श्री महादेव म्हणाले,
‘‘नंतर भरत हा रामाच्या आश्रमाच्या परिसरात मोठ्या आनंदाने गेला. ठिकठिकाणी राम आणि सीता ह्यांच्या पावलांनी तो आश्रमाचा परिसर पवित्र आणि शोभायमान झाला होता. तेथे त्याला वज्र, अंकुश, कमळ, ध्वज इ. चिह्नांनी तो सर्व प्रदेश श्रीरामपदचिह्नांनी भरून गेलेला दिसला. त्या पाऊलखुणांमुळे तो भूभाग मंगलमय झाला होता. त्या श्रीरामाच्या पदचिह्नांकित धुळीमध्ये भरत कनिष्ठ बंधु शत्रुघ्नासह अक्षरशः लोळला आणि स्वतःशीच म्हणाला, ‘मी खरोखर मोठा भाग्यवान आहे. ब्रह्मादि देव आणि वेद ज्याच्या पायधुळीला नेहमी शोधत असतात त्या श्रीरामाच्या पदकमलांनी अंकीत असलेले चिह्न उमटले आहे, अशा भूप्रदेशाचे मला दर्शन झाले आहे.’ अशाप्रकारे विचार करून भरताचे मन अद्भुत अशा प्रेमरसात बुडून गेले आणि रघुनाथाबद्दल गाढ चिंतनात त्याची वृत्ति रंगून गेली. डोळ्यांतून आनंदातिशयामुळे अश्रू वाहू लागले. अशातच भरताला राम एका ठिकाणी बसलेला दिसला. तो रामाजवळ येऊन पोचला. त्या रामाची देहकांती दुर्वादलाप्रमाणे श्यामलवर्णाची होती. नेत्र विशाल होते. त्याने मस्तकावर जटांचा मुकुट धारण केला होता. नवीन वल्कलांची वस्त्रे धारण केली होती. त्याचे मुख प्रसन्न दिसत होते. बालसूर्याच्या तेजाप्रमाणे तो तेजस्वी दिसत होता. शुभलक्षणी जनककन्या सीतेकडे तो पाहात होता. लक्ष्मण मात्र रामाच्या चरणकमलांची सेवा करीत होता. अशाप्रकारच्या दर्शनाने मनात शोक आणि हर्ष दोन्ही भाव निर्माण झाले आहेत, असा भरत धावतच रामाकडे आला आणि रामाचे दोन्ही पाय धरले. जो आजानुबाहू आहे अशा रामाने त्याला दोन्ही हातांनी धरून जवळ ओढले आणि आलिंगन दिले. भरताने जणू आपल्या नेत्रातील अश्रूजलाने रामाला अभिषेक केला. अशावेळी रामाला भेटण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व राममाता घाईघाईने आल्या. जशी तहानेने व्याकूळ झालेली गाय पाणी पिण्यासाठी धावत येते त्याप्रमाणे राममाता त्वरेने रामाजवळ आल्या. माता कौसल्येला पाहताक्षणीच रामाने त्वरेने उठून पुढे येऊन आणि डोळ्यात अश्रू आणून मातेचे चरणवंदन केले. मातेनेही पुत्राला आलिंगन दिले, परंतु तिच्या मनात अतिशय दुःख दाटून आले. रघुनंदनाने इतरही सर्व मातांना वंदन केले. मुनिश्रेष्ठ वसिष्ठ बरोबर आल्याचे बघून रामाने त्यांना साष्टांग नमस्कार करून म्हटले की ‘मी आज धन्य धन्य झालो’, असे वारंवार म्हणू लागला. त्यानंतर रामाने त्या सर्वांना योग्य अशा आसनावर बसवून विचारले, ‘‘माझे पिता कुशल आहेत ना? माझ्याकरिता दुःख करणाऱ्या त्यांनी मला काही सांगितले आहे का?’’
