श्री महादेव म्हणाले,
‘‘हे पार्वती! एकदा राम आपल्या अंत:पुरात सर्व आभूषणे धारण करुन रत्नजडित सिंहासनावर सुखाने बसला होता. जवळच असलेली सीता रत्नजडित दांडी असलेल्या चवरीने वारा घालीत होती. आदराने स्वीकारलेल्या तांबूलाचे भक्षण करीत त्याचा सीतेशी हास्यविनोद सुरु होता. अशा वेळेस राम जेथे बसला होता त्या ठिकाणी नारदमुनी आकाशमार्गाने त्याला भेटण्यासाठी खाली उतरले. ध्यानीमनी नसताना अगदी अचानकपणे नारदमुनी तेथे उपस्थित झाले. नारदाचे ते दिव्य स्वरुप बघून राम सिंहासनावरुन लगेच उठले आणि सीतेसह प्रेमपूर्वक हात जोडून भक्तिभावाने नारदाला साष्टांग नमस्कार केला. अतिशय प्रेमाने राम नारदांना म्हणाले, ‘अहो मुनिश्रेष्ठ! आमच्या सारख्या संसारी माणसांना आपले दर्शन खरोखर दुर्लभच आहे. ज्याअर्थी मी संसारी असून मला आपले दुर्लभ दर्शन घडले त्याअर्थी माझी पूर्वपुण्याईच फळाला आली असेच म्हणायला पाहिजे. हे मुनीश्वर! आपल्या केवळ दर्शनानेच मी धन्य झालो आहे. आता सांगा, आपले कोणते कार्य आहे जे माझ्याकडून केले जावे? सांगा मी ते कार्य करतो’.
त्यावर नारदमुनि भक्तांविषयी वात्सल्य भाव बाळगणाऱ्या रामाला म्हणतात, ‘‘सर्वसामान्य माणसासारखे भाषण करुन हे रामा, तू मला का बरे मोहवित आहेस? हे विभो, ‘मी संसारी आहे’ असे जे तू म्हटले ते अगदी बरोबर आहे. कारण सर्व जगाचे आदिकारण अशी जी तुझी पत्नी आहे. (योगमाया सीतारुपात आली आहे.) हे रामा, तुझ्या सान्निध्यात, तुझ्याच आश्रयाने तिच्या ठिकाणी ब्रह्मादिक प्रजा निर्माण होतात. सत्त्व, रज, तम त्रिगुणात्मक माया तुझ्या आश्रयानेच सतत भासत असते. ही माया सतत शुक्ल म्हणजेच पांढरे, कृष्ण-काळे आणि रक्त म्हणजेच तांबड्या रंगाची प्रजा उत्पन्न करते. म्हणून हे रामा, तू त्रैलोक्यरुपी भव्य अशा गृहामध्ये राहणारा गृहस्थच आहेस. तू विष्णु आणि जानकी ही लक्ष्मी होय. तू शिव आणि जानकी म्हणजे पार्वती प्रभा होय, तू चंद्र सीता ही रोहिणी, तू इंद्र जानकी ही इंद्राणी आहे. तसेच तू स्वत: अग्नि आणि सीता ही स्वाहा अर्थात अग्निची स्त्री होय. हे रामा, तू कालस्वरुपी यम तर सीता ही त्याची संयमिनी आहे. हे जगन्नाथा, तू नैऋत्यदिशेचा अधिपति निऋति आणि शुभरुपा जानकी ही तामसी (निऋतीची स्त्री) होय. हे रामा, तू स्वत: वरुण आणि शुभरुपा जानकी ही भार्गवी होय. तू वायु असून जानकी ही सदागति होय. हे रामा, तू कुबेर आणि सीता ही सर्व संपत्ती म्हणून सांगितले आहे. सर्व लोकसंहारक असा रुद्र तू आहेस तर जानकी रुद्राणी आहे. या जगात स्त्रीवाचक जे जे काही आहे ते ते सर्व ही जानकीच आहे. पुरुषवाचक जे जे आहे ते ते सर्व तूच आहेस. म्हणून हे देवाधिदेवा, या त्रैलोक्यामध्ये तुम्हा उभयतांपलीकडे अथवा तुम्हा दोघांशिवाय वेगळे असे काहीच नाही.
हे रामा, तुझ्या संबंधामुळे, मायेच्या योगाने, निर्माण झालेले अज्ञान त्याला अव्याकृत म्हणतात, ती मायाच अविद्या होय. ही अविद्या केवळ भासमात्र असल्यामुळे स्पष्टपणे न समजणारी अर्थात अव्याकृत असते तीच प्रकृति होय. त्या प्रकृतिपासून महातत्त्व, महातत्त्वापासून सूत्र म्हणजेच अहंकार आणि त्या अहंकारापासून सर्व कार्य करणारा लिंगदेह उत्पन्न होतो.
