श्री महादेव म्हणाले,
‘‘भगवान वसिष्ठमुनि, अनेक मुनि आणि मंत्रिगण घेऊन देवांच्या सभेप्रमाणे भासणाऱ्या त्या राज्यसभेत आले. तेथे ते आसनावर बसले असता जणू दुसरे ब्रह्मदेवच भासत होते. त्यांनी कनिष्ठ बंधु शत्रुघ्नासह भरताला सभेत आणून आपल्याजवळ बसविले. देश, कालानुसार योग्य, शत्रूंचा नाश करणाऱ्या भरताला उद्देशून वसिष्ठमुनि म्हणाले, ‘‘वत्सा! तुझ्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे आज आम्ही तुला राज्याभिषेक करणार आहोत. हे पुरुषश्रेष्ठा! तुझ्याकरिता कैकेयीने राज्य मागून घेतले आहे. दशरथ राजा सत्यप्रतिज्ञ असल्यामुळे त्याने प्रतिज्ञापूर्वक तुला राज्य दिलेले आहे. म्हणून आज तुला मंत्रपूर्वक अभिषेक होवो.’’
तेव्हा भरत म्हणाला, ‘‘मुनिवर्य, मला राज्य काय करायचे आहे? राम हाच राजाधिराज आहे. आम्ही त्याचे सेवक आहोत. तेव्हा उद्या पहाटेच तातडीने रामाला आणण्याकरिता मी जाणार आहे. मी स्वतः आपण आणि कैकेयी वगळून सर्व माता मिळून आपण जाऊ. कैकेयी ही केवळ मातृत्वाला कलंक आहे. ती आई नाही. खरे तर मी तिला आत्ताच ठार मारावी, असा विचार करीत होतो. परंतु रघुश्रेष्ठ रामाला माझे हे स्त्रीहत्त्येचे कृत्य आवडणार नाही म्हणून उद्या दिवस उगवताच मी पायी चालत दण्डकारण्यात जाणार आहे. माझ्यासोबत शत्रुघ्नाला सुद्धा नेणार आहे. आपण यावे किंवा न यावे, मी मात्र राम जसा वनात गेला त्याप्रमाणे वल्कले परिधान करून जाणार आहे. अहो मुनिवर्य! राम वनातून परत येईपर्यंत शत्रुघ्नासह मी फलमूलांचा आहार घेईन, भूमीवर शयन करून राहीन, जटा धारण करीन.’’ असा निश्चय करून भरत स्वस्थ बसला. सर्वांनी आनंदाने ‘उत्तम, उत्तम!’ असे म्हणून त्याची प्रशंसा केली.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच भरत निघाला तेव्हा हत्ती, घोडे यांसह सर्व सैनिक सुमंत्राच्या आज्ञेने भरताच्या मागून निघाले. कौसल्यादि सर्व राजस्त्रिया, वसिष्ठमुनि, सर्व प्रमुख ब्राह्मण आणि इतर लोक, कोणी पुढे तर कोणी मागे असे चालू लागले. पृथ्वी जणू आच्छादून गेली होती. शृंगवेरपुराला पोचल्यावर गंगातीरावर शत्रुघ्नाच्या आज्ञेने त्या प्रचंड सेनेने तळ दिला.
‘भरत आला आहे’ हे ऐकताच गुहाच्या मनात एक वेगळीच शंका निर्माण झाली. ‘हा भरत फार मोठी सेना घेऊन आला आहे. रामाला मात्र याची कल्पना सुद्धा नाही. हा काही दुष्ट हेतू साधण्यासाठी तर आला नाही ना? आपण त्याची भेट घेऊन त्याचा हेतू जाणून घेऊ. त्याचा हेतू जर शुद्ध असेल तरच तो गंगेच्या पैलतीराला जाईल. तसे जर नसेल तर नावा बाहेर ओढून ठेवू. ज्ञातीबांधवांसह शस्त्र जवळ बाळगून सर्व दिशांना लक्ष ठेवून सज्ज राहू.’ अशी सर्वांना आज्ञा देऊन गुह भरताकडे आला. त्याने नानाप्रकारच्या पुष्कळ भेटवस्तू, नजराणा म्हणून आणल्या होत्या. त्याच्या ज्ञातीबांधवांना सोबत घेऊनच तो गुह आला होता. गुहाने आणलेल्या भेटवस्तू भरतापुढे ठेवल्या. भरताच्या भोवती धाकटा बंधु शत्रुघ्न, मंत्रिगण यांना गुहाने पाहिले. त्यावेळी भरताने वल्कले परिधान केली होती, मस्तकावर जटांचा मुकुट धारण केला होता. भरत रामाबद्दल शोक करीत होता. मुखाने सतत ‘राम‘, ‘राम’ असे म्हणत होता. हे पाहून गुहाने भरताला साष्टांग नमस्कार केला आणि ‘मी गुह आहे’ असे त्याला सांगितले. भरताने गुहाला ताबडतोब उठविले आणि आदराने त्याला आलिंगन दिले. त्याचे क्षेमकुशल विचारले. त्याला आपला मित्र समजून मनमोकळेपणाने म्हणाला, ‘‘हे बंधो, तू रामाच्या सोबत रहात होतास. तुला त्याच्या भेटीचा लाभ झाला. त्या शुद्ध मनाच्या रामाने तुला प्रेमाने, अश्रूपूर्ण नेत्रांनी आलिंगन दिले आहे. खरोखर तू धन्य आहेस. कृतार्थ झाला आहेस. सीता आणि लक्ष्मणासह असलेल्या त्या कमलनयन रामाशी तुझे संभाषण झाले आहे. हे सुव्रता गुहा! ज्याठिकाणी तुला रामाचे दर्शन झाले ते ठिकाण मला दाखव. तू रामाचा अत्यंत प्रिय आहेस. भक्तिमान आणि भाग्यवानही आहेस.’’