तेव्हा वसिष्ठमुनि त्याला म्हणाले, ‘‘हे रघुनंदना, तुझ्या पित्याने तुझा वियोग असह्य होऊन केवळ तुझेच चिंतन करीत, ‘हाय रामा! हे रामा रे! हा सीते! हाय लक्ष्मण!’ असे म्हणत प्राण सोडला.’’ वसिष्ठ गुरुंचे भाषण शूलाप्रमाणे कानात ऐकू जात असता ‘हाय! हाय! माझा घात झाला’ असे म्हणत रडत रडत राम जमिनीवर पडला. लक्ष्मणाचीही तशीच अवस्था झाली. ते पाहून सर्व माता आणि इतर लोक सर्वजण रडू लागले.
‘‘हा तात! हे दयाळा! मला सोडून आपण कोठे हो गेलात? आता मी अनाथ झालो आहे. आता माझे लालन कोण बरे करणार?’’ सीता आणि लक्ष्मण यांनीही शोक प्रगट गेला. तेव्हा वसिष्ठमुनिंनी त्यांचे सांत्त्वन केले, त्यांच्या सर्वांच्या दुःखाचे शमन केले. ती सर्व मंडळी गंगेवर गेली. स्नान करून शुद्ध झाली. तेथे जलाची अपेक्षा करीत असलेल्या दशरथाला सर्वांनी जल दिले. राम आणि लक्ष्मण यांनी पिंडदान केले. आपण जे अन्न भक्षण करतो तेच पितरांचेही अन्न आहे असे स्मृतीमध्ये सांगितले आहे. इंगुदी फळांचे पीठ करून त्याचे पिंड बनविले, ते मधात भिजवून तयार केले होते. त्यानंतर दुःखाने अश्रू ढाळीत पुन्हा रामाने स्नान केले आणि तो आश्रमात आला. इतरही सर्वांनी स्नान केले आणि आश्रमात आले. त्या दिवशी सर्वांनी उपवास केला. दुसऱ्या दिवशी गंगेच्या पवित्र, शुद्ध जलात रामाने स्नान केले. राम जेथे बसला होता तेथे भरत त्याच्याजवळ जाऊन रामाला म्हणाला, ‘‘हे रामा! महाभाग्यवान रामा! तू स्वतःला राज्याभिषेक करून घे. पितृपरंपरेने प्राप्त झालेल्या राज्याचे पालन कर. तू ज्येष्ठ बंधु असल्यामुळे मला पितृतुल्य आहेस आणि प्रजेचे पालन करणे हाच खरा क्षत्रिय धर्म आहे. अनेक प्रकारचे यज्ञ करून वंशवृद्धिसाठी पुत्रोत्पत्ति करून, पुत्राला राज्यावर बसवून नंतर तू वनाला जावेस. आता सध्या तुला वनवासात जाण्याची आवश्यकताच नाही. एवढी कृपा तू माझ्यावर कर. माझ्या मातेने केलेले दुष्कृत्य तू किंचितही मनात आणू नकोस. तूच आमचे रक्षण कर.’’ असे म्हणून भरताने रामाचे पाय धरले. भक्तिपूर्वक आपल्या मस्तकावर ठेवले आणि रामापुढे साष्टांग दंडवत घातला. रामाने भरताला ताबडतोब उठविले. मोठ्या प्रेमाने आपल्या मांडीवर बसविले. भरताचे प्रेम आणि भक्ति पाहून रामाच्या डोळ्यांतून घळघळ प्रेमाश्रू वाहू लागले. हळूहळू राम त्याच्याशी बोलू लागला, ‘‘हे बाळा! भरता! मी सांगतो तेवढे ऐक. तू अगदी बरोबर बोललास, परंतु पित्याची आज्ञाच तशी आहे की मी चौदा वर्षे दण्डकारण्यात रहावे आणि नंतर नगरात परतावे. आता हे सर्व राज्य भरताला दिले आहे, असे त्यांनी सांगितले आहे. यावरून सर्व गोष्टीच स्पष्ट होतात. पित्यानेच तुला अयोध्येचे राज्य दिले आहे. मला दण्डकारण्याचे राज्य दिले आहे. म्हणून आपण दोघांनीही पितृआज्ञेचे पालन केले पाहिजे. तेव्हा पितृआज्ञेचे उल्लंघन करून जो स्वतंत्रपणे वागतो तो जिवंत असूनही मृतवत होय. मृत्युनंतर त्याला नरकात जावे लागते. म्हणून तू राज्यकारभार सांभाळ. मी दण्डकारण्याचे रक्षण करतो.’’
