श्री महादेव म्हणाले,
‘‘महाभाग्यशाली बिभीषण आपल्या चार मंत्र्यांसह रामासमोर येऊन आकाशात उभा राहिला आणि म्हणाला, ‘‘कमलनयन रामचंद्रस्वामीन्! तुझ्या स्त्रीचे हरण करणाऱ्या रावणाचा मी कनिष्ठ बंधू आहे. माझे नाव बिभीषण असून मला भावाने घालवून दिल्यामुळे मी तुला शरण आलो आहे. देवा! त्या रावणाला आत्मज्ञान नाही म्हणून मी त्याला हिताची गोष्ट सांगितली ‘जनककन्या सीतेला रामाकडे पाठवून दे’ असे मी त्याला वारंवार सांगितले. त्याने ऐकले नाही. तो कालपाशाच्या स्वाधीन झाला आहे. मला ठार मारण्यासाठी तो राक्षसाधम तरवार घेऊन धावला तेव्हा मी चार मंत्र्यांना सोबत घेऊन, संसारातून माझी सुटका व्हावी या हेतूने तुला शरण आलो आहे. मी मुमुक्षू आहे.’’
बिभीषणाचे भाषण ऐकून सुग्रीव म्हणाला, ‘‘रामा! हा कपटी नीच राक्षस तुझ्या विश्वासास पात्र नाही. विशेषतः सीताहरण करणाऱ्या रावणाचा हा कनिष्ठ बंधु असून हा बलवान सुद्धा तसाच आहे. हत्यारे घेऊन सज्ज असलेले मंत्री ह्याच्यासोबत आहेत. त्यांच्या मदतीने हा आम्हाला गुहेमध्ये मारून टाकील. तरी देवा, ह्याला वानराकडून ठार मारण्याची मला आज्ञा द्या. रामा! मला असे वाटते की तुझ्या बुद्धिला निश्चयपूर्वक काय वाटत असेल ते सांग.’’ सुग्रीवाचे भाषण ऐकून रामाला हसू आले. तो म्हणाला, ‘‘कपिश्रेष्ठा! जर मी मनात आणीन तर अर्ध्या क्षणात लोकपालांसह सर्व त्रैलोक्याचा नाश करीन किंवा निमिषार्धात सर्व सृष्टी नव्याने उत्पन्न करीन. म्हणून मी त्याला अभय दिले आहे. त्या राक्षसाला लवकर घेऊन ये. ‘मी तुझा आहे’ असे केवळ एकदा याचनापूर्वक जो म्हणतो व मला शरण येतो तो कोणत्याही स्थितीमध्ये असला तर मी त्याला अभय देतो. हे माझे व्रत आहे.’’ हे रामाचे भाषण ऐकून सुग्रीवाच्या मनाला आनंद झाला. त्याने बिभीषणाला आणविले आणि रामाला भेटविले. बिभीषणाने रघुत्तमाला साष्टांग नमस्कार घातला. हर्षाने त्याचा कंठ दाटून आला. त्याच्या अंतःकरणात अत्यंत भक्ती उद्भवली. त्या श्यामवर्ण, विशालाक्ष, प्रसन्नमुखकमल असलेल्या, धनुर्बाणधारी, सलक्ष्मण आणि शांत रामापुढे तो बिभीषण हात जोडून उभा राहिला. नंतर त्याने रामाची स्तुती करण्यास सुरूवात केली.
