श्री महादेव म्हणाले,
‘‘आपण आता गळफास घेऊन देहत्याग करावा! राम मला अंतरला. आता ह्या राक्षसांच्या मध्ये राहून जगून तरी काय फलीत आहे? ही माझी लांब वेणी गळफास घेण्यासाठी फारच उपयोगी पडेल.’’ असा देहत्यागाचा निर्णय सीतेने केला आहे हे पाहून मारुतीने आपल्या मनाशी काही विचार केला आणि सूक्ष्मरुप धारण करून जानकीला ऐकू येईल अशा हलक्या आवाजात बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, ‘‘ईक्ष्वाकुवंशात जन्मलेला अयोध्याधिपती दशरथ नावाचा सुप्रसिद्ध असा राजा होऊन गेला. त्याला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न नामक जगत्प्रसिद्ध असे चार पुत्र होते. ते सर्व देवांसारखे शुभलक्षणसंपन्न होते. त्यापैकी ज्येष्ठ पुत्र राम पित्याच्या आज्ञेनुसार धाकटा बंधु लक्ष्मण आणि सीतेसह दंडकारण्यात आला. तेथे तो थोर मनाचा राम गौतमी नदीच्या तीरावर पंचवटीमध्ये राहात होता. तेथूनच राम जवळ नाही असे पाहून संधी साधून त्या महाभाग्यशाली जनककन्या सीतेचे दुष्ट रावणाने हरण केले. त्यामुळे अत्यंत दुःखी होऊन रामाने सर्वत्र सीतेचा शोध केला. एवढ्यातच पक्षिराज जटायु, जो मरणोन्मुख अवस्थेत जमिनीवर पडलेला होता तो रामाला दिसला. त्याला स्वर्गप्राप्त करून देऊन नंतर लगेचच राम ऋष्यमूक पर्वतावर गेला. तेथे आत्मज्ञानसंपन्न अशा त्या श्रीरामाची सुग्रीवाशी मैत्री झाली. पुढे रघुनंदन रामाने सुग्रीवाच्या पत्नीचे हरण करणाऱ्या वालीचा वध केला आणि सुग्रीवाला राज्याभिषेक करून मित्रकार्य पूर्ण केले. नंतर वानरराज सुग्रीवाने अनेक वानरांना बोलावून घेतले आणि सीतेच्या शोधासाठी चारी दिशांना त्या वानरांना पाठविले. त्यापैकी मी सुग्रीवाचा सचिव असा एक वानर आहे. संपातीच्या सांगण्यावरून शंभर योजने लांब समुद्र शीघ्र उल्लंघून लंका नगरीत त्या सुलक्षणी जानकीचा मी शोध घेत आहे. तेथून पुढे अशोकवनिकेत थोडा थोडा शोध घेत असता तेथे एका शिंशपा वृक्षाखाली दुःखमग्न स्थितीत शोक करीत असलेली, रामाची पट्टराणी देवी जानकी मला दिसली. आता माझ्या येथे येण्याचे सार्थक झाले’’ असे बोलून तो महाबुद्धिमान मारुती स्वस्थ बसला. तो सर्व वृत्तांत क्रमवार ऐकून सीतेला खूप आश्चर्य वाटले. ‘‘मी हे ऐकलेले शब्द आकाशात वायुने उच्चारलेले असतील काय? मी झोपेत आहे काय? की माझ्या मनाला भ्रम झाला आहे? की हे सर्व खरे आहे? दुःखामुळे झोप तर मला नाहीच. तसेच मला हे सर्व नीट समजत आहे, तेव्हा भ्रम तरी कसा म्हणायचा? माझ्या कानांना अमृताप्रमाणे गोड वाटणारे शब्द ज्याच्याकडून उच्चारिले गेले असतील त्या प्रियंवद महाभाग्यशाली पुरुषाने माझ्यापुढे प्रगट व्हावे.’’ जानकीचे हे शब्द ऐकून मारुती त्या पानांच्या जाळीतून हळूच खाली उतरला आणि सीतेच्या पुढे उभा राहिला. त्याचे शरीर चिमणीएवढे, तोंड लाल आणि अंगकांती पिवळी होती, असा तो वानर मारुती सीतेला हळूच नमस्कार करून, हात जोडून तिच्यापुढे उभा राहिला. त्याला पाहून जानकीला भीती वाटली. ‘मायेने वानराकार धारण करून हा रावणच मला मोहित करण्यासाठी आला आहे’ असे तिला वाटून ती मुख खाली घालून स्वस्थ राहिली. तेव्हा मारुती पुन्हा म्हणाला, ‘‘देवी! तुझ्या मनात शंका आली आहे, तसा मी नाही. माते! माझ्याविषयीची शंका सोडून दे. कोसलदेशचा अधिपती परमात्मा रामचंद्र, त्याचा मी दास आहे. हे कल्याणिनी! कपिराज सुग्रीवाचा मी सचिव आहे आणि हे सुंदरी! सर्वांना प्राणरुप असणारा जो वायु त्याचा मी पुत्र आहे.’’
