श्री महादेव म्हणाले,
‘‘याचवेळी सुमंत्र संध्याकाळ झाली म्हणून वस्त्राने तोंड झाकून घेऊन, डोळ्यात अश्रू दाटून आले आहेत अशा अवस्थेत अयोध्या नगरीत प्रवेश घेता झाला. रथ बाहेरच थांबवून राजाला भेटायला तो आत गेला. त्याने राजाचा जयजयकार करुन त्याची स्तुति केली. राजाला प्रणाम केला. सुमंत्र अशा प्रकारे वंदन करीत असता विव्हळ होऊन राजा म्हणाला, ‘‘सुमंत्रा! सीता आणि लक्ष्मण बरोबर असलेला राम कोठे आहे? तू रामाला कोठे सोडून आलास? माझ्यासारख्या पाप्याला उद्देशून राम काय म्हणाला? मज निर्दयाला उद्देशून सीता आणि लक्ष्मण काय काय बोलले? हे रामा! हे गुणनिधे! हे प्रियवादिनी सीते! मला ह्या दु:खसागरात बुडून मृत्यु पावणाऱ्या मला तुम्ही पहात नाही का?’’
अशाप्रकारे शोक करीत तो राजा दुःखसागरात बुडून गेला. तेव्हा तो सुमंत्र हात जोडून त्या दुःखाने रडणाऱ्या राजाला म्हणाला, ‘‘महाराज, राम लक्ष्मण आणि सीता ह्यांना मी रथात बसवून नेले. ते गंगेच्या काठावरील शृंगवेरपुराजवळ गेल्यावर तेथेच राहिले. तेथे गुहाने थोडीफार फळेमुळेे आणली होती. त्याला रामाने प्रेमाने आणि संतोषाने स्पर्श केला. परंतु ती न घेता तशीच ठेवून दिली. त्यानंतर गुहाकडून वडाच्या झाडाचा चीक आणवून त्या रघुनंदनाने आपल्या जटांचा मुकुट बांधला. मग तो राम मला म्हणाला, ‘‘सुमंत्रा, महाराजांना सांग की माझ्यासाठी आपण शोक करू नका. ह्या वनात आम्हाला अयोध्येपेक्षाही अधिक सुख मिळणार आहे. माझ्या मातेला माझा प्रणाम सांग आणि सांग की माझ्यासाठी शोक करू नकोस. शोकाकूल झालेल्या वृद्ध अशा महाराजांचे सांत्त्वन करीत रहा. हे नृपश्रेष्ठा, साश्रू नयनाने रामाकडे किंचित बघून, दुःखाने गद्गदीत झालेल्या आवाजाने सीता मला म्हणाली, ‘‘माझ्या सासू-सासऱ्यांच्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात सांगा’’, असे म्हणून ती सीता रडतरडत खाली मान घालून पुढे चालू लागली. ते तिघेही अश्रुपूर्ण नेत्रांनी नौकेमध्ये चढले. गंगापार करून सर्वजण पलीकडे जाईपर्यंत मी तेथेच उभा होतो. त्यानंतर मोठ्या दुःखाने मी परत आलो.’’
हे ऐकून कौसल्या रडत राजाला म्हणाली, ‘‘कैकेयी आपली प्रिय पत्नी असून आपण तिला प्रसन्न होऊन वर दिला. तिच्या पुत्राला, भरताला राज्यही दिले. परंतु माझ्या रामाला मात्र आपण वनात का बरे पाठविले? आपणच हे सर्व केले आहे. आता व्यर्थ शोक का बरे करत आहात?’’
