देवादिकांकडून ज्यांची प्रार्थना केली जात आहे असा चिन्मय परमात्मा मनुष्यरूप धारण करून पृथ्वीवर आला. जो आपल्या मूळ रुपामध्ये अर्थात ज्ञानस्वरूप, निर्विकार, ब्रह्मस्वरुपात जाऊ शकतो, शत्रूंचा नाश करण्यासाठी जगातील पाप पूर्णपणे नष्ट करणारा मानवी देहधारी प्रभु राम, त्यांचे आम्ही भजन करतो. आरंभमंगलाचे पाच श्लोकात वर्णन केले आहे. जगाच्या उत्पत्ति, स्थिति, लय या अवस्थांचे एकमात्र कारण असलेला मायेचा आश्रय असूनही ज्याला मायेची शक्ति यत्किंचितही बाधत नाही, अशा आत्मबोधस्वरूप सीतापति श्रीरामाला नमस्कार करतो.
जे भक्त श्रद्धेने एकचित्त होऊन अध्यात्मरामायणाचे वाचन, श्रवण करतात त्यांची सर्व पापे नष्ट होतात, ते हरिपदाला जाऊन पोचतात. ज्याला भवबंधातून सुटण्याची इच्छा असेल त्याने नित्यनेमाने अध्यात्मरामायण पठण करावे. त्याला सहस्रायुतकोटीपेक्षा अधिक असे गोदानाचे फल मिळेल.
त्रिपुरासुराचा वध करणारा श्रीशंकर, त्या श्रीशंकररूपी पर्वतातून उगम पावलेली, शेवटी श्रीरामरुपी समुद्राला मिळणारी अध्यात्मरामायणरुपी गंगा संपूर्ण भुवनांना पावन करणारी आहे.
पुढील श्लोकापासून श्रीशिव आणि पार्वती यांचा संवाद सुरू होतो.
एकदा कैलास पर्वतावर सूर्यप्रकाशाने उजळलेल्या आपल्या भवनात, रत्नजडित आसनावर बसलेल्या, ध्यानमग्न अवस्थेत असलेल्या, सिद्धपुरुषांकडून सेवा केल्या जाणाऱ्या, सर्व पातके नष्ट करणाऱ्या, आत्मज्ञानाच्या आनंदाचा मूर्तिमंत गाभा असलेल्या अशा देवाधिदेव श्री शिवशंकराला, त्यांच्या डाव्या मांडीवर विराजमान असलेली पार्वती अतिशय नम्रपणे, भक्तिभावाने म्हणाली,
‘‘हे देवाधिदेवा, संपूर्ण जगात भरून राहिलेले, सर्वांना आत्मरुपाने पाहू शकणारे असे आपण प्रत्यक्ष परमेश्वरच आहात. सनातन आहात. त्या सनातन पुरुषाचे म्हणजेच परब्रह्माचे तात्त्विक स्वरुप काय आहे ते कृपया मला समजावून सांगा. वास्तविक हे अत्यंत गुप्त, गोपनीय असे रूप आहे. आपल्या भक्तांना आपण सांगता म्हणून हे देवा, मी आपली प्रिय भक्त आहे. आपणही मला अत्यंत प्रिय आहात. म्हणून मी नम्रपणे विचारते, आपण मला सांगावे.
जानाम्यहं योषिदपि त्वदुक्तं, यथा तथा ब्रूहि तरन्ति येन॥
ज्यामुळे जीव तरून जातात असे वैराग्यपूर्ण आणि भक्तियुक्त, अनुभव प्राप्त करून देणारे ज्ञान आपण मला सांगावे. आपण मला सहज समजेल असे ज्ञान करून द्यावे. याशिवाय आणखी एक रहस्यपूर्ण गोष्ट आपल्याला विचारायची आहे. तीच मला प्रथम सांगा.