ते ऐकून हात जोडून पुढे उभ्या असलेल्या मारुतीला जानकी म्हणाली, ‘‘वानरांची आणि मनुष्यांची मैत्री कशी बरे घडावी? तू म्हणतोस ‘मी रामाचा दास आहे’ हे कसे शक्य आहे?’’ ते ऐकून मारुतीला संतोष वाटला आणि तो जानकीला म्हणाला, ‘‘शबरीच्या प्रेरणेने बुद्धिमान राम ऋष्यमूक पर्वतावर गेला. त्या पर्वतावर सुग्रीव राहात असे. त्याला राम-लक्ष्मण दिसले. त्यांना पाहून सुग्रीव घाबरला आणि त्याने रामाचा तेथे येण्याचा काय उद्देश आहे हे समजून घेण्यासाठी मला तेथे पाठविले. मी ब्रह्मचाऱ्याचा वेष घेऊन रामाजवळ गेलो. रामाचा शुद्ध अभिप्राय जाणून त्या दोघांना मी माझ्या खांद्यावर घेतले आणि त्यांना सुग्रीवाजवळ नेऊन त्यांची सुग्रीवाशी मैत्री घडवून आणली. सुग्रीवाच्या पत्नीचे वालीने हरण केले. त्याचा रामाने एकाच बाणाने वध केला आणि सुग्रीवाला राज्याभिषेक केला. पुढे सुग्रीवाने तुझ्या शोधासाठी दाही दिशांना मोठमोठे बलवान वानर पाठविले. आता मला निघताना पाहून श्रीराम आदरपूर्वक म्हणाला, ‘‘हे वायुपुत्रा, माझ्या कार्याची सिद्धी होणे आता पूर्णपणे तुझ्याच हातात आहे. मी आणि लक्ष्मण दोघेही खुशाल असल्याचे सांग आणि खुणेसाठी म्हणून जिच्यावर माझ्या नावाची अक्षरे कोरलेली आहेत ती ही माझी अंगठी तुला देतो. ती सीतेला दे. असे म्हणून रामाने आपल्या कराग्रातून अंगठी काढली आणि मला दिली. देवी! ही पाहा. मी ती जपून आणली आहे.’’ असे म्हणून वायुपुत्र मारुतीने ती अंगठी सीतादेवीला दिली आणि हात जोडून नमस्कार करून दूर उभा राहिला. ती रामनामांकित अंगठी पाहून सीतेला खूप आनंद झाला. तिने ती अंगठी मस्तकी धरली. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ती म्हणाली, ‘‘वानरा, तू माझा प्राणदाता आहेस. तू बुद्धिमान असून रामाचा भक्त आहेस. एवढेच नव्हे तर तू रामाचा प्रियकर्ता असून तुझ्यावर रामाचा विश्वास आहे. तसे नसते तर परपुरुषाला त्याने माझ्याजवळ कसे बरे पाठविले असते? हनुमंता! माझे दुःख वगैरे तू सर्वच पाहिले आहेस. ते सर्व तू रामाला सांग की जेणेकरून त्याला माझी दया येईल. हे साधुश्रेष्ठा! माझे प्राण केवळ दोन महिने राहतील. तेवढ्यात जर राम आला नाही तर तो दुष्ट मला खाऊन टाकील. म्हणून कपीन्द्र सुग्रीव आणि दुसऱ्याही वानरनायकांसह प्रभु राम येईल आणि तो रावणाचा पुत्र आणि सैन्यासह युद्धात वध करून मला सोडवील तरच ते त्याच्या वर्णिलेल्या वीर्याला अनुरुप होईल. म्हणून हे वीरा! त्याला येथील वृत्तांत अशा तर्हेने सांग की जेणेकरून त्याला स्फुरण येईल. हनुमंता! रावणाचा वध करून राम लवकर मला सोडवील असा प्रयत्न कर. हनुमंता! वाणीचा उपयोग करून धर्म घडेल असे काही कर.’’
