श्री महादेव म्हणाले,
‘‘नंतर राम लक्ष्मणासह दुसऱ्या अरण्यात निघून गेला आणि पुन्हा शोकग्रस्त होऊन सीतेचा शोध करण्याचे कार्य करू लागला. तेथे त्याला एक विलक्षण आकाराचा राक्षस दिसला. त्याच्या छातीवर मोठे तोंड असून डोळे वगैरे काहीएक त्याला नव्हते. त्या राक्षसाचे हात योजनभर (चार कोस) लांब पसरलेले होते. त्याचे नाव कबंध होते. तो सर्व प्राण्यांची हिंसा करीत होता. त्याच्या दोन बाहुंच्या मध्यभागी राम-लक्ष्मण फिरत होते. राक्षसाच्या बाहुंचा वेढा रामलक्ष्मणाभोवती पडला असता त्यांनी त्या महाकाय प्राण्याकडे पाहिले. तेव्हा राम हसत हसत म्हणाला, ‘‘लक्ष्मणा! पहा हा राक्षस. ह्याला मस्तक व पाय नाहीत. त्याच्या छातीवर तोंड आहे. हातामध्ये जे जे काही सापडते, मिळते ते खाऊन हा राहिला आहे. आपण दोघेही त्याच्या बाहुंमध्ये सापडले आहोत खरे. परंतु लक्ष्मणा, याच्या हातून सुटून दुसरीकडे जाण्याचा मार्ग दिसत नाही. तर आपण आता काय करावे? तो आता आपल्याला नक्की खाऊन टाकील.’’ यावर लक्ष्मण म्हणाला, ‘‘रामा! विचार कशाचा करायचा? आपण दोघेही त्या राक्षसाचे प्रत्येकी एक असे दोन्ही हात तोडून टाकू.’’ ‘‘ठीक आहे’’ असे म्हणून रामाने तलवारीने त्या राक्षसाचा उजवा हात तोडला तर लक्ष्मणानेही त्याचा डावा हात सहज तोडला. तेव्हा त्या राक्षसाला खूप आश्चर्य वाटले. त्याने विचारले, ‘‘तुम्ही दोघे देवश्रेष्ठासारखे कोण आहात?’’ इहलोकी किंवा स्वर्गलोकी माझे हात तोडणारे कोण बरे आहात?’’ नंतर कमलनयन रामाने हसत सांगितले की, ‘‘अयोध्यापति राजा दशरथ होऊन गेला. मी त्याचा ज्येष्ठ पुत्र राम आहे. हा बुद्धिमान लक्ष्मण माझा धाकटा बंधु आणि त्रैलोक्यसुंदरी जनककन्या माझी पत्नी आहे. आम्ही मृगयेसाठी बाहेर गेलो असता कोणी राक्षसाने सीतेला नेले. तिचा शोध घेण्यासाठी आम्ही ह्या भयंकर अरण्यात आलो असता तुझ्या बाहुंच्या विळख्यात आम्ही सापडलो. आम्ही प्राणरक्षणासाठी तुझे बाहू कापून टाकले. आता हे सांग की, असे हे भयंकर विराट रूप धारण करणारा तू कोण आहेस?’’
तेव्हा कबंध म्हणाला, ‘‘रामा! तू माझ्याजवळ आला आहेस तेव्हा मी आता खरोखर कृतार्थ झालो आहे. पूर्वी मी गंधर्वांचा राजा होतो. माझे सुंदर रूप आणि तारूण्य याचा मला फार गर्व होता. पृथ्वीवर मी सर्वत्र फिरत असता मोठमोठ्या सुंदर स्त्रिया मला पाहून मोहित होत असत. हे रघुश्रेष्ठा! तप करून ब्रह्मदेवाकडून मी अवध्यपण मिळवले होते. पूर्वी एके वेळी अष्टावक्र मुनीला पाहून मी हसलो. त्यामुळे तो मुनी क्रुद्ध होऊन म्हणाला, ‘दुष्टा! दुर्मते! तू राक्षस हो.’ त्यानंतर मी त्या अष्टावक्र मुनिंच्या पाया पडलो. तेव्हा त्याला माझी दया आली आणि माझ्या शापाचा शेवट केव्हा होईल हे त्याने सांगितले. त्याच्या तपाचे तेज सभोवताली झळकत होते. तो म्हणाला, ‘‘त्रेतायुगात साक्षात नारायण दशरथपुत्र होऊन येईल. तो तुझे योजनापर्यंत पसरलेले हात तोडून टाकील. तेव्हा तू शापमुक्त होशील आणि पूर्वस्वरूपाला प्राप्त करशील.’’ असा शाप मिळताच माझे राक्षसरूप झाले हे मी पाहिले. पुढे कोणे एके वेळी मी क्रोधाने देवेंद्राच्या अंगावर धावून गेलो. तेव्हा हे रामा! त्यानेही माझ्या मस्तकावर प्रहार केला. तेव्हा हे रघुनंदना! माझे मस्तक खाली पोटात शिरले आणि माझे दोन्ही पाय नष्ट झाले. परंतु मला ब्रह्मदेवाचा वर मिळालेला असल्याने त्या वज्रप्रहाराने माझा मृत्यू झाला नाही. मला मुख नसलेले पाहून सर्वांना माझी दया आली. हा जिवंत कसा राहील असे सर्वांनी इंद्राला विचारले, तेव्हा इंद्र म्हणाला, ‘‘तुझ्या पोटावर मुख येईल. तुझे बाहू योजनाइतके लांब होतील. आता येथून जा.’’ असे त्याने सांगितले म्हणून मी येथे राहू लागलो. वनात जे जे काही सापडेल ते मी खात असे. हे निष्पापा! तू आता माझे बाहू तोडले आहेस. हे रघुकुलोत्तमा! आता अग्निकाष्ठे घातलेल्या गर्तेच्या तोंडी मला टाक. अग्नित माझे दहन झाले असता मला माझे पूर्वरूप प्राप्त होईल. नंतर मी तुला तुझ्या पत्नीचा मार्ग सांगेन.’’
असे त्याने सांगितल्यावर रामाने लक्ष्मणाकडून खड्डा तयार करवून घेतला. त्यात त्या राक्षसाचे दहन केले. नंतर त्याच्या शरीरातून मदनासारखा सुंदर आणि सर्व अलंकारविभूषित असा एक पुरूष उत्पन्न झाला. रामाला प्रदक्षिणा घालून, साष्टांग नमस्कार करून त्याने हात जोडले. त्याचा कंठ दाटून आला. सद्गदीत वाणीने तो म्हणाला, ‘‘रामा! तुझी स्तुति करण्यासाठी माझे मन उत्सुक झाले आहे. तू अनंत आहेस, आदिअंतरहित आहेस. मन, वाणीला तू अगोचर आहेस. तुझे सूक्ष्मरूप विराटरूप आणि हिरण्यगर्भ याहून तू वेगळा आहेस. ज्ञानमय असून कोणालाही, योग्यांनाही अगम्य आहेस, न समजणारा आहेस. त्याशिवाय, इतर सर्व दृश्य अनात्मक जड आहे. प्रभो! मन सुद्धा तुझ्याहून भिन्न असल्यामुळे तुला कसे जाणणार? बुद्धि आणि आत्म्याचे प्रतिबिंब यांचे ऐक्य म्हणजे जीव असे म्हटले आहे. बुद्ध्यादिकांना साक्षीभूत ब्रह्मच आहे. अशा ह्या निर्विषय रूपाच्या ठिकाणी अज्ञानाच्या साहाय्याने सकल प्रपंचाचा आरोप केला जातो. ते रूप निर्विकार, सकलांचा आत्मा असे आहे. हिरण्यगर्भ हे तुझे सूक्ष्म रूप असून विराट हे तुझे स्थूल रूप आहे. रामा! तुझे सूक्ष्म रूप म्हणजे ध्यानाचा विषय असून ते ध्यान करणाऱ्यांना कल्याणकारक आहे. त्या ध्यानाच्या योगाने जगातील भूत, भविष्य, वर्तमान ह्या सर्वांचे ज्ञान होते. तुझा स्थूल देह म्हणजे ब्रह्मांड होय. त्याच्या सभोवती उत्तरोत्तर दहापट अधिक महत्तत्त्वादि सात आवरणे आहेत. त्यातील विराट पुरूष हा ध्यानाचा आश्रय होय. शेवटी मिळवायची वस्तू म्हणजे तूच आहेस. सर्व लोक भुवने म्हणजे तुझे अवयव म्हटले आहे. पाताळ तुझे पादतळ, महातल तुझ्या पायाचे तळवे होत. रसातल, तलातल तुझे पायाचे घोटे म्हटले आहे. रामा! सुतल हे तुझे गुडघे आणि वितल तुझ्या मांड्या होत. रामा! अतल आणि महीतल तुझे जघन असून नभोदेश हे तुझे नाभिस्थान होय. ज्योतिर्गण हे तुझे वक्षस्थल असून महर्लोक हा तुझा कंठभाग आहे. जनलोक तुझे वदन असून तपोलोक हा शंखाकार