हे कौसल्येचे भाषण ऐकून जखमेवर अग्नि ठेवावा त्याप्रमाणे त्या दशरथ राजाचे डोळे दुःखाश्रूंनी भरून आले आणि तो कौसल्येला म्हणाला, ‘‘आधीच मी दुःखाने मरणोन्मुख झालो आहे अशा मला आणखी का बरे दुःख देतेस? आता पुरे कर! आता माझे प्राण निघून जाणार यात काही शंका नाही. पूर्वी माझ्या हातून अपराध घडला आणि त्यामुळे कोण्या एका मुनीने मला शाप दिला होता. हा मुनी श्रावण नावाचा वैश्य होता. मी पूर्वी तारूण्यात असतांना गर्विष्ठ होऊन धनुष्यबाण घेवून फिरत असे. शिकारीची मला फारच आवड होती. रात्रीच्या वेळी सुद्धा मी शिकारीसाठी फिरत असे. असाच एकदा एका अरण्यात नदीतीरावर मी गेलो होतो. मध्यरात्रीच्या वेळी कोणी एक मुनी, आपल्या तहानेने व्याकूळ झालेल्या आईवडिलांसाठी उत्साहाने पाणी भरत होता. तो आपला कुंभ पाण्यात बुडवून पाणी भरत असता पाण्याचा आवाज झाला. तेव्हा एखादा हत्ती ह्या मध्यरात्रीच्या वेळी पाणी पीत असावा असे वाटून धनुष्याला बाण लावून शब्दाच्या दिशेने अचूक लक्ष्यवेध करण्यासाठी मी बाण सोडला. तेवढ्यातच ‘मेलो, मेलो, माझा काही अपराध नसताना हे दैवा, कोणी बाण मारला?’ असा मनुष्याचा आवाज मी ऐकला. ‘माझे आईवडील पाण्याची इच्छा करीत माझी वाट बघत असतील’ हे त्या पुरुषाचे भाषण ऐकून मी भयभीत होऊन गेलो. नंतर मी हळूहळू त्याच्याजवळ जाऊन म्हणालो, ‘स्वामी! मी दशरथ राजा आहे. लक्ष्य वेधणारा माझा बाण नकळत आपणास लागला आहे. हे मुने, आता आपणच माझे रक्षण करणे योग्य आहे,’ असे बोलत असता माझा कंठ दाटून आला. मी त्याच्या चरणांवर लोटांगण घातले. तेव्हा तो मुनि म्हणाला, ‘‘हे राजश्रेष्ठा! भिऊ नकोस. तुला ब्रह्महत्त्येचे पातक लागणार नाही. कारण मी तपश्चर्या करणारा वैश्य आहे. माझे माता, पिता दोघेही तहान-भुकेने व्याकूळ होऊन माझी वाट बघत आहेत. म्हणून तू थोडाही विलंब न करता आधी त्यांना पाणी नेऊन दे. तू जर असे केले नाहीस, तर पिता अत्यंत संतापून तुझे भस्म करून टाकील. त्यांना पाणी सर्वप्रथम देऊन नंतर त्यांना नमन करून सर्व वृत्तांत सांग. त्या आधी माझ्या शरीरातील बाण बाहेर काढ. मला फार वेदना होत आहेत.’’ असे त्याने सांगितल्यावर मी ताबडतोब त्याच्या शरीरातून बाण उपटून काढला. मग तो पाण्याचा कलश घेऊन त्याच्या मात्यापित्याकडे गेलो. ते दोघेही वृद्ध आणि अंध होते. रात्रभर तहानभुकेने व्याकूळ झालेले होते. ‘पाणी घेऊन अजूनपर्यंत पुत्र का बरे येत नाही? काय कारण असेल? आम्हाला त्याच्याशिवाय कुणी नाही. वार्धक्यामुळे आमची अशी शोचनीय अवस्था झाली आहे. आमचा भक्तिमान पुत्र आमची उपेक्षा करीत आहे काय?’ अशा चिंतेने ते दोघेही व्याकूळ असताना माझ्या पावलांचा ध्वनि त्यांनी ऐकला. त्यावर पिता म्हणाला, ‘‘बाळा, एवढा उशीर का बरे केलास? बाळा, आम्हाला पाणी दे आणि तू सुद्धा पी.’’ अशा तऱ्हेने बोलत आहे तेवढ्यात मी हळूहळू त्यांच्याजवळ गेलो. त्यांच्या चरणावर डोके ठेवून नमन केले आणि विनयपूर्वक म्हणालो, ‘‘मी आपला पुत्र नाही. मी अयोध्येचा राजा दशरथ आहे. मी पापी आहे. मृगयासक्त होवून रात्रीच्या वेळी शिकार करण्यासाठी पाणवठ्यापासून दूर अशा अंतरावर थांबलो होतो. पाण्यात होणारा आवाज ऐकून मी शब्दवेधाने एक बाण त्या ठिकाणी सोडला. त्यानंतर ‘मेलो, मेलो’ असा आवाज ऐकू आला. मी घाबरून तेथे गेलो. तेथे एक मुनीकुमार अस्ताव्यस्त होऊन खाली पडलेला पाहिला. भयभीत होऊन मी त्याचे पाय धरले आणि ‘माझे रक्षण कर, रक्षण कर’ असे म्हणालो. मुनीकुमार म्हणाला, ‘‘भिऊ नकोस. तुला काही ब्रह्महत्त्येचे पाप लागणार नाही.’’ असे सांगून पुढे म्हणाला, ‘‘माझ्या मातापित्यांना पाणी दे आणि नमन करून जीवदानासाठी प्रार्थना कर’’, असे त्याने सांगितले म्हणून मी आपल्याकडे आलो आहे. मी आपल्याला शरण आलो आहे. आपण दयाळू होऊन माझे रक्षण करावे.
माझे हे बोलणे ऐकून दोघेही दुःखाने व्याकूळ झाले. त्यांनी फार शोक केला. शोक करताना दोघेही जमिनीवर पडले आणि मला म्हणाले, ‘आमचा पुत्र जेथे असेल तेथे आम्हाला सत्त्वर घेऊन चल.’ त्यानंतर मी त्या वृद्ध दम्पतीला, त्यांचा पुत्र जेथे पडून होता तेथे नेले. आपल्या मुलाला हाताने स्पर्श करीत बराच वेळ शोक केला. ‘हाय, हाय’ म्हणून फार मोठा आक्रोश केला. म्हणू लागले, ‘‘बाळा, अरे बाळा, पाणी दे रे, आम्हाला पोटभर पाणी का देत नाहीस?’’ त्यानंतर मला म्हणाले, ‘‘राजा, लवकर चिता तयार कर.’’ मी लगेचच चिता रचली आणि त्यावर तिघांना ठेवून अग्नि दिला. अशारितीने ते तिघे अग्निने दग्ध होऊन स्वर्गलोकी गेले. त्यावेळी वृद्ध पिता मला म्हणाला, ‘‘तुझीही अशीच अवस्था होईल. माझ्या शापाने तुला पुत्रशोकानेच मरण येईल.’’ अशा या शापाचे फळ आता मला प्राप्त झाले आहे’’.
असे म्हणून राजाने शोकायमान होवून विलाप सुरू केला. ‘‘हे रामा! माझ्या बाळा! हे सीते! हे गुणनिधे लक्ष्मणा! तुमच्या वियोगाने मी मृत्यु प्राप्त करून घेतला आहे. याला कारणमात्र कैकेयी आहे’’, एवढे बोलून राजा दशरथाने प्राण सोडला. स्वर्गाला गेला. तेव्हा कौसल्या, सुमित्रा आणि इतर राजस्त्रिया उर बडवित, मोठ्याने आक्रोश करीत विलाप करू लागल्या.