लिंगदेहाचे स्वरुप वर्णन
अहंकार, बुद्धि, पंचप्राण आणि इंद्रिये यापासून लिंगदेह तयार होतो. ह्या लिंगदेहालाच जन्म, मृत्यु, सुख, दु:ख इ. विकार होतात असे म्हणतात आणि हा लिंगदेहच ‘जीव’ या संज्ञेने जगात ओळखला जातो. तोच समष्टिरुपाने सर्व लोकांमध्ये भासतो. मूळ चैतन्याला स्थूल, सूक्ष्म आणि कारण अशा तीन प्रकारच्या उपाधि आहेत. ह्या उपाधींनी युक्त असलेल्या चैतन्यालाच तर ‘जीव’ असे म्हणतात आणि उपाधी विरहीत अशा चैतन्याला ‘परमेश्वर’ म्हणतात. स्थूलापासून तर विराटपर्यंत अंतर्यामीचा ईश्वरच कारण आहे.
संसृती ही तीन नावाने प्रसिद्ध आहे. जागृति, स्वप्न, सुषुप्ति अशी नावे आहे. रघुत्तमा, तू ह्या संसृतिहून वेगळा भिन्न आहेस. तू चिन्मात्र असून त्या संसृतीला प्रत्यक्ष पाहणारा आहेस. हे सर्व जग तुझ्यापासून निर्माण झाले असून ते तुझ्याच ठिकाणी सर्व राहिले आहे. शेवटी ते तुझ्यातच लय पावते. म्हणून तूच जगाचे कारण आहेस. जसे दोरीला साप समजल्याने भय वाटते तसेच आत्म्याला जीव मानल्याने भय निर्माण होते. परंतु मीच तो परमात्मा हे समजून घेतले असता तो प्राणी भयमुक्त होतो. दु:खापासून मुक्त होतो. हे रामा, ज्ञानस्वरुप तेजाने शरीरातील सर्व बुद्धि तुझ्याकडूनच प्रकाशिल्या जाते म्हणून तूच सर्वांचा आत्मा आहेस. जसा दोरीवर सर्पाचा आरोप तसाच तुझ्यावर अज्ञानाने सर्व जगाचा आरोप केल्या जातो. तुझ्या संबंधीचे ज्ञान झाले म्हणजे हे जगविषयक अज्ञान नष्ट होते. म्हणून परमात्मज्ञानाचा अभ्यास तसेच तुझ्या चरणाची भक्ती करण्यात तल्लीन असलेल्यांनाच क्रमाक्रमाने विशेष ज्ञान होते म्हणून तुझी भक्ती करणाऱ्यांनाच मुक्ती प्राप्त होते. हे रामा, तू मला मोहात पाडू नकोस. मी तुझ्या भक्तांच्या दासांचाही दास आहे. माझ्यावर प्रसन्न हो. कृपा कर. मोह आवर. मी ब्रह्मदेवाचा पुत्र आहे. हे प्रभो! त्यामुळे मी तुझा पौत्र (नातू) आहे. माझे रक्षण करणे तुझ्या स्वाधीन आहे. माझे रक्षण कर’, अशा प्रकारे सांगून साश्रू नयनांनी नारद रामाला म्हणाले,
‘‘हे रामा, ब्रह्मदेवाने मला तुला काही सांगण्यासाठी पाठविले आहे. रावणाचा वध करण्यासाठी तू अवतार घेतला आहेस आणि आता राज्यरक्षणासाठी तुझा पिता राजा दशरथ तुला राज्याभिषेक करणार आहे. तू जर राज्याविषयीच आसक्त होऊन राहिलास तर तुझ्याकडून रावणवधाचे कार्य होणार नाही. हे रामा, तू तर भूभार हलका करण्याबद्दलची प्रतिज्ञा केलेली आहेस. म्हणून हे राजेन्द्रा, तू आपली प्रतिज्ञा सत्य करुन दाखव.’’
अशाप्रकारे नारदाचे बोलणे ऐकून हसतहसत राम नारदाला म्हणाले, ‘‘हे नारदमुनी ऐक, जगात कोठे काय आहे? मला माहिती नाही किंवा समजतही नाही. मी पूर्वी जी प्रतिज्ञा केली त्याप्रमाणे सर्व करणार आहे. यात संशय नाही, परंतु काळाच्या ओघात जसजशी दैत्यसमूहाची प्रारब्धकर्मे क्षीण होतील तसतसा मी क्रमाने त्यांचा नाश करीन, सर्व पृथ्वीचा भार उतरवीन. रावणाच्या विनाशासाठी मी उद्या दंडकारण्यात जाणार आहे. तेथे मुनिवेष धारण करुन चौदा वर्षे राहीन. तसेच सीतेचे निमित्त करुन त्या दुष्टाचा त्याच्या संपूर्ण कुळासह नाश करीन.’’ अशाप्रकारे रामाने प्रतिज्ञापूर्वक सांगितल्यानंतर नारदांना अतिशय आनंद झाला. मग रामाला तीन प्रदक्षिणा घालून, साष्टांग दण्डवत घालून, रामाला अनुज्ञा मागून नारदमुनी स्वर्गलोकाला जाण्यास निघाले.
मुनिश्रेष्ठ नारद आणि रामाच्या ह्या संवादाचे नित्य, भक्तिने पठण, श्रवण, संस्मरण जो करील त्याला क्रमाक्रमाने वैराग्यपूर्वक आणि देवदुर्लभ असा मोक्ष आणि कैवल्यपद प्राप्त होईल.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अयोध्याकाण्डे प्रथमः सर्गः।