श्री महादेव म्हणाले,
‘‘लंकेमध्ये हनुमंताने देवांनाही दुष्कर असे कार्य केलेले पाहून रावणाने लज्जेने तोंड खाली घातले. त्याने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावून म्हटले की, ‘‘हनुमंताने केलेले कृत्य तर तुम्ही पाहिलेलेच आहे. अलंघ्य अशा लंकेमध्ये प्रवेश करून, दुष्प्राप्य अशा सीतेला भेटून, अनेक वीर राक्षसांना मारून, मंदोदरीपुत्र अक्षाचा वध करून, लंका पूर्णपणे जाळून, समुद्र उल्लंघन करून, तुम्हा सर्वांना तुच्छ लेखून तो स्वस्थपणे परत गेला आहे. आता पुढे आम्ही काय करायचे? तुम्ही चांगले मंत्रज्ञ, सल्ला देणारे आहात. तुम्ही माझे कल्याण होईल असा प्रयत्नपूर्वक काहीतरी उपाय शोधून काढा.’’ रावणाचे भाषण ऐकून राक्षस त्याला म्हणाले, ‘‘राजन्! आपण रणांगणामध्ये लोकपालांनाही जिंकले आहे. तेव्हा रामाची भीती वाटण्याचे कारण नाही. इंद्राला बांधून त्याला आपल्या पुत्राने नगरात आणून ठेवले. कुबेराला जिंकून आणि त्याचे पुष्पक विमान आणून त्याचा उपभोग आपण घेत आहात. प्रभो! यमाला जिंकल्यामुळे त्याच्या कालपाशाची भीती आपणाला किंचितही नाही. वरुणाला नुसत्या हुंकारानेच जिंकले आहे. सर्व राक्षसांनाही आपण जिंकून घेतले आहे. महासुर जो मय त्याने तुमच्या भीतीपोटी आपली कन्या तुम्हाला देऊन तो तुम्हाला अगदी वश होऊन राहिला आहे. मग इतर महादैत्यांची काय गोष्ट आहे? हनुमंताने जो विध्वंस केला तो केवळ आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे, ह्या शूद्र वानरावर आम्ही पराक्रम तो काय दाखवायचा? ह्या विचाराने त्याने केलेल्या विध्वंसाकडे आम्ही लक्ष दिले नाही. तो वानर काय करणार, असे म्हणून निष्काळजीपणाने राहिलो म्हणून आम्हाला त्या हनुमंताने फसविले. आम्हा सर्वांना जर तो असे काही करणार असे कळले असते तर तो येथून जिवंत कसा गेला असता? आपण आज्ञा द्या की जगातील सर्व वानर आणि मनुष्ये नाहीशी करून आम्ही सर्व परत येतो. नाही तर एकएकाची या कार्यात योजना करा.’’
ह्या प्रसंगी कुंभकर्ण राक्षसाधिपती रावणाला म्हणाला, ‘‘जे कार्य तू सुरू केले आहेस, त्यात तू स्वतःच नष्ट होणार आहेस. त्या सीताहरणाच्या वेळी तू रामाच्या दृष्टिस पडला नाही हे तुझे भाग्यच आहे. रामाने जर तुला पाहिले असते तर तू जिवंत परत आलाच नसता. राम हा मनुष्य नसून तो साक्षात् देव, निर्विकार नारायण आहे. रामपत्नी यशस्विनी सीता ही प्रत्यक्ष भगवती लक्ष्मीच होय. त्या सिंहकटी सीतेला आणलेस त्यामुळे सर्व राक्षसांचा विनाश होणार आहे. मोठा मासा का असेना विषपिंड गिळून त्याची जी अवस्था होते तशी स्थिती जानकीला आणल्यामुळे तुझी झाली आहे. आता मागाहून ‘कसे होईल’ म्हणून तू दुःख करतो आहेस. प्रभो, अज्ञानाने जरी हे अयोग्य कर्म तुझ्या हातून घडले आहे तरी मी सर्व यथास्थित करीन. तू स्वस्थ रहा.’’
कुंभकर्णाचे भाषण ऐकून इंद्रजित म्हणाला, ‘‘महाराज! मला परवानगी द्या. मी रामाला, लक्ष्मणाला, सुग्रीवाला आणि सर्व वानरांना मारून पुन्हा आपल्याजवळ येतो.’’ इतक्यातच महाभगवद्भक्त आणि अतिशय बुद्धिमान बिभीषण तेथे आला. रामचरणयुगली त्याची चित्तवृत्ती एकाग्र होऊन गेली होती. देवशत्रू रावणाला त्याने प्रणाम केला आणि त्याच्याजवळ बसला. कुंभकर्णादि एकापेक्षा एक मदोन्मत्त अशा दैत्यांना तेथे पाहून बिभीषणाला अतिशय आश्चर्य वाटले. रावण कामातूर झाला आहे हे जाणून, ‘‘कुंभकर्ण, इंद्रजित तसेच महापार्श्व, महोदर, निकुंभ, कुंभ आणि अतिकाय हे समरांगणी रामापुढे टिकाव धरण्यास असमर्थ आहेत. सीतानामक मोठ्या ग्रहाने तुला ग्रासले आहे. त्यापासून तुझी सुटका होणे शक्य नाही. तरी सत्कारपूर्वक विपुल धन देऊन सीतेला रामाच्या स्वाधीन कर आणि तू सुखी हो. रामाच्या तीक्ष्ण बाणांनी लंका व्यापून राक्षसांची शिरे तुटत नाहीत तोपर्यंत जानकीला रघुनायकाला परत नेऊन देणे हेच तुझ्यासाठी योग्य आहे. जोपर्यंत पर्वतासमान शरीरांचे, नखे आणि दाढा या शस्त्रांनी लढणारे सिंहासारखे पराक्रमी महाबलिष्ठ वानर लंकेवर चाल करून तिचा नाश करत नाहीत तोपर्यंत सीतेला शीघ्र रामाकडे नेऊन रामाच्या स्वाधीन कर. मोठमोठ्या देवांनी तुझे रक्षण केले, प्रत्यक्ष शंकराने तुला पाठीशी घातले किंवा इंद्राच्या मांडीवर जाऊन बसलास किंवा मृत्युलोकी किंवा पाताळलोकी दडून राहिलास तरी रामाच्या हातून तू जिवंत सुटणार नाहीस.’’
