श्री महादेव म्हणाले,
‘‘विमानातून जात असता राम सर्वत्र दृष्टी टाकून पहात होता. तो चंद्रवदन जनकतनयेला सीतेला म्हणाला, ‘‘त्रिकूट पर्वताच्या शिखरावर असलेली ही अत्यंत शोभायमान लंका नगरी पहा. मांसाचा चिखल दाटून राहिलेली ही रणभूमी पहा. ह्या ठिकाणी असुरांचे आणि वानरांचे मोठे युद्ध झाले. राक्षसराज रावण माझ्याकडून मारला जाऊन येथेच पडला. कुंभकर्ण, इंद्रजित वगैरे सर्वही येथेच मारले गेले. जलराशी सागरावर मी सेतू बांधला, तो पहा. महाप्रसिद्ध सागरतीर्थ ते हे दिसत आहे. ते सेतूबंध ह्या नावाने प्रसिद्ध असून त्रैलोक्य त्याला वंदन करीत असते. हे अत्यंत पवित्र असून केवळ दर्शन घेतल्याने पातक हरण करणारे आहे. ह्या स्थळी रामेश्वर म्हणून शिवलिंग मी स्थापन केले आहे. येथे बिभीषण आपल्या मंत्र्यासह मला शरण आला. चित्रविचित्र अरण्यांनी युक्त सुग्रीवनगरी किष्किंधा ती ही पहा.’’ तेथे सीतेच्या संतोषाकरिता रामाच्या आज्ञेनुसार सुग्रीवाने तारा वगैरे वानरस्त्रियांना आणविले. त्या स्त्रियांना घेऊन लगेचच ते विमान पुढे चालू लागले. ते पाहून राम म्हणाला. ‘‘सीते, हा ऋष्यमूक पर्वत पहा. येथे वालीचा वध मी केला. ही पंचवटी म्हणतात, ती पहा. ह्या ठिकाणी मी पुष्कळ राक्षस मारले. कल्याणी! ही पहा अगस्त्य आणि सुतीक्ष्ण ह्यांची आश्रमांची ठिकाणे, हे सुंदरी! हे आता तपस्वी ऋषी दिसू लागले. देवी! हा पहा पर्वतश्रेष्ठ चित्रकूट दिसत आहे. येथे कैकेयीसुत भरत मला प्रसन्न करून परत नेण्यासाठी आला होता. ह्या यमुनातटावर भरद्वाज आश्रम दिसत आहे बघ. ही येथे सर्व लोकांना पावन करणारी भागीरथी गंगा दिसत आहे. सीते! तीरावर यज्ञस्तंभाच्या माळा लागून राहिल्या आहेत, अशी ही शरयू नदी दिसत आहे. ही अयोध्या इकडे दिसत आहे. हे मानिनि! तिला नमस्कार कर.’’ अशा क्रमाने रामचंद्र भरद्वाज आश्रमाला आले. चौदा वर्ष पूर्ण होताच पंचमी तिथीला रघुनंदन रामाने कनिष्ठ बंधुसह भरद्वाजमुनींचे दर्शन घेतले आणि त्यांना वंदन केले. मुनी आश्रमात बसले होते, त्यांना रघुत्तमाने विनयपूर्वक विचारले, ‘‘भरतासंबंधी काही वर्तमान आपल्या कानावर आले आहे काय? तो कनिष्ठ बंधु शत्रुघ्नासह खुशाल आहे ना? अयोध्यानगरीत सुबत्ता आहे ना? माझ्या माता सुखात राहताहेत ना?’’ रामाचे भाषण ऐकून भरद्वाजाच्या अंतःकरणाला आनंद झाला. तो म्हणाला, ‘‘रामा, सर्व मंडळी खुशाल आहेत. मोठ्या मनाचा भरत फळेमुळे भक्षण करून राहिला आहे. जटा आणि वल्कले त्याने धारण केली आहेत. तुझ्या पादुकांवर सकळ राज्य सोपवून, पादुका राजासनी ठेवून तो तुझी वाट पहात राहिला आहे. रघुनंदना! दंडकारण्यात तू ज्या ज्या गोष्टी केल्यास, सीतेला हरण करावयाला रावणाला तू कसे वाटेला लावलेस आणि नंतर राक्षसांचा विनाश कसा केलास, ह्या सर्व गोष्टी माझ्या तपाच्या योगाने तसेच तुझ्या प्रसादाने मला कळून आल्या आहेत. तू साक्षात परब्रह्म आहेस. सर्वप्रथम उदक उत्पन्न करून तू त्यात राहिलास म्हणूनच तू ‘नारायण’ म्हटला जातोस. तू सृष्टिकर्ता आहेस. हे विश्वात्मन्! तू नरांचा अंतर्यामी आहेस. सर्व लोकांचा पितामह ब्रह्मदेव तुझ्या नाभिकमलापासून उत्पन्न झाला आहे. म्हणून तू सर्व जगतांचा ईश असून