श्री महादेव म्हणाले,
‘‘इकडे रामाला सुद्धा रावणाच्या सर्व हालचाली समजून आल्या. तो सीतेला एकांतात म्हणाला, ‘‘हे जानकी! माझे वचन ऐक. रावण भिक्षूचे रूप घेऊन तुझ्याजवळ येईल. म्हणून तू तुझ्या आकाराची छाया ठेव आणि माझ्या आज्ञेने एक वर्षपर्यंत अग्नीमध्ये गुप्त रुपाने रहा. हे कल्याणी! रावणाचा वध झाल्यानंतर तू मला येऊन मिळशील.’’ असे रामाचे बोलणे ऐकून तिने देखील लगेच त्याप्रमाणे केले. माया सीता बाहेर ठेवून ती स्वतः अग्नीमध्ये गुप्त झाली. त्या मायिक सीतेने मायानिर्मित हरिणाला पाहिले आणि रामाजवळ येऊन ती विनयपूर्वक म्हणाली, ‘‘रामा! तो पहा विचित्र सुवर्णमृग निर्भयपणे भटकत आहे. तो रत्नविभूषित असून त्याच्या अंगावर चित्रविचित्र असे ठिपके आहेत. मला तो हरीण आणून द्या. हा सुंदर हरीण मला क्रीडेसाठी होईल.’’
‘‘ठीक आहे’’, असे म्हणून रामाने धनुष्य घेतले आणि जाताना तो लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘लक्ष्मणा माझी प्राणप्रिया सीता, तिचे प्रयत्नपूर्वक रक्षण कर. ह्या अरण्यात भयंकर असे कपटी राक्षस आहेत. म्हणून येथे सावध राहून सीतेचे रक्षण कर. ही साध्वी आजपर्यंत कधीही कोणाच्या निंदेस पात्र झाली नाही.’’ तेव्हा लक्ष्मण म्हणाला, ‘‘हा मृगरुप धारण केलेला मारीच राक्षस आहे, यात मुळीच संशय नाही. अशाप्रकारचा हरीण कसा बरे असू शकेल?’’ राम म्हणाला, ‘‘हा जर मारीच आहे तर मी त्याचा वध करीन, हे निश्चितच आहे. जर हा खराच हरीण असेल तर मी त्याला सीतेच्या करमणुकीसाठी पकडून आणीन. मी आत्ताच जातो आणि त्याला बांधून आणतो. तू प्रयत्नपूर्वक सीतेचा सांभाळ कर.’’ असे बोलून लोकांना मोहित करणारी व जगाच्या रुपाने नटलेली माया ज्याच्या आश्रयाने राहते असा तो राम त्या मायामृगाच्या मागे धावत गेला. तो निर्विकार, चैतन्यमय पूर्ण असा राम असूनही त्या हरिणाचा पाठलाग करू लागला. ह्यावरून भगवान हरि ‘भक्तांवर दया करणारा’ म्हणतात ते वचन सत्य आहे. तरी पण हा मायामृग आहे हे समजूनही राम सीतेचे प्रिय करण्याच्या इच्छेने हरिणामागे गेला. त्या पूर्णकाम, आत्मस्वरूप, परमात्मा रामाला त्या हरिणाशी किंवा स्त्रीसोबत काय कर्तव्य होते? तो हरीण काही वेळ जवळ दिसे, क्षणात धावे आणि चटकन अदृश्य होत असे. नंतर पुष्कळ दूर अंतरावर दिसत असे. अशा तऱ्हेने त्याने रामाला खूप दूर नेले. तेव्हा रामाने ओळखले की हा खरोखर राक्षस आहे. मग त्याने एक बाण त्या राक्षसावर सोडला. त्याबरोबर त्याचे तोंड रक्तबंबाळ झाले आणि आपले मूळ रूप घेऊन तो जमिनीवर पडला. पडताना त्याने, ‘हाय, हाय, मी मेलो! महाबाहो लक्ष्मणा! लवकर ये, माझे रक्षण कर’ असा हुबेहूब रामासारखा आवाज काढला.
ज्याचे नामस्मरण मरणसमयी केले असता अज्ञानी मनुष्यही सायुज्य पावतो, त्या रामाकडून त्याच्याच समोर, त्याचे चिंतन करताना मारल्या गेलेला तो असुर सायुज्यगति प्राप्त करता झाला यात काय नवल? त्याच्या शरीरातून बाहेर पडलेले तेज रामरुपात प्रविष्ट झाले. ते पाहून सर्व देवांना फार आश्चर्य वाटले आणि म्हणाले, ‘‘अहाहा, ह्या मुनिहिंसक पातक्याने कर्म केले काय आणि मिळविले काय? हा सारा रामाचाच महिमा आहे, यात संशय नाही. पूर्वी एकदा हा रामबाणाने विद्ध झाला असता भयाने गृहवित्तादि जे जे काही होते ते ते सर्व टाकून देऊन मनात रामाचे ध्यान करीत सदैव रहात होता. त्यामुळे याची सर्व पापे नाहीशी झाली. शेवटी रामाकडून मारला जाऊन रामस्वरुपी मिळाला. ब्राह्मण असो की राक्षस असो, पापी असो वा अधार्मिक असो, रामाचे स्मरण करीत देहत्याग करतो तो परमपदाला पावतो.’’ असे परस्परात भाषण करून ते देव स्वर्गाला गेले.