असे रामाने म्हटल्यावर भरत म्हणाला, ‘‘जसे शहाणा मनुष्य भ्रमिष्ट माणसाचे बोलणे मनावर घेत नाही तसेच स्त्रीलंपट आणि ज्याच्या मनाला भ्रम होऊन जो उन्मत्त झाला आहे, अशा पित्याचे बोलणे तू मनावर घेऊ नये. ते तू खरे मानू नकोस.’’ यावर राम म्हणाला, ‘‘आपले पिता स्त्रीलंपट नव्हते. विषयासक्त किंवा मूढ बुद्धिने काही सांगतील असेही नव्हते. त्यांनी पूर्वी दिलेल्या वचनाची पूर्ती करण्यासाठी आणि सत्यवादी असल्यामुळे आपण दिलेले वचन खोटे होऊ नये, ते तसे होणे नरकापेक्षाही भयंकर आहे म्हणून त्यांनी आपले वचन सत्य केले. मी सुद्धा कैकेयीला दिलेले वचन सत्य करणार आहे. कारण मी रघुकुलोत्पन्न आहे. माझ्याकडून वचनभंग कसा बरे होणार?’’ असे रामाने म्हटले असता भरत म्हणाला, ‘‘हे सुव्रता रामा! मी सुद्धा तुझ्याप्रमाणे वल्कले परिधान करून चौदा वर्षे वनात राहतो. नंतर तू सुखाने राज्य कर.’’
त्यावर राम म्हणाला, ‘‘पित्याने तुला राज्य दिलेले आहे, मला वनवास दिला आहे. यात जर उलटपालट केले तर पुन्हा असत्यच माझ्या पदरी येईल.’’ त्यावर भरत म्हणाला, ‘‘मी सुद्धा वनात येतो आणि लक्ष्मणाप्रमाणे तुझी सेवा करतो. अन्यथा मी प्रायोपवेशन करून देहत्याग करीन.’’ अशा तऱ्हेने निश्चय करून, उन्हामध्ये दर्भ पसरवून तो भरत मनाने निश्चय करून पूर्वेकडे तोंड करून बसला. भरताचा तो निर्धार पाहून रामाला खूप आश्चर्य वाटले. म्हणून गुरुंना नेत्रसंकेत करून भरताला समजावण्याबद्दल सुचवले. वसिष्ठांनी भरताला एकांतात नेऊन त्याला म्हणाले, ‘‘वत्सा, मी तुला एक गुह्य सांगतो. माझे म्हणणे तू लक्ष देऊन, निश्चयपूर्वक ऐक. राम हा साक्षात नारायण आहे. पूर्वी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने प्रार्थना केली म्हणून रावणाला ठार मारण्यासाठी तो नारायण दशरथपुत्र होऊन जन्मला आहे. योगमाया सुद्धा सीता ह्या नावाने जनकाची कन्या म्हणून जन्मली आहे. शेष सुद्धा लक्ष्मण म्हणून जन्मला असून सतत रामाच्या मागेच असतो. रावणाला ठार करण्यासाठी हे राम, लक्ष्मण तिकडे जाणार आहेत यात काही संशय नाही. कैकेयीला दिलेले वरदान आणि तिचे ते निष्ठूरपणे केलेले भाषण हे सर्व देवांनीच घडवून आणले आहे आणि असे जर नसते तर ती असे कसे बरे बोलली असती? म्हणून हे भरता, रामाला अयोध्येला परत घेऊन जाण्याचा आग्रह तू सोडून दे आणि हे प्रचंड सैन्य आणि राजमाता यांच्यासह तू स्वतः राजधानीला परत जा. राम लवकरच रावणाचा सहकुटुंब वध करून परत येईल.’’