सर्व लोक तुला नमस्कार करतात. तू विष्णु असून जानकी ही लक्ष्मी आहे. तसेच शेष हाच लक्ष्मण नावाचा तुझा बंधु आहे. तू आत्म्याच्या योगाने आत्म्याच्या ठिकाणीच आपल्या मायेकडून ही सृष्टि निर्माण करतोस. आकाश कोठेही न चिकटता जसे सर्वत्र व्यापून असते त्याचप्रमाणे तू कोठेही आसक्त नाही. तरी आपल्या ज्ञानशक्तीने सर्वसाक्षी आहेस. तू पूर्ण आहेस. तरी सुद्धा मूढमति लोक तुझ्या स्वरूपाला मर्यादा आहे असे समजतात. तूच जगत्, तूच जगाचा आधार, तूच जगाचा परिपालक आहेस. हे जगत्पते! सर्व भूतांचा भोक्ता आणि भोज्य तूच आहेस, हे रघुत्तमा! जे काही दिसते, ऐकू येते किंवा आठविले जाते ते सर्व तूच आहेस. तुझ्याशिवाय दुसरे काहीच नाही. माया आपल्या अहंकारादि गुणांनी लोकांना निर्माण करते. पण रामा! त्या मायेला तुझ्याच शक्तिकडून प्रेरणा होत असते. म्हणूनच सृष्टिकर्तृत्वादि तुजवर लादले जाते. चुंबकाच्या सान्निध्याने जसे लोखंड वगैरे चळण पावते, त्याप्रमाणे तुझी दृष्टी पडली असता ही जड माया सृष्टि उत्पन्न करते. तू स्वतः देहरहित आहेस तरी जगाच्या स्थितीकरता तू दोन देह धारण करीत असतोस. विराट हे तुझे स्थूलरूप असून हिरण्यगर्भ हे तुझे सूक्ष्मरूप असे म्हटले आहे. हे रघुनंदना! तुझ्या विराट स्वरूपापासून हे हजारो अवतार उत्पन्न होतात व ते विशिष्ट कार्य संपताच पुन्हा तुझ्या विराट स्वरूपात प्रवेश करतात. हे रघुत्तमा! जे लोक तुझ्या अवतारकथा अंतःकरणपूर्वक पृथ्वीवर गातात आणि वर्णन करतात त्यांनाच मुक्ति मिळते. राघवा! ब्रह्मदेवाने तपश्चर्या करून पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी पूर्वी तुझी प्रार्थना केली होती. त्या त्याच्या तपाने संतुष्ट होऊन तू रघुकुलामध्ये जन्माला आलास. रामा! देवांचे दुष्कर कार्य तू पूर्णपणे केलेस. ह्यापुढे मनुष्यदेहाचा आश्रय करून अनेक सहस्त्र वर्षेपर्यंत उभय लोकांच्या कल्याणासाठी दुष्कर व पापहारक कर्मे करीत राहून जगभर तुझी कीर्ती पसरवशील. जगन्नाथा! माझे गृह, आश्रम पवित्र कर अशी माझी तुला प्रार्थना आहे. आजचा दिवस सैन्यासह येथे राहून व भोजन करून उद्या तू नगराला जावेस.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून राम त्या दिवशी त्या उत्तम आश्रमात राहिला. भरद्वाजाने सीता, लक्ष्मण व सैन्य ह्या सर्वांसहित रामाचा उत्तम सत्कार केला. नंतर रामाने क्षणभर विचार केला आणि मारुतीला म्हटले, ‘‘मारुते! तू येथून अयोध्येला लवकर निघून जा आणि तेथे माझा मित्र गुह असतो, त्याला भेटून त्याच्याशी बोल. त्याला सांग की, ‘जानकी आणि लक्ष्मणासह मी आलो आहे.’ तेथून पुढे नंदिग्रामाला जा आणि माझा बंधु भरताला भेटून मी, माझी पत्नी आणि बंधु लक्ष्मण खुशाल आहोत असे सांग. सीताहरणादि कथा आणि रावणवध वगैरे मी व माझ्या भावाने केलेल्या सर्व गोष्टी त्याला सांग. सर्व शत्रुगणांचा वध करून, कृतकृत्य होऊन राम पत्नी आणि बंधु, त्याचप्रमाणे मोठमोठे अस्वल आणि वानर यांसह येत आहे, हा वृत्तांत त्याला सांग आणि मग भरताचा सर्व वृत्तांत समजून घेऊन ताबडतोब माझ्याकडे ये.