श्री महादेव म्हणाले,
‘‘राणी मंदोदरीशी असे प्रेमपूर्वक भाषण करून रामाबरोबर युद्ध करण्याकरिता रावण युद्धभूमीवर गेला. तो आपल्या रथात बसला. त्याच्याबरोबर अनेक भयंकर राक्षस होते. तो रथ अतिशय बळकट असून त्याला सोळा चाके, छपरी व जोखड ही होती. त्याला गाढवे जोडली होती. त्यांची तोंडे पिशाचासारखी होती. त्यामुळे तो रथ पाहाताच भीती वाटत असे. आत सर्व शस्त्रे, अस्त्रे व इतर संपूर्ण साहित्य तयार करून ठेवले होते. अशा रथात बसून तो भयंकर स्वरूपाचा रावण निघाला. त्या उग्र व रणांगणावर निर्दयतेने वागणाऱ्या रावणाला येताना पाहून रामाच्या देखरेखीसाठी असलेली वानरसेना भिऊन गेली. नंतर मारुतीने उडी मारली व तो रावणाशी युद्ध करण्यास पुढे आला. जवळ येताच त्या अतुल पराक्रमी हनुमंताने राक्षसाच्या, रावणाच्या छातीवर घट्ट मूठ आवळून जोराने प्रहार केला. त्या मुष्टीप्रहाराने रावण रथात गुडघ्यांवर पडला. त्यामुळे त्याला मूर्च्छा आली. नंतर काही वेळाने पुन्हा सावध होऊन तो मारुतीला म्हणाला, ‘‘तू शूर आहेस. त्यामुळे तू मला मान्य आहेस.’’ त्यावर मारुती म्हणाला, ‘‘रावणा, माझा मुष्टिप्रहार सोसूनही तू जिवंत राहिलास, त्याअर्थी माझा धिक्कार असो. आता रावणा, तू माझ्या वक्षावर मुष्टिप्रहार कर. कारण मी तुला मारल्यावर तू प्राणत्याग करशील, हे निःसंशय आहे.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून रावणाने मारुतीच्या वक्षःस्थळावर प्रहार केला. त्यामुळे मारुतीने डोळे फिरविले. त्याला थोडावेळ मूर्च्छा आली. शुद्धीवर येऊन तो वानरश्रेष्ठ रावणाला मारण्यास सज्ज झाला. तेव्हा राक्षसाधिपति रावण भयभीत होऊन दुसऱ्या ठिकाणी गेला. मग हनुमान, अंगद, नल आणि नील हे चौघे एकत्र आले असता त्यांना आपल्यासमोर अग्निवर्ण, सर्परोमा, खङ्गरोमा आणि वृश्चिकरोमा हे चार मोठे राक्षस दृष्टीस पडले. त्यांनी त्या महापराक्रमी राक्षसांना क्रमाने ठार मारले. अशारितीने त्या चौघांचा वध केल्यानंतर ते चौघे वेगवेगळे सिंहनाद करीत रामाजवळ आले. इकडे रावण क्रुद्ध होऊन दात करकर वाजवू लागला. त्याने डोळे वटारले. मग तो क्रूर रावण रामावर धावून गेला. रावण रथात बसला होता. तेथून त्याने वज्रासारखे भयंकर बाण रामावर सोडले. मेघाने उदकाच्या धारांची वृष्टि करावी तशी महाघोर बाणवृष्टि रावण करीत होता. त्या रावणाने रामाच्या पुढे सर्व वानरांना त्रस्त केले. रामाने अग्नीसारखे सोन्याने मढविलेले बाण घेऊन त्याची वृष्टि मोठ्या दक्षतेने रावणावर केली. रावण रथात बसलेला व राम जमिनीवर उभा असलेला पाहून इंद्राने मातलीला हाक मारून सांगितले की माझा रथ घेऊन भूमीवर उभ्या असलेल्या