अशा तऱ्हेचे गुरु वसिष्ठांचे बोलणे ऐकून भरताला फार आश्चर्य वाटले. त्याचे डोळे एकदम विस्ङ्गारले गेले. तो रामाजवळ आला आणि म्हणाला, ‘‘हे राजेन्द्रा! राज्य करण्यासाठी मला तुझ्या पूज्य अशा पादुका दे. तू येईपर्यंत मी त्यांचीच सेवा करीन.’’ असे म्हणून भरताने दिव्य अशा पादुका रामाच्या चरणात घातल्या. त्या पादुका रामाने अत्यंत प्रेमाने भरताला परत दिल्या. त्या रत्नजडित दिव्य पादुका घेऊन भरताने रामाला वारंवार प्रणाम करून प्रदक्षिणा घातली. भक्तिप्रेमामुळे ज्याचा कंठ दाटून आला आहे असा भरत रामाला म्हणाला, ‘‘चौदा वर्षे पूर्ण झाल्यावर पहिल्याच दिवशी हे रामा, तू जर परत आला नाहीस तर मी मोठ्या प्रज्वलित अग्नीत प्रवेश करीन.’’ यावर रामाने ‘ठीक आहे’ असे म्हटले. अशारितीने भरताला परत अयोध्येला जाण्यास राजी केले.
भरतानेही सर्व सैन्य, वसिष्ठमुनि, शत्रुघ्न, सर्व माता, मंत्रिगण या सर्वांसह परत जाण्याची तयारी केली. नेमके ह्याचवेळी कैकेयी रामाला एकटा पाहून त्याच्याजवळ गेली. डोळ्यातून सतत अश्रूधारा वाहत आहेत, अशा परिस्थितीत ती हात जोडून म्हणाली, ‘‘हे रामा, तुझ्या राज्याभिषेकात मी विघ्न आणले. ते मी दुष्टबुद्धि मनात धरून आणि मायेने माझ्या अंतःकरणात मोह निर्माण झाला त्यामुळे मी तसे दुष्कृत्य केले. मला त्या दुष्कृत्याबद्दल क्षमा कर. सज्जन लोकांचा क्षमा करणे हा श्रेष्ठ गुणधर्म असतो. तू तर प्रत्यक्ष विष्णुच आहेस. अव्यक्त, सनातन असा परमात्मा आहेस. मायेने मनुष्यरूप धारण करून संपूर्ण जगाला तू मोहित करीत आहेस. तुझ्या प्रेरणेने जगात सर्व लोक चांगली किंवा वाईट कर्मे करीत असतात. हे सर्व विघ्न तुझ्याच अधीन आहे. ते स्वतंत्रपणे काहीच करू शकत नाही. जसे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ सूत्रधाराच्या इच्छेप्रमाणे केल्या जातो, तशा त्या बाहुल्या नाचतात. अगदी तसेच तुझ्या अधीन असलेली ही मायारुपी बाहुली अनेक रुपे धारण करून तुझ्याच प्रेरणेने कार्य करीत आहे. देवकार्य करण्यासाठी सुद्धा तूच प्रेरणा दिली आहेस. म्हणून हे शत्रूनाशका, मी हे पापाचरण करण्यास उत्सुक झाले. मात्र देवांनाही ज्याचे दर्शन सहज होत नाही असा तू माझ्या दृष्टीस पडला आहेस. म्हणून हे विश्वेश्वरा, अनंता, जगन्नाथा, माझा तुला नमस्कार असो. माझे रक्षण कर. पुत्र, वित्त इ. चे पाश आणि त्याबद्दलचा माझ्या ठिकाणी असलेला मोह नष्ट कर. तुझ्या ज्ञानरुपी शुद्ध खङ्गाने त्याचा नाश कर.’’