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून मारुतीने तेथेच मनुष्यशरीर धारण केले आणि तो वायुवेगाने नंदिग्रामाला जाण्यास निघाला. गरुड जसा मोठ्या सापाला धरण्यासाठी अत्यंत वेगाने धावत सुटतो त्याप्रमाणे मारुती त्यावेळेस दिसला. शृंगवेरपुराला येऊन मारुतीने गुहाची भेट घेतली आणि आनंदित अंतःकरणाने त्याने रामाचा गोड निरोप गुहाला कळविला. तो म्हणाला, ‘‘तुझा मित्र धर्मात्मा श्रीमान् दाशरथि राम ह्याने सीता आणि लक्ष्मणासह आपण सुखरूप आहोत अशी कुशल वार्ता तुला कळविली आहे. आज भरद्वाज मुनींची अनुज्ञा घेऊन राम इकडे येणार आहे. तेव्हा त्या रघुत्तमाची व तुझी भेट होईलच.’’ असे म्हणून तो महातेजस्वी व महावेगवान मारुती वायुवेगाने तेथून उठला. मारुतीचे भाषण ऐकून गुहाच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले. पुढे मारुतीला मार्गात रामतीर्थ महानदी शरयू लागली. तिला उल्लंघून मारुती आनंदाने नंदिग्रामाला गेला. हा गाव अयोध्येपासून एक कोसावर आहे. तेथे वल्कले आणि हरिणचर्म परिधान करणारा, दीन आणि कृश होऊन आश्रमात राहणारा भरत मारुतीला दिसला. त्याचे शरीर मळ आणि चिखल यांनी माखले होते. त्याने मस्तकावर जटा वाढविल्या होत्या. अंगावर वल्कले धारण केली होती. फळे आणि मुळे खाऊन तो सदैव रामाच्या चिंतनात मग्न असे. रामाने दिलेल्या पादुका पुढे ठेवून तो पृथ्वीचे शासन करीत असे. त्याच्या भोवती त्याचे मंत्री आणि मुख्यमुख्य नागरिक काषायवस्त्रे परिधान करून बसले होते. हा शरीरधारी प्रत्यक्ष धर्मच आहे, असे पाहणाऱ्याला वाटत असे. त्याला वायुसुत मारुतीने हात जोडून म्हटले, ‘‘भरता! ज्या दंडकारण्यवासी तापसवृत्ती रामाचे तू चिंतन करीत आहेस आणि ज्याकरिता तू खेद करीत आहेस, त्या काकुत्स्थकुलोत्पन्न रामाने आपली खुशाली माझ्यामार्फत तुला कळविली आहे. राजा! मी तुला आनंदाची वार्ता सांगतो. हा अति भयंकर शोक सोडून दे. ह्या आजच्याच मुहूर्तावर राम तुला भेटेल. रणांगणावर रावणाचा वध करून आणि सीतेची प्राप्ती करून घेऊन कृतकृत्य होत्साता राम सीता आणि लक्ष्मण ह्यांसह जवळ येत आहे.’’ असे मारुतीने सांगितल्यावर तो महातेजस्वी कैकेयीसुत भरत आनंदभराने मूर्च्छा येऊन भूमीवर निश्चेष्ट पडला. सावध झाल्यावर भरताने लगेचच त्या प्रिय वार्ता सांगणाऱ्या मारुतीला आलिंगन दिले. भरताच्या डोळ्यातून आनंदाश्रुंचा एवढा पूर लोटला की त्या जलाने भरताने मारुतीला जणू न्हाऊ घातले असे वाटले. भरत म्हणाला, ‘‘वा! तू देव आहेस की मनुष्य आहेस? माझ्यावर कृपा करून ज्याअर्थी तू प्रिय वार्ता घेऊन आलास त्या अर्थी प्रिय कथन करणाऱ्या तुला मी शतसहस्त्र गायी, शंभर उत्तम गावे आणि सर्वालंकारांनी विभूषित अशा सुंदर सोळा कन्या देतो.’’ असे बोलून भरत पुन्हा त्या वायुपुत्राला म्हणाला, ‘‘राम अत्यंत घोर अरण्यात जाऊन आज बरीच वर्षे लोटली. माझ्या प्रभूची परम सुखकर वार्ता आज मी ऐकत आहे. लोकांमध्ये एक उक्ति प्रसिद्ध आहे. तिचा खरेपणा आता मला दिसून येत आहे. ती उक्ति ही की मनुष्य जिवंत राहिल्यास शंभर वर्षांनी का होईना त्याला आनंदाचा दिवस बघायला मिळतो. आता राम आणि वानर ह्यांचा समागम कसा घडला ते मला सांग. तुझे कल्याण असो. तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास आहे.’’