प्रातःकाळ होताच वसिष्ठ मुनी इतर मंत्रीजनांना घेऊन तेथे आले. नंतर तेलाच्या द्रोणीमध्ये दशरथाला ठेवून ते दूतांना म्हणाले, ‘‘तुम्ही त्वरित घोड्यावरून युधाजिताच्या नगरीला जा. तेथे तेजस्वी आणि ऐश्वर्यवान भरत, शत्रुघ्नासह भरताला सांगा की माझी आज्ञा आहे तुम्ही लवकरात लवकर अयोध्येला यावे. अयोध्येला येऊन राजा दशरथ आणि कैकेयी यांना भेटावे, त्यांचे दर्शन घ्यावे.’’ असे सांगितल्यानंतर दूत वेगाने भरताच्या आजोळी आले. तेथे युधाजिताला वंदन करून त्याला म्हणाले, ‘‘वसिष्ठ मुनींनी आपणाला निरोप सांगितला आहे. भरत आणि शत्रुघ्न या दोघांना घेऊन ताबडतोब अयोध्येला यावे.’’ अशी वसिष्ठांची आज्ञा ऐकताच भरत घाबरून गेला. त्यानंतर लगेचच ते अयोध्येला आले. महाराजांवर किंवा रामावर काही तरी विघ्न वा दुःखद प्रसंग आला असावा असा चिंतायुक्त विचार करीत करीतच भरत, शत्रुघ्न अयोध्येला आले. तेथे त्याला नगराची सर्व शोभा नष्ट झाली आहे, लोकसमुदाय कुठेच दिसत नाही, नगरातील सर्व उत्सव बंद झाले आहेत, हे सर्व पाहून तो भरत विशेष काळजी करू लागला. राजप्रासादात प्रवेश करताच सर्वत्र राजलक्ष्मीविरहित असे त्याला दिसले. तेथे एकटीच आसनावर कैकेयी बसून असलेली दिसली आणि भक्तियुक्त अशा अंतःकरणाने त्याने मातेला नमस्कार केला.
भरत आलेला पाहताच प्रेमभावनेने कैकेयी घाईघाईने उठली. तिने त्याला आलिंगन दिले. त्याला मांडीवर बसवले. मग त्याचे मस्तक हुंगले आणि त्याला माहेरचे कुशल वृत्तांत विचारले. ‘‘माझा पिता, बंधु, माता कुशल आहेत ना? बाळा, आज तू सुखरूप असलेला मला दिसला. मला खूप समाधान वाटले.’’ अशाप्रकारे मातेने विचारले असता भरताचे मन मात्र चिंताग्रस्त होते. दुःखी मनाने त्याने मातेला विचारले, ‘‘माते, माझे पिता कुठे आहेत? तू येथे एकटीच का बसली आहेस? तुझ्याशिवाय माझे पिता एकटे कधीच पाहिले नाहीत. आज ते कुठेच दिसत नाहीत? ते कुठे आहेत ते सांग. ते न दिसल्यामुळे मला भीती आणि दुःखही वाटते आहे.’’
तेव्हा कैकेयी भरताला म्हणाली, ‘‘हे निष्पाप बाळा, तू असा का बरे दुःखी होतो आहेस? धर्माने वागणाऱ्यांना, अश्वमेधादि यज्ञ करणाऱ्यांना ज्या गतीला जावे लागते त्या गतीला तुझे वडील गेले आहेत, हे पितृवत्सला भरता!’’
