श्री महादेव म्हणाले,
‘‘त्यावेळी जनस्थानात राहाणारी इच्छारूपधारिणी, अतिबलाढ्य अशी एक राक्षसी त्या मोठ्या दण्डकारण्यात फिरत असे. एकदा गोदावरीच्या तीरावर पंचवटीजवळ कमळ, वज्र, अंकुश अशा चिह्नांनी युक्त उमटलेली रामाची पाऊले तिने पाहिली. त्या पायांच्या सौंदर्याने मोहित होऊन तिचे मन कामवासनेने व्याकूळ झाले. तशीच रामाचा शोध घेत घेत ती रामाच्या आश्रमाजवळ आली. तेथे सीतेसह असणाऱ्या, मदनासारख्या सुंदर असणाऱ्या रामाला पाहून ती काममोहित झाली. ती रामाला म्हणाली, ‘‘तू कोण आहेस? कोणाचा आहेस? ह्या आश्रमात जटा, वल्कले धारण करून तुला काय मिळवायचे आहे? मला सांग. मी शूर्पणखा नावाची राक्षसीण आहे. मी वाटेल ते रूप धारण करते. मी महात्मा रावणाची बहीण आहे. माझा बंधु खर यासह मी अरण्यात रहाते. राजाने हे सर्व अरण्य मला दिले आहे. मी मुनींचे भक्षण करते. वक्त्यांमध्ये तू उत्तम वक्ता आहेस म्हणून तुझा वृत्तांत समजून घ्यावा अशी माझी इच्छा आहे. तेव्हा मला सर्व सांग.’’
तेव्हा राम तिला म्हणाला, ‘‘मी अयोध्यापती दशरथाचा पुत्र आहे. माझे नाव राम आहे. ही सुंदरी जनकराजाची कन्या, माझी भार्या सीता आहे. तो अतिशय सुंदर दिसणारा माझा धाकटा बंधु लक्ष्मण आहे. हे त्रैलोक्यसुंदरी! माझ्याकडे तुझे कोणते काम आहे? ते सांग.’’
हे भाषण ऐकून कामपीडित होऊन ती रामाला म्हणाली, ‘‘हे रामा! माझ्याबरोबर ये. ह्या पर्वतावरील अरण्यात माझ्याबरोबर रममाण हो. मी काममोहित झाल्यामुळे तुला सोडू शकत नाही.’’
रामाने सीतेकडे कटाक्ष टाकला आणि हसत म्हटले, ‘‘ही सुलक्षणा माझी पत्नी आहे. मला हिला टाकता येणार नाही. हे सुंदरी, सापत्नभावात तू माझ्याजवळ कशी बरे राहशील? माझा अतिसुंदर असा बंधु लक्ष्मण बाहेर आहे. तो तुला योग्य पति होईल. त्याच्याबरोबर तू वनात संचार कर.’’ असे रामाने सांगताच ती लक्ष्मणाजवळ गेली आणि लक्ष्मणाला म्हणाली, ‘‘हे सुंदरा! तू माझा पति हो. बंधुच्या आज्ञेनुसार आपण संगमसुख भोगू. आता उशीर नको.’’ असे ती काममोहित घोर राक्षसी लक्ष्मणाला म्हणाली. तेव्हा लक्ष्मण तिला म्हणाला, ‘‘हे साध्वी! मी त्या बुद्धिमान रामाचा दास आहे. म्हणून तुलाही त्याची दासी व्हावे लागेल. यापेक्षा दुःखदायक आणखी काय असणार? म्हणून तू त्याच्याचकडे जा. त्यात तुझे कल्याण आहे. तो सर्वांचा राजा आहे. सर्वेश्वर आहे.’’