असा भालप्रदेश होय. हे रघुश्रेष्ठा! सत्यलोक तुझ्या मस्तकाच्या ठिकाणी सर्वदा राहतात. इंद्रादि लोकपाल हे तुझे बाहू असून दिशा ह्या कान आहेत. रामा! अश्विनीकुमार तुझ्या नाकपुड्या आणि अग्नि म्हणजे तुझे मुख आहे. रामा! सूर्य हा तुझा डोळा असून मन हा चंद्र म्हटले आहे. तुझा भ्रूभंग हा काल, नाश करणारा मृत्यु आणि तुझी बुद्धि बृहस्पति आहे. रुद्र हा तुझा अहंकार आहे. हे अव्यया, निर्विकाररूपा! तुझी भाषणे वेद होत. यम हा तुझ्या दाढांच्या ठिकाणी राहिला असून नक्षत्रे ह्या तुझ्या दंतपंक्ति होत. तुझे हास्य जगाला मोह घालणारी माया असून तुझा कटाक्षपात म्हणजे सृष्टि होय. धर्म म्हणजे तुझा पुढील भाग आणि अधर्म म्हणजे तुझा पृष्ठभाग म्हटले आहे. हे रघुश्रेष्ठा! तुझ्या डोळ्यांची उघडझाप म्हणजे रात्र आणि दिवस होय. सात समुद्र तुझे उदर असून ईश्वरा! नद्या ह्या तुझ्या नाड्या होत. हे सर्वसमर्था! वृक्ष, वनस्पती ह्या तुझे केस असून तुझे रेत म्हणजे पर्जन्य होय. ज्ञानशास्त्र हे तुझे मोठेपण होय. अशा तऱ्हेने तुझे स्थूल रूप आहे. ह्या तुझ्या स्थूलरूपाच्या ठिकाणी चित्त स्थिर ठेवणे म्हणजे सहजपणे मुक्ति मिळविणे होय. याशिवाय दुसरे कोणतेही साधन नाही. म्हणून हे रामा! तुझ्या स्थूलरूपाचेच मी चिंतन करतो. त्याचे ध्यान केले म्हणजे अंतःकरणात प्रेम उत्पन्न होते. प्रेमरस उत्पन्न झाला की शरीरावर रोमांच दाटून येतात. रामा! तुझ्या स्थूलरूपाचे ध्यान जीवाच्या ठिकाणी जडेल तेव्हाच त्याला मुक्ति मिळेल. त्या तुझ्या स्थूलरूपाचे चिंतन तर असो, मी माझ्यासमोर दिसणाऱ्या तुझ्या सगुण रूपाचेच चिंतन करतो. तुझ्या हातात धनुष्यबाण आहे. अंगकांति श्यामवर्ण असून जटा, वल्कले यांच्या साहाय्याने तुझ्या रुपाला शोभा प्राप्त झाली आहे. तुझे वय तारूण्याचे असून लक्ष्मणासह तू सीतेचा शोध करीत आहेस. हे रघुनंदना! हेच तुझे रूप सदैव माझ्या अंतःकरणात राहो. सर्वज्ञ असलेला शंकर पार्वतीसह सदैव तुझ्या स्वरूपाचेच चिंतन करीत असतो आणि काशीत राहून आसन्नमरण जीवांना तारणारे आणि तत्त्वमसि इ. महावाक्यांनी प्रतिपादित ब्रह्मस्वरूपवाचक अशा तुझ्या ‘राम’ नामाचा संतुष्ट अंतःकरणाने उपदेश करीत असतो. म्हणून हे जानकीनाथा! तू परमात्मा आहेस, हे नक्की आहे. परंतु सर्व लोक मायेने मोहित होऊन यथार्थ रितीने तुझे स्वरूप जाणत नाहीत. हे सृष्टिकर्त्या परमात्मा रामभद्रा! तुला नमस्कार असो. जगन्नाथा! माझे रक्षण कर. तुझी माया मला मोहित न करो.’’ राम म्हणाला, ‘‘हे निष्पाप गंधर्वा! तुझ्या भक्तिने, स्तुतीने मी प्रसन्न झालो आहे. फक्त योग्यांनाच कळणारे माझे सनातन, नित्य, परमस्थान जे स्वर्लोक, तेथे तू जा. जे कोणी अनन्यभावाने वेदार्थाला अनुसरून केलेल्या तुझ्या स्तोत्राचा जप करतील ते अज्ञानापासून निर्माण झालेल्या संसाराचा त्याग करून नित्य व अनुभवजन्य अशा माझ्या स्वरूपाला प्राप्त होतील.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अरण्यकाण्डे नवमः सर्गः।