त्यावर हनुमंत देखील तिला म्हणाला, ‘‘देवी! मी रामाला भेटलो की तो आयुधांसह लक्ष्मणाला आणि ससैन्य सुग्रीवाला घेऊन लगेचच येईल आणि स्वपराक्रमाने रावणाचा वध करून हे देवी, तुला अयोध्येला घेऊन जाईल, हे निश्चित आहे, यात संशय नाही.’’ त्यावर जानकी त्याला म्हणाली, ‘‘पण एवढ्या विस्तीर्ण समुद्राला तरून विशाल स्थूल स्वरुपाचा राम आपली वानरसेना आणि सेनापती यांसह कसा येणार?’’ मारुती म्हणाला, ‘‘ते दोघे पुरुषश्रेष्ठ माझ्या खांद्यावर बसून येतील. वानराधिपती सुग्रीव आपल्या सैन्यासह आकाशमार्गाने एका क्षणात विस्तीर्ण समुद्र उल्लंघून येईल आणि तुझ्याकरिता सर्व राक्षससमूहांना जाळून भस्म करील. हे खात्रीने सांगतो. देवी! मला अनुमोदन दे. मी रामाला भेटण्यासाठी लवकर जातो आणि बंधुसह त्याला तुझ्याकडे घाईने पाठवितो. देवी! माझ्याजवळ काही तरी खुणेची वस्तू दे की जिच्यामुळे रामाचा माझ्यावर विश्वास बसेल. ती वस्तू मी जपून ठेवीन आणि मोठ्या आनंदाने रामाकडे जाईन.’’ नंतर कमललोचना सीतेने थोडा वेळ विचार केला आणि मग आपल्या वेणीतील चूडामणि काढून तो मारुतीला दिला. ती म्हणाली, ‘‘हे कपिश्रेष्ठा! हा मणी पाहताच रामलक्ष्मणाचा तुझ्यावर विश्वास बसेल. हे सुव्रता! खुणेकरिता आणखी एक गोष्ट मी तुला सांगते. पूर्वी एकदा चित्रकूट पर्वतावर राम एकांतात माझ्या मांडीवर मस्तक ठेवून निजले होते. त्यावेळी कावळ्याच्या रुपाने इंद्राचा पुत्र तेथे येऊन त्याने मांसाच्या आशेने माझ्या पायाचा किंचित लाल असा अंगठा आपल्या नखांनी आणि चोचीने वरचेवर प्रहार करून फोडला. त्यानंतर राम जागे झाले तेव्हा माझ्या पायाला झालेली जखम त्यांना दिसली. ते म्हणाले, ‘‘कल्याणी! मला अप्रिय अशी ही गोष्ट कोणत्या दुष्टाने केली?’’ इतक्यात ज्याचे तोंड, नखे आणि चोच रक्ताने लाल झाली आहेत व जो माझ्या अंगावर वरचेवर धावून येत आहे अशा त्या कावळ्याला रामाने पाहिले. ते बघून संतप्त झाले. त्यानंतर रामाने गवताची एक काडी घेऊन तिच्यावर दिव्य अस्त्राचा प्रयोग केला आणि ती धगधगती काडी सहज कावळ्यावर फेकली. ते बघून कावळा घाबरला आणि तीनही लोकात तो भटकू लागला. इंद्र, ब्रह्मदेव इत्यादिकांकडूनही आपले रक्षण होणे शक्य नाही असे ओळखून तो पुन्हा दयानिधी रामचंद्राकडे आला आणि भयभीत होऊन रामाच्या पाया पडला. तो शरण आला आहे असे पाहून राम त्याला म्हणाले, ‘‘तू त्याला आपला एक डोळा दे आणि येथून निघून जा.’’ कावळ्याने ते ऐकून आपला उजवा डोळा त्या अस्त्राला दिला. नंतर निघून गेला. एवढे पराक्रमी असूनही ते श्रीराम सांप्रत माझी का बरे उपेक्षा करीत आहेत?’’ हनुमंताने देखील सीतेचे भाषण ऐकून तिला म्हटले, ‘‘देवी! तू येथे आहेस हे जर रघुत्तम रामाला समजले तर तो ह्या राक्षसांनी भरलेल्या लंकेचे क्षणात भस्म करील.’’ सीता म्हणाली, ‘‘वत्सा! तू त्या राक्षसांबरोबर कसा लढणार? तुझे शरीर अत्यंत सूक्ष्म आहे. सर्व वानरही तुझ्या सारखेच असणार?’’ हे सीतेचे भाषण ऐकून मारुतीने सीतादेवीला आपले पूर्वरूप दाखविले. ते मेरुमंदार पर्वतासारखे असून राक्षस समुदायांना पाहताक्षणीच भीती वाटेल असे होते. मोठा पर्वतच की काय अशा त्या हनुमंताला पाहून सीतेला अत्यंत आनंद झाला. ती त्या कपिश्रेष्ठाला म्हणाली, ‘‘महासमर्था मारुते! तू स्वीकारलेले कार्य सिद्धिस नेण्यास समर्थ आहेस. महासामर्थ्यवान अशा तुला ह्या राक्षसी पाहतील. तरी तू रामाकडे लगेच निघून जा. तुझा मार्ग कल्याणकारक होवो.’’ त्या वानराला, मारुतीला खूप भूक लागली होती. तो म्हणाला, ‘‘तुझे दर्शन झाले तरी आता तुझ्या नजरेसमोर जी जी फळे आहेत ती ती सर्व खाऊन टाकतो आणि माझी क्षुधाशांती करतो.’’ ‘ठीक आहे’ असे जानकीने म्हटल्यावर त्या वानराने तेथील फळे भक्षण केली. नंतर जानकीची अनुज्ञा घेऊन आणि तिला नमस्कार करून तो तेथून निघाला. काही अंतर गेल्यावर त्याने स्वतःशीच विचार केला. स्वामीकार्यासाठी आलेला दूत त्या कार्यात विरोध न होईल अशा प्रकारचे काही तरी दूसरे, स्वतःच्या स्वामीचे सामर्थ्य प्रगट होईल असे कार्य न करताच परत जाईल, तर तो अधम होय. म्हणून दूसरे काही तरी काम काढून रावणाला भेटून, त्याच्याशी संभाषण करून नंतरच रामदर्शनाला जाईन. असा मनात पक्का निश्चय करून त्या महाबलवान वानराने झाडेच्या झाडे उपटून काढली आणि क्षणभरात त्या सर्व अशोकवनाची नासधूस केली. सीता ज्या वृक्षाच्या आश्रयाला बसली होती तेवढा मात्र वृक्ष सोडून बाकी सर्व अशोकवन त्याने ओसाड करून टाकले. मारुती ते वन ओसाड करीत आहे असे पाहून त्या राक्षसिणी जानकीला म्हणाल्या, ‘‘हा वानराकृती दांडगट वीर कोण आहे?’’ जानकी म्हणाली, ‘‘राक्षसांनी काय माया निर्माण केली असेल ते तुम्हालाच माहिती. मी दुःख आणि शोकाने पीडित असून हा कोण आहे हे मला माहीत नाही.’’ असे सीतेने सांगितल्यावर त्या राक्षसिणी भयभीत होऊन ताबडतोब रावणाकडे गेल्या आणि हनुमंताने केलेल्या सर्व गोष्टी त्याला सांगितल्या. त्या म्हणाल्या, ‘‘महाराज! वानराचा देह धारण केलेला महाबलवान असा कोणी एक प्राणी येथे आला आहे. त्याने सीतेबरोबर संभाषण केले आणि क्षणात अशोकवनिका उद्ध्वस्त केली. तेथील देवालयही भग्न केले. त्याच्या पराक्रमाला मिती नाही. वाड्याच्या सर्व रक्षकांना ठार करून तो तेथेच राहिला आहे.’’