सर्व लोकांमध्ये सारभूत असलेल्या प्रभु श्रीरामचंद्राचे ठायी दृढभक्ति ठेवणे हीच खरी भवसागर तरून जाण्यासाठी असलेली सुप्रसिद्ध नौका आहे, असे मला कळले आहे. भव म्हणजे संसार. यातून मुक्त होण्यासाठी भक्ति हेच खरे साधन आहे. परंतु माझ्या मनात संशय निर्माण झाले आहेत, त्याचे आपण निराकरण करावे.’’
पुढील म्हणजे 11 ते 15 श्लोकांपर्यंत पार्वतीच्या मनातील संशय सांगितले आहेत.
‘‘राम हा सर्वश्रेष्ठ, सर्वांचे आदिकारण, त्याने मायेमुळे निर्माण होणाऱ्या गुणप्रवाहाचा निरास केला आहे, असे जे रामाविषयी सांगतात, रात्रंदिवस जे भजन करतात ते ज्ञानी सिद्धपुरुष मोक्षाच्या सर्वोत्तम पदाला प्राप्त करतात. काही असेही म्हणतात की राम हा सर्वश्रेष्ठ आहे खरा परंतु त्याचे स्वतःचे आत्मस्वरुप, ब्रह्मस्वरुप स्वतःच्याच मायारुपी अविद्येने वेढल्यामुळे, तो स्वतः जाणत नव्हता. दुसऱ्या कुणी अर्थात गुरुने त्याला उपदेश केल्यानंतरच तो स्वतःच्या श्रेष्ठ अशा परमात्मस्वरुपाला जाणता झाला. जर रामाला स्वस्वरुपाचे ज्ञान झाले तर त्या परमश्रेष्ठ रामाने सीतेसाठी शोक कोणत्या कारणाने केला? जर त्याला ह्या गोष्टीचे ज्ञान नव्हते असे म्हटले तर इतर सर्व जीवमात्रांप्रमाणेच त्याची योग्यता म्हणावी लागेल, त्याची सेवा तरी इतर कुणी का करावी? माझ्या या संशयाचे निराकरण करावे, माझे समाधान करावे.’’
श्री महादेव तिच्या संशयाचे निराकरण करतात. श्लोक 21 ते 32 श्रीशिवशंकर पार्वतीच्या मनात आलेल्या शंकांचे निरसन करतात. ‘‘हे पार्वती, तुझ्या मनातील शंका, ह्या तुझी ब्रह्मस्वरुप, रामस्वरुप जाणून घेण्याची जिज्ञासा स्पष्ट करतात. खरोखर तू धन्य आहेस. परमात्म्याची तू भक्त आहेस. यापूर्वी मला असा कुणीही प्रश्न विचारला नाही किंवा कुणी शंका सुद्धा घेतली नाही. आज मला तू मोठ्या भक्तियुक्त मनाने विचारले आहे म्हणून त्या रघुश्रेष्ठ रामाला नमन करून सांगतो. सर्व रहस्य सांगतो. राम हा परमात्मा आहे. तो अनादि, आनंदस्वरुप केवळ सर्वश्रेष्ठ असा फक्त पुरुषोत्तमच आहे. रामाने आपल्याच मायेने सर्व जग उत्पन्न केले. आकाशाप्रमाणे त्या जगाच्या आत-बाहेर राहणारा, सर्वांतर्यामी असून सुद्धा गुप्त होऊन जातो. स्वमायेने निर्माण केलेल्या सृष्टीकडे मोठ्या कौतुकाने पहात असतो. अनेक ब्रह्मांडे रामाभोवती फिरत असतात. अज्ञानी लोकांना काहीच समजत नाही. त्यांच्या मनावर अविद्येचे अर्थात मायेचे आवरण असते. पुत्रादिक, विविध कर्मे यामध्ये गुंतलेले, मोहित झालेले लोक रामावर स्वतःच्या अज्ञानाने आरोप करतात. केवळ संसार तेवढा खरा मानतात.
