श्री महादेव म्हणाले,
‘‘शुकाच्या मुखातून निघालेले शब्द ऐकून रावणाचे डोळे क्रोधाने लाल झाले. शुकाला तो जाळीत आहे की काय? असा भास झाला. शुकाचे ते भाषण म्हणजे अज्ञानाचा नाश करणारे उपदेश वचन होते. रावण त्याला म्हणाला, ‘‘शुका, तू अत्यंत दुष्ट बुद्धिचा आहेस. तू चाकर असून गुरुसारखे भाषण करीत आहेस, हे कसे? मी त्रैलोक्याचे शासन करणारा असून तू मला उपदेश करीत आहेस. याची तुला लाज वाटत नाही काय? आताच मी तुझा वध केला असता परंतु तुझे पूर्वीचे उपकार लक्षात घेता तू वध्य असूनही तुझे रक्षण करीत आहे. मूर्खा, येथून निघून जा. अशा प्रकारचे तुझे भाषण ऐकून घेणे मला योग्य वाटत नाही.’’ ‘‘हा माझ्यावर मोठाच अनुग्रह केला आहे’’ असे बोलून भीतीने थरथर कापत शुक घरी गेला. शुक देखील पूर्वजन्मी ब्राह्मण असून वेदपारंगत व परम ब्रह्मज्ञानी होता. तो वानप्रस्थधर्मानुसार कर्मे आचरण करून वनात रहात असे. देवांच्या उत्कर्षासाठी व देवशत्रूंच्या अर्थात दैत्यांच्या नाशासाठी त्या महाबुद्धिमान शुकाने एकामागून एक असे अनेक यज्ञ केले. देवांचे हित करण्यात शुक तत्पर असल्यामुळे राक्षस त्याला विरोध करू लागले. त्यात वज्रदंष्ट्र नावाचा एक प्रसिद्ध महाराक्षस होता. शुकाला अपकार करण्याबद्दल उत्कंठित होऊन तशा संधीची वाट पाहात होता. एकेवेळी त्या मुनिच्या आश्रमात अगस्त्य मुनि आले. त्यांचे आदरातिथ्य करून शुकाने त्यांना भोजनासाठी थांबण्याकरिता सांगितले. पुढे मुनि स्नानाला गेले असता संधी साधून त्या वज्रदंष्ट्र राक्षसाने अगस्त्याचा वेष धारण केला आणि शुकाकडे येऊन त्याला म्हटले, ‘‘ब्रह्मन्! मला तुम्ही भोजन देणार तर त्यात मांस असावे. बरेच दिवसात बोकडाच्या शरीराचे मांस मी खाल्लेले नाही.’’ ‘बरे आहे’ असे म्हणून शुकाने मांसाचे सर्व पदार्थ तयार केले. पुढे अगस्त्य भोजनास बसला असता त्या राक्षसाने शुकपत्नीला मोहवश केले व तिच्यासारखे सुंदर रूप धारण केले आणि नरमांसाचे तयार केलेले अनेक पदार्थ त्याला वाढले. ते वाढून होताच तो राक्षस गुप्त झाला. ते नरमांस पाहून अगस्त्याला क्रोध आला. तो शुकाला म्हणाला, ‘‘नरमांस अपवित्र आहे, ते अभक्ष्य नरमांस तू मला दिले आहेस म्हणून तू राक्षस होऊन मनुष्यमांस भक्षण करीत जा’’, असा शाप मिळताच शुक घाबरला. तो अगस्त्याला म्हणाला, ‘‘मुने, आपण आताच मला सांगितलं की आज प्रामुख्याने मांसाचे भोजन असावे. त्याप्रमाणेच मी आपणाला भोजन घातले. देवा, मला शाप का म्हणून देता?’’ शुकाचे भाषण ऐकून अगस्त्य मुनि थोडावेळ ध्यानस्थ बसले. राक्षसाने केलेला सर्व प्रकार त्यांच्या ध्यानात आला. नंतर ते बुद्धिमान अगस्त्य शुकाला म्हणाले, ‘‘तुला अपकार करू इच्छिणाऱ्या राक्षसाने हे सर्व केले आहे. मुनिसत्तमा, अविचाराने मी तुला शाप दिला आहे. तरी सुद्धा माझे भाषण निश्चित सत्य होणार. तरी तू राक्षसदेह धारण करून रामचंद्र येईपर्यंत रावणाला साहाय्य कर. रावणाचा वध करण्यासाठी वानरांना सोबत घेऊन श्रीराम लंकेजवळ येईल तेव्हा रावण तुला आपला दूत म्हणून रघुश्रेष्ठ रामाकडे पाठविल. तेथे रामाचे दर्शन होताच तू शापमुक्त होशील. पुढे तू रावणाला तत्त्वज्ञानाचा उपदेश करशील आणि मुक्त होऊन परमपदाला जाशील.’’ असे अगस्त्य मुनि ब्राह्मणश्रेष्ठ शुकाला म्हणाले. त्याप्रमाणे तत्काळ शुकाला राक्षसरूप प्राप्त झाले आणि तो रावणाच्या आश्रयाने राहिला. आता त्याने दूतरूपाने जाऊन कनिष्ठ बंधुसह रामाचे दर्शन घेतले आणि परत येऊन रावणाला उपदेश केला. त्यामुळे तो तत्काळ पूर्ववत ब्राह्मण होऊन ऋषींसह पुनः राहू लागला.
त्यानंतर माल्यवान नावाचा एक वृद्ध राक्षस रावणाजवळ आला. तो मोठा बुद्धिमान आणि नीतिशास्त्रात निपुण होता. शिवाय तो रावणाच्या आईचा प्रिय पिता होता. त्याने त्या पराक्रमी राक्षसवीर रावणाला सांगितले, ‘‘राजा! आता मी सांगतो ते शांत चित्ताने ऐकून घे. मग तुला वाटेल ते कर. दशानना, रामाची प्रिय भार्या जानकी हिचा प्रवेश लंकेत झाला तेव्हापासून ह्या नगरीत भयंकर अशी अशुभ चिह्ने दिसत आहेत. त्यावरून ही लंकापुरी पूर्ण नाशाला जाणार असे दिसून येत आहे. ती अशुभ चिह्ने कोणती ते सांगतो. आकाशात भयंकर मेघ गर्दभस्वर काढून गर्जना करतात व सर्वकाळ लंकेवर उष्ण रक्ताचा वर्षाव करतात. देवांच्या मूर्ती रडतात, घामाघूम होतात आणि स्थळ सोडतात. कालिका पुढे उभी राहून आपले पांढरे दात बाहेर काढते आणि हसत सुटते. गाईच्या पोटी गर्दभ येतात. उंदीर व मुंगूस मांजराबरोबर युद्ध करतात आणि सर्प गरुडाशी लढतात. क्रूर, भयंकर, मुंडलेला, काळ्या पिंगट वर्णाचा काळपुरुष सर्वांच्या घरात वेळोवेळी डोकावतो. ही व दुसरी अनेक दुश्चिह्ने दिसतात, उद्भवतात. म्हणून हे दशानना, कुलाच्या रक्षणाकरिता काही शांती कर. अरे! धनासह सत्कारपूर्वक सीता रामाला लवकर नेऊन दे. राम हा नारायण आहे असे समज. त्या राघवाविषयी द्वेषबुद्धी सोडून दे. त्याच्या चरणरूप नौकेचा आश्रय करून ज्ञानी लोकांची अंतःकरणे भक्तीने पवित्र होतात आणि ते भवसागर तरून जातात. राम हा मनुष्य नाही. म्हणून सर्वांच्या हृदयात राहणाऱ्या त्या रामचंद्राचे भक्तिभावेकरून भजन कर. जरी तू दुराचरणी आहेस, तरी भक्तीच्या योगे पवित्र होशील. राजेन्द्रा, तुझ्या कुलाचे कल्याण व्हावे म्हणून माझ्या म्हणण्याप्रमाणे वाग.’’