इकडे रामाने विचार केला, ‘ह्या दुष्ट राक्षसाने हा लक्ष्मणा! असे माझ्या आवाजात शब्द काढले आणि देह सोडला. त्याचे कारण काय असावे? माझा आवाज ऐकून सीतेची अवस्था काय झाली असेल?’ ह्या चिंतेने रामाचे मन व्याकूळ झाले आणि तो तेथून लगेचच परतला. इकडे त्या मारीचाचे भाषण ऐकून सीता खूप घाबरली आणि लक्ष्मणाला म्हणाली, ‘‘लक्ष्मणा! तुझ्या बंधुला राक्षसाने पीडिले आहे, तरी तू तात्काळ जा. हा लक्ष्मणा! हे तुझ्या बंधुचे शब्द तू ऐकलेस ना?’’
तेव्हा लक्ष्मण तिला म्हणाला, ‘‘देवी! जो राम रागावला असता एका क्षणात त्रैलोक्याचाही नाश करू शकतो तो देवांनाही वंद्य राम असे दीनवाणे शब्द उच्चारील, हे शक्य तरी आहे का?’’ त्यावर सीतेने रागाने लक्ष्मणाकडे पाहिले. तिचे नेत्र अश्रूपूर्ण झाले. ती म्हणाली, ‘‘दुर्बुद्धे लक्ष्मणा! बंधुवर संकट यावे अशीच तुझी इच्छा आहे असे दिसते. रामाचा नाश करण्याची इच्छा करणाऱ्या भरताने तुला पाठविले आहे असे वाटते. रामाचा नाश झाल्यावर मला न्यावे यासाठीच तू आला आहेस. परंतु माझी प्राप्ती तुला होणार नाही. मी आताच प्राण देते. अशाप्रकारे आपल्या पत्नीचे हरण करण्याविषयी तू उद्युक्त होशील हे रामाला कळले नाही. रामाशिवाय दुसऱ्या कोणालाही, तुला काय किंवा भरताला काय, मी स्पर्श करणार नाही.’’ असे बोलून ती सीता रडू लागली.
ते ऐकून लक्ष्मणाला खूप दुःख झाले. त्याने कानावर हात ठेवले. तो म्हणाला, ‘‘हे संतापी स्त्रिये! तू मला असे बोलत आहेस, त्याअर्थी तुझा धिक्कार असो. अशाने तू नाहीशी होशील.’’ असे बोलून त्याने सीतेला वनदेवींच्या स्वाधीन केले. दुःखाने खिन्न होऊन तो रामाकडे गेला.
हीच संधी पाहून रावणाने भिक्षूवेष धारण केला आणि तो सीतेजवळ आला. त्याच्या हातात कमंडलू होते. सीतेने त्याला पाहून भक्तिभावाने नमस्कार केला. त्याची पूजा केली. त्याला कंदमूळे, फळे देऊन ती आदराने म्हणाली, ‘‘हे मुने! आपण कंदमूळे, फळे खावी आणि विश्रांती घ्यावी. माझे पति लवकरच येतील. ते आपले स्वागत अधिक सुंदर करतील. आपली इच्छा असल्यास बसावे.’’
भिक्षू रावण म्हणाला, ‘‘हे कमलाक्षी, तू कोण आहेस? तुझा पति कोण आहे? हे सुंदरी, राक्षसांचे वास्तव्य असलेल्या ह्या वनात तू कशाला राहते आहेस? ते सांग. त्यानंतर माझा वृत्तांत तुला सांगेन.’’ सीता म्हणाली, ‘‘अयोध्यापति दशरथ नावाचा सुप्रसिद्ध आणि श्रीमान राजा होऊन गेला. त्याचा सर्वगुणसंपन्न ज्येष्ठ पुत्र राम, त्याची मी धर्मपत्नी आहे. माझे नाव सीता असून मी जनकाची कन्या आहे. त्याचा धाकटा बंधु लक्ष्मण असून तो आपल्या ज्येष्ठ भावावर प्रेम करणारा आहे. पित्याची आज्ञा पालन करण्यासाठी दंडकारण्यात चौदा वर्षे निवास करण्यासाठी आला आहे. आता आपली वृत्तांतकथा सांगावी.’’
