श्री महादेव म्हणाले,
‘‘नंतर सीतेला नमस्कार करून हनुमंत सीतेला म्हणाला, ‘‘तू मला आता रामाकडे जाण्यासाठी आज्ञा दे. मी आता जातो. राम कनिष्ठ बंधुसह तुझ्या भेटीला येईल.’’ असे बोलून मारुतीने जानकीला तीन प्रदक्षिणा घातल्या आणि नमस्कार करून तो जायला निघाला. निघताना तो म्हणाला, ‘‘देवी! मी जातो. तुझे कल्याण होईल. राम-लक्ष्मण सुग्रीव आणि त्याबरोबर दशसहस्त्र वानरांचे, कोट्यावधी पक्ष्यांचे थवे येतील. त्यांची तुझी भेट लवकरच होईल.’’ त्यावर दुःखाने कृश झालेली जानकी हनुमंताला म्हणाली, ‘‘तुझी भेट झाल्यामुळे मी माझे दुःख विसरून गेले होते. आता तर तू येथून जात आहेस. यापुढे मला रामवार्ता ऐकायला मिळणार नाही. पुढे माझे कसे होणार?’’ मारुती म्हणाला, ‘‘देवी! असे जर आहे तर माझ्या खांद्यावर बैस. हे जानकी! तुझी इच्छा असेल तर एका क्षणात तुझी आणि रामाची भेट करून देतो.’’ सीता म्हणाली, ‘‘राम समुद्राचे शोषण करून किंवा बाणांच्या समूहयोगाने त्यावर सेतू बांधून वानरांसह येथे येईल आणि युद्धात रावणाचा वध करून मला घेऊन जाईल, तर रामाची कीर्ती पृथ्वीवर चिरकाल राहील. म्हणून तू जा. मी कसे तरी प्राण धारण करीन.’’ अशारितीने सीतेने जाण्यास परवानगी दिल्यावर त्या वानरवीराने तिला प्रणिपात केला आणि महासमुद्राच्या पलीकडे जाण्यासाठी पर्वतशिखरावर गेला. तेथून त्या महाबलाढ्य मारुतीने पायाने पर्वताला दाबले आणि वायुवेगाने पुढे चालला. त्याच्या भाराने पर्वत जमिनीमध्ये इतका दबून गेला की तो तीस योजने उंच होता तरी आता पृथ्वीच्या बरोबरीचा सपाट झाला. मारुतीने आकाशातून जात असता मोठी गर्जना केली. ती ऐकून सर्व वानरांना मारुती आला असे समजले. त्या सर्वांना अतिशय आनंद झाला. त्यांनी मोठा भुभुःकार केला. ते आपसात म्हणाले, ‘‘हे वानरांनो! वानरपुंगव हनुमंतच आला आहे. पहा! त्याच्या शब्दावरुनच कळते आहे की हा कार्य करून आला आहे.’’ असे ते वानरवीर बोलत असता मारुती पर्वताच्या शिखरावर उतरला आणि वानरांना म्हणाला, ‘‘सीता मला दिसली. लंकेचा आणि तेथील उपवनाचा मी नाश केला. मी रावणाशी संभाषण केले आणि नंतर पुन्हा इकडे आलो. आताच आपण राम आणि सुग्रीव यांना भेटायला जाऊ या.’’ असे म्हणताच त्या सर्व वानरांनी आनंदाने मारुतीला आलिंगन दिले. कित्येकांनी त्याच्या पुच्छाचे चुंबन घेतले. कित्येक तर मोठ्या आनंदाने, उत्कंठेने नाचू लागले. नंतर ते सर्व मारुतीसह प्रवर्षण पर्वतावर गेले. तेथे जात असता सुग्रीवाने राखून ठेवलेले ‘मधु’ नावाचे वन त्यांना दिसले. तेव्हा ते वानरवीर अंगदाला म्हणाले, ‘‘वीरा अंगदा! तू महाबुद्धिमान आहेस. आम्ही खूप भुकेलेलो आहोत. आम्हाला अनुज्ञा दे. आज आम्ही येथील फळे खातो आणि अमृतासारखे गोड मद्य पितो. संतुष्ट मनाने आताच आम्ही कनिष्ठ बंधुसह असलेल्या रामाला भेटायला जाऊ.’’ अंगद म्हणाला, ‘‘वानरश्रेष्ठहो! हा हनुमंत कार्य करून आला आहे. त्याच्या कृपेचे फळ म्हणून येथील मद्य प्राशन करा. चला आणि फळे, मुळे भक्षण करा.’’ नंतर त्या उपवनात वानर शिरले आणि त्यांनी मद्यप्राशन करण्यास सुरुवात केली. दधिवक्राने पाठविलेल्या रक्षकांना ते मुळीच ऐकत नव्हते. ते वनरक्षक वानरवीरांना, मद्यप्राशन करणार्यांना मारू लागले तेव्हा त्यांनीही त्या रक्षकांना बुक्क्यांनी लाथांनी मारून चोपले आणि पुनः मद्यप्राशन करू लागले. तेव्हा दधिमुखाला क्रोध आला. हा दधिमुख सुग्रीवाचा मामा होता. तो त्या रक्षकांना बरोबर घेऊन जेथे वानरराज सुग्रीव होता तेथे आला. त्याला म्हणाला, ‘‘राजा! फार दिवस रक्षण करून ठेवलेल्या तुझ्या मधुवनाचा कुमार अंगदाने व हनुमंताने विनाश केला.’’ दधिमुखाने सांगितलेला वृत्तांत ऐकून सुग्रीवाच्या मनाला आनंद झाला. तो म्हणाला, ‘‘वायुपुत्र सीतेला भेटून आला असला पाहिजे यात संशय नाही. असे नसते तर माझ्या मधुवनाकडे नजर टाकण्याची कोणात हिंमत होती? त्यातही हे कार्य मारुतीकडूनच झाले असले पाहिजे यात शंका नाही.’’ सुग्रीवाचे भाषण ऐकून रामाला आनंद झाला. तो सुग्रीवाला म्हणाला, ‘‘राजा! सीतेची गोष्ट काढून दधिवक्राजवळ जे तू भाषण केलेस ते काय होते?’’ सुग्रीव म्हणाला, ‘‘देवा! हनुमंत वगैरे सर्व वानरवीर आज मधुवनात शिरले आहेत त्याअर्थी त्यांना सीतेची वार्ता कळली असली पाहिजे. त्यांनी संपूर्ण मधुवन खाऊन टाकले आहे. तसेच रक्षकांनाही ताडन केले आहे. तुझे कार्य केल्याशिवाय माझ्या मधुवनाकडे पाहणे सुद्धा शक्य नव्हते. म्हणून सीतादेवीचा शोध लागला आहे हे निश्चित आहे.’’ तो रक्षकांना म्हणाला, ‘‘रक्षकांनो! तुम्ही घाबरू नका. माझ्या आज्ञेनुसार त्या अंगदादिकांना माझ्याजवळ घेऊन या.’’ सुग्रीवाचे भाषण ऐकून ते रक्षक वायुवेगाने तेथून गेले. ते हनुमंत वगैरे वानरांना म्हणाले, ‘‘सुग्रीव रामलक्ष्मणासह तुम्हाला भेटू इच्छित आहे. तरी राजा सुग्रीवाची आज्ञा मानून त्याच्याकडे जा. महाबलवान वीर हो! त्यांना अतिशय आनंद झाला असून त्यांनी तुम्हाला ताबडतोब बोलावले आहे.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून आकाशात उड्डाण करून ते वानरश्रेष्ठ तिकडे जाण्यासाठी निघाले. नंतर हनुमंत, युवराज अंगदाला पुढे करून रामसुग्रीवांच्या अग्रभागी, ते भूमीवर त्वरित उतरले. हनुमान रामाला पाहून म्हणाला, ‘‘मी सीतेला भेटलो. ती खुशाल आहे.’’ असे सांगून त्याने आधी रामाला आणि सुग्रीवाला साष्टांग नमस्कार केला. तो म्हणाला, ‘‘राजेंद्रा, जानकीने आपली खुशाली तुला कळवली आहे. ती शोकाने व्याप्त असून अशोकवनिकेमध्ये शिंशपा वृक्षाच्या मुळाचा आश्रय करून राहात आहे. प्रभो, तिच्या सभोवती राक्षसींचा वेढा आहे. अन्नत्याग केल्यामुळे ती कृश झाली आहे. तिने मलिन वस्त्र घातले आहे. ‘हा रामा! हा रामा!’ असा ती सारखा शोक करते आहे. ती एकवेणी असल्याचे मी पाहिले. नंतर मी वृक्षाच्या फांदीवर सूक्ष्म रूपाने बसून तुझी कथा वर्णन केली आणि सावकाशपणे तिचा विश्वास संपादन केला. जन्मापासून विस्तारपूर्वक तुझी कथा मी तिला वर्णन करून सांगितली. ती याप्रमाणे सांगितली, हे रामा, तू दंडकारण्यात आलास, पुढे तू जवळ नसता जानकीला दशाननाने हरण करून नेले. नंतर तू सुग्रीवाशी मैत्री करून वालीचा वध केलास. जानकीच्या शोधासाठी सुग्रीवाने महाबलवान, चतुर, इंद्रियनिग्रही वानर पाठविले. ते सर्व वेगवेगळ्या दिशांना गेले. त्यापैकी मी एक इकडे लंकेत आलो आहे. मी सुग्रीवाचा सचिव असून रामाचा दास आहे. भाग्याने जानकी मला दिसली म्हणून आज माझा प्रयत्न सफल झाला आहे. हे माझे बोलणे ऐकून सीतेने आनंदाने डोळे उघडले आणि म्हटले, ‘‘कानांना अमृतासारखे गोड वाटणारे हे मंगल शब्द कुणी बरे मला ऐकविले? हे खरे असेल तर त्या बोलणाऱ्याने माझ्यासमोर प्रगट व्हावे.’’ हे ऐकून माझ्या सूक्ष्मरूप वानराकारातच मी जानकीला प्रणाम केला आणि हात जोडून दूर उभा राहिलो. हे प्रभो! त्या वेळी सीतेने ‘तू कोण’ इत्यादि अनेक प्रश्न विचारले. हे शत्रूनाशना! मी त्या सर्वांची क्रमाने उत्तरे नम्रपणाने सीतेला निवेदन केली. नंतर मी आपण दिलेली अंगठी देवीला दिली. त्यामुळे तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसला आणि ती म्हणाली, ‘‘राक्षसिणी अनेक प्रकारे छळ करीत आहे. मला घाबरवित आहेत. हे हनुमंता! तू पाहिले आहेसच. हे सर्व तू श्रीरामचंद्रांना कळव.’’ मी म्हणालो, ‘देवी! राम देखील तुझी एकसारखी काळजी करीत आहे. तुझी वार्ता त्याला काहीच न कळल्यामुळे तो रात्रंदिवस शोक करीत आहे. आताच मी जाऊन तुझी सर्व स्थिती रामाला कळवतो. तुझा वृत्तांत ऐकल्याबरोबर राम सुग्रीव, लक्ष्मण, वानर सेनापती यांना बरोबर घेऊन तुझ्याकडे येईल आणि रावणाचा सहकुटुंब वध करून तुला आपल्या राजधानीला घेऊन जाईल. देवी! जेणेकरून प्रभू रामचंद्र माझ्यावर विश्वास ठेवतील अशी काही तरी खूण दे, असे मी म्हटल्यावर तिने आपल्या केशकलापातील आवडता चूडामणि काढून मला दिला. खूण म्हणून पूर्वी चित्रकूट पर्वतावर घडलेली कावळ्याची गोष्ट सांगितली. डोळ्यात अश्रू दाटलेल्या अवस्थेत तिने मला आणखीही सांगितले की ‘‘रामाला माझी खुशाली सांग आणि लक्ष्मणाला सांग की पूर्वी मी जे काही वाईट शब्द बोलले असेन त्याबद्दल मला क्षमा कर. हे कुलनंदना! अजाणपणाने ते शब्द माझ्या मुखातून निघाले होते. तू आता माझ्यावर दया करून, जेणेकरून राम मला सोडवील तसे कर.’’ असे बोलून सीता रडू लागली. तिला अतिशय दुःख झाले होते. रामा! मीही तुझा सर्व वृत्तांत सांगून तिला आश्वासन दिले. रामा! नंतर तिची अनुज्ञा घेऊन मी तुझ्याकडे येण्यासाठी निघालो. तेथून येतेवेळी रावणाच्या प्रिय असलेल्या अशोकवाटिकेचा मी विध्वंस केला. ती उपटून टाकली. क्षणात तेथील पुष्कळ राक्षसांचा वध केला. रावणाच्या मुलाला ठार मारले. रावणाशी संभाषण केले आणि संपूर्ण लंका जाळून लगेचच इकडे आलो.’’
हनुमंताचे भाषण ऐकून रामाला अतिशय आनंद झाला. तो म्हणाला, ‘‘हनुमंता! देवांना देखील दुष्कर असे कार्य तू केले आहेस. माझ्यावर तू केलेल्या उपकारांची परतफेड मी कशी करणार हे मला काही कळत नाही. मारुते! माझे सर्वस्व म्हणून जे काही माझ्याजवळ आहे, ते मी आता तुला देतो.’’ असे म्हणून त्या वानरश्रेष्ठाला रामाने जवळ ओढून गाढ आलिंगन दिले. त्या रघुश्रेष्ठ रामाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले व त्याला फार मोठा आनंद झाला. मग भक्तवत्सल श्रीराम हनुमंताला म्हणाले, ‘‘वानरश्रेष्ठा! मी परमात्मा आहे, अशा माझे आलिंगन लोकात प्राप्त होणे ही अतिशय दुर्लभ अशी गोष्ट आहे. तुला ते मिळाले. तू माझा भक्त, अतिशय लाडका, आवडता असा आहेस. ज्याच्या पदकमलांची तुलसीपत्रादिकांनी पूजा केली असता अनुपम अशा विष्णुपदाची प्राप्ती होते त्याच रामचंद्राने अनेक पुण्यराशी संचित करून ठेवणाऱ्या वायुपुत्राच्या शरीराला आलिंगन दिले. त्याअर्थी त्या मारुतीला ते विष्णुपद प्राप्त झाले हे वेगळे सांगणे नको.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे सुंदरकाण्डे पञ्चमः सर्गः।