श्री महादेव म्हणाले,
‘‘लक्ष्मणासह राम हळूहळू पंपा सरोवराच्या तीरावर आला. त्या सुंदर रमणीय सरोवराला पाहून त्याला खूप विस्मय वाटला. त्या सरोवराचा विस्तार एक कोस असून त्यात सखोल, निर्मल असे भरपूर पाणी होते. फुललेली कमळे, कल्हारे, कुमुदे आणि उत्पले या सर्व कमळांमुळे त्या सरोवराला सुंदर सौंदर्य प्राप्त झाले होते. त्या सरोवरात हंस, कारंडव या पक्ष्यांचे थवे होते. चक्रवाक इ. पक्ष्यांनी त्याला खूप शोभा आली होती. पाणकोंबडे, टिटव्या आणि क्रौंच पक्षी यांचा नाद सर्वत्र घुमत होता. तऱ्हेतऱ्हेच्या पुष्पलता सर्वत्र पसरल्या असून अनेक प्रकारची फळझाडे दाटीवाटीने होती. त्याचे पाणी सज्जन लोकांच्या मनाप्रमाणे स्वच्छ असून ते कमलतंतूंनी सुगंधित झाले होते. कनिष्ठ बंधूसह राम तेथे स्नान करून ते श्रमहारक पाणी प्राशन करून सरोवराच्या शीतल तीरावरील थंडगार मार्गाने पुढे निघाले. ते इंद्रियनिग्रही, पराक्रमी राम-लक्ष्मण ऋष्यमूक पर्वताच्या बाजुने जात होते. त्यांच्या हातात धनुष्यबाण होते. जटा आणि वल्कले धारण करण्यामुळे त्यांच्या शरीराला शोभा प्राप्त झाली होती. अनेक प्रकारचे वृक्ष आणि पर्वत यांची शोभा पहात ते पुढे जात होते. त्या पर्वतावर सुग्रीव चार वानरांसह बसला होता. त्यांनी रामलक्ष्मणांना येताना पाहिले. तो पर्वताच्या शिखरावर चढला आणि हनुमंताला म्हणाला, ‘‘मित्रा, हे दोघे वीरश्रेष्ठ कोण असावेत बरे? ब्राह्मण बटुवेषाने जा आणि शोध घे. तुझे कल्याण होवो. वालीने पाठविल्यामुळे मला मारण्यासाठी तर हे आले नसतील ना? त्यांच्याशी भाषण करून त्यांचा उद्देश जाणून घे. जर त्यांच्या अंतःकरणात काही पापविचार असेल तर मला हाताच्या बोटाने खूण कर. त्यांच्यापुढे तू विनयाने नम्र होऊन रहा. मी सांगितलेले नीट लक्षात ठेव.’’
‘‘ठीक आहे’’ असे म्हणून बटुरुपाने हनुमान रामाकडे आला आणि विनयपूर्वक नम्रपणे वंदन करून म्हणाला, ‘‘हे पुरुषश्रेष्ठ हो! तरुण आणि शूरांना मान्य असे तुम्ही कोण आहात? सूर्याप्रमाणे आपल्या कांतीने सर्व दिशा सुशोभित करीत आहात. तुम्ही त्रैलोक्याचे कर्ते, जगाचे कारण, सर्वव्यापी, प्रधानपुरुष, नरनारायणच आहात असे मला वाटते. मायेने मनुष्याकार धारण करून तुम्ही लीलेने फिरत आहात. वास्तविक पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी व भक्तजनांचे पालन करण्यासाठी तुम्ही क्षत्रियरुपाने अवतीर्ण होऊन फिरत आहात. जगाची स्थिती, नाश आणि उत्पत्ती लीलेने करण्यास तुम्ही उत्सुक आहात. स्वतंत्रेने सर्वांना प्रेरणा करणारे सर्वांच्या अंतर्यामी राहणारे नरनारायण देवच ह्या लोकी फिरत आहेत, असे तुम्हाला पाहून मला वाटत आहे.’’
