श्री महादेव म्हणाले,
‘‘हे पार्वति! सुग्रीवाची सर्व पातके आपल्या आलिंगनाने नष्ट झाली आहेत हे रामाला कळून चुकले होते. तरी देवकार्यसिद्धिसाठी आपली मोहमाया त्याच्यावर पसरविण्याचे ठरवून हसत श्रीराम त्याला म्हणाले, ‘‘मित्रा! तू मला जे काही बोललास ते सर्व सत्य आहे यात शंका नाही. परंतु लोक मला म्हणतील की रामाने अग्निसाक्षिक वानरराज सुग्रीवासोबत मैत्री केली, ते करून त्याला काय मिळवून दिले? असा लोकापवाद माझ्यावर येईल. हे निश्चित आहे. म्हणून तू वालीला युद्ध करण्यासाठी बोलाव. तुझे कल्याण असो. एकाच बाणाने त्याचा वध करून मी तुला राज्याभिषेक करविन.’’
‘ठीक आहे’ असे म्हणून सुग्रीव किष्किन्धेच्या उपवनात लगेचच गेला आणि मोठी आरोळी ठोकून त्याने वालीला हाक मारली. तो बंधुचा शब्द ऐकून क्रोधाने वालीचे डोळे लाल झाले. सुग्रीव वानर जेथे होता तेथे तो आला. वाली आपल्यावर चालून येत असलेला पाहून सुग्रीवाने त्याच्या वक्षस्थलावर जोरदार प्रहार केला. क्रोधाने चवताळून वालीनेही सुग्रीवावर दोन्ही मुष्टींनी प्रहार केले. सुग्रीवाने सुद्धा त्यावर उलट प्रहार केले. अशारितीने रागारागाने दोघेही आपसात लढू लागले. त्या दोघांचीही रुपे अगदी सारखीच असल्याचे पाहून रामाला आश्चर्य वाटले. आपल्या हातून कदाचित सुग्रीवाचा वध होईल अशी शंका आल्यामुळे रामाने बाण सोडला नाही. सुग्रीवाने भयभीत होऊन, रक्त ओकत तेथून पळ काढला. नंतर सुग्रीव रामाला म्हणाला, ‘‘रामा! बंधुरुपी शत्रूकडून मला का बरे मारवित आहेस? प्रभो! मला मारण्याची तुझी इच्छा असल्यास तूच माझा वध कर. शरणागतवत्सल रघुत्तमा! तू सत्यवादी आहेस. मग मला विश्वास देऊन माझी उपेक्षा का बरे करतो आहेस?’’
असे सुग्रीवाचे भाषण ऐकून रामाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने सुग्रीवाला आलिंगन दिले आणि म्हणाला, ‘‘तू भिऊ नकोस. तुमची दोघांची रुपे अगदी सारखी आहेत. ते बघून कदाचित मित्राचा माझ्या हातून वध होईल या भीतीने मी बाण सोडला नाही. हा माझा भ्रम नाहीसा करण्यासाठी तुझी ओळख पटावी म्हणून तुझ्यावर काहीतरी खूण करतो. तू पुन्हा जाऊन शत्रूला हाक मार. नंतर पहा, तू वालीला मेलेला बघशील. बंधो! तुझी शपथ घेऊन सांगतो की मी तुझ्या शत्रूला क्षणात मारून टाकतो.’’ अशा तऱ्हेने सुग्रीवाला रामाने आश्वासन देऊन लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘महाभागा! सुग्रीवाच्या गळ्यात विकसित फुलांची माळ घाल आणि त्याला वालीकडे पाठव.’’ तेव्हा लक्ष्मणाने सुग्रीवाच्या गळ्यात फुलांची माळ घालून त्याला ‘जा, जा’ असे आदरपूर्वक सांगून वालीकडे पाठविले. पुनश्च अद्भुत आरोळी मारून सुग्रीवाने वालीला हाक मारली. ती ऐकून वालीला आश्चर्य वाटले. त्याचा क्रोध वाढला. तो बाहेर जाऊ लागला, त्यावेळी तारेने त्याला अडवले आणि निषेध करून म्हटले, ‘‘आता आपण जायचे नाही. मला फार मोठी शंका वाटत आहे. नुकताच तो तुमच्या हातून पराभूत झाला आहे. तो पुन्हा लगेचच परत आला, त्याअर्थी त्याला कोणीतरी बलवान साहाय्यक मिळाला असावा, हे नक्की आहे.’’ तेव्हा वाली तिला म्हणाला, ‘‘हे सुंदरी! त्याबद्दल तू शंका घेऊ नकोस. प्रिये! माझा हात सोड आणि घरात जा. मी त्या शत्रूला बघतो. त्याचा वध करून लगेच येतो. त्याला कोण साहाय्य करणार? जर कदाचित सुग्रीवाला साहाय्य मिळाले तर दोघांनाही ठार मारून लवकर येतो. शोक करू नको. युद्धासाठी शत्रू हाक मारीत आहे हे समजून कोण शूरवीर घरात बसून राहील? सुंदरी! मी शत्रूला ठार मारून येतो.’’ तारा म्हणाली, ‘‘राजेन्द्रा! मी आणखी सांगते ते ऐका आणि तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. आपला पुत्र अंगद शिकारीला गेला असता तेथे त्याने जे ऐकले ते त्याने मला सांगितले. अयोध्याधीश दशरथपुत्र श्रीराम, बंधु लक्ष्मण आणि पत्नी सीता ह्यांसह दण्डकारण्यात आले आहेत. रावणाने दण्डकारण्यातून सीतेला चोरून नेले. त्या जानकीचा राम बंधुसह शोध करतो आहे. शोध करीत तो ऋष्यमूक पर्वतावर आला आहे. तेथे त्याची सुग्रीवाशी भेट झाली. त्याने अग्निला साक्षी ठेवून त्याच्याशी मैत्री केली. रामाने सुग्रीवाला प्रतिज्ञा करून सांगितले की ‘समरांगणात वालीचा वध करून मी तुला राजा करीन,’ असा निश्चय करून ते आले आहेत असे मला खात्रीने वाटत आहे. तरी आपण माझे म्हणणे ऐका. आत्ताच तुमच्याकडून पराभूत होऊन गेला, तो पुन्हा आला, हे कसे शक्य आहे? म्हणून आपण सर्वप्रकारे वैर सोडून द्यावे आणि सुग्रीवाला यौवराज्याभिषेक करावा. तसेच रामाला शरण जावे. अहो वानराधीश! मला, अंगदाला, राज्याला आणि कुळाला पाळा.’’ असे म्हणून अश्रू मुखावरून वाहत आहेत, अशा अवस्थेत तारा वालीच्या पाया पडली. भयग्रस्त होऊन तिने त्याचे पाय धरले. तेव्हा वालीने तिला आलिंगन दिले आणि प्रेमाने म्हटले, ‘‘स्त्री स्वभावानुसार तुला भीती वाटत आहे. प्रिये! मला ते भय नाही. श्रीरामप्रभु लक्ष्मणासह आला असेल तर त्या रामाशी निःसंशय मैत्री होईल. हे निष्पाप तारे! संपूर्ण सृष्टीचा भार हरण करण्यासाठी साक्षात नारायण अवतीर्ण झालेला आहे, हे मला फार पूर्वीच कळले आहे. त्या परमात्मा रामाला स्वतःचा पक्ष आणि परपक्ष म्हणून काही नाहीच. हे साध्वि, त्याच्या चरणकमलांना नमन करून मी त्याला घरी आणीन. तो देवाधिदेव भक्तिनेच प्राप्त होण्यासारखा असून त्याला जे लोक भजतात त्यांना तो उलट भजत असतो. सुग्रीव स्वतः होऊन माझ्यावर चालून आल्यास मी त्याला ठार मारीन. आता त्याला यौवराज्याभिषेक करण्याविषयी तू आवाहन केले आहेस. हे प्रिये! ज्याअर्थी शत्रू होऊन त्याने मला युद्धासाठी आव्हान केले आहे, त्याअर्थी मी तसे कसे बरे करीन? हे शुभलक्षणे, माझे शौर्य सर्व लोकांना माहीत आहे. म्हणून हे सुंदरी! तू शोक करणे सोडून दे आणि घरी रहा.’’ अशा तऱ्हेने तारेचे सांत्त्वन करून वाली सुग्रीवाचा वध करण्यासाठी निघाला. तेव्हा तारेच्या डोळ्यातून सतत अश्रूंचा प्रवाह सुरू होता. ती शोक करीत होती. वाली येत असलेला पाहून सुग्रीवाने पतंगाप्रमाणे उडी घेतली. तो महापराक्रमी होता. त्याच्या गळ्यात पुष्पमाला होती. त्याने आपल्या दोन्ही मुष्टिंचा प्रहार वालीवर केला. वालीनेही तसाच प्रहार केला. वालीने सुग्रीवाला मारले. सुग्रीवानेही वालीला मारले. दोघेही परस्परांवर प्रहार करीत होते. या युद्धात सुग्रीव रामाकडे नजर ठेवून लढत होता. अशाप्रकारे त्या दोघांना लढताना रामाने पाहिले. तेव्हा रामाने भात्यातून बाण काढला आणि आपल्या ऐंद्र धनुष्यावर जोडला. (हे धनुष्य रामाला अगस्त्य मुनींने दिले होते) वृक्षांच्या आड अदृश्य होऊन त्याने आकर्ण धनुष्य ओढले. वालीकडे निरखून पाहिले नंतर त्या वालीच्या वक्षःस्थलावर नीट नेम धरून त्या महाबलवान रामाने वज्रासारखा अतिशय वेगवान बाण सोडला. त्या बाणाने वालीचे वक्षःस्थल विदीर्ण झाले. नंतर पृथ्वीला कंपायमान करून मोठा शब्द करीत तो बाण वर आकाशात उडाला आणि वाली पृथ्वीवर कोसळला. एक मुहूर्तपर्यंत तो शुद्धीवर आला नव्हता. काही वेळाने तो देहभानावर आला, तो आपल्यापुढे कमलनयन राम डाव्या हातात धनुष्य, दुसऱ्या हातात बाण घेऊन आहे, असा त्याला दिसला. रामाने वल्कले परिधान केलेली असून मस्तकावर जटामुकुट धारण केला होता. त्याचे वक्षःस्थल विशाल असून त्यावर वनमालेने विशेष शोभा आणली होती. त्याच्या भुजा भव्य, सुंदर आणि दीर्घ होत्या. त्याची अंगकांती नवदुर्वादलाप्रमाणे नीलवर्ण होती. त्याच्या दोन्ही बाजुला सुग्रीव आणि लक्ष्मण उभे राहून त्याची सेवा करीत होते. रामाला बघून त्याची निंदा करीत वाली हळू आवाजात म्हणाला, ‘‘रामा, मी तुझा काय अपराध केला म्हणून तू माझा वध केला आहेस? वृक्षराईत झाडाआड उभा राहून माझ्यावर बाण सोडल्याने राजधर्म न जाणता तू निंद्य गोष्ट केली आहेस. रामा! चोराप्रमाणे युद्ध करून तुला कोणते यश मिळणार आहे? जर तू खरा क्षत्रियवंशज आणि मनुकुलोत्पन्न असशील तर माझ्या समक्ष उभा राहून युद्ध कर. म्हणजे तुला त्याचे फळ मिळेल. सुग्रीवाने तुझी कोणती अशी कामगिरी केली आणि मी काय केले नाही रामा! महारण्यात तुझी पत्नी रावणाने हरण करून नेली आणि त्यासाठी तू सुग्रीवाला शरण गेलास, असे आम्ही ऐकतो आहे. परंतु रामा! पृथ्वीवर सर्वत्र माझाच पराक्रम प्रसिद्ध आहे. तो तुला माहीत नाही का? राघवा! जर मी मनात आणीन तर अर्ध्या मुहूर्तात रावणाला सहकुटुंब बांधून सीता आणि लंका नगरीही येथे घेऊन येईन. रघुनंदना! ह्या लोकात तू ‘धर्मिष्ठ’ म्हणून वर्णिला जातो. तरी पारध्याप्रमाणे वानराचा वध करून तुला कोणता धर्म मिळणार आहे? वानराचे मांस अभक्ष्य असल्याने मला मारून तू काय करणार आहेस?’’
