श्री महादेव म्हणाले,
‘‘संपातीचे भाषण ऐकून सर्व वानर आश्चर्यचकित झाले. त्यांनी संपातीला म्हटले, ‘‘भगवन्! आपण आपलाही सर्व वृत्तांत मुळापासून सांगावा.’’ नंतर संपातीने आपण पूर्वी काय काय केले होते तो संपूर्ण वृत्तांत सांगितला. तो म्हणाला, ‘‘पूर्वी मी आणि जटायु असे आम्ही दोघे बंधु पूर्ण तारूण्यात असता आमच्यातील बलशक्तीचा आम्हाला फार गर्व झाला होता. पुढे कोणाचे सामर्थ्य किती आहे हे पाहण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण होऊन आकाशातून फिरत फिरत सूर्यमंडळापर्यंत जाण्याचे आम्ही ठरविले आणि यौवनमदाने विचार न करताच वर उडालो. आम्ही कित्येक सहस्त्र योजने वर गेलो. तेथे सूर्याच्या प्रखर तेजाने जटायुचे शरीर होरपळून गेले. ते पाहून माझ्या मनात दया उत्पन्न झाली आणि त्याचे रक्षण करण्यासाठी त्याला माझ्या पंखांखाली झाकून घेऊन मी उभा राहिलो. त्यामुळे सूर्यकिरणांनी माझे पंख जळून गेले आणि मी ह्या विंध्य पर्वताच्या शिखरावर पडलो. वानरश्रेष्ठहो! उंचावरून खाली पडल्यामुळे मला मूर्च्छा आली. तीन दिवसांनी मी पुनः शुद्धीवर आलो. परंतु पंख जळाल्यामुळे भ्रमिष्ट होऊन ‘हा कोणता देश आहे किंवा भोवताली कोणती पर्वतशिखरे आहेत’ हे काहीच मला कळत नव्हते. हळूहळू मी डोळे उघडून पाहिले तो तेथे एक पुण्याश्रम माझ्या दृष्टीस पडला. मग मी मंद पावले टाकीत त्या आश्रमाजवळ गेलो. तेथे चंद्रमा नावाचा एक मुनिश्रेष्ठ रहात असे. मला पाहून आश्चर्यचकित होऊन तो म्हणाला, ‘‘संपाते! आज तुला काय झाले आहे? तुझे शरीर कोणी विरूप केले? पूर्वी तू अत्यंत बलवान होतास, हे मला चांगले माहीत आहे. तुझे पंख जळण्याचे कारण काय आहे? तुला जर सांगणे योग्य वाटत असेल तर सांग. तेव्हा मी माझा सर्व वृत्तांत सांगितला आणि अत्यंत दुःखित होऊन म्हटले, ‘‘मुनिश्रेष्ठा! वणव्याप्रमाणे दुःसह अशा दाहाने मी पोळत आहे. प्रभो! पंखांशिवाय मी प्राण कसे धारण करणार?’’ असे मी त्या मुनीला सांगितल्यावर त्यांनी दयार्द्र दृष्टीने माझ्याकडे पाहिले आणि म्हटले, ‘‘वत्सा! आता मी काय सांगतो ते ऐक आणि मग तुला वाटेल ते कर. ह्या दुःखाचे मूळ शरीर हेच आहे आणि शरीर हे कर्मामुळे उत्पन्न होत असते. देहावर नराची अहंताबुद्धी असते म्हणून त्याच्या हातून कर्म घडत असते. अहंकार हा अनादि असून अविद्येपासून उत्पन्न झाला आहे. अर्थात तो जड आहे. आगीने तप्त झालेल्या लोखंडाच्या लाल गोळ्याप्रमाणे अहंकार आहे. तो सदा चैतन्याच्या प्रतिबिंबाने युक्त असतो. अहंकाराशी देहाचे तादात्म्य झाले असता देह चैतन्ययुक्त होतो. ह्याच अहंतेच्या गुणाने आत्म्याला ‘देह मी’ अशी बुद्धि होते आणि त्यामुळेच सुखदुःखादिकांची प्राप्ती करून देणारा संसार भोगावा लागतो. आत्मा वास्तविक निर्विकार आहे. तरी त्याच्यावर मिथ्या तादात्म्य आरोपिले जाते, त्यामुळे तो जीव ‘मी देह आहे, मी कर्मे करीत आहे’ अशा संकल्पाने सर्वदा कर्मे करीत असतो. मग त्यांच्या फलांनी बद्ध होऊन