कैकेयीचे हे बोलणे ऐकून भरत अतिशय शोकविव्हळ होऊन जमिनीवर पडला. शोक करू लागला. ‘‘हाय! हाय! मला असे दुःखसागरात टाकून आपण कोठे निघून गेलात? मला रामराजाच्या स्वाधीन न करता कोठे गेला आहात?’’ अशाप्रकारे शोक करीत विलाप करणाऱ्या, जमिनीवर पडलेल्या आपल्या भरताला कैकेयीने उठवले. त्याचे अश्रू पुसले. त्याला म्हणाली, ‘‘बाळा, धीर धर, धीर धर! तुझे सर्वप्रकारे कल्याण होईल अशी व्यवस्था केली आहे.’’ त्यावर भरत तिला म्हणाला, ‘‘प्राण सोडताना माझे पिता काय म्हणाले?’’ तेव्हा कैकेयी निर्भय होऊन भरताला म्हणाली, ‘‘हा राम, हे रामा, हे सीते, हे लक्ष्मणा! असा वारंवार विलाप करीत प्राणत्याग केला आणि ते स्वर्गाला गेले.’’ तेव्हा भरत म्हणाला, ‘‘राम त्यावेळी मरणसमयी त्यांच्याजवळ नव्हता काय? लक्ष्मण किंवा सीता यापैकी कुणीच त्यांच्याजवळ नव्हते काय? ते सर्वजण कोठे गेले?’’ तेव्हा कैकेयी म्हणाली, ‘‘रामाला यौवराज्याभिषेक करण्याची त्यांनी मोठ्या घाईगडबडीने तयारी केली होती. परंतु तुलाच राज्य मिळावे म्हणून मी त्यावेळी त्या कामात विघ्न निर्माण केले. पूर्वी महाराजांनी मला वर देण्याचे कबूल केले होते. मला त्यांनी दोन वर दिले होते. ते वर मी यावेळेला मागितले. त्यातील एका वराने तुला सर्व राज्य मिळावे आणि दुसऱ्या वराने रामाने मुनीव्रत स्वीकारून वनवासाला जावे, असे वर मागितले. तेव्हा त्या सत्यव्रत महाराजांनी राज्य तुला दिले आहे आणि रामाला त्यांनी वनवासाला पाठविले, म्हणून ते तिघेही वनात गेले आहेत. रामाच्या मागोमाग भ्रातृनिष्ठा, बंधुप्रेमासाठी लक्ष्मणही सोबत गेला आहे. असे हे सर्व वनात गेल्यानंतर फक्त त्यांचेच सदैव चिंतन करीत, ‘हे रामा, हे रामा,’ असा सारखा विलाप करीत तो राजा नृपश्रेष्ठ मृत्युमुखी पडला.’’
हे कैकेयीचे बोलणे ऐकून वज्राच्या आघाताने एखादा वृक्ष जसा कोसळावा त्याप्रमाणे भरत हा भूमीवर निश्चेष्ट होऊन पडला. हे पाहून कैकेयीला फार दुःख झाले. ती भरताला म्हणाली, ‘‘बाळा, तुला शोक करण्याचे कारण काय आहे? एवढे मोठे राज्य मिळाल्यावर दुःख करण्याचे काहीच कारण नाही’’ असे माता कैकेयी म्हणत असता भरताने तिच्याकडे उग्र दृष्टीने पाहिले. त्यावेळी कैकेयीला भरत म्हणजे साक्षात अग्निप्रमाणे वाटू लागला, दाहक वाटू लागला.
भरत कैकेयीला म्हणाला, ‘‘हे दुष्टे! पापिणी! माझ्याशी बोलण्याची तुझी लायकीच नाही. तू पतिहत्या करणारी आहेस. हे पापी स्त्रिये, तुझ्या गर्भात माझा जन्म झाला म्हणून मी सुद्धा पापी ठरलो आहे. आता मी अग्निप्रवेश करतो अथवा विष खाऊन देहत्याग करतो किंवा खङ्गाने स्वतःची हत्या करून यमसदनाला जातो. पतिहत्या करणाऱ्या दुष्ट स्त्रिये, तू तर घोर अशा नरकाला जाणार आहेस.’’ अशाप्रकारे कैकेयीची निंदा करून तो भरत कौसल्येच्या मंदिरात गेला. ती भरताला बघून मोठमोठ्याने रडू लागली. त्यावेळी भरतही कौसल्येच्या चरणांवर पडून रडू लागला. तेव्हा त्या कीर्तिवान, साध्वी राममातेने त्याला आलिंगन दिले.