तो भिक्षू म्हणाला, ‘‘मी पौलस्त्याचा पुत्र असून रावण माझे नाव आहे. मी राक्षसांचा राजा आहे. तुझ्यावर माझे अत्यंत प्रेम आहे. त्यामुळे मी कामपरितप्त आहे आणि म्हणून माझ्या नगराला तुला नेण्यासाठी आलो आहे. मुनिवेष धारण करणाऱ्या रामाबरोबर राहून काय उपयोग? तरी तू माझा आश्रय करून माझ्या संगतीत उपभोग घे. आता तू वनवासाचे दुःख सोडून दे.’’ असे त्याचे भाषण ऐकून सीता भयभीत झाली. धैर्य धारण करून त्याला म्हणाली, ‘‘हे रावणा, तू माझ्याशी असे बोलत आहेस म्हणून रामाच्या हातानेच तुझा सर्वनाश होईल. थोडा वेळ थांब. तो राम सुद्धा आपल्या धाकट्या बंधुसह येईल. सिंहाच्या पत्नीला ससा कसा बरे घाबरवू शकतो? मला घाबरविण्याचे सामर्थ्य कोणात आहे? रामबाणाने घायाळ होऊन तू जमिनीवर पडशील.’’
हे सीतेचे भाषण ऐकून रावण खूप संतप्त झाला. तो स्वतःचे देहभान सुद्धा विसरला. त्याने आपले भयानक असे रुप, दहा तोंडे, वीस हात, कृष्णमेघाप्रमाणे कांति असे रुप दाखवले. ते बघून वनदेवी, सर्व प्राणिमात्र घाबरले. नंतर रावणाने सीतेच्या पायाखालील जमीन आपल्या नखांनी उकरली आणि आपल्या बाहुंनी तिला उचलून धरले आणि रथात बसवून लगेचच आकाशमार्गाने निघाला. ती जानकी ‘हा रामा! हा लक्ष्मणा!’ असा आक्रोश करू लागली. तिचे मन भयभीत झाले होते. दीन होऊन तिने आपली दृष्टि भूमीकडे लावली होती. ते सीतेचे दीनवाणे आक्रंदन पक्षिराज जटायुला ऐकू आले. तेव्हा तो पर्वतशिखरावरून लगेच उठला. त्याची चोच तीक्ष्ण होती. तो रावणाला म्हणाला, ‘‘थांब, थांब. जनरहित अशा वनाश्रमातून तू त्या लोकनाथ रामाच्या पत्नीला माझ्या समोरून, मला नकळत चोरून घेऊन जाणारा कोण? यज्ञातील मंत्रांनी पवित्र झालेला पुरोडाश (होमद्रव्य) जसा एखाद्या कुत्र्याने हरण करावा तसे सीता हरण करणाऱ्या तुझी अवस्था आहे.’’ असे म्हणून तीक्ष्ण चोचीने त्याने रावणाच्या रथाचा चक्काचूर केला. घोड्यांचे तुकडे केले आणि धनुष्याचे पायांनी चूर्ण केले. हे पाहून सीतेला सोडून रावणाने हातात खङ्ग घेऊन संतप्त होऊन त्या बुद्धिमान पक्षिराजाचे पंख तोडले. त्यामुळे तो पक्षी पडला. किंचित प्राण शिल्लक आहेत अशा धुगधुगीच्या अवस्थेत जमिनीवर पडला. रावणाने सुद्धा दुसरा रथ जोडून त्यात सीतेला बसविले आणि निघाला.
‘‘हा राम! हा राम! हा जगन्नाथ राम! दुःखमग्न अशा स्थितीत मला आपण पाहात नाही काय? आता मला कोणी त्राता नाही,’’ असा आक्रोश ती करू लागली. ती म्हणाली, ‘‘आपल्या पत्नीला राक्षस हरण करून नेत आहेत तरी तिला सोडवा. महाभागा लक्ष्मणा! मी अपराधी आहे. माझे रक्षण करा! भाऊजी, मी तुम्हाला कठोर शब्दांनी ताडन केले तरी मला क्षमा करा.’’
अशारितीने आक्रोश करीत असलेल्या सीतेला घेऊन तो रावण वायुवेगाने निघून गेला. त्याला शंका आली की राम मध्येच येईल. रावण सीतेला नेत असताना तिने आपली दृष्टी खाली भूमिकडे लावली होती. अशा स्थितीत त्या कमलनयन रामाला आपले वृत्त कळवावे या हेतुने आपल्या अंगावरील वस्त्रात आपले दागिने बांधून सीतेने ते खाली पर्वतावर टाकले. नंतर समुद्र ओलांडून तो रावण लंकेला गेला. आपल्या अंतःपुरातील एकांतस्थल असलेल्या अशोकवनात त्याने तिला ठेवले. तिच्या रक्षणासाठी त्याने राक्षसिणी ठेवल्या आणि मातृबुद्धिने तिचे पालन केले. तेथे ती अत्यंत कृश झाली. अत्यंत दीनवाणी राहणारी, अभ्यंगस्नानादि संस्काररहित असल्यामुळे दुःखाने अति व्याकूळ होऊन सीता ‘हा रामा! हा रामा!’ असा विलाप करीत त्या राक्षसिणींच्या समुदायात राहिली.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अरण्यकाण्डे सप्तमः सर्गः।