ते ऐकून ती दुष्ट अंतःकरणाची स्त्री पुन्हा रामाकडे गेली. क्रोधाने म्हणाली, ‘‘चंचलपणाने तू मला का भ्रमवित आहेस? रामा! त्या सीतेला मी आत्ताच तुझ्यापुढे खाऊन टाकते.’’ असे म्हणून ती सीतेच्या अंगावर धावून गेली. इतक्यात रामाच्या आज्ञेने महापराक्रमी लक्ष्मणाने तलवार हातात घेतली. तिला धरून तिचे नाक, कान तोडून टाकले. त्यामुळे तिचे शरीर रक्तबंबाळ झाले. तिने आरोळी ठोकली. मोठ्याने ओरडत, अपशब्द उच्चारित ती खराच्या पुढे आली. तिने त्याच्यासमोर लोळण घेतली. त्यावर अतिशय रागाने खराने विचारले, ‘‘हे काय झाले? तुझी अशी अवस्था करून मृत्युच्या मुखात उडी घ्यायला कोण तयार आहे? मला सांग. तो जरी प्रत्यक्ष यमासारखा असला तरी मी त्याचा वध करीन.’’ तेव्हा ती राक्षसी त्याला म्हणाली, ‘‘सीता, लक्ष्मणासह राम दण्डकारण्याला निर्भय करण्यासाठी गोदावरीच्या तीरावर रहातो आहे. त्याच्याच प्रेरणेने त्याच्या बंधुने माझी अशी अवस्था केली आहे. जर तू खरोखर कुलाभिमानी वीरपुरुष असशील तर त्या दोन शत्रूंचा वध कर. त्यांचे रक्त प्राशन करून नंतर मी त्या दोन उन्मत्त पुरुषांना खाऊन टाकेन. असे जर माझ्याकडून झाले नाही तर मी प्राणत्याग करीन.’’
ते ऐकून खर अतिशय संतप्त होऊन निघाला. त्याने चौदा हजार अतिक्रूर राक्षस रामाकडे वध करण्याच्या हेतूने पाठविले. खर, दूषण, त्रिशिरा हे सर्वजण अनेक प्रकारची आयुधे घेऊन ताबडतोब रामाकडे गेले. त्यांचा कोलाहल ऐकून राम लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘ही मोठी आरोळी ऐकू येत आहे. म्हणजे निश्चितपणे राक्षसच येत आहेत. आज नक्की त्यांचेबरोबर माझे युद्ध होणार आहे. हे बलिष्ठा लक्ष्मणा! सीतेला घेऊन गुहेत जाऊन बैस. ह्या सर्व राक्षसांचा वध करावा अशी माझी इच्छा आहे. आता तू काही बोलू नकोस. अशी माझी तुला शपथ आहे.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून लक्ष्मण गुहेत गेला. रामाने कंबर कसून हातात धनुष्य घेतले आणि अक्षय्य बाणांनी युक्त असे दोन भाते पाठीवर बांधून युद्धासाठी सज्ज झाला. त्यानंतर राक्षस तेथे आले. त्यांनी आपली विचित्र आयुधे तसेच दगड, वृक्ष ह्यांची रामावर वृष्टि केली. रामाने अगदी सहजपणे ती सर्व आयुधे तोडून टाकली. नंतर हजारो बाण टाकून सर्व राक्षस ठार मारले. खर, त्रिशिरा आणि दूषण ह्या सर्व राक्षसांना अर्ध्या प्रहरातच ठार मारले. इतक्यातच लक्ष्मण सीतेसह गुहेच्या बाहेर आला. त्या सर्व राक्षसांना रामाने ठार मारलेले पाहून त्याला फार आश्चर्य वाटले. रामाला बघून सीतेचे मुख सुप्रसन्न झाले. तिने रामाला आलिंगन दिले आणि त्याच्या शरीरावरील शस्त्राचे घाव त्या जानकीने धुवून काढले.
त्यावेळी रावणाची बहीण शूर्पणखा, ते सर्व मोठेमोठे राक्षस ठार झालेले पाहून लंकेला गेली. तेथे रावणाची सभा सुरू असता तेथे जाऊन तिने जमिनीवर लोळण घेतली. आपल्या भयभीत झालेल्या बहिणीला पाहून रावण म्हणाला, ‘‘वत्से, उठ, तुला असे विद्रूप कोणी केले? कल्याणी! इंद्राने की यमाने की वरुणाने की कुबेराने? एका क्षणात मी त्याचे भस्म करून टाकतो.’’ त्यावर ती राक्षसी म्हणाली, ‘‘तू उन्मत्त झाला आहेस. तुझी बुद्धि मंद झाली आहे. तू मद्यपानात दंग झालेला स्त्रीजित असून पूर्णपणे नपुंसकासारखा दिसत आहे. राजाचे खरे नेत्र म्हणजे त्याचे हेर, ते तुझ्याजवळ नाहीत. तू कसला राजा? असुरांचा शत्रू जो राम त्याने खर, दूषण आणि त्रिशिरा यांच्यासह चौदा हजार मोठमोठे राक्षस रणांगणात एका क्षणात मारून टाकले आणि मुनिजनांना जनस्थान निर्भय करून दिले. तुला हे काहीच कसे माहीत नाही? म्हणून तू मूर्ख आहेस असे मला म्हणावे लागले.’’