बिभीषण म्हणाला, ‘‘राजेंद्रा रामा! तू सीतेचे मन रमविणारा आहेस. तुझे धनुष्य प्रचंड आहे. हे भक्तवत्सला! तुला नमस्कार असो. तू अनंत आहेस, तू शांत आहेस. तुझे तेज अपरिमित आहे. तू सुग्रीवाचा मित्र आहेस. तू रघुकुलाचा पति आहेस. अशा तुला, रामाला माझा नमस्कार असो. तू महात्मा आहेस. तू जगाच्या उत्पत्तीचे व नाशाचे कारण आहेस. तू त्रैलोक्याचा गुरु आहेस. तू अनादि काळापासूनचा गृहस्थाश्रमी आहेस. तुला नमस्कार असो. रामा सर्व जगतांचा उत्पादक, संरक्षक, शेवटी लयस्थानही तूच आहेस. तू स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागणारा आहेस. राघवा! तू स्थावरजंगमात्मक सर्व भूतांच्या बाहेर व आत व्याप्यव्यापकरूपाने भरलेला आहेस. म्हणून तू जगन्मय भासतोस. तुझ्या मायेने ज्यांचे ज्ञान हरण केले आहे व त्यामुळे ज्यांचा आत्मा नष्ट झालेला असतो त्यांचे मन विपरीत मार्गाकडे, प्रवृत्ति मार्गाकडे लागलेले असते. ते आपापल्या पापपुण्यांच्या बलावर सर्वदा जन्ममृत्युरूप परंपरा पावत असतात. जोपर्यंत तुझ्या ठिकाणी एकाग्रपणे ज्ञाननिष्ठ होऊन प्राण्यांचे मन लागत नाही तोपर्यंत शिंपेच्या तुकड्यावर रुप्याचा भास व्हावा त्याप्रमाणे त्यांना जग सत्य वाटत असते. प्रभो! तुझे ज्ञान न झाल्यामुळे ते पुत्र, स्त्रिया, गृहे इत्यादिकांच्या ठिकाणी आसक्त होऊन शेवटी दुःखदायक अशा विषयसुखात रममाण होतात. इंद्र, अग्नि, यम, निर्ऋति, वरुण, वायु, कुबेर त्याचप्रमाणे रुद्र हे सर्व श्रीरामा तूच आहेस ना. पुरुषोत्तमही तूच आहेस. ईश्वरा, तू सूक्ष्माहून सूक्ष्म आणि स्थूलाहून स्थूल आहेस. तू सर्व लोकांचा पिता, माता, धाता अर्थात पोषण करणारा आहेस. तुला आदि नाही, मध्य नाही आणि अंतही नाही. तू परमात्मा परिपूर्ण, अच्युत आणि अव्यय आहेस. तुला हात, पाय, नेत्र, कर्णही नाहीत. तरी तू ऐकतोस, पाहतोस, ग्रहण करतोस, धावतोस. तू खर राक्षसाचा नाश केला आहेस. तू अन्नमयादि पाच कोशांहून वेगळा आहेस. तू निर्गुण आहेस. तुला दुसऱ्या कोणाचाही आश्रय नाही. तू निर्विकल्प, निराकार, निरीश्वर, षड्भावहीन, अनादि, प्रकृतीहून पर असा पुरुष आहेस. मायेच्या योगाने तू मनुष्यासारखा दिसत आहेस. जे वैष्णव तू निर्गुण आणि जन्मरहित आहेस असे ओळखतात ते मोक्ष पावतात. राघवा! तुझ्या चरणांची उत्तम भक्ती हीच निःश्रेणी शिडी मिळवून तिच्या योगे ज्ञानयोगनामक राजवाड्याच्या शिखरावर चढावे अशी माझी इच्छा आहे. सीतापते रामा, परम दयावंता, रावणान्तका, तुला माझा नमस्कार असो. संसारसमुद्रापासून माझे रक्षण कर.’’
ही स्तुती ऐकून भक्तवत्सल राम प्रसन्न झाला, तो म्हणाला, ‘‘तुझे कल्याण असो, पाहिजे तो वर माग. मी वर देण्यास सिद्ध आहे.’’ बिभीषण म्हणाला, ‘‘राघवा, मी धन्य झालो. मी कृतकृत्य झालो. माझे कार्य सिद्धिला गेले. तुझ्या चरणदर्शनानेच मी मुक्त झालो आहे, यात संशय नाही. माझ्यासारखा धन्य कोणी नाही. माझ्यासारखा पवित्र कोणी नाही. रामा, तुझ्या मूर्तीच्या दर्शनाने जगात माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणीच नाही. रघुनंदना, कर्मबंधन तुटण्यासाठी भक्तीपासून उत्पन्न होणारे तुझ्या स्वरूपाचे ज्ञान आणि परमार्थाचे मोक्षाचे साधन जे तुझे ध्यान ते मला दे. राजेन्द्रा रामा! मी विषयसुख तुझ्याकडे मागत नाही. तुझ्या पदकमलांच्या ठायी माझी भक्ति सर्वकाळ जडून राहो.’’