महात्मा भरताने असे विचारल्यानंतर मारुतीने रामाचे सर्व चरित्र क्रमवार सांगितले. त्या वायुपुत्राच्या तोंडून ती रामकथा ऐकून भरताला परम आनंद झाला. शत्रुघ्नालाही ती रामकथा ऐकून आनंद झाला. मग त्या भरताने आनंदित अंतःकरणाने त्या शत्रुघ्नाला आज्ञा दिली की ‘‘रघुनंदना! नगरामध्ये जितकी म्हणून देवालये आहेत त्या सर्व ठिकाणी बुद्धिमंत पुरुषांनी नानाविध उपहार आणि बली अर्पण करून पूजन करावे. सूत, वैतालिक बंदी, स्तुतिपाठक, शेकडो वारांगना ह्यांचे शतशः थवेच्या थवे आज आधी पुढे निघोत. राजस्त्रिया, अमात्य, हत्ती, घोडे, पायदळ मिळून सेना, ब्राह्मण, पौरजन आणि एकत्र जमलेले निरनिराळ्या देशांचे राजे हे सर्व रामाचा मुखचंद्र अवलोकन करण्यास आताच निघोत.’’
भरताचे भाषण ऐकून शत्रुघ्नाने सर्वांना आज्ञा दिली. त्याप्रमाणे सर्वांनी मोत्यांची, रत्नांची तोरणे लावली. चित्रविचित्र अनेक प्रकारच्या पताका उभारल्या. कलाकुशल लोकांनी आपापली घरे श्रृंगारली. रामदर्शनाच्या इच्छेने सर्व लोक घोळक्याघोळक्यांनी निघाले. एक लक्ष घोडे, अयुत हत्ती, सुवर्णसूत्रांनी सुशोभित केलेले दहा हजार रथ बाहेर पडले. ईश्वराला अर्पण करण्यालायक लहानमोठ्या वस्तु घेऊन सर्वजण निघाले. नंतर पालख्यांमध्ये बसून राजस्त्रिया निघाल्या. भरताने रामाच्या पादुका मस्तकावर घेतल्या आणि हात जोडून तो शत्रुघ्नासह पायी चालत रामाकडे जाण्यास निघाला. इतक्यात दुरून चंद्रासारखे शुभ्र विमान दिसू लागले. हे सूर्यासारखे तेजस्वी विमान ब्रह्मदेवाने मनःसंकल्पाने निर्माण केले असून त्यात जानकीसह दोघे वीरबंधु रामलक्ष्मण, कपिश्रेष्ठ सुग्रीव आणि मंत्र्यांसह बिभीषण बसलेले दिसत आहेत. ‘‘लोक हो, पहा’’ असे मारुती बोलला. नंतर सर्व स्त्रिया, मुले, तरुण, वृद्ध ह्यांच्या तोंडून आनंदाने, ‘‘हा राम आला’’, ‘‘हा राम आला’’ अशी गर्जना होऊ लागली आणि ती गर्जना स्वर्गाला जाऊन पोचली. रथ, हत्ती, घोडे यावर बसून आलेले लोक खाली उतरून जमिनीवर उभे राहिले. तेवढ्यातच आकाशस्थ चंद्राप्रमाणे, विमानात बसलेला राम त्यांच्या दृष्टीस पडला. ह्यावेळी भरताला अतिशय आनंद झाला. त्याने हात जोडले आणि रामाला सामोरा गेला. विमानाच्या अग्र्रभागी बसलेल्या रामाला, मेरुपर्वतावरील सूर्याला वंदन करतात त्याप्रमाणे भरताने नम्रतापूर्वक आनंदाने वंदन केले. नंतर रामाच्या अनुज्ञेने ते विमान जमिनीवर उतरले. तेव्हा कनिष्ठ बंधु शत्रुघ्नासह भरताला रामाने विमानात घेतले. रामाची भेट होऊन भरताने