श्री महादेव म्हणाले,
‘‘सत्याचरणाचे पालन करणारा, ऐश्वर्यसंपन्न, वीरश्रेष्ठ योद्धा संपूर्ण जगात सुप्रसिद्ध असलेला दशरथ नावाचा अयोध्येचा राजा होता. परंतु निपुत्रिक असल्यामुळे मनाने सदैव खिन्न रहात असे. एकदा तो कुलगुरु वसिष्ठ मुनिंना वंदन करुन म्हणाला, ‘‘आचार्य, सर्व उत्तमलक्षणयुक्त असे पुत्र मला कसे प्राप्त होतील? माझे सर्व राज्य, ऐश्वर्य हे पुत्रहीनतेमुळे दु:खदायकच ठरत आहे.’’ तेव्हा वसिष्ठ त्याला सांगतात, ‘‘तुला इंद्रादि देवाप्रमाणे जणू लोकपालच की काय असे सत्त्वगुणयुक्त चार पुत्र होतील. त्यासाठी आपल्याला लवकरात लवकर पुत्रकामेष्ठि नावाचा यज्ञ करावयाचा आहे. सर्वप्रथम शांतेचा पति, जो ऋष्यशृंग ऋषि त्यांना लवकर आमंत्रण देऊन घेऊन यावे.’’ असे वसिष्ठांनी सांगितल्यानंतर तत्काळ दशरथाने मंत्री पाठवून ऋष्यशृंग ऋषिंना आणले आणि स्वत: शुद्ध होऊन इतर अनेक पुण्यवान ऋषिमुनींच्या साहाय्याने राजाने पुत्रकामेष्ठि यज्ञ सुरु केला. अतिशय श्रद्धेय, भावभक्तियुक्त अंत:करणाने यज्ञात आहूति अर्पण केल्या जात असताना, सुवर्णाप्रमाणे तेजस्वी अग्निदेव सुवर्णपात्रात ठेवलेले पायस हातात घेऊन यज्ञातून प्रगट झाले आणि म्हणाले ‘‘हे राजन, प्रत्यक्ष देवांनी निर्माण केलेला आणि पुत्रप्राप्ती करुन देणारा हा दिव्य पायस तू घे. प्रत्यक्ष परमात्माच तुझ्या घरी पुत्ररुपाने अवतार घेणार आहे यात शंका नाही.’’ असे बोलून तो पायस राजाला देऊन अग्नि गुप्त झाला. आपले मनोरथ पूर्ण होणार असे समजून दशरथाने आनंदाने आचार्य वसिष्ठ आणि ऋष्यशृंग इ. मुनिश्रेष्ठांना वंदन कले. या दोन्ही ऋषिंच्या अनुज्ञेने त्याने त्या पायस प्रसादाचे दोन सारखे भाग करुन कौसल्या आणि कैकेयी ह्या दोघींना अर्धे अर्धे दिले. नेमके त्याचवेळी प्रसादाचा लाभ व्हावा या उद्देशाने सुमित्रा तेथे आली तेव्हा कौसल्येने मोठ्या आनंदाने आपल्या भागातील अर्धा भाग सुमित्रेला दिला. कैकेयीने सुद्धा प्रेमाने आपल्यातील अर्धा भाग दिला. त्या तीनही राण्यांनी पायस भक्षण केला. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी या तिघींनाही गर्भधारणा झाली. आपल्या ठिकाणी असलेल्या गर्भतेजाने त्या देवतांप्रमाणे शोभू लागल्या.