रामचंद्र संतुष्ट होऊन म्हणाले, ‘‘ठीक आहे. बिभीषणा, तुझे कल्याण असो. मी तुला माझे रहस्य स्पष्ट सांगतो, ऐक. ह्या जगात जे माझे भक्त अत्यंत शांत, योगनिष्ठ आणि वैराग्यरत असे असतात त्यांच्या हृदयामध्ये मी सीतेसह वर्तमान सर्वदा वास करतो, यात संशय नाही. म्हणून तू सर्वदा शांत आणि सर्व पापरहित असल्यामुळे माझ्या नित्य ध्यानाने भयंकर संसारसागरातून मुक्त होशील. जो कोणी माझ्या प्रीत्यर्थ मला प्रिय अशा ह्या स्तोत्राचे पठण करील, ते लिहिल किंवा श्रवण करील त्याला माझी सरुपता प्राप्त होईल.’’ असे बोलून भक्तजनांवर प्रेम करणाऱ्या रामाने लक्ष्मणाला म्हटले, ‘‘माझ्या दर्शनाचे फळ काय ते आत्ताच ह्याला दिसून येईल. मी लंकाराज्याच्या अभिषेक आताच ह्याच्यावर करतो. तरी समुद्राचे उदक घेऊन ये. जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत, त्याचप्रमाणे पृथ्वी जोपर्यंत विद्यमान आहे, जोवर माझी कथा जगामध्ये राहणार आहे, तोपर्यंत हा लंकेचे राज्य करो’’ असे बोलून रामाने लक्ष्मणाकडून कलशात पाणी आणविले आणि त्या लक्ष्मीपती रामाने त्या बिभीषणाच्या मंत्र्यांकडून, विशेषतः लक्ष्मणाकडून लंकाराज्याधिकाराचा त्याला अभिषेक केला. तेव्हा ‘ठीक’, ‘ठीक’ म्हणून त्या सर्व वानरांनी अत्यंत प्रशंसा केली. सुग्रीवाने देखील बिभीषणाला आलिंगन दिले आणि म्हटले, ‘‘बिभीषणा, परमात्मा रामाचे आम्ही सर्व सेवक आहोत. रामाचा भक्तिपूर्वक आश्रय केल्यामुळे त्या सर्वात तू मुख्य आहेस. आता रावणाचा वध करण्याच्या कामी तू रामाला साहाय्य करावे.’’ बिभीषण म्हणाला, ‘‘परमात्मा रामाला मी साहाय्य ते काय करणार? तरीसुद्धा भक्तिपूर्वक आणि निष्कपटपणे यथाशक्ति मी त्याची सेवा करीन.’’ इतक्यात रावणाचा निरोप घेऊन शुक नावाचा महादैत्य येऊन आकाशात उभा राहिला आणि सुग्रीवाला म्हणाला, ‘‘सुग्रीवा, तू रावणाचा बंधु असल्यामुळे त्या राक्षसाधिपतीने तुला सांगितले आहे की ‘तू मोठ्या कुळात जन्मलेला असून वनचरांचा राजा आहेस. मी तुला भावाप्रमाणे मानीत असून तुझ्या कोणत्याही वस्तुचा नाश माझ्याकडून झाला नाही. मी राजपुत्र रामाची पत्नी हरण करून आणली आहे, त्याचा तुझ्याशी काय संबंध आहे? वानरासह वर्तमान किष्किन्धेला जा. देवांनाही लंका मिळविणे शक्य नाही. मग अल्पशक्तिच्या मानवाचे किंवा वानरसेनापतीचे तेथे काय चालणार?’’ तो शुक अशाप्रकारे रावणाचा निरोप कळवित आहे इतक्यात वानरांनी शीघ्र उड्या मारल्या आणि लगेचच बळकट मुष्टिप्रहारांनी त्यांनी त्याला मारण्यास सुरूवात केली. वानर मारीत असता शुक रामाला म्हणाला, ‘‘महासमर्था, राजेंद्रा! दूतांना कोणी मारत नसतात. आपल्या वानरांचे निवारण करा.’’ शुकाचे भाषण व शोक ऐकून ‘त्याला मारू नका’ असे म्हणून रामाने त्या वानरांचे निवारण केले. पुनः आकाशात जाऊन शुक सुग्रीवाला म्हणाला, ‘‘राजा सुग्रीवा! मी रावणाला काय सांगू ते बोल. हा मी चाललो.’’ सुग्रीव म्हणाला, ‘‘राक्षसाधमा, जसा वाली माझा बंधु तसाच तू ही आहेस. म्हणून वाटेल ते उपाय करून मी तुला पुत्र, सैन्य, ह्यासह ठार मारावे हेच योग्य आहे. त्याला माझा निरोप सांग की रामाची पत्नी घेऊन तू कुठे जाणार ते मला सांग.’’ असे बोलून सुग्रीवाने रामाज्ञेने त्या शुकाला बांधविले आणि सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले. दुसऱ्या कोणी शार्दूल नावाच्या दैत्याने ते वानरांचे सैन्य पाहून शुकदैत्य येण्यापूर्वीच सर्व वृत्तांत रावणाला सांगितला. त्यामुळे रावणाला मोठी चिंता वाटू लागली. तो दीर्घ सुस्कारे टाकीत मंदिरात बसून राहिला. इकडे रामाने समुद्राला पाहून नेत्रप्रांत क्रोधाने लाल केले आणि म्हटले, ‘‘अनघा, लक्ष्मणा! हा समुद्र माझा सत्कार करीत नाही की दर्शनही घेत नाही. त्याला वाटत असावे की हा राम केवळ मनुष्य आहे. ह्याच्याने आपले काय वाकडे होणार? महाबाहो लक्ष्मणा, पहा, आज मी ह्या समुद्राला सुकवून टाकणार आहे. असे केले म्हणजे वानर निश्चिंत होऊन पायीच समुद्राच्या पार जातील.’’ असे बोलून रामाने क्रोधाने डोळे लाल केले आणि त्याने धनुष्याला प्रत्यंचा लावली. भात्यातून प्रलयकालाच्या अग्नीसारखा बाण काढून त्याने धनुष्यावर जोडला आणि प्रत्यंचा ओढून तो बोलला, ‘‘सर्व भूते आज रामाच्या बाणाचा पराक्रम पाहोत. ह्या नदीपति समुद्राचे मी भस्म करून टाकतो.’’ रामाला हे बोलताना ऐकून सर्व पर्वत, उपवने, अरण्ये यासह पृथ्वी कंपित झाली. आकाश आणि दिशा अंधःकाराने व्याप्त झाल्या. समुद्र खवळला. भयाने मर्यादेचे उल्लंघन करून तो एक योजन पुढे सरकला. त्यामुळे जलचर संतप्त होऊन व्याकूळ झाले.