जसे देहभान हरवलेल्या मनुष्याला स्वतःच्या गळ्यातील सोन्याच्या अलंकाराचे भान रहात नाही अगदी तसेच अज्ञानी लोकांना स्वहृदयात असलेल्या रामाला जाणता येत नाही. जसे सूर्याच्या ठिकाणी अंधःकार असणे अशक्य आहे. सूर्याप्रमाणेच तेजःस्वरुप, निर्मल, ब्रह्मज्ञानाने परिपूर्ण अशा परमात्मा असलेल्या रामाच्या ठिकाणी अज्ञान राहणे कसे शक्य आहे? अर्थात शक्य नाही.
जसे स्वतःभोवती सतत गिरक्या घेणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टिला घरदार सर्व काही फिरताना दिसते, अगदी त्याप्रमाणेच शरीर आणि इंद्रिये यातच गुंतून राहिल्याने प्राणी मोहित होतात, भ्रमित होतात. सूर्याचे प्रकाशरूप जसे कधीच बदलत नाही, त्यामुळे त्याच्या ठिकाणी दिवस-रात्र काहीच नसतात. अगदी त्याप्रमाणे विशुद्ध ज्ञानाने परिपूर्ण असणाऱ्या, संकटे नाहिशी करणाऱ्या रामाच्या ठिकाणी ज्ञान किंवा अज्ञान ही दोन्ही कशी बरे राहू शकतील? परमानंदरूप, विज्ञानरूप अर्थात शुद्ध ज्ञानस्वरूप अशा तसेच अज्ञानरूप मायेचा केवळ साक्षी असलेला रघुत्तम त्याच्या ठिकाणी मोह निर्माण करणारे अज्ञान, स्वतःचा मायेचा आश्रय आहे म्हणून त्याच्या ठिकाणी अज्ञान रहात नाही. अशाप्रकारे 16 ते 24 पर्यंतच्या श्लोकात शंकानिरसन केले आहे.
आता यापुढे ऐकायला अतिशय दुर्मिळ असलेला आणि मोक्षप्राप्तीला सुलभ साधन असलेला सीता, रामचंद्र आणि वायूपुत्र मारुती यांच्यातील रहस्यमय संवाद श्रीशिव पार्वतीला सांगतात.
पूर्वी रामायणकाळामध्ये म्हणजे रामावतारात, श्रीरामचंद्राने रणांगणात देवाचा द्रोह करणाऱ्या रावणाचा समूळ नाश केला. त्याचे पुत्र, सैन्य, वाहन इ. सह विनाश केला. त्यानंतर सीता, सुग्रीव, लक्ष्मण इ. सह हनुमान इ. प्रमुखांना सोबत घेऊन राम अयोध्या नगरीला आले.
अयोध्येला रामचंद्र आल्यानंतर वसिष्ठादि महान ऋषींनी राज्याभिषेक केला. कोटिसूर्याप्रमाणे तेजस्वी असे रामचंद्र सिंहासनावर विराजमान झाले. श्रीरामाला सिंहासनावर विराजमान झालेले पाहून, हनुमान त्यांच्या समोर हात जोडून उभा राहिला. ज्याच्या साहाय्याने रामाने अनेक महत्त्वाची कार्ये पार पाडली, ज्याला ज्ञानाशिवाय कशाचीच इच्छा नाही असा महान बुद्धिवान हनुमान हात जोडून उभा राहिला. हनुमंताला बघून राम सीतेला म्हणतात, ‘‘तू हनुमंताला सत्तत्त्वाचा उपदेश कर. हा निष्कलंक निष्पाप असा आहे. आपणा दोघांची सदैव भक्ति करणारा आहे. ज्ञानाच्या उपदेशास पात्र आहे. ‘निष्कल्मषोऽयं ज्ञानस्य पात्रं, नौ नित्यभक्तिमान’,’’ अशा तऱ्हेने श्रीरामाने हनुमंताचा उल्लेख मोठ्या गौरवाने केला. जगन्मोहिनी माता सीता ‘ठीक आहे, सांगते’ असे म्हणाली. सीता ही प्रत्यक्ष मायाच होती. विनयशील अशा हनुमंताला श्रीरामाचे सत्यस्वरुप सहज समजेल अशा प्रकारे सांगू लागली. ती रामहृदय सांगते.