ते वनभंगाचे अतिशय वाईट वृत्त ऐकून रावण तत्काळ उठला. त्या राक्षसाधिपतीने दहा लक्ष सेवक मारुतीकडे पाठविले. त्यावेळी मोडलेल्या देवालयाच्या पहिल्या चौकात मारुती बसला होता. त्या हनुमंताचे शरीर पर्वतासारखे होते. त्याने आयुध म्हणून एक लोहस्तंभ हातात घेतला होता. तो आपले शेपूट हलवित होता. त्याचे तोंड रक्तवर्ण व आकृती भयंकर दिसत होती. आपल्या अंगावर चालून येणारा राक्षसांचा मोठा समूह त्याने पाहिला आणि सिंहासारखी गर्जना केली. ती ऐकून ते राक्षस मूर्च्छित झाले. सर्व राक्षसांचा घात करणाऱ्या भयंकर आकाराच्या हनुमंताला पाहून त्या राक्षसांनी अनेक प्रकारच्या अस्त्रप्रहारांनी त्याच्यावर मारा सुरू केला. नंतर मदोन्मत्त हत्तीने जशा माशा चिरडून टाकाव्या त्याप्रमाणे हनुमंताने हातातील लोखंडी मुद्गराने भोवतालच्या सर्वांचे पीठ केले. आपले सेवक मारले गेले हे ऐकून रावण क्रोधाने देहभान विसरून गेला. त्याने मदोन्मत्त असे पाच सेनापती त्या मारुतीवर पाठविले. हनुमंताने त्या सगळ्यांचाही हातातील मुद्गराने वध केला. त्यावर रावणाने सात मंत्रीपुत्र पाठविले. पूर्वीप्रमाणेच मारुतीने ह्या वेळीही आपल्यावर चालून आलेल्या सर्वांचा लोह-मुद्गराने एका क्षणात वध केला आणि पूर्वठिकाणी येऊन बसला व राक्षसांची वाट पाहू लागला. त्यानंतर बलवान आणि प्रतापी कुमार अक्ष मारुतीवर चालून आला. त्याला पाहून मारुती हातात मुद्गर घेऊन आकाशात उडाला आणि त्वरेने त्या अक्षाच्या मस्तकावर मुद्गराने प्रहार करता झाला. अक्षाचा वध करून मारुतीने त्याच्या सर्व सैन्याचा समूळ नाश केला.
कुमार अक्षाचा वध झाल्याचे ऐकून राक्षसश्रेष्ठ रावण अत्यंत क्रोधाविष्ट झाला. तो इंद्रजिताला म्हणाला, ‘‘पुत्रा, जेथे तो माझ्या अक्ष पुत्राचा वध करणारा आहे तेथे मी जातो. मी त्याचा वध करून किंवा त्याला बांधून तुझ्याजवळ घेऊन येतो.’’ त्यावर इंद्रजित म्हणाला, ‘‘महामते! आपण शोक करणे सोडून द्यावे. मी असताना आपण असे दुःखाचे भाषण का करता? त्या वानराला ब्रह्मपाशाने बांधून मी सत्त्वर घेऊन येतो.’’ असे बोलून तो इंद्रजित रथावर चढला, त्याने आपल्यासोबत पुष्कळ राक्षस घेतले होते. तो अतिपराक्रमी वीर, वायुपुत्राच्या जवळ आला. पुढे इंद्रजिताची मोठी गर्जना ऐकून त्या वीर्यशाली मारुतीने आपला लोहमुद्गल उचलला आणि गरुडाप्रमाणे आकाशात उडी घेतली. आकाशात भ्रमण करणाऱ्या त्या हनुमंतावर इंद्रजिताने बाणांचे प्रहार केले. त्याच्या मस्तकावर आठ बाण मारले. दोन्ही पायांवर सहा बाण मारले. पुन्हा हृदयावर आठ बाण मारले. नंतर एका बाणाने इंद्रजिताने त्याच्या पुच्छाचा भेद केला आणि भयंकर असा सिंहनाद केला. तेव्हा वीर्यशाली मारुतीने मोठ्या आनंदाने आपला लोहमुद्गल उचलून घेतला आणि इंद्रजिताच्या सारथ्याचा वध करून त्याचे घोडे, रथ ह्यांचा क्षणात चुराडा केला. नंतर त्या बलवान इंद्रजिताने दुसरा रथ आणवला. त्यात तो बसला. पुढे त्याने ब्रह्मास्त्र घेऊन त्याच्या योगाने त्या वानरवीराला बांधले. मग तो बलशाली इंद्रजित त्याला रावणाजवळ घेऊन गेला.
ज्याच्या नामाचा सतत जप केल्याने अज्ञानातून उत्पन्न झालेल्या कर्मबंधनातून मुक्त होऊन कोटिसूर्याप्रमाणे तेजस्वी व कल्याणकारक अशा त्या ईश्वराच्या पदी भक्त तात्काळ जाऊन पोचतात त्याच रामाचे चरणकमल मारुतीने आपल्या हृदयामध्ये सतत ठेवले होते. म्हणूनच सर्व बंधनापासून तो आधीच मुक्त होता. ब्रह्मपाश किंवा इतर बंधने याकडून त्याचे काय वाकडे होणार?
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे सुंदरकाण्डे तृतीयः सर्गः।