इतक्यात साक्षात् समुद्र दिव्य रूप धारण करून आणि उत्तम अलंकार अंगावर घालून आपल्या कांतीने सर्व दिशांना प्रकाशित करीत रामाकडे आला. आपल्या पोटातील सुंदर रत्ने हातात घेऊन तो मोठा रत्नांचा नजराणा त्याने रामाच्या पायापुढे ठेवला आणि क्रोधाने नेत्रप्रांत लाल झाले आहेत अशा त्या रामाला साष्टांग नमस्कार घालून म्हणाला, ‘‘हे जगन्नाथा, त्रैलोक्यरक्षका रामा, माझे रक्षण कर. सर्व जगाची उत्पत्ती करताना हे रामा, तूच मला स्वतः जड असा निर्माण केलास. तो देवनिर्मित माझा जड स्वभाव आता कोण बरे बदलवू शकेल? स्थूल पंचभूते स्वभावतःच जड आहेत. ही तूच निर्माण केली आहेस. ती तुझी आज्ञा मोडत नाहीत. रामा! तामस अहंकारापासून भूते उत्पन्न होतात तेव्हा मुळाला अनुसरूनच ह्यांच्या अंगी जडत्व आहे. प्रभो! तू निर्गुण, निराकार असून लीलेने जेव्हा मायागुणांचा स्वीकार करतोस तेव्हा तुला वैराज हे नाव प्राप्त होते. त्या त्रिगुणात्मक विराट देहाच्या सत्त्वगुणापासून देव झाले, रजोगुणापासून प्रजापति वगैरे निर्माण झाले. तसाच भूतपति रुद्र हा तुझ्या क्रोधापासून झाला आहे. तुझे स्वरूप मायेने आच्छादलेले असून तू मनुष्यरूप धारण केले आहेस. अशा स्थितीत तुझ्या निर्गुण स्वरूपाला मी जडबुद्धि अज्ञानी व मूर्ख कसा बरे जाणणार? प्रभो, देवश्रेष्ठा! पशूंना मार्गावर आणण्यासाठी काठीचा उपयोग करावा लागतो. त्याचप्रमाणे मूर्ख प्राण्यांना सन्मार्गावर आणण्यास दंड हेच योग्य साधन आहे. भक्तवत्सला ईशा, तू शरणागतांचे कल्याण करणारा आहेस म्हणून मी तुला शरण आलो आहे. रामा, मला अभय दे. लंकेला जाण्यास मी तुला मार्ग देतो.’’ राम म्हणाला, ‘‘हा माझा बाण अमोघ, व्यर्थ न जाणारा असा आहे. तरी तो कोठे सोडू ते सांग. हा बाण व्यर्थ न जाणारा असल्यामुळे याचे लक्ष्य, नेम मारण्याचे ठिकाण सांग, दाखव.’’ रामाचे भाषण ऐकून आणि त्याच्या हातात महाशर पाहून तो महातेजस्वी, महासागर रामाला म्हणाला, ‘‘रामा, उत्तरप्रदेशी द्रुमकुल्य नावाचा प्रसिद्ध प्रदेश आहे. तेथे पुष्कळ पापी लोक राहात असून ते रात्रंदिवस मला पीडा देत असतात. रघुश्रेष्ठा, हा तुझा बाण तेथे पडू द्या.’’ नंतर रामाने बाण सोडला. त्या बाणाने क्षणात त्या भिल्लांच्या समुदायाचा नाश केला आणि पुन्हा तो भात्यात पूर्ववत येऊन राहिला. नंतर समुद्राने विनयपूर्वक त्या रघुश्रेष्ठाला म्हटले, ‘‘विश्वकर्म्याचा पुत्र जो नल त्याने माझ्या उदकावर सेतू बांधावा. तो चतुर व ह्या कामात समर्थ आहे. शिवाय त्याला महादेवाकडून तसा वर सुद्धा मिळाला आहे. हा सेतू बांधल्यामुळे तुझी कीर्ति लोकांना समजेल. तुझी कीर्ति सर्व लोकांची पापे नाहीशी करते.’’ असे म्हणून समुद्राने रामाला नमस्कार केला आणि तो अदृश्य झाला.
नंतर सुग्रीव आणि लक्ष्मणासह रामाने वानरांच्या साहाय्याने सेतू बांधण्याची नलाला आज्ञा केली. तेव्हा नलाला अतिशय आनंद झाला. त्याने पर्वतासारख्या प्रचंड शरीराच्या अनेक वानरसेनापतींचे साहाय्य घेतले आणि पर्वत व वृक्ष ह्यांच्या योगे शंभर योजने लांब असा विस्तीर्ण सेतू बांधला.
इति श्रीमद्ध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे तृतीयः सर्गः।