ती कौसल्यामाता, कृश झालेली, अत्यंत दीनमुखाने डोळ्यात अश्रू आणून भरताला म्हणाली, ‘‘तुझ्या मातेने तुला सर्व काही सांगितले, ते तू ऐकले आहेस. ह्या सर्व गोष्टींना कारण तुझी माताच आहे, हे तुला कळलेच असेल. माझा पुत्र रघुकुलोत्पन्न रामचन्द्र मला दुःखसागरात सोडून पत्नी सीता आणि बंधु लक्ष्मणासह वनात गेला आहे. त्याने वल्कले नेसून मस्तकावर जटाकलाप बांधला आहे. हाय राम! अरे रघुवंशनाथा, तू प्रत्यक्ष परमात्मा माझ्या पोटी जन्मलास, तरी मला मात्र दुःख सोडून जात नाही. यावरून दैव हेच बलवत्तर आहे असेच सारखे माझ्या मनात येते.’’
अशाप्रकारे शोक करणाऱ्या कौसल्यामातेला पाहून भरताने तिचे पाय धरले आणि म्हटले, ‘‘हे माते! माझे म्हणणे ऐकून घे. रामाच्या राज्याभिषेक कार्यामध्ये जे काही घडलं त्या किंवा अन्य कोणत्याही बाबतीत मला माहिती असेल किंवा मी तिला तसे करण्यास प्रोत्साहित केले असेल तर हे माते! शंभर ब्रह्महत्येचे पाप मला लागेल किंवा अरुंधतीसह मुनिवर्य वसिष्ठांचा खङ्गाने वध केल्यानंतर जे पाप लागेल ते पाप मी जर काही यासंबंधी जाणत असेल तर ते पाप मला लागो.’’ असे म्हणून भरत रडू लागला, त्यावेळी कौसल्येने त्याला आलिंगन देऊन त्याचे सांत्त्वन केले आणि म्हणाली ‘‘हे बाळा, मला सर्व माहीत आहे. तू आता शोक करू नकोस.’’
भरताचे आगमन झाले हे कळल्यानंतर वसिष्ठमुनि मंत्र्यांसह राजप्रासादात आले. तेथे भरताला रडताना पाहून वसिष्ठमुनि त्याला म्हणाले, ‘‘राजा दशरथ वृद्ध असून ज्ञानी तसेच सत्यपराक्रमी होता. मृत्युलोकातील सर्व सुखांचा त्याने उपभोग घेतला. अनेकांना भरपूर दक्षिणा दिली आणि अश्वमेधादि यज्ञाने मिळणारे सर्व इच्छित प्राप्त करून ईश्वराची आराधना केली म्हणूनच त्याला साक्षात् हरिस्वरूप पुत्राची, रामाची प्राप्ती झाली. शेवटी तो स्वर्गलोकास जाऊन इंद्राच्या अर्ध्या आसनावर बसण्यायोग्य झाला. तो मोक्षाला प्राप्त झाला म्हणून त्याच्याबद्दल शोक करू नकोस. तू व्यर्थ शोकाकूल होऊ नकोस कारण आत्मा हा नित्य, विकाररहित, शुद्ध आहे. जन्म किंवा नाश त्याला काहीच नसते. शरीर मात्र जड असून अत्यंत अपवित्र आहे. शरीर नाशवंत आहे. म्हणून जर विचार केला तर त्याविषयी शोक करणे योग्य नाही. पिता किंवा पुत्र ह्यापैकी कुणी जरी मृत्यु पावला तरी त्यासाठी कोणी स्वतःला ताडन करून शोक करतात, ते केवळ मूर्खच होत. म्हणून ह्या निःसार असलेल्या संसारात ज्ञानी मनुष्यांना वियोग हा नेहमी वैराग्याचे कारण होतो आणि तोच पुढे शांति, सुख देत असतो. संसाराचे क्षणभंगुरत्व ते ज्ञानी पूर्णपणे जाणतात.
