श्री महादेव म्हणाले,
‘‘अतिकायादिकांचे ते सर्व प्रचंड सैन्य युद्धात पतन पावल्याचे ऐकून रावण दुःखसंतप्त होऊन गेला. त्याचा क्रोध अनावर झाला. त्या महातेजस्वी राक्षसाने, रावणाने लंकेच्या रक्षणाकरिता इंद्रजिताची योजना करून तो आपण स्वतः रामाबरोबर युद्धासाठी निघाला. सर्व शस्त्रास्त्रांनी युक्त अशा दिव्य रथावर आरुढ होऊन तो महाबलवान राक्षसराज रामावर चालून गेला. सर्पासारखे विषारी बाण टाकून त्याने अनेक वानरांना ठार केले आणि सुग्रीवादि सेनानायकांना जमिनीवर लोळविले. तेथे महासामर्थ्यवान बिभीषण हातात गदा घेऊन युद्धाला आलेला पाहून रावणाने त्याच्यावर मयासुराने दिलेली महाशक्ती सोडली. बिभीषणाचा घात करण्यासाठी येणारी ती शक्ती पाहून ‘ह्याला रामाने अभय दिले आहे, हा असुर वधाला योग्य नाही’ असे म्हणून तो वीर्यशाली लक्ष्मण भयंकर धनुष्य घेऊन बिभीषणाच्या पुढे पर्वतासारखा निश्चल उभा राहिला. ती शक्ती अमोघ सामर्थ्याची, कधीही व्यर्थ न जाणारी होती. ती लक्ष्मणाच्या शरीरात प्रविष्ट झाली. मायेपासून निर्माण होणाऱ्या जितक्या शक्ती जगात आहेत त्या सर्वांचा आधार महात्मा लक्ष्मण होता. कारण तो शेषांश असून परमेश्वराची विभूती होता. त्यापुढे त्या मायाशक्तीच्या सामर्थ्याचे काय चालणार? तरी सुद्धा धारण केलेल्या मनुष्यरुपास उचित असे वर्तन ठेवणे योग्य असल्यामुळे मूर्च्छित होऊन तो जमिनीवर पडला. इतक्यात रावण त्याला उचलण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने हातांनी त्याला तोलून धरण्याचा प्रयत्न केला तरी तो हालेना, हे पाहून रावणाला अतिशय आश्चर्य वाटले. सर्व जगाचे सार, विराटरुपी परमेश्वर, सर्व लोकांचा आधार अशा त्या लक्ष्मणरुप विष्णुला तो क्षुद्र राक्षस कसा बरे उचलू शकणार? लक्ष्मणाला रावण धरू इच्छित आहे हे मारुतीने पाहिले. तेव्हा त्याने क्रुद्ध होऊन आपल्या वज्रतुल्य मुष्टीच्या योगाने रावणाच्या वक्षःस्थलावर प्रहार केला. त्यामुळे तो रावण गुडघ्यावर पडला. त्याच्या दहा तोंडातून, डोळ्यांतून आणि कानातून सारखे रक्त वाहू लागले. तो डोळे फिरवू लागला. अशा स्थितीत तो रथात जाऊन बसला. इकडे रावणाने जखमी केलेल्या लक्ष्मणाला हनुमंताने बाहूंनी उचलून धरून रामाजवळ आणले. तो अजन्मा परमेश्वर लक्ष्मण सर्व जड पदार्थात अतिशय जड, वजनदार असूनही हनुमंताच्या प्रेमामुळे आणि भक्तीमुळे हलका झाला. लक्ष्मण हा नारायणांशभूत आहे असे जाणून ती शक्ति त्या लक्ष्मणाला टाळून रावणाच्या रथाकडे परत फिरली. नंतर रावणही हळूहळू शुद्धीवर आला. त्याने रागाने तत्काळ धनुष्य घेतले आणि तो रामावर चालून गेला. त्याला पाहून रामालाही क्रोध आला. त्या रथात बसलेल्या रावणाला पाहून तो जगन्नाथ राघव राम, महाबलवान हनुमंताच्या खांद्यावर बसला आणि रावणावर चाल करून गेला. धनुष्याच्या प्रत्यंचेचा टणत्कार करून विजेच्या कडकडाटासारख्या कठोर नादात गंभीर वाणीने राम त्या राक्षसाधिपतीला म्हणाला, ‘‘राक्षसाधमा! थांब. आता माझ्यापुढून तू कोठे जाशील? माझी सर्वत्र समदृष्टि असूनही तू माझा भयंकर अपराध केला आहेस. जनस्थानी तुझे राक्षस ज्या बाणाने मारले त्याच बाणाने आज तुझा वध करतो. माझ्यासमोर उभा रहा.’’ श्रीरामाचे भाषण ऐकून रावणाने युद्धात रामाला खांद्यावर वाहून नेणाऱ्या मारुतीवर तीक्ष्ण बाणांचे प्रहार केले. त्या तीक्ष्ण बाणांनी मारुती घायाळ झाला तरी त्याचे तेज त्याच्या स्वतःच्या वीर्यामुळे कमी न होता वाढतच गेले. त्या महाकपीने मोठ्याने गर्जना केली. हनुमंताला व्रण झाले आहेत असे पाहताच रघुश्रेष्ठ रामाला एवढा क्रोध आला की हा दुसरा कालरुद्रच आहे की काय, असे सर्वांना वाटले. त्याने तीक्ष्ण बाण योजून रावणाचा रथ, घोडे, ध्वज, सारथी, शस्त्रसमूह, धनुष्य, छत्र, पताका हे सर्व क्षणात तोडून टाकले. नंतर इंद्राने पर्वतावर टाकावा त्याप्रमाणे रघुवीराने रावणावर वज्रासारखा बाण टाकून त्याला जर्जर केले. रामबाणाने घायाळ झालेला वीर रावण थरथर कापू लागला. त्याला मूर्च्छा आली. त्याच्या हातातून धनुष्य गळून पडले. त्याला तशा स्थितीत पाहून रघुत्तम रामाने एका अर्धचंद्राकार बाणाने त्याचा सूर्यासारखा तेजस्वी मुकुट तोडून टाकला आणि त्याला म्हटले, ‘‘तू आता बाणाने विद्ध झाला आहेस. तुला मी जाण्यास परवानगी देतो. लंकेत जाऊन एक दिवस विश्रांती घे. म्हणजे उद्या माझे बल काय आहे हे पाहशील.’’
रामाच्या बाणाने जर्जर झालेल्या रावणाचा अशारितीने गर्व उतरल्यावर त्याला खूप लाज वाटली. तो व्याकूळ होऊन लंकेत गेला. लक्ष्मण मूर्च्छित होऊन जमिनीवर पडला आहे हे पाहून रामही स्वीकारलेल्या मनुष्य स्वभावानुसार शोक करू लागला. नंतर तो मारुतीला म्हणाला, ‘‘वत्सा, पूर्वीप्रमाणे दिव्य औषधी आण आणि लक्ष्मणाला आणि वानरांना जिवंत कर.’’ रामाने असे सांगितल्यावर ‘ठीक आहे’ असे सांगून तो महाकपि मारुति तत्काळ निघाला. क्षणमात्रात तो वायुवेगाने महासागर ओलांडून गेला. इतक्यात हेरांनी येऊन रावणाला सांगितले की ‘‘देवा, लक्ष्मणाला जिवंत उठविण्यासाठी म्हणून महौषधी आणण्यासाठी रामाने पाठविलेला हनुमान क्षीरसमुद्राकडे गेला आहे.’’ ते हेरांचे भाषण ऐकून रावणाला मोठी काळजी वाटू लागली. तो तत्काळ रात्रीच्या वेळी एकटाच कालनेमीच्या घरी गेला. घरी आलेल्या रावणाला पाहून कालनेमीला आश्चर्य वाटले. त्याने अर्घ्यादिक उपचार रावणाला अर्पण केले. नंतर भयभीत होऊन रावणापुढे उभा राहिला. हात जोडून म्हणाला, ‘‘राजेन्द्रा! मी तुमचे कोणते कार्य केले पाहिजे? आपण कशाकरिता आला आहात?’’ त्यावर तो दुःखपीडित रावण कालनेमीला म्हणाला, ‘‘कालवशेकरून माझ्यावर ही आपत्ती आली आहे. ती अशी की माझ्या शक्तीने लक्ष्मण घायाळ होऊन जमिनीवर पडला आहे. त्याला जिवंत करण्यासाठी औषधी आणण्याकरिता हनुमान गेला आहे. तरी जेणेकरून त्याला विघ्न होईल असे कर. तू मोठा बुद्धिमान आहेस. कपटाने मुनिवेष धारण करून तू त्या महावानराला मोहित कर आणि जेणेकरून त्याला जाण्यास विलंब होईल असे कर. मग तू आपल्या मंदिरी परत ये.’’ रावणाचे भाषण ऐकून कालनेमी त्याला म्हणाला, ‘‘राजा रावणा, मी आपणाला सांगतो ते ऐका आणि खरे समजून लक्षात ठेवा. आपल्याला प्रिय असेल ते मी करीन. आपल्याकरिता प्राणही वेचीन. परंतु हरणाचे रूप धारण करून अरण्यात गेलेल्या मारीचाची पूर्वी जी स्थिती झाली तीच माझी स्थिती होणार यात संशय नाही. हे दशानना! आपले पुत्र, पौत्र, बांधव वगैरे अनेक राक्षस मारले गेले. राक्षसकुळाचा नाश करवून तुम्हाला जगायचे तरी कशाकरिता? राज्य, सीता किंवा जडस्वरूपी देह तुम्हाला कोणत्या कामाला येणार आहे? रामाला सीता नेऊन द्या आणि राज्य बिभीषणाला द्या. महाबाहो रावणा! मुनिगणांनी आश्रय केलेल्या रम्य वनात राहण्यास तुम्ही जा. प्रातःकाळी पवित्र उदकात स्नान करा. संध्यादिक क्रिया आचरण करा आणि एकांतात सुखासन घालून बसा. सर्व आसक्ति सोडून द्या, विषयांना दूर करा. बाहेरील विषयांकडे ओढ घेणाऱ्या इंद्रियसमूहाला हळूहळू अंतर्मुख करा. हे अनघा! आत्मा प्रकृतिहून भिन्न आहे ह्याचा नित्य विचार करा. देह, बुद्धि, इंद्रिये इत्यादि स्थावरजंगमात्मक सर्व जग, ब्रह्मदेवापासून तर अतिसूक्ष्म कीटकापर्यंत जे म्हणून दृष्टीला पडते अथवा ऐकिवात येते ते सर्व ही प्रकृति होय. तिलाच ‘माया’ असे म्हणतात. जगत्वृक्षाच्या उत्पत्ति-स्थिती-संहारांना कारण म्हणजे प्रकृतीच होय. तीच रक्त, श्वेत आणि कृष्ण वर्णाच्या पूजा निर्माण करीत असते. कामक्रोधादि हे तिचे पुत्र असून हिंसा, तृष्णा वगैरे कन्या आहेत. आत्मा व्यापक आणि ज्ञानरूप आहे. तरीही त्याला आपल्या गुणांनी सृष्टि उत्पन्न करून त्यांच्या साहाय्याने नित्य मोहित करते. आत्म्यावर कर्ता, भोक्ता इत्यादि आपली सर्व लक्षणे आरोपित करून ही त्याला आपल्या स्वाधीन करून घेते आणि त्याच्याबरोबर सदैव क्रीडा करीत असते. आत्मा वास्तविक शुद्ध आहे तरीही प्रकृतीचा समागम घडला असता मायेच्या गुणांनी मोहित होऊन तो स्वस्वरूप विसरून जातो आणि सदासर्वदा बहिर्मुख होतो, बाह्य विषय भोगू लागतो. पुढे ज्ञानरूप सद्गुरुंची गाठ पडून जेव्हा त्याला त्यांच्याकडून बोध केला जातो तेव्हा त्याची दृष्टी विषयांपासून पराङ्मुख होते आणि शुद्ध आत्मस्वरूप त्याच्या नित्य दृष्टीस पडते. अशारितीने प्राणी देहीच जीवन्मुक्त होऊन प्रकृतीच्या गुणांपासून मुक्त होतो. म्हणून रावणा, तू देखील इंद्रियदमन करून आत्मविचार करीत रहा. आत्मा प्रकृतीहून वेगळा आहे हे ज्ञान झाल्यामुळे तू मुक्त होशील. आता असे ध्यान जर तू करू शकत नसशील तर सगुण देवस्वरूपाचा आश्रय कर. हृदयकमलाच्या गाभ्यात रत्नगणांनी जडित, मृदु आणि स्निग्ध अशा सुवर्णसिंहासनावर जानकीसह राम विराजित आहे, त्याने वीरासन घातले आहे, त्याचे नेत्र विशाल आहेत, त्याचे वस्त्र विद्युल्लतापुंजासारखे आहे, शरीरावर किरीट, हार, केयूर, बाहुभूषणे, कौस्तुभ इत्यादि अलंकार शोभून दिसत आहेत. पैंजण, कडी आणि वनमाला यांनी शरीराला शोभा आली आहे. दोन धनुष्ये हातात घेऊन लक्ष्मण त्याची सेवा करीत आहे. अशा सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या आत्मरूपी श्रीरामाचे जो कोणी नित्य ध्यान करतो त्याची रामावर परमभक्ति जडते आणि तो मुक्त होतो, ह्यात काही संशय नाही. भक्तजनांच्या संगतीत एकनिष्ठेने रामचरित्राचे श्रवण कर. असे केल्याने पूर्वी तुझ्याकडून महापातके घडली असतील तरी ती अग्नीकडून कापसाच्या राशी जळून खाक होतात त्याप्रमाणे क्षणात नाहीशी होतील. राम हा एक परिपूर्ण अद्वितीय पुराणपुरूष आहे. तो योगीजनांकडून सर्वदा हृदयात चिंतिला जातो. त्याला नामरूप हा भेद नाही. अशा रामाला वैर सोडून परमभक्तिपूर्वक भजत जा.’’
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे षष्ठः सर्गः