सीता हनुमंताला सांगते, ‘‘सच्चिदानंदस्वरुप, एकमेव अद्वितीय, सर्व उपाधीपासून मुक्त, सत्तारुपाने मात्र सर्वत्र अस्तित्व राखून असलेले, इंद्रियाला न समजणारे असे ब्रह्मतत्त्व म्हणजे रामाचे स्वरुप होय. श्रीराम हे आनंदस्वरुप, शुद्ध, निर्मल, शांत, निर्विकार, अज्ञान माया विरहीत, सर्व विश्वाला व्यापून असणारे सर्वात्मक, स्वयंप्रकाशी, पापरहित असे ब्रह्मतत्त्व आहे. तसेच मी सुद्धा आदिमाया आहे. उत्पत्ति, स्थिति, लय करणारी आहे, हे तू जाण. श्रीरामाच्या सान्निध्यानेच मी हे जग एकरुपतेने निर्माण करते. वास्तविक त्यांच्या सान्निध्यात मी हे जग निर्माण केले परंतु अज्ञानी लोक मात्र त्यांच्या सान्निध्यामुळे त्यांच्यावरच आरोप करतात. अयोध्या नगरीत अतिशय शुद्ध पवित्र अशा रघुवंशात जन्म घेणे, विश्वामित्रांना साहाय्य करणे, यज्ञ रक्षण करणे, अहिल्येला शापमुक्त करणे, शिवधनुष्य भंग करणे, माझे पाणिग्रहण करणे, परशुरामांचा गर्व हरण करणे, अयोध्या नगरीत बारा वर्षे माझ्यासह वास्तव्य करणे, दंडकारण्यात जाणे, विराधवध करणे, मायावी मारीचाचे मरण, मायेने निर्माण केलेल्या सीतेचे हरण इ. प्रसंग, जटायू आणि कबंध यांना मोक्षाचा लाभ, सीताशोध कार्य, समुद्रावर सेतूबंधन कार्य, लंकेला वेढा, युद्ध करुन रावणाचा पुत्रासह समूळ नाश करणे, बिभीषणाला लंकेचे राज्य दान करुन माझ्यासह पुष्पक विमानातून अयोध्येला आगमन, नंतर रामाला राज्याभिषेक ह्या सर्व गोष्टी माझ्याकडूनच घडवून आणल्या. पण ह्या सर्व गोष्टींचे कर्तृत्व मात्र सर्वांतर्यामी असलेल्या, विकाररहित अशा श्रीरामाच्या ठायीच आहे, असे लोकांकडून आरोपिल्या जाते.
श्रीराम मात्र काहीच करीत नाही, चालत नाही, उभा रहात नाही. कोणत्याही प्रकारे शोक करीत नाही, कोणत्या गोष्टीची इच्छा धरीत नाही किंवा कशाचा त्यागही करीत नाही, काहीच करीत नाही. तो आनंदरुप, अढळ, परिणामशून्य असा आहे. परंतु मायेने निर्माण होणाऱ्या गुणांकडून निर्माण झालेल्या प्रसंगांना तो आधारभूत असल्यामुळे तो तसा सृष्टिरुपी भासतो.’’