कैकेयीचे बोलणे ऐकून राम आश्चर्याने तिला म्हणाला, ‘‘हे महाभाग्यवान माते, तू मला जे सांगितलेस ते सर्व सत्य आहे. ज्या वाणीची मी तुझ्या ठिकाणी प्रेरणा केली होती तिच वाणी तुझ्या तोंडातून बाहेर पडली. देवाचे कार्य यशस्वी व्हावे यासाठीच हे सर्व घडून आले. यात तुझा काही दोष नाही. आता तू परत जा. अंतःकरणात रात्रंदिवस माझेच चिंतन करीत रहा. अशातऱ्हेने माझी भक्ति केली असता तुझी सर्व आसक्ति नष्ट होईल. तू त्यातून लवकरच मुक्त होशील. मी सर्वत्र समदृष्टीने बघत असतो. द्वेष काय किंवा प्रेम काय माझ्यासाठी सर्व सारखेच आहे. माझी भक्ति करणाऱ्याकडे मीही बघत असतो. हे माते! माझ्याच मायेने मोहित झालेले लोक मला मनुष्यभावनेने पाहतात, तशी त्यांना बुद्धि होते. मला सुख-दुःखाच्या प्रवाहात सापडलेला मनुष्य समजतात. वास्तविक ते माझे खरे स्वरुप जाणत नाहीत. संसाराचा नाश करणारे माझ्याबद्दलचे ज्ञान तुला झाले ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. माझे स्मरण, चिंतन करत तू रहा. म्हणजे तुला कर्माची बाधा होणार नाही.’’
असे रामाने तिला समजावल्यानंतर मोठ्या आनंदाने आणि आश्चर्यचकित मनाने तिने रामाला प्रदक्षिणा घातली. रामासमोर अनेकवेळा नमस्कार घातले आणि ती आनंदाने घरी गेली. भरत सुद्धा आपले अमात्य, माता आणि गुरु वसिष्ठ यांच्यासह अयोध्येला परत गेला. त्याने मनात सतत रामाचेच चिंतन चालू ठेवले होते. नंतर त्या महाबुद्धिवान भरताने अयोध्येमध्येच नेहमीसाठी रामाच्या पादुकांची सिंहासनावर न्यायमार्गाने, भक्तिपूर्वक स्थापना केली. प्रत्येक दिवशी तो राम साक्षात समोर आहे अशा भावनेने गंध, अक्षता, फुले वाहून रामाच्या पादुकांची पूजा करून तसेच छत्र, चामरे इ. राजोपचार अर्पण करून राहू लागला. अशाप्रकारे नित्य व्रतस्थ रहात होता. शत्रुघ्नासह तो फळेमुळे खाऊन राहू लागला. त्याने इंद्रियदमन केले होते. जटा, वल्कले धारण केली होती. ब्रह्मचर्य पाळून तो भूमीवर शयन करीत असे.
जेवढी काही राजकार्ये पृथ्वीतलावर येत होती ती सर्व कार्ये रघुकुलातील भरत त्या पादुकांसमोर योग्य तऱ्हेने निवेदन करून सांगत असे. रामाच्या येण्याची वाट पहात तो जणू दिवस मोजत होता. रामाच्या ठिकाणी चित्त अर्पण करून तो एक एक दिवस घालवित होता. साक्षात ब्रह्ममुनींप्रमाणे तो आपले चित्त रामाचे ठिकाणी ठेवून रहात होता.