अशा तऱ्हेने सारखे रामस्मरण करून भरताच्या डोळ्यांतून सारखे अश्रू वाहू लागले. जेथे राम रात्रभर राहिला होता तेथे गुहाबरोबर भरत गेला. तेथे त्याने दर्भ पसरून तयार केलेले रामाचे शयनस्थल पाहिले. सीतेच्या अंगावरील सोन्याच्या अलंकारांशी झालेल्या संघर्षणाने त्या शय्येवर सुवर्णचिह्ने उमटली होती. ते पाहून भरताचे मन दुःखाने संतप्त झाले. तो शोक करू लागला.
भरत म्हणाला, ‘‘अहो, ती अतिसुकुमार जनककन्या सीता, राजप्रासादात रत्नजडित पलंगावर उत्तम आणि मृदू अशा शय्येवर रामासह शयन करायची, तिला माझ्या चुकीमुळे दर्भाच्या शय्येवर झोपण्याचा प्रसंग आला ना? माझा धिक्कार असो. पापिणी कैकेयीच्या उदरी जन्म घेतला, धिक्कार असो. माझ्यामुळे परमात्मा रामाला हे सगळे कष्ट सहन करावे लागले. खरोखर त्या महाभाग्यवान लक्ष्मणाचा जन्म कृतार्थ झाला म्हणायचा. वनवासातही तो रामाबरोबर आहे. रामाचे जे दास आहेत, त्या दासांच्या, भक्तांच्या दासांचा मी दास होईन. तरच कुठे माझ्या जन्माचे सार्थक होईल, यात काही संशय नाही. हे बंधो, गुहा, तुला काही माहीत असेल तर सर्व काही मला सांग. तो राम जेथे कुठे असेल तेथे त्याला आणण्यासाठी मी लगेच जातो.’’
भरताचे शुद्ध हृदय आहे हे जाणून घेऊन गुह भरताला म्हणाला, ‘‘भरता! खरे तर तूच धन्य आहेस. तुझी अशाप्रकारची भक्ति आहे. तो कमलनयन राम, चित्रकूट पर्वतापासून जवळच आणि गंगेपासून फार दूर नाही अशा ठिकाणी मुनींच्या आश्रमात जानकी आणि लक्ष्मणासह रहात आहे. तेथे सर्वप्रकारच्या आनंददायी गोष्टी भरपूर आहेत. म्हणून तो सुखाने रहात आहे. तेथे आपण लवकर जाऊ या. सर्वप्रथम गंगा ओलांडून पैलतीराला जावे.’’
असे सांगून भरताला सैन्यासह महानदी पार करता यावी यासाठी गुहाने पाचशे नौका आणि एक राजनौका आणली. त्या राजनौकेत भरत, शत्रुघ्न, राममाता आणि वसिष्ठमुनि यांना बसविले आणि दुसऱ्या नौकेत कैकेयी आणि इतर राजस्त्रियांना बसविले. गंगेच्या पैलतीराला गेल्यानंतर आपल्या प्रचंड सैन्याला दूर ठेवून भरत घाईघाईने भरद्वाज मुनींच्या आश्रमाकडे शत्रुघ्नासह गेला. आश्रमात त्या तेजस्वी मुनींना पाहून भरताने भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घातला. हा दशरथपुत्र आहे हे जाणून मुनींनी त्याचे आदरातिथ्य केले. जटा, वल्कले धारण केलेले पाहून त्याला क्षेमकुशल विचारले. ‘‘तू राज्यकारभार सांभाळत असताना वल्कले का बरे धारण केली? आणि ह्या अरण्यात तू कोणत्या हेतूने आलास?’’ हे भरद्वाज मुनींचे बोलणे ऐकून भरताच्या डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, ‘‘भगवन्, आपण सर्व काही जाणता. असे असूनही ज्याअर्थी आपण हे प्रश्न विचारत आहात त्याअर्थी आपण माझ्यावर कृपा केली असे मी समजतो. रामाला राज्य मिळण्यासाठी कैकेयीने जे विघ्न आणले ते किंवा त्याचा वनवास इ. बाबतीत मला काहीच माहीत नाही. मुनिश्रेष्ठ, मी आपल्या चरणांची शपथ घेऊन सांगतो.’’ एवढे बोलून मुनिवर्यांच्या चरणांना स्पर्श करून दुःखी मनाने म्हणाला, ‘‘देवा, माझे मन शुद्ध आहे की अशुद्ध हे जाणण्यास आपण समर्थ आहात. स्वामी रामराजा असताना मला राज्य घेऊन काय करायचे आहे? मी तर रामाचा सदैव सेवकच आहे. म्हणून हे मुनिश्रेष्ठ, आता मी रामाजवळ जातो आणि त्याच्या चरणांवर नतमस्तक होऊन आताच हे राज्य अर्पण करतो आणि वसिष्ठादि मुनि, नागरिक इतर देशांचे लोक इ. समोर मी रामाला अभिषेक करीन. मग रामाला अयोध्येला नेऊन त्याचा दास होऊन नम्रपणे सेवा करीन.’’