कर्मे चांगली वाईट असतील त्यानुसार पराधीन होऊन उच्चनीच योनीत नित्य भ्रमण करीत राहतो. ‘मी यज्ञदानादि पुष्कळ पुण्यकर्म केले आहे. तरी स्वर्गात जाऊन निश्चित मी सुख भोगेन’ असा तो संकल्प करतो. असे चिंतन नेहमी केल्यामुळे तो स्वर्गाला जाऊन मोठ्या सुखाचा चिरकाल उपभोग घेतो. परंतु ते त्याचे पुण्य संपले की त्याची इच्छा नसतानाही कर्माच्या प्रेरणेने तो अधोलोकी येऊन पडतो. प्रथम तो जीव चंद्रमंडलावर पडतो. तेथून पुन्हा दवाच्या संगतीने तो भूमीवर येऊन पडतो. व्रीहि, तांदूळ इत्यादि धान्यात चिरकाल वसती करतो. त्या धान्याचे चार प्रकारचे भोज्य पदार्थ होऊन ते पुरुष भक्षण करतात. त्यापासून रेत उत्पन्न होऊन त्याचा सेक ऋतुकाली पुरुषाकडून स्त्रीच्या गर्भाशयामध्ये केला जातो. पहिल्या दिवशी ते रेत योनीरक्ताने मिश्रित होऊन आणि गर्भवेष्टनाने वेष्टिले जाऊन कलल निर्माण होते आणि मग ते घट्ट होते. नंतर पाच रात्री गेल्यावर त्याला बुडबुड्यासारखा आकार प्राप्त होतो. सात रात्री झाल्यानंतर त्याची मांसपेशी तयार होते. पंधरा दिवस ती पेशी रक्ताने भरलेली असते. पुढे पंचवीस रात्री होऊन गेल्या की तिच्यामधेच अंकुर उत्पन्न होतो. मान, मस्तक, खांदा, पाठीचा कणा आणि उदर ही पाच अंगे एक महिना झाला असता क्रमाने त्याला प्राप्त होतात. दोन महिने झाले असता क्रमाने हात, पाय, बरगड्या, कमर, गुडघे उत्पन्न होतात. इतर काही त्यात होत नाही. तीन महिने झाले असता क्रमाने अंगाचे सांधे उत्पन्न होतात. चौथ्या महिन्यात सर्व बोटे येतात. पाचव्या महिन्यात नाक, कान, डोळे, दंतपंक्ति, नखे, गुह्यस्थान ही त्याला प्राप्त होतात. सहाव्या महिन्यांच्या सुरुवातीला कानांची छिद्रे निर्माण होतात. गुद, शिश्न, उपस्थ आणि नाभी हे अवयव ह्या महिन्यात मनुष्याला प्राप्त होतात. सातव्या महिन्यात रोम आणि मस्तकावरील केस निर्माण होतात. आठव्या महिन्यात सर्व अवयव स्पष्टपणे वेगवेगळे निर्माण होतात. हे विहगा (संपाते), अशाप्रकारे स्त्रीच्या उदरात गर्भ वाढत असतो. जीवाला पाचव्या महिन्यातच चेतनाशक्ति प्राप्त होते. नाळेच्या सूक्ष्म रंध्रातून आईने खाल्लेल्या अन्नातील सार गर्भातील पिंडास पोहोचते आणि त्याची वाढ होते. स्वतःच्या कर्मबलाने तो मरत नाही. मग मातेच्या जठरानलाने संतप्त झाल्यावर त्याला आपले सर्व पूर्वजन्म आणि त्यातील कर्मे आठवू लागतात आणि मग तो पश्चात्तापाने म्हणतो की, ‘आजपर्यंत अनेक सहस्त्र योनीत जन्म घेतला आणि पुत्र, स्त्रिया इत्यादिकांचा संबंध त्याचप्रमाणे पशुबांधव यांचे सुख ही कोट्यावधी वेळा मी अनुभवले आहे. कुटुंबपोषण करण्यात आसक्त होऊन गेल्यामुळे न्यायमार्गाने व अन्याय्य मार्गानेही धनार्जन केले. पण स्वप्नात देखील कधी मी विष्णुचे चिंतन केले नाही. काय माझे दुर्दैव सांगावे. आता त्याचे फळ म्हणून हे अतिखडतर असे गर्भवासदुःख मी भोगीत आहे. नश्वर शरीराला मी शाश्वत मानले. आशातृष्णांनी व्याप्त होऊन अनेक निषिद्ध कार्ये