाने पुढे जाऊ लागला. इकडे समुद्रानेही रत्नकांचनांच्या शिखरांनी शोभणाऱ्या मैनाक पर्वताला सांगितले की ‘‘हा महासामर्थ्यवान वायुपुत्र हनुमान रामकार्याच्या सिद्धिकरिता जात आहे. तरी तू त्याला मदत कर. पूर्वी मला सगरांनी वाढविले म्हणून मी ‘सागर’ झालो आहे आणि रामाच्या कार्यसिद्धिसाठी हा महावानर जात आहे. तू पाण्यातून लवकर वर निघून ये. म्हणजे हा तुझ्या ठिकाणी शिखरावर विश्रांती घेऊन पुढे जाईल.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून तो मैनाक अतिशय उंच होऊन पाण्यावर प्रकट झाला. त्यावर अनेक मणिमय शिखरे असून एक मनुष्याकृति होती. तो मनुष्याकार पर्वत आकाशमार्गे जाणाऱ्या हनुमंताला म्हणाला, ‘‘वानरश्रेष्ठा! मी मैनाक पर्वत आहे. मारुते! तुला विसावा देण्याची समुद्राने मला आज्ञा केली आहे. तर ये आणि माझ्या पृष्ठभागावरील पिकलेली अमृततुल्य फळे खा. क्षणभर येथे विश्रांती घे आणि मग खुशाल जा.’’ असे तो मैनाक बोलला असता वायुपुत्र हनुमान त्याला म्हणाला, ‘‘रामकार्याकरिता मी जात असता मला जेवण ते कसे बरे सुचणार? विश्रांती सुद्धा मी कशी घेणार? मला सत्त्वर येथून गेले पाहिजे.’’ असे बोलून कराग्राने पर्वतशिखराला त्याने स्पर्श केला व नंतर तो पुढे गेला. थोडे दूर तो गेला तोच त्याची छाया एका छायाग्रहाने धरून ओढली. हा छायाग्रह म्हणजे सतत पाण्यात राहणारी सिंहिका नावाची भयंकर राक्षसी होती. आकाशमार्गाने जाणाऱ्यांची छाया एकत्र करून त्याला खाली ओढावे नंतर भक्षण करावे, असा तिचा नित्यक्रम होता. तिने त्याला धरले, तेव्हा त्या वीर्यशाली मारुतीने विचार केला, ‘माझ्या वेगाला प्रतिबंध करून रामकार्यात विघ्न आणणारा हा कोण बरे असावा? येथे कोणीच दिसत नाही. म्हणून मला आश्चर्य वाटत आहे.’ असा विचार करून मारुतीने खाली दृष्टी टाकली असता धिप्पाड शरीराची, भयंकर स्वरूपाची ती सिंहिका त्याला दिसली. मारुतीने चटकन पाण्यात उडी मारली आणि मोठ्या संतापाने लत्ताप्रहारांनी तिचा वध केला. पुन्हा वर आकाशात उड्डाण करून, दक्षिणाभिमुख होऊन हनुमान पुढे जाण्यासाठी निघाला. दक्षिणतीरावर येऊन पोचला. तेथे विविधप्रकारचे फळांनी भरगच्च असलेले अनेक वृक्ष होते. चित्रविचित्र पक्षी व पशू ठिकठिकाणी फिरत असून अनेक जातीच्या फुलवेलींनी ते स्थान भरून गेले होते. नंतर त्रिकूट पर्वताच्या शिखरावर त्याला एक नगर दिसले. त्याच्या सभोवताली अनेक तट असून त्या तटाभोवती सर्वत्र खंदक होते. ते बघून आपण लंकेत कसा प्रवेश करू अशी काळजी मारुतीच्या मनात निर्माण झाली. ‘रात्रीच्या वेळी सूक्ष्म रुप धारण करून रावण राज्य करीत असलेल्या ह्या लंका नगरीत आपण प्रवेश करावा’ असा विचार करून तो रात्र होईस्तोवर तेथेच राहिला. नंतर सूक्ष्मरूप धारण करून त्या प्रतापशाली मारुतीने लंकानगरीच्या द्वारात प्रवेश केला. तेथे राक्षसीचा वेश धारण करून साक्षात लंकापुरी बसलेली होती. हनुमान आत प्रवेश करीत आहे असे पाहून तिने त्याला भीती दाखवून म्हटले, ‘‘मी लंकिनी येथे बसले आहे. माझा अपमान करणारा तू कोण आहेस? चोरासारखा रात्रीच्या वेळेस वानररुपाने आत शिरून तुझ्या मनात काय करावयाचे आहे?’’ असे बोलून क्रोधाने डोळे लाल झाले आहेत, अशा लंकिनीने मारुतीला लाथ मारली. हनुमंतानेही तिची अवज्ञा करून डाव्या मुठीने तिच्यावर प्रहार केला. त्यामुळे ती तत्काळ जमिनीवर पडली आणि रक्त ओकू लागली. सावध झाल्यानंतर उठली आणि मारुतीला म्हणाली, ‘‘हे निष्पाप हनुमंता! तुझे कल्याण असो! तू जा. तू लंकेला जिंकले आहेस. पूर्वी मला ब्रह्मदेवाने सांगितले की अठ्ठाविसाव्या त्रेतायुगामध्ये निर्विकार नारायण रामरुपाने दशरथपुत्र होणार आहे. योगमायासुद्धा जनकाचे घरी सीतारुपाने जन्माला येणार आहे. कारण मी एकदा भूभार हरण करण्यासाठी त्याची प्रार्थना केली होती. आपल्या पत्नीला आणि बंधुला घेऊन श्रीराम वनवासाला जाईल. तेथे महामाया सीतेचे रावण हरण करील. नंतर रामाशी सुग्रीवाची मैत्री होऊन सुग्रीव जानकीच्या शोधासाठी वानर पाठविल. तेव्हा एक वानर रात्रीच्या वेळी तुझ्याजवळ येईल. तू त्याला धमकी देशील आणि तो तुला मुष्टिप्रहार करील. हे अनघे! त्याच्या प्रहाराने तू व्यथीत होशील तेव्हाच रावणाचा नाश होईल. ह्यात काहीच संशय नाही. ज्याअर्थी तू लंका जिंकली आहे त्याअर्थी हे पुण्यशीला! तू सर्व काही जिंकले आहेस. रावणाच्या सुंदर अंतःपुरानजीक एक उत्तम क्रीडोद्यान आहे. त्याच्या मध्यभागी दिव्य वृक्षांनी दाटलेली अशी अशोकवाटिका आहे आणि तिच्या मध्यभागी शिंशपा नावाचा एक मोठा वृक्ष आहे. तेथे त्या वृक्षाखाली जानकी आहे. तिच्या संरक्षणासाठी भयंकर अशा राक्षसिणी ठेवल्या आहेत. तू तिला भेट आणि मग ताबडतोब जाऊन ती गोष्ट श्रीरामाला कळव. संसारपाशातून मुक्त करणारी रामचंद्राची स्मृती मला झाली तसेच अत्यंत दुर्लभ असा त्याच्या भक्तांचा समागमही मला घडला. म्हणून मला मोठी धन्यता वाटते. तो दाशरथी राम माझ्या हृदयात सदैव प्रसन्नतेने राहो.’’
मारुती समुद्र ओलांडून गेला त्याचवेळी सीतेचा आणि दशानन रावणाचा डावा डोळा आणि डावा हात अत्यंत स्फुरण पावू लागला. तसेच त्या अतिंद्रिय रामाचेही उजवे अंग स्फुरण पावू लागले.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे सुंदरकाण्डे प्रथमः सर्गः।