ह्या जगात प्राणी जन्माला आला की त्याच्या पाठोपाठ मृत्यु सुद्धा सोबत आलेला असतो. म्हणून जन्म घेतलेल्या कोणालाही मृत्यु टाळता येत नाही. सर्व प्राण्यांना जन्म आणि मरण येणारच. त्याच्या कर्मानुसार ठरलेले असते. हे जो जाणतो तो अज्ञानी जरी असला तरी आपल्या ज्ञातीबांधवांबद्दल शोक कशाला करील? आजपर्यंत कोट्यवधि ब्रह्मांडे नष्ट झाली, अनेक सृष्टिंचा नाश झाला आहे. अशा ह्या क्षणभंगूर असलेल्यांची आस्था का म्हणून करावी? चंचल आणि दोलायमान पानाच्या टोकाजवळ असलेल्या जलबिंदूप्रमाणे आयुष्य क्षणभंगूर आहे. ते भलत्या वेळी सुद्धा प्राण्याला सोडून जात असते. मग त्यावर एवढा विश्वास का बरे ठेवावा? पूर्वजन्मीच्या कर्माप्रमाणे जिवाला पुन्हा नवीन देह प्राप्त होतो. असा ह्या आत्म्याचा अनेक देहांमधून संचार होतो. तो या देहातून त्या देहात असा फिरत असतो. जसे एखादा माणूस जुने वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र परिधान करतो, तसे आत्मा सुद्धा जीर्ण शरीर सोडून देऊन नवीन देह धारण करतो. म्हणून त्याबद्दल शोक तरी कसा करायचा? आत्मा कधी मरत नाही तसेच तो कधी जन्मसुद्धा घेत नाही. वाढतही नाही. आत्मा हा षड्भावरहित आहे, अनंत आहे. सत्य असे आत्मस्वरूप ज्ञान हेच त्याचे शरीर आहे. तो आनंदरूप असून बुद्ध्यादिकांचा साक्षी आहे. तो नाशरहित आहे. आत्मा हा एकच सर्वत्र भरलेला असून तो द्वैतभावरहित आहे. म्हणून सर्वत्र सारखाच आहे. अशाप्रकारे आत्मस्वरूप समजून घे आणि शोक आवर, कृती कर. हे कुलनंदना भरता! आता पित्याचा मृतदेह तेलद्रोणीतून बाहेर काढ. सचिवांच्या आणि आमच्या साहाय्याने त्यांची यथाविधी क्रिया कर.’’
याप्रमाणे वसिष्ठ गुरुंनी उपदेश केल्यानंतर भरताने अज्ञानातून निर्माण झालेले दुःख दूर सारले आणि पित्याची यथाविधी क्रिया केली. भरताने गुरुंनी सांगितल्याप्रमाणे पित्याच्या देहावर यथाशास्त्र सर्व संस्कार केले. त्यांच्या अकराव्या दिवशी वेदपारंगत अशा सहस्त्र ब्राह्मणांना त्याने यथाविधी भोजन घातले. आपल्या पित्याच्या निमित्ताने ब्राह्मणांना विपुल धन, हजारो गाई, गावे, रत्ने आणि वस्त्रे दान दिली. त्यानंतर वसिष्ठमुनि, बंधु शत्रुघ्न आणि मंत्रिमंडळ यांसह सतत फक्त रामाचेच चिंतन करीत तो भरत आपल्या घरी राहिला.
‘जनकतनया सीता आणि लक्ष्मण बंधुसह राम घोर अशा वनात गेला आहे. राक्षसीप्रमाणे असलेली माता दिसताच माझ्या हृदयाचा दाह होतो आहे, म्हणून आता हे सर्व राज्य दूर सारून मी स्वतःच वनात जातो आणि तेथे सीतेसह असलेल्या, मुखावर मधुर हास्य शोभून दिसत असलेल्या रामाची नित्यसेवा करतो’, असा विचार भरताने केला.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अयोध्याकाण्डे सप्तमः सर्गः।