रामाकडे सत्वर जा. पृथ्वीतलावर लवकर जाऊन, ‘हे निष्पापा! एवढे माझे कार्य कर’ असे इंद्राने सांगितल्यावर त्याला प्रणाम करून देवसारथी मातलीने त्या उत्तम रथाला हिरवे घोडे जोडले आणि रामाचा जय व्हावा ह्या उद्देशाने तो मातली स्वर्गातून रामाकडे आला. अशा त्या रथात बसून आलेला मातली हात जोडून रामाला म्हणाला, ‘‘रघुत्तमा, देवराज इंद्राने मला पाठविले आहे. हा रथ इंद्राचा असून तो त्याने तुझा विजय व्हावा म्हणून पाठविला आहे. तसेच हे सुंदर इंद्रधनुष्य, अभेद्य कवच, हे खङ्ग आणि ही दिव्य भात्यांची जोडी ही सुद्धा तुझ्यासाठी पाठविली आहे. रामा, तू या रथावर आरोहण कर आणि देवपती इंद्राने वृत्राचा वध केला तसा तू रावणाचा वध कर. मी तुझा सारथी होतो.’’ असे मातलीने सांगितल्यानंतर त्या उत्तम रथाला रामाने प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि लोकांना आनंद देत तो त्यावर चढला. नंतर महात्मा राम आणि बुद्धिमान रावण यांच्यामध्ये भयंकर, अंगावर काटा उभा राहणारे युद्ध झाले. रावणाच्या आग्नेयास्त्रावर आग्नेयास्त्र व इंद्रास्त्रावर इंद्रास्त्र सोडून अस्त्रवेत्त्या रामाने राक्षसाधिपतीच्या त्या अस्त्राचा भंग केला. पुढे त्या अस्त्रनिपुण रावणाने अत्यंत क्रुद्ध होऊन रामावर एका भयंकर राक्षसी अस्त्राची योजना केली. रावणाच्या धनुष्यापासून सुटलेल्या बाणांपासून भयंकर विषारी सर्प उत्पन्न होऊन ते चारी बाजूंनी रामावर येऊन पडू लागले. त्या बाणांचे पृष्ठभाग सुवर्णाने मढविले होते. त्या सर्पमुख बाणांच्या तोंडून अग्नि बाहेर पडून त्यायोगे सर्व दिशा आणि विदिशा व्याप्त होत असत. सर्वत्र भरून राहिलेल्या सर्पांना पाहून रामाने त्या अस्त्राहूनही भयंकर असे गरुडास्त्र रणांगणावर अग्रभागी सोडले. रामाने सोडलेले बाण गरुडरुपी होऊन त्या सर्पशत्रू रामाच्या बाणांनी सर्पबाणांना चोहोंकडून विच्छिन्न केले. युद्धात रामाकडून आपल्या अस्त्राचा पराभव झालेला पाहून रावणाने रामावर बाणांची भयंकर वृष्टि केली. तिचा प्रतिकार राम अगदी सहजपणे करीत होता. तरी सुद्धा रावणाने पुन्हा बाणवृष्टि करून त्या रामाला त्रस्त केले आणि एक भयंकर बाण मातलीवर टाकला. रावणाने क्रोधाने रामाच्या रथाचा सुवर्णध्वज रथाच्या मागील बाजूला पाडला. इंद्राच्या घोड्यांना जर्जर केले. रामाच्या शरीराला इजा झाल्याचे पाहून देव, गंधर्व, चारण, पितर आणि महर्षि हे सर्व व्यथित झाले. बिभीषणासह सर्व वानरश्रेष्ठ चिंतातूर झाले. तो दहा तोंडांचा, वीस हातांचा धनुष्य घेऊन असलेला रावण मैनाक पर्वतासारखा दिसत होता. रामाचे डोळे क्रोधाने लाल झाले. त्याने भृकुटी चढवून त्या