भरताचे उद्गार ऐकून भरद्वाजमुनींनी त्याला आलिंगन दिले. मस्तकाचे अवघ्राण करून त्याची प्रशंसा केली. म्हणाले, ‘‘हे वत्सा! हे भविष्य ज्ञानदृष्टिने मी पूर्वीच जाणले होते. तू खिन्न होऊ नकोस. रामाचे ठिकाणी तुझी भक्ति लक्ष्मणापेक्षाही अधिक आहे. हे निष्पाप भरता! तुझ्या सर्व सैन्यासह तुझे आतिथ्य करण्याची माझी इच्छा आहे. म्हणून तू आज सैन्यासह भोजन करून उद्या रामाकडे जावे.’’
‘‘जशी आपली आज्ञा, ठीक आहे,’’ असे भरत म्हणाला. त्यानंतर भरद्वाजमुनींनी आचमन केले. मौन धरून होमशाळेत जाऊन बसले. तेथे त्यांनी कामधेनुचे ध्यान केले. तेव्हा कामधेनुने त्या सर्वांसाठी त्यांच्या इच्छेप्रमाणे अलौकिक उत्तमोत्तम पदार्थ निर्माण केले. कामधेनुने पदार्थांची जणू वृष्टिच केली. सर्व सैनिक भोजन करून तृप्त झाले.
योगिश्रेष्ठ भरद्वाजांनी शास्त्रोक्त दृष्टीने सर्वप्रथम वसिष्ठांचे पूजन केले. त्यानंतर सर्व सैन्यासह भरताचे आतिथ्य करून संतुष्ट केले. स्वर्गाप्रमाणे असलेल्या त्या आश्रमात एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी सकाळीच शत्रुघ्नासह भरद्वाजांना वंदन करून त्यांची अनुज्ञा घेऊन भरत रामाकडे जाण्यास निघाला. चित्रकूट पर्वताजवळ येताच त्याने सैनिकांना दूर ठेवले आणि रामाच्या दर्शनाची इच्छा मनात धरून स्वतः पुढे निघाला. शत्रुघ्न, सुमंत्र, गुह यांना सोबत घेऊन भरताने तपस्व्यांची सर्व ठिकाणे शोधली. रामाचा शोध न लागल्यामुळे परत आला. रामाचे वसतिस्थान सापडत नसल्यामुळे तेथील ऋषिजनांना त्याने विचारले. ‘‘सीता, लक्ष्मण यांच्यासह रघुत्तम श्रीराम कोठे आहेत?’’
त्यावर ते ऋषि म्हणाले, ‘‘समोर दिसणाऱ्या पर्वताच्या पाठीमागच्या बाजूला, गंगेच्या उत्तरेकडील तीरावर, एकान्त अशा सुंदर अरण्याने नटलेल्या ठिकाणी रामाचे निवासस्थान आहे. तेथे फलयुक्त आम्र, फणस असे वृक्ष असून केळीची अनेक बने आहेत. चाङ्गा, कांचन, पुन्नाग इ. सुगंधी फुलांची झाडे सुद्धा भरपूर आहेत.’’
मुनींनी सांगितलेल्या सर्व खुणा लक्षात ठेवून तो भरत सुमंत्रास सोबत घेऊन अतिशय आनंदाने रघुश्रेष्ठ रामाच्या निवासस्थानाकडे निघाला. दुरूनच त्याला अतिशय तेजस्वी, कल्याणकारी मुनीजनांनी आश्रय घेतला आहे असे रामाचे गृह कनिष्ठ बंधुसह दिसले. वृक्षांच्या शेंड्यावर उत्तम वल्कले आणि अजिने अडकविलेली होती. रामाच्या वास्तव्यामुळे ते ठिकाण रमणीय झाले होते.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अयोध्याकाण्डे अष्टमः सर्गः।