रावण म्हणाला, ‘‘कोण आहे हा राम? त्याने राक्षसांना कसे मारले? का मारले? हे सर्व नीटपणे सांग. म्हणजे मी त्या सर्वांचा समूळ नाश करतो.’’ शूर्पणखा म्हणाली, ‘‘एकदा मी जनस्थानातून गोदावरीच्या तीरावर गेले असता तेथे पंचवटी नावाचे एक ठिकाण असून तेथे पूर्वी मुनी रहात होते. त्या आश्रमात मी त्या कमलनयन रामाला पाहिले. त्याच्या हातात धनुष्यबाण असून जटा आणि वल्कले धारण करून शरीर सुशोभित केले होते. त्याचा धाकटा बंधु लक्ष्मण देखील त्याच्यासारखाच आहे. त्याची पत्नी दुसरी लक्ष्मीच की काय इतकी सुंदर विशालाक्षी आहे. देव, गंधर्व, नाग, मनुष्ये ह्या सर्वांमध्ये आजपर्यंत तिच्यासारखी सुंदर स्त्री कोणी पाहिली नाही किंवा ऐकली सुद्धा नाही. राजा! त्या सुंदरीने वनाला सुशोभित केले आहे. हे निष्पाप रावणा! तुझी पत्नी म्हणून तिला आणावे अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी त्याच्याकडे गेले. तेव्हा त्याच्या महाप्रबल लक्ष्मण नामक बंधुने माझे नाक, कान रामाच्या सांगण्यानुसार कापून काढले. मग मी अतिदुःखाने खराकडे गेले. तो देखील अनेक राक्षसांना घेऊन रामावर चालून गेला. परंतु बलशाली रामाने एका क्षणात त्या महापराक्रमी अशा सर्व राक्षसांना मारून टाकले. रामाने मनात आणले तर तो अर्ध्या क्षणात त्रैलोक्याचे खात्रीने भस्म करील असे मला वाटते. हे राजा! जर ती सीता तुझी स्त्री होईल तर तुझे जीवित सफल होईल. म्हणून हे राजेंद्रा! जेणेकरून ती तुझी प्रिय पत्नी होईल असा प्रयत्न कर. त्या कमलनयन सुंदरीसारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात मिळणार नाही. हे राजा! त्या रामापुढे प्रत्यक्ष उभे राहण्याची तुझ्यात शक्ती नाही. काहीतरी कपटयुक्तीने त्या रघुश्रेष्ठ रामाला मोह घातलास तरच ती सीता तुला प्राप्त होईल.’’
ते सर्व ऐकून गोड वचनांनी, दानमानादिकांनी रावणाने त्या आपल्या बहिणीचे सांत्त्वन केले. त्यानंतर तो आपल्या मंदिरी गेला. परंतु चिंतेने त्याचे मन व्याप्त झाल्यामुळे त्याला रात्री झोप लागली नाही. ‘मनुष्यमात्र अशा एकट्या रामाकडून माझ्या खराचा सर्व सैन्यासह वध व्हावा हे कसे शक्य आहे? आपल्या शक्तीचा आणि पराक्रमाचा माझ्या भावाला खूप गर्व होता. असा तो पराक्रमी रामाकडून मारला जावा ना? राम हा मनुष्य नसून ते प्रत्यक्ष परमेश असावा. माझे सैन्य मोठे आहे म्हणून मी प्रबल झालो म्हणून मला मारण्याची त्याला इच्छा झाली असावी. पूर्वी ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्याप्रमाणे मनुष्यरूपाने तो आता रघुकुळात जन्मला असावा. त्या परमात्म्याकडून मी मारला जाईन तर वैकुंठराज्याचा मालक होईन. नाही तर ह्या राक्षसराज्याचा चिरकाल भोग घेईन. म्हणून मी रामावर चालून जाणार आहे.’ सर्व राक्षसांचा राजा असलेल्या त्या रावणाने असा विचार करून आणि राम हा परमेश्वर विष्णुच आहे हे ओळखून भक्तिने भगवान सत्वर प्रसन्न होत नसतो म्हणून विरोधक बुद्धिनेच त्याच्याकडे जावे आणि त्याची प्राप्ति करून घ्यावी असे त्याने मनात ठरविले.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अरण्यकाण्डे पञ्चमः सर्गः।
॥अरण्यकाण्डम्॥