माल्यवानाने असे हितकारक उपदेशाचे भाषण केले तरी ते त्या दशाननाला, रावणाला सहन झाले नाही. तो दुष्ट हृदयाचा रावण मृत्युच्या अधीन झाला होता. ‘‘राम म्हणजे एक यःकश्चित दीन मनुष्य, त्याला आधार म्हणजे माकडांचा. त्याला पिताही नाही. त्याला प्रिय म्हणजे वनातील मुनिजन. अशा त्या रामाला तू समर्थ समजतोस. हे कसे शक्य आहे? तुला खरोखर रामाने पाठविले असावे म्हणून तू असे निष्प्रतिबंधपणे बोलत आहेस. तू जा. तू म्हातारा व आमचा आप्त असल्यामुळे मी तुझे सर्व बोलणे सहन केले आहे. तुझ्या भाषणाने माझ्या कानांची आग आग झाली आहे.’’
असे बोलून सचिवासह रावण तेथून निघाला. राजवाड्याच्या शिखरावर बसून व वानरसैनिकांना पाहून जवळ असलेल्या सर्व राक्षसांना युद्धासाठी सिद्ध होण्याची त्याने आज्ञा दिली. रामाने सुद्धा लक्ष्मणाने आणलेले धनुष्य हाती घेतले. रावणाला राजवाड्यावर बसलेला पाहून राम अत्यंत क्रुद्ध झाला. रावण मुकुट घालून बसला होता. त्याच्या सभोवती त्याचे मंत्री बसले होते. अशा त्या रावणावर रामाने एक अर्धचंद्राकार बाण टाकून त्याची हजारो शुभ्र छत्रे आणि दहा मुकुट निमिषार्धात छेदून टाकली. ते कृत्य सर्वांना आश्चर्यकारक वाटले. रावण लज्जित होऊन तत्काळ आपल्या मंदिरात गेला. त्या दुष्टाने प्रहस्त वगैरे सर्व राक्षसांना बोलावले आणि त्वरेने त्यांना वानरांशी युद्ध करण्याला जाण्याची आज्ञा दिली. लगेच भेरिमृदंगादि तसेच पणव, आनक, गोमुख वाद्ये वाजू लागली. रेडे, उंट, गाढव, सिंह, वाघ ह्या वाहनांवर बसून खङ्ग, शूल, धनुष्ये, पाश, यष्टि, तोमर आणि शक्ति ही हत्यारे हाती घेऊन राक्षस निघाले. अशारितीने ते राक्षस लंकेच्या प्रत्येक वेशीवर येऊन पोचले. त्यापूर्वीच रामाने आपल्या वानरश्रेष्ठांना युद्धाला निघण्याची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे पर्वताची शृंगे आणि मोठमोठाली शिखरे, तसेच नानाप्रकारचे वृक्ष उपटून घेऊन वानरसेनापतीही सज्ज झाले. ते रावणाचे सैन्य तुकड्यातुकड्यांनी येत आहे हे पाहून वानरवीर रामाचे कल्याण करण्याच्या इच्छेने लंकेवर चालून गेले. कोणी हातात वृक्ष घेतले होते तर कोणी पर्वतशिखरे घेतली होती. कोणी आपल्या मुष्टी आवळून धरल्या होत्या, कोणा सेनापतीच्या हाताखाली सहस्त्र तर कोणाच्या हाताखाली कोटि, शतकोटि असे सेनासमूह होते. अशाप्रकारे त्या