चैत्र महिन्यात, शुक्ल पक्षामध्ये नवमी, पुनर्वसु नक्षत्र, शुभ असे कर्क लग्न असताना, पाच ग्रह उच्चस्थानी असताना दहाव्या महिन्यात कौसल्येने अद्भुत अशा पुत्राला जन्म दिला. पुत्रजन्माचे वेळी सूर्य मेष राशीत होता. रवि, मंगळ, गुरु, शुक्र, शनि हे पाच ग्रह उच्चस्थानी विराजमान होते. सतत पुष्पवृष्टि होत होती. अशा तर्हने अखिल जगाचा स्वामी, सनातन परमात्मा पृथ्वीवर मनुष्यरुपात प्रकट झाला. पुत्राचे दिव्य रुप पाहून कौसल्या आश्चर्यचकित झाली. 16, 17, 18 या तीन श्लोकात परमात्म्याच्या सालंकार मूळ रुपाचे वर्णन केले आहे. म्हणून कौसल्या आश्चर्यचकित होऊन म्हणते, ‘‘शंख, चक्र, गदा, धारण करणाऱ्या देवाधिदेवा तुला नमस्कार करते. तू परमात्मा, स्वरुपापासून, स्वस्थानापासून कधीही न ढळणारा, पूर्णस्वरुप, गुणातीत असा पुरुषोत्तम आहेस’’.
20 ते 29 श्लोकांपर्यंत कौसल्येने वर्णन केलेली परमात्मा पुरुषोत्तमाची स्तुती आहे.
‘‘वेद जाणणारे म्हणतात की तू वाणी, बुद्धि इ. च्या साहाय्याने जाणून घेता येतो. सत्ता हेच केवळ तुझे रुप आणि ज्ञान असे तुझे अवयवी शरीर आहे. सत्त्व, रज, तम या त्रिगुणांनी युक्त होऊन आपल्या मायेने विश्वाची उत्पत्ती, पालन, संहार कार्य करतोस. परंतु स्वत: मात्र मायादोषरहित होऊन शुद्ध अशा स्वरुपात राहतोस. तू क्रिया करतो आहे असे वाटते पण तू काहीच करीत नाहीस. जातो, ऐकतो, पाहतो असे जरी वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र तू काहीच करीत नाहीस. अज्ञानी लोकांना मात्र तुझे रुप कळत नाही. तू ज्यांच्या ठिकाणी असतोस त्या ज्ञानी लोकांना तुझ्या रुपाचे आकलन होते. त्यांना तू दिसतोस, तुझ्या उदरातील ब्रह्मांडे परमाणूप्रमाणे दिसतात. हे परमात्मा, तू माझ्या पोटी जन्म घेतला असे लोकांना खोटेच (मायेने) भासव. ह्यामुळे तू भक्ताच्या अधीन आहेस असे मला स्पष्ट जाणवते. केवळ तुझ्या मायेमुळे ह्या संसारसागरात भ्रमण करणारी, पति, पुत्र, धन यात सदैव मग्न राहणारी मी, आज तुझ्या चरणाजवळ येऊन पोचले आहे. म्हणून हे देवा, तुझे हे रुप माझ्या अंत:करणामध्ये सदैव राहू दे. तुझी विश्वमोहिनी माया मला कधीही मोह न घालो. हे विश्वात्मका, तुझे हे अलौकिक रुप आता नाहीसे कर. हे आनंदस्वरुप भगवंता, अतिशय कोमल असे बालरुप धारण करुन मला बालरुपाचा आनंद दे.’’
अशी कौसल्येने भगवंताजवळ प्रार्थना केली असता भगवान म्हणाले, ‘‘हे माते, तुझ्यासोबत झालेल्या प्रेमयुक्त आलिंगनाने आणि भाषण ऐकल्याने हा अज्ञानाचा अंध:कार नष्ट होईल.’’ असा वार्तालाप कौसल्या आणि भगवंत यामध्ये झाला. भगवंत म्हणाले, ‘‘माते, तुला जे इष्ट आहे असे वाटते ते सर्व घडून येईल. दुसरे काही होणार नाही. पूर्वी ब्रह्मदेवाने माझी प्रार्थना केली होती, म्हणून मी मनुष्यरुपाने जन्म घेतला. हे माते, पूर्वी तू आणि दशरथ दोघांनी खूप तपश्चर्या करुन मला प्रसन्न करुन घेतले. मी तुमचा पुत्र व्हावे अशी इच्छा प्रगट केली होती. आज मी तुमचे मनोरथ पूर्ण केले आहे. माझे हे जे रुप माते तू पाहिलेस ते पूर्वी केलेल्या तपाचेच फळ आहे. अतिशय दुर्लभ अशा माझ्या रुपाचे तुला दर्शन झाले ते मोक्ष प्राप्त करुन देणारे आहे. आता हा आपणा दोघांमधील संवाद जो कोणी पठण करील, ऐकेल किंवा ऐकविल त्याला माझ्या स्वरुपाशी एकरुप होता येईल आणि मरणकाळी त्याला माझे स्मरण होईल.’’