प्रसंगानुसार अनुरूप असा क्रोध धारण केला. यावरून तो त्या राक्षस रावणाला जाळून टाकत आहे की काय असा भास झाला. मग रामाने इंद्रधनुष्याच्या आकाराचे अद्भुत धनुष्य घेऊन प्रलयकाळाच्या अग्नीसारखा बाण हातात धारण केला आणि जवळच असलेल्या शत्रूवर त्याने आपली नजर टाकली. त्यावेळी राम आपल्या दृष्टिपाताने शत्रूचे भस्म करतो की काय असे वाटले. पुढे सर्व लोकांच्या देखत सर्व शरीर जणू काय प्रदीप्त झाले आहे अशा त्या कालरुपी रामाने आपला पराक्रम दाखविण्यास सुरुवात केली. रामाने धनुष्य ओढून रावणावर बाण मारला तेव्हा वानरसैन्याला अत्यंत आनंद झाला. त्यावेळी राम कालांतकासारखा दिसला. शत्रूवर धावून जाणाऱ्या रामाचा क्रुद्ध चेहरा बघून सर्व प्राण्यांना भीती वाटली. पृथ्वी थरथर कापू लागली. रामाचे ते महाभयंकर स्वरूप आणि ते अत्यंत दारुण उत्पात पाहून सर्व भूतांना त्रास झाला व रावणालाही भय वाटले. देव समुदाय सिद्ध, गंधर्व, किन्नर हे विमानात बसून जगाच्या प्रलयासारखे हे भयंकर युद्ध पहात होते. शेवटी ऐन्द्रास्त्र घेऊन त्यायोगे रामाने रावणाचे शिर छेदिले. तालाच्या वृक्षावरून फळे पडावी त्याप्रमाणे रक्ताने भिजलेली रावणाची ती अनेक मस्तके आकाशातून खाली पडली. युद्ध चालले असता रात्र की दिवस काहीच कळेना अशी स्थिती तरी त्या युद्धाचा रावणावर काही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. तेव्हा रामाचे अंतःकरण आश्चर्यचकित झाले. तो स्वतःशी म्हणाला, ‘रावणाची समान तेजाची एकशे एक मस्तके तोडून टाकली तरी जीवित संपून तो देह टाकीत नाही, मरत नाही हे तर आश्चर्यच होय.’ त्या कौसल्यानंदन रामाला सर्व अस्त्रांचे ज्ञान होते. तो पराक्रमी होता. त्याच्याजवळ अनेक अस्त्रे होती, तरीही त्या राघवाला काळजी वाटू लागली की ‘ज्या बाणांनी मोठेमोठे बलवान आणि पराक्रमी दैत्य माझ्याकडून मारले गेले ते ते सर्व आज रावणाच्या वधासाठी मात्र निष्ङ्गळ झाले आहेत’ मग अशाप्रकारे राम चिंताक्रांत झाला असता बिभीषण जवळच होता. तो रामाला म्हणाला, ‘‘ह्याला ब्रह्मदेवाने वर दिला आहे. ह्याचे तुटून पडलेले बाहू व छेदलेली मस्तके पुनः लवकरच उद्भूत होतील, असे भगवान ब्रह्मदेवाने सांगितले आहे. याच्या नाभीच्या ठिकाणी कुंडलाच्या आकारासारखे अमृत ठेवलेले आहे. ते पावकास्त्राचा उपयोग करून शोषून घे. त्यामुळे त्याला मरण येईल.’’ हे बिभीषणाचे भाषण ऐकून त्या शीघ्रपराक्रमी रामाने अस्त्राची योजना करून त्या राक्षसाच्या, रावणाच्या नाभीचा छेद केला आणि नंतर त्या महाबलिष्ठाने त्याची मस्तके तोडून टाकली. त्या खवळलेल्या रामाने रावणाचे बाहू सुद्धा तोडून टाकले. नंतर क्रोधसंतप्त होऊन रावणाने भयंकर अशी महाशक्ती घेतली आणि बिभीषणाला मारण्याच्या उद्देशाने ती त्याच्यावर टाकली. सुवर्णभूषित तीक्ष्ण बाणाच्या योगे ती शक्ती रामाने तोडून टाकली. रावणाची नऊ मस्तके तुटल्यामुळे आता त्याचे तेज निघून गेले. ती भयंकर मस्तके छिन्न होऊन तो म्लान दिसू लागला. एक मुख्य मस्तक व दोन बाहू हीच आता शिल्लक राहिली होती. तरी तो त्यांनी अजूनही शोभत होता. पुन्हा क्रुद्ध होऊन रावणाने रामावर नाना प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा वर्षाव केला. रामानेही तशीच बाणवृष्टि त्याच्यावर केली. नंतर अंगावर काटा उभा राहील असे भयंकर युद्ध झाले. इतक्यात मातलीने रामाला आठवण करून देऊन सांगितले की, ‘‘रघुत्तमा! ह्याच्या वधाकरिता ब्रह्मास्त्र लवकर सोड. देवांनी त्याचा विनाशकाल ठरविला आहे, तो आज आला आहे. ह्याचे मस्तक तू तोडू नकोस. मस्तकावर प्रहार केल्याने हा मरणार नाही. काळजावर आघात केल्यास हा मरेल.’’ मातलीच्या ह्या भाषणाने रामाला आठवण करून दिली. त्यानंतर रामाने सर्पाप्रमाणे निःश्वास टाकणारा एक तेजस्वी बाण घेतला. ह्या बाणाच्या पार्श्वभागी बाजूला वायु आणि अग्रभागी सूर्य आणि अग्नी काढले होते. त्याचे शरीर आकाशमय असून तो मेरुमंदारासारखा जड होता. त्याच्या प्रत्येक पर्वावर महातेजस्वी लोकपालांना बसविले होते. त्याचे अंग अत्यंत प्रज्वलित होते. तेज सूर्यासारखे होते. लोकांची भीती नाहीशी करणारे ते अद्भुत उग्र अस्त्र त्या महाबाणावर वेदोक्त विधीने अभिमंत्रित करून महाबाहू बलवान रामाने तो बाण धनुष्यावर जोडला. तो उत्तम बाण धनुष्यावर जोडला जात असता, सर्व भूते अत्यंत त्रस्त झाली होती आणि पृथ्वी कंपित झाली. त्यानंतर रावणावर परम क्रुद्ध झालेल्या रामाने ते धनुष्य प्रयत्नपूर्वक अतिशय वाकविले आणि तो मर्मघातक बाण रावणावर सोडला. वज्रपाणी इंद्राने पाठविलेला तो वज्रासमान दुर्धर, कृतांतच की काय असा भयंकर मुखाचा बाण रावणाच्या वक्षावर पडला आणि आत घुसला. शरीराचा नाश करणाऱ्या त्या महाभयंकर उत्तम बाणाने महासामर्थ्यवान रावणाचे हृदय तत्काळ भेदून टाकले. रावणाचे प्राण हरण करून त्याने पृथ्वीतलात प्रवेश केला. रावणाच्या वधानंतर तो बाण पुन्हा रामाच्या भात्यात येऊन बसला. ह्या वेळी रावणाच्या हातातून त्याचे मोठे धनुष्य बाणासह खाली पडले आणि तो राक्षसनाथ बाणापासून उत्पन्न झालेल्या भ्रमणवेगामुळे गतप्राण होऊन जमिनीवर पडला. तो रावण जमिनीवर मरून पडलेला पाहून आपला नाथ ठार झाल्यामुळे उरलेल्या राक्षसांनी भयभीत होऊन सर्व दिशांकडे पळ काढला. रावणाचे मरण व रामाचा विजय झाल्याचे पाहून त्या जयशाली