आचरण केली आणि स्वतःचे असे काहीच हित केले नाही. म्हणून कृतकर्माचे फळ म्हणून मला आजपर्यंत अनेक दुःखे भोगावी लागली. नरकसमान गर्भवासातून माझी कधी बरे सुटका होईल? यापुढे मी नित्य विष्णुचेच पूजन करीत राहीन’, असा विचार करतो आहे तोच त्याची जन्मवेळ येऊन तो योनिद्वारात कासाविस होऊ लागतो. नंतर नरकातून पापी सुटावा त्याप्रमाणे तो तेथून बाहेर पडतो. दुर्गंधीने भरलेल्या व्रणातून, योनीरुप क्षतातून तो एखाद्या किड्यासारखा बाहेर पडतो. त्यानंतर बाल्यादि सर्व दुःखे प्राप्त होतात. अशारितीने सर्व प्राण्यांना दुःख भोगावे लागते. गृध्रा! यौवनादि अवस्थांमध्ये भोगावी लागणारी दुःखे तू भोगिली आहेस आणि ती सर्वांना माहीतही आहे. म्हणून त्याचे वर्णन विस्ताराने केले नाही. अशारितीने ‘देह मी’ अशी मति उत्पन्न होऊन अभिमान उत्पन्न होतो आणि त्यामुळेच नरकादि यातना व गर्भवास ही दुःखे प्राप्त होतात. म्हणून आत्मा स्थूल व सूक्ष्म या दोहोंपेक्षा वेगळा असून प्रकृतीच्याही पलीकडे आहे, असे जाणून प्राण्याने देहादिकांवरची ममता सोडून द्यावी आणि आत्मज्ञान सारे विश्व आत्मरुप आहे हे ज्ञान संपादन करावे. आत्म्याला जाग्रदादि अवस्था नाही. त्याचे स्वरूप चिद्रूप व आत्मज्ञान, आत्मस्वरुपाचे ज्ञान होऊन अज्ञानापासून उत्पन्न होणारा मोह नष्ट झाला असता देह पडो वा प्रारब्धकर्मानुसार राहो. ज्ञान्याला अज्ञानजन्य दुःख किंवा सुख ह्यांची बाधा होत नाही. म्हणून प्रारब्धकर्माचा नाश होईपर्यंत अंगावर कात धरून राहणाऱ्या सर्पाप्रमाणे देह सांभाळावा. हे पक्ष्या! आणखी एक हिताची गोष्ट तुला सांगतो ती ऐक. त्रेतायुगामध्ये निर्विकार नारायण दशरथपुत्र होऊन रावणाच्या वधासाठी दंडकारण्यात येईल. त्याच्याबरोबर त्याची पत्नी सीता व बंधु लक्ष्मण येतील. एकदा संधी साधून, अरण्यात दोघे भाऊ नाहीत असे पाहून रावण चोरासारखा येऊन आश्रमात असलेल्या सीतेला घेऊन जाईल आणि लंकेत नेऊन ठेवील. पुढे सुग्रीवाच्या आज्ञेनुसार तिचा शोध घेत वानर समुद्राच्या तीरावर येतील. तेथे काही कारण घडून त्यांचा व तुझा समागम होईल यात मुळीच शंका नाही. तेव्हा तू त्यांना सीतेचे वर्तमान योग्य तऱ्हेने सांग. म्हणजे तुला तत्काळ पुन्हा दोन पंख उत्पन्न होतील.’ संपाती म्हणाला. त्या मुनिश्रेष्ठ चंद्र नामक मुनीने मला असा उपदेश केला. हे पहा, अत्यंत कोमल असे नवे फुटलेले माझे पंख! तुमचे कल्याण असो. मी आता जातो. तुम्हाला आता सीता दिसेल ह्यात काही शंका नाही. हा दुर्लंघ्य सागर उल्लंघून जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. वानर हो! ज्याचे केवळ नामस्मरण केले असता दुर्जन सुद्धा अमर्याद अशा संसारसमुद्राला तरून शाश्वत अशा परम विष्णुपदाला जातो त्याच त्रैलोक्यपालक श्रीरामाचे तुम्ही भक्त आहात. तुम्हाला सामान्य समुद्र तरून जाता येणार नाही, हे कसे काय होईल?
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे किष्किन्धाकाण्डे अष्टमः सर्गः।