सर्वांनी पूर्ण नगराला वेढा घातला. ते वानर वरखाली उड्या मारत व गर्जना करीत होते. ‘अतिबलवान रामाचा जयजयकार असो’, ‘महाबलिष्ठ लक्ष्मणाचा जयजयकार असो’, ‘रामाने रक्षण केलेल्या सुग्रीवाचा जयजयकार असो’ अशारितीने जयघोष करीत ते शत्रूंबरोबर लढू लागले. हनुमंत, अंगद, कुमुद, नील, नल, शरभ, मैंद, द्विविद, जांबवान, दधिवक्र, केसरी, तार आणि दुसरेही बलवान वानर अशा सर्व सेनापतींनी लंकेच्या वेशीवर उड्या मारल्या आणि ते चारी बाजूंनी नगराला पूर्णपणे वेढा घालून राहिले. त्या प्रचंड शरीराच्या वानरांपैकी काहींनी मोठ्या वृक्षांनी आणि पर्वताग्रांनी, तर कित्येकांनी आपल्या नखांनी आणि दातांनी त्या राक्षसांवर मोठ्या त्वेषाने प्रहार केले. तेव्हा त्या महाकाय आणि महाबल अशा भयंकर राक्षसांनी क्रोधाने वेशीबाहेर येऊन गोफणी, तरवारी, शूल आणि कुर्हाडी यांच्यायोगे वानरसैन्यावर सर्वत्र मारा केला. इकडे त्या जयशील वानरांनी राक्षसांना इतका मार दिला की त्या रणांगणावर मांस आणि रक्त ह्यांचा सर्वत्र चिखल होऊन राहिला. हे राक्षसांचे आणि वानरांचे युद्ध इतके विलक्षण झाले की त्याला कुठली उपमाच देता येणार नाही. ते राक्षसश्रेष्ठ कोणी घोड्यांवर, कोणी हत्तीवर तर कोणी सुवर्णसदृश रथात बसून लढत होते. त्यांनी आपल्या गर्जनांनी दाही दिशा भरून टाकल्या. राक्षस काय आणि वानर काय, दोघे एकमेकास जिंकण्याची इच्छा धरून राहिले होते. वानर राक्षसांना मारीत त्याचप्रमाणे राक्षसही वानरांना मारीत होते. वानर देवांचे अंशावतार असल्यामुळे आणि त्यातही त्या विष्णुरुपी रामचंद्राची त्यांच्यावर कृपादृष्टी असल्यामुळे ते अमृतप्राशन केल्याप्रमाणे बलवान आणि आनंदी झाले होते. उलटपक्षी राक्षसांचा पालक रावण होता. त्याने सीतेचे हरण करण्याचे पापकर्म केल्यामुळे त्यांचे तेज आणि वीरश्री नष्ट झाली होती. अशा त्या राक्षसांचा वानरांनी युद्धात, रणांगणावर लढून पराक्रमाने वध केला.
शेवटी सर्व राक्षससैन्य मारलेले पाहून ब्रह्मदेवाच्या वराने वीरश्री पावलेला दुष्टबुद्धिचा मेघनाद अंतर्धान पावला. आकाशातून चारी बाजूंनी ब्रह्मास्त्रासह नाना प्रकारची शस्त्रे सोडून तो वानरसैन्याला पीडा देऊ लागला. सर्व अस्त्रविद्येत तो कुशल होता. त्याने बाणांची सारखी वृष्टि चालू ठेवली. तो देखावा सर्वांना अत्यंत आश्चर्यकारक वाटला.