अशाप्रकारे सीतेने हनुमंताला रामहृदय सांगितले (44 ते 52) श्री महादेव सांगतात, ‘‘सीता मातेने अशा प्रकारे रामहृदय वर्णन केल्यानंतर श्रीराम स्वत:च जवळ असलेल्या मारुतीला म्हणाले, ‘‘मी तुला आता आत्मा, अनात्मा, परात्मा अर्थात ईश्वर, जीव आणि शुद्ध चैतन्य ह्यांचे तत्त्व काय आहे ते सांगतो. जसे आकाशाचे तीन प्रकारचे भेद दिसतात तसे मोठे आकाश, जलाशयात मर्यादित झालेले आकाश आणि पाण्यात प्रतिबिंबित होऊन राहिलेले आकाश. तशाच प्रकारे बुद्धिरुपी उपाधीने युक्त असे एक चैतन्य- ईश्वर, प्रतिबिंबित रुप असलेले चैतन्य जीव आणि बिंबभूत म्हणजेच आधारभूत शुद्ध चैतन्य असे चैतन्याचे तीन प्रकार आहेत. अज्ञानी लोक आभासयुक्त चैतन्यावर भ्रांतीने आरोप करतात. हा आभास म्हणजे प्रतिबिंब. वास्तविक हे मिथ्या ज्ञान होय. हे मिथ्या ज्ञान, अविद्या, अज्ञानाने निर्माण होते. ब्रह्म हे भेदरहित, अविकारी, मर्यादातीत असलेले शुद्ध चैतन्यस्वरुप आहे. परंतु अज्ञानाने किंवा भ्रमाने त्याच्या ठिकाणी भेद दिसतो. अशाप्रकारे भ्रमाने चैतन्याच्या ठिकाणी भेद निर्माण झाला म्हणजे आभासयुक्त किंवा प्रतिबिंबयुक्त जीवाचे ‘तत् त्वम् असि’ ते तूच आहेस इ. महावाक्याच्या साहाय्याने शुद्ध चैतन्याशी त्याचे ऐक्य पटवून दिले जाते.
जीव आणि ईश्वर ‘तत्त्वमसि’ या महावाक्याने ऐक्य आहेत हे समजले म्हणजे अविद्या तत्काळ त्याच्या कार्यासहित नष्ट होते. हे जाणले की माझा भक्त माझ्या स्वरुपाला प्राप्त होतो. हे समजल्यावरही माझ्या भक्तीपासून दूर असणारे अज्ञानी लोक मोहवश होऊन शास्त्ररुपी खड्डयात पडतात. शेकडो जन्म घेऊनही त्यांना ज्ञान मिळत नाही, अर्थात मोक्षही मिळत नाही.
हे माझ्या निष्पाप भक्ता हनुमंता, माझ्या स्वरुपासंबंधीचे हे गुप्त तत्त्व रामहृदय मी स्वत: तुला सांगितले. या रामहृदय तत्त्वाची योग्यता इंद्राच्या राज्यापेक्षाही अधिक आहे. ज्याच्याजवळ माझी भक्ती नाही अशा दुष्ट व्यक्तिला तू उपदेश करु नयेस.’’
महादेव म्हणतात, ‘‘हे पार्वती मी तुला अतिशय गुह्य, मनोहर, पवित्र, पापनाशक असे रामहृदय सांगितले जे साक्षात रामानेच सांगितलेल्या तसेच सर्व वेदातील सिद्धांताचे सार असलेल्या ह्या रामहृदयाचे वर्णन केलेले आहे. जो भक्तियुक्त अंत:करणाने नित्य रामहृदयाचे पठण करील तो निश्चयपणे मुक्त होईल यात तीळमात्र शंका नाही. पूर्वजन्मी केलेली पापे, ब्रह्महत्त्यादी महापापे याच्या पठणाने नष्ट होतील असे स्वत: रामाचेच वचन आहे. श्रीरामाची पूजा करुन भक्तिपूर्वक जो कोणी ह्या रामहृदयाचे पठण करील तो नि:संशय ब्रह्मपदाला जाईल.
अत्यंत भ्रष्ट, अतिशय पापी, परधन, परस्त्री हरण करणारा, चोरी करणारा, ब्रह्महत्त्या, मातापित्याचा वध करण्यास सिद्ध असणारा, साधुंवर अपकार करणारा, त्यांना पिडा देणारा अशा प्रकाराचा कोणीही पापी मनुष्य भक्तियुक्त अंत:करणाने रामहृदय पठण करील त्याला योगी लोकांनाही दुर्लभ असे देवांना प्रिय असणारे ब्रह्मपद त्या पदाची खात्रीने प्राप्ती होईल, अर्थात उद्धार होईल.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे बालकाण्डे प्रथमः सर्गः।