त्यावर श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, ‘‘बटुरुप धारण करून हा कोण आला आहे पहा बरे. खरोखर हा सकल शब्दशास्त्रात सर्वथा पारंगत आहे असे दिसते आहे. हा जे काही सर्व बोलला त्यात कोठेही थोडासुद्धा अपशब्द आढळत नाही.’’ नंतर तो ज्ञानरुपी राम हनुमंताला म्हणाला, ‘‘मी दशरथपुत्र राम आहे. हा माझा कनिष्ठ बंधु लक्ष्मण आहे. पित्याची आज्ञापालन करण्यासाठी पत्नी सीतेला बरोबर घेऊन या वनात आलो आणि दण्डकारण्यात राहिलो. हे ब्राह्मणा! तेथे कोण्या एका राक्षसाने माझ्या पत्नीचे, सीतेचे अपहरण केले. तिला शोधण्यासाठी म्हणून आम्ही येथे आलो आहोत. तू कोण आहेस? कोणाचा कोण आहेस? ते आता सांग.’’ तेव्हा बटू म्हणाला, ‘‘वानरांचा सुग्रीव नावाचा एक मोठा बुद्धिमान राजा आहे. तो आपल्या चार प्रधानांसह ह्या पर्वताच्या शिखरावर रहात आहे. हा सुग्रीव दुष्टबुद्धि वालीचा कनिष्ठ बंधु आहे. वालीने त्याला बाहेर घालवून त्याच्या पत्नीचे हरण केले आहे. त्याच्या भीतीने हा सुग्रीव ऋष्यमूक पर्वताच्या आश्रयाने रहात आहे. हे महामते! मी सुग्रीवाचा सचिव असून वायुपुत्र आहे. मी हनुमान ह्या नावाने प्रसिद्ध आहे. माझा जन्म अंजनीच्या पोटी झाला आहे. हे रघुश्रेष्ठा! ह्या सुग्रीवाशी तुझी मैत्री होणे योग्य आहे. तुझ्या पत्नीचा शोध घेण्याच्या कार्यात तुला त्याचे निश्चित साहाय्य होईल. जर तुला इष्ट वाटत असेल तर आताच त्याच्याकडे आपण जाऊ.’’
श्रीराम म्हणाले, ‘‘हे कपिश्रेष्ठा! मी सुद्धा त्याच्याशी मैत्री करण्यासाठीच आलो आहे. त्या माझ्या मित्राचे जे काही कार्य करावयाचे असेल ते मी निश्चितच करीन.’’ तेव्हा हनुमंताने आपले मूळ रूप धारण केले आणि तो रामाला म्हणाला, ‘‘माझ्या खांद्यावर तुम्ही दोघे बसा. वालीच्या भीतीने जेथे मंत्र्यांसह सुग्रीव राहतो तेथे जाऊ या.’’ ‘‘ठीक आहे’’ असे म्हणून राम आणि लक्ष्मण त्याच्या खांद्यावर चढून बसले. मग तो महाकपि एका क्षणात पर्वताच्या मस्तकावर उडून गेला. तेथे रामलक्ष्मण एका छायेखाली बसून राहिले. हनुमानही सुग्रीवाकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, ‘‘राजन्! आपली भीती निघून जावो. रामलक्ष्मण आले आहेत. लवकर उठा. मी रामाशी आपल्या मैत्रीचा योग घडवून आणला आहे. अग्निला साक्षी ठेवून आपण त्याच्याशी लवकर मैत्री करा.’’
नंतर सुग्रीव अतिशय आनंदाने त्या रघुश्रेष्ठाकडे गेला. त्याने वृक्षाची एक फांदी स्वतः तोडली आणि ती रामाला आसन म्हणून आनंदाने दिली. हनुमंताने लक्ष्मणाला फांदी तोडून दिली व लक्ष्मणाने सुग्रीवाला दिली. अशाप्रकारे सर्वजण तेथे आनंदात बसले होते. त्यानंतर लक्ष्मणाने रामाचा सुरुवातीपासूनचा सर्व वृत्तांत सांगितला. वनवासात जाणे, सीताहरण इ. प्रसंग सांगितले. लक्ष्मणाचे भाषण ऐकून सुग्रीव रामाला म्हणाला, ‘‘हे राजेन्द्रा, सीताशोध आणि शत्रूचा घात करण्याच्या कार्यात मी तुला साहाय्य करीन. हे रामा! मी जे काही थोडे पाहिले ते तुला सांगतो. एकदा माझ्या मंत्र्यांसह मी पर्वत शिखरावर बसलो होतो. तेव्हा आकाशातून कोणीतरी राक्षस एका उत्तम स्त्रीचे हरण करीत आहे असे आम्हाला दिसले. ती स्त्री ‘रामा! रामा!’ असा आक्रोश करीत होती. तिने आम्हाला पाहून आपले दागिने अंगावरून काढून आपल्या उत्तरीय वस्त्रात बांधून आमच्याकडे पाहून खाली टाकले. तो राक्षस तिला नेत असता ती सारखी ओरडत होती. हे प्रभो! ते दागिने मी लगेचच गुहेत नेऊन ठेवले. आता ते बघून घे आणि ते सीतेचे आहेत किंवा नाही ते ओळखून घे.’’ असे बोलून त्या सुग्रीवाने ते दागिने आणून रामाला दाखविले. रामाने ती गाठोडी सोडून पाहिली आणि वारंवार ‘हे सीते! हा सीते!’ असे म्हणून ते सर्व आपल्या हृदयाशी धरले. तेव्हा एखाद्या सामान्य मनुष्याप्रमाणे तो रडू लागला. ते पाहून बंधु लक्ष्मणाने रामाचे सांत्त्वन केले आणि म्हणाला, ‘‘रामा! वानरराज सुग्रीवाच्या मदतीने रावणाला युद्धात ठार मारल्यावर सुलक्षणा जानकीची तुला लवकरच प्राप्ती होईल.’’ सुग्रीवाने सुद्धा सांगितले, ‘‘हे रामा! मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो की युद्धात रावणाचा वध करून तुझी जानकी तुला मिळवून देईन.’’ नंतर हनुमंताने त्या दोघांच्या जवळच अग्नि प्रज्वलित केला. मग त्या अग्निच्या साक्षीने राम-सुग्रीवांनी बाहू पसरवून निष्कपटपणाने परस्परांस मैत्रीसूचक आलिंगन दिले. नंतर सुग्रीवाने रामावरील प्रेमामुळे त्याने आपला सर्व वृत्तांत रामाला सांगितला.