इकडे अस्त्रवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ असा तो श्रीराम ब्रह्मास्त्राला मान देण्यासाठी क्षणभर स्वस्थ बसला, तो वानरसैन्य पतन पावल्याचे त्याला दिसून आले. त्यामुळे तो क्रोधाने अग्नीसारखा लाल झाला. तो लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘लक्ष्मणा! धनुष्य आण. ब्रह्मास्त्राच्या योगाने ह्या राक्षसाला एका क्षणात भस्म करून टाकतो. हे रघुत्तमा! लक्ष्मणा! माझे सामर्थ्य केवढे आहे ते आज पहाच!’’ रामाचे भाषण त्या कपटी मायावी राक्षसाने ऐकले आणि तो लगेचच सावधपणाने नगरात पोचला. वानरसैन्य पडलेले पाहून रामाला अतिशय दुःख झाले. तो मारुतीला म्हणाला, ‘‘क्षीरमहासागरावर लवकर जा. तेथे द्रोणगिरी नावाचा पर्वत असून त्यावर अनेक दिव्य औषधींची निर्मिती झाली आहे. लवकर जा आणि त्या घेऊन ये. हे महाबुद्धिमंता मारुते, ह्या महापराक्रमी वानरसैन्याला जिवंत कर. असे केल्याने तुझी कीर्ती जगात चिरकाल स्थिर राहील.’’ ‘‘आपली आज्ञा प्रमाण!’’ असे म्हणून तो वायुपुत्र तेथून निघाला. त्या वानरश्रेष्ठाने द्रोणगिरी आणला. सर्व वानरांना जिवंत केले आणि जागच्याजागी पुन्हा त्या पर्वताची स्थापना करून तो ताबडतोब परतला.
वानरांच्या सेनासमूहाची पूर्ववत गर्जना ऐकून रावणाला आश्चर्य वाटले आणि तो म्हणाला, ‘‘देवांनी निर्माण केलेला माझा मोठा शत्रू राघव रामचंद्र येथे पोहोचला आहे. त्याला समरांगणी मारण्याकरिता माझ्या सेनापतींनी तत्काळ निघावे. माझे मंत्री, माझे बांधव आणि माझे प्रिय व्हावे अशी इच्छा करणारे जे कोणी शूर पुरूष असतील त्या सर्वांनी युद्धाला त्वरित निघून जावे, अशी माझी आज्ञा आहे. प्राणनाश होईल ह्या भीतीने जे कोणी युद्धाला जाणार नाहीत त्या माझी आज्ञा मोडणाऱ्या सर्वांचा मी वध करीन.’’
ते ऐकून अतिकाय, प्रहस्त, महानाद, महोदर, देवशत्रू, निकुंभ, देवांतक, नरांतक हे सर्व युद्धनिपुण राक्षस आणि दुसरेही सर्व बलसंपन्न राक्षस वानरांशी युद्ध करण्यासाठी निघाले. हे आणि आपल्या बलाचा अभिमान बाळगणारे दुसरेही पुष्कळ शेकडो, हजारो शूर राक्षस वानरसेनेत शिरून तिचा नाश करू लागले. भुशुंडींनी, गोफणींनी, बाणांनी, तरवारींनी, कुर्हाडींनी आणि दुसऱ्या अनेक प्रकारच्या अस्त्रांनी त्यांनी वानरसेनेवर मारा केला. त्या वानरांनीही वृक्षांनी, पर्वताग्रांनी आपल्या नखांनी, दाढांनी आणि मुष्टिप्रहारांनी सर्व राक्षससेनापतींचे प्राण हरण केले. कित्येक राक्षसांचा वध रामाने केला. कित्येकांचा सुग्रीवाने वध केला तर काहींचा मारुतीने, काहींचा अंगदाने तर काहींचा महापराक्रमी लक्ष्मणाने वध केला. अशाप्रकारे सर्व राक्षस वानरसेनापतींकडून मारले गेले. रामतेजाचा संचार अंगात झाल्यामुळे ते वानर बलाढ्य झाले होते. हे तेजसामर्थ्य रामाकडून त्यांना प्राप्त झाले होते. तसे जर नसते तर त्यांना एवढी शक्ती कोठून आली असती? राम हा सर्वेश्वर सर्वरुपी सृष्टिकर्ता होय. तो नित्य चैतन्यघन आणि आनंदमय आहे. तरी मायेने मनुष्यरुपाचे अनुकरण करून युद्धादि लीलारुप आपली माया विस्तारीत आहे.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे पञ्चमः सर्गः।