बिभीषणाचे असे सौम्य, पवित्र आणि कल्याणप्रद भाषण होते तरी मरणोन्मुख प्राणी औषधाचा त्याग करतो त्याप्रमाणे त्या दुष्टाने त्या उपदेशाचा स्वीकार केला नाही. कालाची प्रेरणा होऊनच की काय तो दैत्य रावण बिभीषणाला म्हणाला, ‘‘मीच दिलेल्या उपभोगांनी पुष्टांग होऊन हा माझ्याजवळ रहात आहे. मी याचे हित करीत असूनही हा माझ्यावर उलटला आहे. हा मित्रपणा दाखवित आहे म्हणून हा माझा शत्रू झाला आहे, यात संशयच नाही. ह्या नीच कृतघ्नाशी संगति करणे मला योग्य वाटत नाही. ज्ञातीजनांचा नाश होण्याची नेहमी इच्छा करणारच. दुसरा कोणी जर अशा प्रकारचे एक जरी वाक्य बोलेल तर मी त्याचा तत्क्षणी वध करीन. राक्षसकुलाधमा! तुझा धिक्कार असो.’’
रावणाने अशाप्रकारे कठोर शब्दांनी निंदा केल्यावर हातात गदा घेऊन तो महाबलवान बिभीषण आपल्या चार मंत्र्यांसह सभेतून उडाला आणि रागाने संतप्त होऊन, आकाशात उभा राहून त्या दशानन रावणाला म्हणाला, ‘‘रावणा तू नाश करून घेऊ नकोस. मी तुला कल्याणाची गोष्ट सांगत असताना तू माझा धिक्कार केला आहे. तरीही तू माझा ज्येष्ठ बंधु असल्यामुळे तू मला पित्यासमान आहेस. माता काली सीता नावाने जनककन्या झाली आहे. रामरुपाने साक्षात काल दशरथाच्या घरी प्रगटला आहे. भूभार हरण करण्यासाठी हे दोघे येथे आलेले आहेत. त्या रामाकडूनच प्रेरणा घेऊन तू माझे हितकर भाषण ऐकत नाहीस. श्रीराम हा सर्वसाक्षी असूनही सर्वदा प्रकृतीच्या पलीकडे असतो. तो सर्वभूतांच्या आतबाहेर समस्वरूपाने संचारून राहिला आहे. नामरुपादि भेदाने तो तसतसा त्या त्या स्वरूपाने भासमान होतो. तो रागलोभादि मलरहित आहे. ज्याप्रमाणे मोठा अग्नि अनेक प्रकारच्या वृक्षांच्या ठिकाणी लागला असता त्यांच्या लहानमोठ्या आकृतिभेदाने अज्ञानी लोकांना त्या त्या आकाराचा दिसतो त्याचप्रमाणे पंचकोशादि भेदांमुळे परमात्मा त्या त्या स्वरूपाने भासत असतो. ह्याला दुसरा दृष्टांत म्हणजे निर्मळ स्फटिकाचा आहे. तो स्फटिक नील, पीत, रक्त वगैरे ज्या पदार्थाशी समागम पावतो त्या पदार्थाच्या रंगाचा दिसतो. तो परमात्मा नित्यमुक्त असूनही स्वतःच्या मायागुणात प्रतिबिंबित होऊन काल, प्रधान, पुरुष आणि अव्यक्त अशा चार प्रकारचा होतो. तो जन्मरहित परमात्मा प्रधानपुरुषापासून सारे जग निर्माण करतो आणि स्वतः निर्विकार असूनही कालरुपाने जगाचा संहार करतो. तो कालस्वरुपी भगवान ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यावरून तुझ्या वधाकरिता रामरूप घेऊन आला आहे. तो सत्यसंकल्प ईश्वर आपला हेतू अन्यथा कसा बरे करील? पुत्र, सैन्य, वाहने ह्यासह राम तुझा वध करणार आहे. रावणा! रामाकडून तुझा आणि सर्व राक्षसकुळाचा वध झालेला मी पाहू शकणार नाही म्हणून मी राघवाकडे जातो. मी गेल्यावर तू सुखी होऊन आपल्या घरात चिरकाल आनंदाने रहा.’’
रावणाच्या बोलण्यामुळे बिभीषणाने एका क्षणात सर्व सामुग्रीने युक्त अशा गृहाचा त्याग केला. रामाच्या चरणयुगुलाची सेवा करण्याच्या इच्छेने तो रामाकडे गेला. त्याचे सर्व मनोरथ पूर्ण झाले.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे द्वितीयः सर्गः।