अशा प्रकारे मातेला बोलून भगवंताने बालरुप घेऊन रडण्यास प्रारंभ केला. त्या बालरुपातही त्याची कांती इंद्रनील मण्याप्रमाणे होती, डोळे विशाल आणि रुप सुंदर देखणे होते. नुकत्याच उगवलेल्या सूर्याप्रमाणे त्याचे तेज होते. भगवंताने जन्म घेतला म्हणून इंद्रादि सर्व लोकपाल आनंदित झाले होते. राजा दशरथ तर पुत्रजन्माची वार्ता ऐकून आनंदसागरात जणू बुडून गेला. गुरु वसिष्ठांना सोबत घेऊन पुत्रमुख बघण्यासाठी राजा दशरथ आला. बालकाला बघून आनंदाश्रूंनी त्याचे डोळे भरुन आले. गुरु वसिष्ठांकडून जातकादि सर्व कर्तव्यकर्मे करवून घेतली. तेवढ्यात कैकयीला पुत्र झाल्याची वार्ता आली. सुमित्रेनेही सुंदर अशा जुळ्या मुलांना जन्म दिला. दशरथाने पुत्रजन्माने आनंदित होऊन ब्राह्मणांना हजारो गावे दान दिली. तसेच सोने, रत्न, वस्त्रे तसेच उत्तम गायीचेही दान दिले. आनंदाने ब्राह्मणांना वस्त्र, भूषण, गाई इत्यादीचे दान कर्म आटोपल्यानंतर गुरु वसिष्ठांनी मुलांचे नामकरण केले.
अज्ञानाचा नाश केल्यानंतर त्या ज्ञानी अवस्थेमध्येच मुनिजन ज्याच्या ठिकाणी रममाण होतात असा तो ज्येष्ठ पुत्र, जो सर्वांना रमवितो म्हणून त्याचे नाव ‘राम’ ठेवले. ‘रमणाद्राम’ ‘भरणाद्भरतो’ सर्वांचे भरण अर्थात पालनपोषण करतो या अर्थी ‘भरत’, सुलक्षणांनी युक्त म्हणून ‘लक्ष्मण’, शत्रूंना ठार मारणारा म्हणून ‘शत्रुघ्न’ अशी नावे आचार्य वसिष्ठांनी ठेवली.
पायसाच्या अंशानुसार लक्ष्मण श्रीरामाच्या सहवासात होता तर भरताच्या सहवासात शत्रुघ्न अशा जोडीने ते फिरत असत. लक्ष्मणासह खेळणारा राम आपल्या बाललीलांनी, निरनिराळ्या आविर्भावाने, बोबड्या बोलाने आईवडिलांना मोहित करीत असे, आनंदित करीत असे. अंगणामध्ये वासरांच्या मागे चहू दिशांना रामाला रांगताना पाहून राजा दशरथ आणि कौसल्या माता आनंदित होत असत. राजा दशरथ भोजनसमयी अतिशय प्रेमाने, आनंदाने रामाला ‘ये’ म्हणून हाक मारीत, परंतु खेळात मग्न असलेला राम दशरथाकडे येत नसे. शेवटी राजा ‘त्याला घेऊन ये’ असे कौसल्येला म्हटल्यावर ती हसत हसत रामाच्या मागे धावत असे. फक्त योगी लोकांनाच गवसणारा तो राम तिला सापडत नसे. कधी कधी तर तो चिखलाने माखलेल्या हातांनी हसत हसत स्वत:च मातेजवळ येत असे. थोडासा, एखादा छोटासा घास घेवून पुन्हा खेळावयास पळून जात असे. प्रत्येक महिन्याच्या त्याच्या वाढदिवसाला माता त्याला वस्त्रभूषणांनी नटवून, विविध प्रकारची वायने देत असे. वायनामध्ये कधी अनरसे, कधी मोदक, कधी करंज्या तर