वानरांनी आनंदित होऊन गर्जना करण्यास आरंभ केला. कोणी ‘रामाचा विजय झाला’ तर कोणी ‘रावण ठार झाला’ असे म्हणू लागले. तेवढ्यात आकाशात सौम्य आवाजात देवदुंदुभि वाजू लागली. चारही बाजूंनी रामावर पुष्पवृष्टि झाली. मुनि, सिद्ध, चारण आणि देव यांनी रामाची स्तुती करण्यास आरंभ केला. आकाशात सर्वत्र अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या. रावणाच्या शरीरातून सूर्याप्रमाणे चमकणारे तेज निघून त्याने सर्व देवांसमक्ष रघुश्रेष्ठ रामस्वरूपात प्रवेश केला. तेव्हा देव म्हणाले, ‘‘ह्या महात्मा रावणाचे भाग्य किती म्हणून सांगावे? विष्णुच्या दयेला पात्र असूनही आम्ही सात्त्विक देव भयदुःखादिकांनी व्याप्त होऊन संसारचक्रात फिरत असतो. हा रावण तर राक्षस, क्रूर, ब्रह्महत्त्या करणारा, अत्यंत तामसी, परस्त्रीरत, विष्णुद्वेषी तसेच तपस्व्यांचा घात करणारा, इतके असूनही सर्व प्राण्यांसमक्ष रामस्वरूपी पावला.’’ असे देव बोलत असता नारदाला हसू येऊन तो म्हणाला, ‘‘देवांनो, तुम्ही धर्मतत्त्व जाणतच आहात, तरी या गोष्टीतील रहस्य मी तुम्हाला सांगतो. रामाच्या वैरामुळे रावण रात्रंदिवस अंतःकरणात त्या रामाचेच चिंतन करीत असे. त्या द्वेषबुद्धीने सेवकांसह सर्वदा रामचरित्र ऐकत असे. रामाच्या हाताने आपल्याला मृत्यु येणार ही गोष्ट ऐकून भयामुळे त्याला सर्वत्र रामच दिसत असे. त्या रावणाच्या मनात रामविषयक क्रोध होता, तरी तो त्याला गुरुउपदेशापेक्षा देखील अधिक लवकर फलद्रुप झाला. शेवटी तो रावण रामाकडून मारला जाऊन त्याची सर्व पापे नाहीशी झाली आणि रामस्वरुपी सायुज्यमुक्तीला प्राप्त करून तो सर्व बंधनापासून मुक्त झाला. कोणी कितीही पापी असो किंवा दुष्ट मनाचा असो किंवा परधन आणि परस्त्री ह्यावर आसक्ती ठेवणारा असो, तो जर स्नेहाने किंवा भयाने रघुकुलतिलक श्रीरामाचे नित्य चिंतन करीत राहील, तर मृत्यु आल्यावर शुद्धांतर होऊन त्याची शेकडो जन्मींची अनेक पातके नाहीशी होतील आणि तो तत्काळ मोठमोठ्या देवांनी गाइलेल्या रामरूपी विष्णुच्या वैकुंठ नावाच्या आद्यपदाला पावेल.
त्रैलोक्याला दुःख देणाऱ्या रावणाचा युद्धात वध केल्यानंतर रामाने डाव्या हाताने धनुष्य भूमीवर टेकवले आणि दुसऱ्या हातात धरलेला एक बाण फिरवित तो उभा राहिला. त्याचे नेत्रप्रांत आरक्त दिसत होते. त्याचे शरीर बाणांनी विदारित झाले होते. त्याची अंगकांती कोटिसूर्याप्रमाणे दीप्तिमंत दिसत होती. त्याच्या सर्व शरीरावर वीरश्री झळकत होती. देवेंद्र त्याची स्तुति करीत होता असा तो वीर राम माझे रक्षण करो.’’
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे एकादशः सर्गः।