‘‘मित्रा! वालीने पूर्वी जे काही केले तो सर्व वृत्तांत हे रामा तू ऐक. मयासुराचा मायावी नावाचा अत्यंत उन्मत्त मुलगा होता. त्याने एकदा किष्किंधानगरीजवळ येऊन फार मोठा सिंहनाद केला आणि वालीला युद्धासाठी बोलावले. वालीला हे सहन झाले नाही. रागाने संतप्त झाल्यामुळे त्याचे डोळे लालबुंद झाले. तो बाहेर आला. त्याने त्या राक्षसावर जोरदार मुष्टिप्रहार केला. तसा तो दैत्य पीडित होऊन पळून गेला आणि आपल्या गुहेत गेला. त्या मायावी राक्षसाच्या मागे मी आणि वाली धावत गेलो. परंतु तो गुहेत शिरला होता, हे पाहून क्रोधाने वाली मला म्हणाला, ‘‘तू बाहेरच रहा. मी गुहेत जातो.’’ एवढे बोलून वाली गुहेत गेला. महिना होऊन गेला तरी तो बाहेर आला नाही. त्या गुहेच्या दारातून खूप रक्त बाहेर आलेले पाहून वाली मरण पावला असे समजून मला खूप दुःख झाले. माझे शरीर तप्त होऊन गेले. मग गुहेच्या द्वारावर एक शिळा ठेवून मी घरी आलो. मी लोकांना वालीच्या मृत्युची बातमी सांगितली. ते ऐकून सर्वांना फार दुःख झाले. नंतर सर्व वानरप्रधानांनी माझी इच्छा नसताना मला राज्याभिषेक केला. अशारितीने हे अरिनाशना! काही काळपर्यंत मी राज्य केले. पुढे एकदा अचानक वाली आला आणि अत्यंत संतप्त होऊन मला कठोर शब्दांत बोलला. अनेक प्रकारे माझा धिक्कार केला. त्याने माझ्यावर मुष्टिप्रहार केला. तेव्हापासून भीतीने मी नगरातून निघालो आणि सर्व ठिकाणे हिंडून आता मी ह्या ऋष्यमूक पर्वताचा आश्रय घेतला. प्रभो! ऋषींच्या शापाच्या भीतीने वाली ह्या पर्वतावर येत नाही. तेव्हापासून तो मूर्ख माझ्या पत्नीचा स्वतः उपभोग घेत आहे. माझ्या स्त्रीचे हरण करून त्याने माझा आधार सुद्धा नष्ट केला. ह्या दुःखाने मी संतप्त झालो आहे. अशा अवस्थेत मी येथे रहात आहे. आज तुझा चरणस्पर्श होऊन मी सुखी झालो आहे.’’