इकडे सीता आणि लक्ष्मण यांच्यासह राम चित्रकूट पर्वतावर रहातो हे माहीत झाल्यामुळे अनेक नागरिक रामाचे दर्शन घेण्याच्या इच्छेने सतत येत होते. लोकांची गर्दी पाहून आणि दण्डकारण्यात जे कार्य करावयाचे आहे त्याचा विचार करून रामाने चित्रकूट पर्वत सोडला. तेथील मुक्काम हलवला. त्यानंतर राम अत्रिऋषींच्या पुण्याश्रमाकडे गेला. अत्रिऋषींचा आश्रम राहण्यासाठी उत्तम होता. तेथे लोकांच्या गर्दीचा अजिबात त्रास नव्हता. तेथे आपल्या तेजाने त्या तपोवनाला प्रकाशित करणारे अत्रिऋषी जेथे बसले होते तेथे जाऊन रामाने त्यांना साष्टांग दंडवत घातला आणि म्हटले, ‘‘मी राम, आपल्याला वंदन करतो आहे. वडिलांच्या आज्ञेनुसार मी ह्या दण्डकारण्यात आलो आहे. या वनवासाच्या निमित्ताने आपले मला दर्शन झाले आणि मी धन्य झालो आहे.’’
रामाचे हे भाषण ऐकून राम हा साक्षात विष्णुच आहे असे जाणून अत्यंत भक्तीने विधिपूर्वक त्या मुनींनी रामाचे पूजन केले. त्यानंतर वनातील फळांनी रामाचे आदरातिथ्य केले. राम, सीता, लक्ष्मण सर्वांना बसवून ते मुनी रामाला म्हणाले, ‘‘हे रामा, माझी पत्नी अनसूया ही अतिशय वृद्ध असून तेवढीच विख्यात आहे. ती धर्म जाणणारी आहे आणि ती धर्मावर फार श्रद्धा ठेवून तपाचरण करते आहे. बराच काळ तपश्चर्येत मग्न असते. ती आत बसली आहे. हे अरिमर्दना, सीतेने तिची भेट घ्यावी.’’ त्यावर राम ‘ठीक आहे’ असे म्हणाला. तो सीतेला म्हणाला, ‘‘हे शुभलक्षणे सीते, त्या भगवती अनसूयादेवीला नमस्कार करून परत ये.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून सीतेने अनसूयेची भेट घेतली. आपल्यापुढे सीतेने दंडवत घातलेला पाहून अत्यंत आनंदित होऊन तिच्या मनाला समाधान वाटले. मग अनसूयेने ‘‘वत्से सीते!’’ असे प्रेमाने म्हणून तिला आलिंगन दिले. विश्वकर्म्याने निर्माण केलेली दोन दिव्य कुंडले तिने सीतेला दिली. तसेच भक्तियुक्त मनाने निर्मल अशी दोन रेशमी वस्त्रे दिली. प्रसन्न मुखाने अनसूयेने सीतेच्या अंगाला दिव्य उटी लावली. ‘‘हे कमलवदने सीते, ह्या उटीमुळे तुझे सौंदर्य कधीच कमी होणार नाही. हे जानकी, पातिव्रत्याचा पुरस्कार करून तू नेहमी रामाच्या मागे जात रहा. श्रीराम तुझ्यासह कुशल स्थितीत पुन्हा घरी परत येवो.’’
नंतर अत्रिमुनिंनी रामाला सीता, लक्ष्मणासह यथाविधी भोजन घातले आणि हात जोडून ते रामाला म्हणाले, ‘‘हे रामा! तूच सर्व भुवने निर्माण करून, त्यांच्या रक्षणासाठी देव, मनुष्य, पशुपक्षी इत्यादि योनिमध्ये अवतार घेतोस. देहाच्या गुणांचा धर्म तुला कधीच चिकटत नाही. सर्वत्र मोह घालणारी मायासुद्धा तुला भीत असते.’’
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अयोध्याकाण्डे नवमः सर्गः।
......