पुन्हा त्याला वंदन केले. फार दिवसांनी भेट झालेल्या बंधु भरताला रघुनंदनाने उठवून मांडीवर घेतले आणि आनंदाने त्याला आलिंगन दिले. नंतर लक्ष्मणाला भेटून आणि जानकीला स्तवन करून त्या प्रेमविव्हल भरताने संतुष्ट मनाने तिला प्रणाम केला. पुढे त्याने सुग्रीव, जांबवंत, युवराज अंगद, मैंद, द्विविद, नील, ऋषभ ह्यांना आलिंगन दिले. सुषेण, नल, गवाक्ष, गंधमादन, शरभ, पनस ह्यांनाही भरताने आलिंगन दिले. मग त्या सौम्य व आनंदित वानरांनी मनुष्यरूप धारण करून भरताला आदरपूर्वक क्षेेमकुशल विचारले. नंतर सुग्रीवाला आलिंगन देऊन भरत भक्तिपूर्वक त्याला म्हणाला, ‘‘तुझ्या साहाय्याने रामाला जय मिळाला आणि रावणाचा वध झाला. सुग्रीवा, तू आम्हा चौघांचा पाचवा भाऊ आहेस.’’ नंतर शत्रुघ्नाने आधी रामाला आणि मग लक्ष्मणाला वंदन केले. त्यानंतर नम्रतेने सीतेच्या चरणी लोटांगण घातले. पुढे राम आपल्या मातेच्या भेटीला गेला. ती निस्तेज आणि शोकविव्हल झाली होती. नम्रपणे मातेच्या चरणांवर लोटांगण घालून रामाने तिचे समाधान केले. पुढे त्याने कैकेयी, सुमित्रा आणि इतर माता ह्यांनाही प्रणाम केला.
नंतर इतकी वर्षे आदरपूर्वक पूजन करून ठेवलेल्या रामाच्या पादुका भरताने आणल्या आणि रामाच्या पायात भक्तिपुरस्सर घातल्या आणि म्हटले, ‘‘तुझी ठेव म्हणून हे राज्य माझ्याकडे होते ते आज मी तुझ्या स्वाधीन केले आहे. आज माझ्या जन्माची सफलता झाली असून माझे मनोरथ सिद्धिस गेले आहे. कारण प्रभो! अयोध्येला परत आलेल्या तुझी आज मला भेट होत आहे. तुझी कोठारे, तुझे सैन्य, तुझा कोश ही माझ्या हाती दसपटीने वाढली आहेत. जगन्नाथा, आता आपल्या तेजोबलाने स्वतःच्या नगरीचे पालन कर.’’ असे भरत बोलत असता त्या सर्व कपिश्रेष्ठांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले. त्यांनी आनंदित अंतःकरणाने भरताची प्रशंसा केली. रामानेही संतुष्ट मनाने भरताला मांडीवर घेतले आणि मोठ्या आनंदाने त्या विमानात बसून तो भरताच्या आश्रमाला आला. तेथे येताच त्या उत्तम विमानातून राम भूमीवर उतरला. मग प्रभु राम त्या पुष्पकाला म्हणाला, ‘‘तू आता कुबेराकडे जा आणि त्याचे वाहन हो. मी तुला जाण्यास अनुज्ञा देतो. तू त्या धनपालक कुबेराची सेवा कर.’’ देवगुरु बृहस्पतीला इंद्र प्रणाम करतो, त्याप्रमाणे वसिष्ठ गुरुच्या चरणकमलाला वंदन करून व त्यांना उत्तम आसनावर बसवून राम स्वतः गुरुच्या समीप बसला.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे चतुर्दशः सर्गः।