कधी कानवले इ. प्रकारचे वायन देत असे. त्याच्या अतिचपळतेमुळे कौसल्येने घरातील कामे करण्याचे सोडून दिले. एकदा राम आईजवळ जाऊन म्हणाला ‘‘मला भूक लागली, जेवायला दे ग आई’’ परंतु कामात मग्न असल्यामुळे तिला ते ऐकू आले नाही. तेव्हा रागावलेल्या रामाने लाकूड मारुन भांडी ङ्गोडली. शिंक्यावर ठेवलेले दूध, दही, लोणी खाली पाडले. प्रथम लक्ष्मणाला दिले, नंतर भरत, शत्रुघ्नाला देऊन स्वत:ही घेतले. तेथे असलेल्या स्वयंपाक्याने ही गोष्ट मातेला सांगितली. तेव्हा लहानग्या रामाने तेथून धूम ठोकली. कौसल्या माता तेथे येताच सर्व मुले पळाली. कौसल्या मात्र त्यांच्या मागून धावताना पावलोपावली अडखळू लागली. कसेबसे तिने रामाला पकडले. काहीही बोलली नाही तरी बालस्वभानुसार राम रडू लागला. मातेने सर्व मुलांना जवळ घेतले, गाढ आलिंगन दिले. त्यांना प्रयत्नपूर्वक समजाविले. अशा तऱ्हेने सर्वांना आनंद देणारा राम बाललीला करु लागला.
काही दिवसांनी ही मुले कौमार्यावस्थेस प्राप्त झाली. आचार्य वसिष्ठांनी सर्व मुलांचे उपनयन संस्कार केले. चौघेही सर्व विद्यांमध्ये पारंगत झाले. धनुर्विद्या त्यांना विशेषरितीने आवडत असे. सर्व प्रकारच्या शास्त्रातील तत्त्वार्थ उत्तम प्रकारे जाणून घेऊ लागले. लीलेने जरी त्यांनी मनुष्यरुप धारण केले होते तरी राम सर्व जगाचे स्वामीच होते. लक्ष्मण हा अत्यंत आदराने, प्रेमाने रामाच्या मागोमाग सावलीप्रमाणे रहात असे. हे जसे राम-लक्ष्मणाचे होते तसेच भरत हा स्वामी, आपण त्याचे सेवक आहोत असा सेवकभाव मनात ठेवून शत्रुघ्न नेहमी भरताच्या मागे असायचा. राम धनुष्य-बाणांनी भरलेला भाता सदैव बाळगत असे. लक्ष्मणाला सोबत घेऊन घोड्यावर स्वार होऊन शिकारीसाठी वनात जात असे. दुष्ट पशूंचा वध करुन घरी आल्यावर राजा दशरथाला, पित्याला सर्व वृत्तांत सांगत असे. तो सकाळी उठून स्नान करुन मातृपितृवंदन करीत असे. पौरकार्ये मोठ्या विनयाने करीत असे. दररोज आपल्या सर्व बंधुजनांना तसेच काही मुनींना बरोबर घेऊन जेवण करीत असे. भोजनानंतर धर्मशास्त्रातील रहस्य श्रवण करुन त्याचे विवरण करीत असे. असा रामाचा दिनक्रम होता.
अशाप्रकारे मनुष्य अवतार घेऊन, त्यानुसार वर्तन करणे सर्व मनुष्याप्रमाणे लीला केल्या. वास्तविक विचार केल्यास परमात्म्याला कोणतेच विकार नाहीत किंवा त्याला शेवटही नाही. खरे पाहता तो स्वत: (परमात्मा) काहीच करीत नाही.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे बालकाण्डे तृतीयः सर्गः।