अशाप्रकारे वाली बोलत असता श्रीराम त्याला म्हणाले, ‘‘धर्माचा रक्षक म्हणून ह्या लोकात मी धनुष्य घेऊन फिरत असतो. अधर्माचे आचरण करणाऱ्यांचा वध करून मी सद्धर्माचे पालन करीत असतो. मुलगी, बहीण, बंधुस्त्री आणि सून ह्या सर्व सारख्याच होत. जो मूढबुद्धी होऊन यापैकी एखादीशी रममाण होतो तो पातकी समजावा. राजांनी अशाचा सदा वध करावा. तू तर कनिष्ठ बंधूच्या भार्येशी बलात्काराने रममाण होत आहेस. म्हणून हे रानवटा! तुझा धर्म जाणूनच मी तुला मारले. तू वानर असल्यामुळे महात्मे लोक कसे आचरण करतात ते तुला कसे बरे कळणार? महात्मे लोक पृथ्वीवर संचार करून लोकांना पावन करीत असतात. तू त्यांची निंदा करू नये.’’
ते ऐकून वाली भयभीत झाला. राम हा प्रत्यक्ष लक्ष्मीपतीच आहे हे त्याने जाणले. वालीने तत्काळ रामाला नमस्कार करून म्हटले, ‘‘रामा! महाभागा रामा! तू प्रत्यक्ष परमेश्वर आहेस, हे मी ओळखले. मी अज्ञानामुळे जे काही बोललो असेन, त्याची मला क्षमा करा. तुझ्या साक्षात् शरप्रहाराने आणि तुझ्यासमोर मी प्राण सोडतो आहे. केवढे माझे थोर भाग्य! तुझे दर्शन महायोग्यांनाही दुर्लभ आहे. मरणासन्न अवस्थेत पराधीनतेने का होईना, ज्याचे नाम घेतले असता प्राणी परमपदाला जातो तोच आज साक्षात माझ्या मरणसमयी माझ्यासमोर उभा आहे. देवा! मी जाणतो की तू पुरुष परमेश्वर आहेस आणि जानकी ही मंगलकारिणी लक्ष्मी आहे. ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यामुळे रावणाचा वध करण्यासाठी तू अवतार घेतला आहेस. हे रामा! तुझ्या परमपदाला मी जात आहे. तरी मला अनुज्ञा द्यावी. माझ्यासारखा माझा बलवान पुत्र अंगद, त्याच्यावर कृपादृष्टी असावी. रामा! माझ्या हृदयाला हस्तस्पर्श करून त्यातील शल्य, बाणाग्र काढून टाक.’’
तेव्हा ‘ठीक आहे’ असे म्हणून रामाने वालीच्या शरीरातून बाण बाहेर काढला. त्याला हस्तस्पर्श केला. रघुत्तमाच्या शराने विद्ध झालेल्या वालीला रामाने सुखाची खाणच की काय अशा आपल्या शीतल कराने स्पर्श केला. तत्क्षणी वानरदेहाचा त्याग करून तो वाली तत्काळ श्रेष्ठ असा देव झाला आणि अलभ्य, परमहंस लोकांनाही दुर्मिळ अशा पदाला तो प्राप्त झाला.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे किष्किन्धाकाण्डे द्वितीयः सर्गः।