तो कमलनयन राम आपल्या मित्राच्या दुःखाने संतप्त झाला. त्याने सुग्रीवापुढे प्रतिज्ञा केली की तुझ्या पत्नीचा अपहार करणाऱ्या शत्रूचा मी लवकरच वध करीन. यावर सुग्रीव म्हणाला, ‘‘राजेंद्रा! वाली हा सर्व बलवानांमध्ये बलवान आहे. देवांना देखील तो साध्य होणे कठीण आहे. मग तू त्याला कसा मारणार? बलिश्रेष्ठा! ऐक, त्याचे बळ भरपूर आहे हे मी पहिल्यांदाच सांगतो. मागे एकदा दुंदुभि नावाचा एक महाबलाढ्य व महाकाय असा राक्षस होऊन गेला. रामा! मोठ्या रेड्याचे रूप धारण करून तो भयंकर राक्षस किष्किंधा नगरीला आला आणि रात्रीच्या वेळी वालीला युद्धासाठी बोलावू लागला. ते ऐकून वाली खूप संतप्त झाला. त्याला ते दुंदुभिचे वागणे सहन झाले नाही. बाहेर येऊन त्याने त्या रेड्याची शिंगे धरून त्याला जमिनीवर पाडले. त्याच्या शरीरावर एक पाय देऊन त्याचे मस्तक हाताने पिरगाळून तोडून पृथ्वीवर फेकून दिले. रामा! ते त्याचे मस्तक मतंग ऋषींच्या आश्रमाजवळ येऊन पडले. तेथे ते आपटून पुढे चार कोस उंच उडाले. मुनिंच्या आश्रमात रक्ताची वृष्टि झाली. ते पाहून मतंग ऋषी क्रोधायमान होऊन वालीला म्हणाले, ‘‘जर तू माझ्या पर्वतावर येशील तर तुझे मस्तक तुटून जाईल. तू मरण पावशील ह्यात काहीच संशय नाही.’’ असा त्याला शाप दिला. तेव्हापासून वाली ऋष्यमूक पर्वतावर जात नाही. म्हणून मी ह्या पर्वतावर निर्भय होऊन रहात आहे. रामा! त्या दुंदुभिचे पर्वतावर पडलेले शीर पहा. ते फेकून देण्याची तुझ्यात शक्ती असेल तरच तू वालीचा वध करू शकशील.’’ असे म्हणून पर्वतासारखे दुंदुभिचे शीर त्याने रामाला दाखवले. रामाने ते पाहिले आणि हसून पायाच्या अंगठ्याने दहा योजने लांब दूर फेकले. सर्वांना ती गोष्ट अद्भुत वाटली. ते पाहून सुग्रीवाने प्रधानासह ‘शाब्बास, शाब्बास’ असे म्हटले.
नंतर त्या भक्तवत्सल रामाला सुग्रीव म्हणाला, ‘‘रघुश्रेष्ठा! मोठे बळकट असे हे सात ताल वृक्ष पहा. हा वाली प्रत्येकाला हलवून अगदी सहज पर्णरहित करून टाकतो. जर तू एका बाणाने ह्यांना वेधून छिद्र पाडशील तर तुझ्या हातून वाली मरेल, असा विश्वास माझ्या मनात निर्माण होईल.’’ ‘‘ठीक आहे’’ असे म्हणून रामाने धनुष्य घेतले. त्यावर बाण जोडला. त्या महाबल रामाने लगेच सात ताल वृक्षांवर बाण सोडला. तो बाण त्या सात तालवृक्षांचा, पर्वताचा आणि भूमीचाही भेद करून पुन्हा रामाच्या भात्यात पूर्वीप्रमाणे येऊन राहिला. तेव्हा सुग्रीवाला खूप आश्चर्य वाटले. तो अत्यानंदाने रामाला म्हणाला, ‘‘देवा! तू संपूर्ण जगाचा नाथ परमात्मा आहेस ह्यात काही संशय नाही. माझ्या पूर्व जन्मार्जित पुण्यसंचयामुळे आज मला तुझा सहवास घडला. संसारातून निवृत्त होण्यासाठी योगी, महात्मे तुझे भजन भक्ती करतात. मग प्रत्यक्ष मोक्ष देणाऱ्या अशा तुझी मला प्राप्ती झाली आहे. तेव्हा मी तुला संसारसुख कसे बरे मागणार? स्त्री, पुत्र, धन, राज्य ह्या सर्व गोष्टी तुझ्याच मायेने उत्पन्न झाल्या आहेत. म्हणून हे देवदेवेशा! मी दुसऱ्या कशाचीही इच्छा करीत नाही. तुझी फक्त प्रेमदृष्टी माझ्यावर सदैव असो. मातीसाठी खणत असता द्रव्यठेवा सापडावा त्याप्रमाणे हे सज्जनपालका! माझ्या भाग्योदयाने आनंदमूर्ती अशा तुझी मला प्राप्ती झाली आहे. अनादि अविद्येपासून उत्पन्न झालेले आमचे भवबंधन आज तुटून गेले आहे. प्रभो! यज्ञ, दान, तपश्चर्या, इष्टापूर्तादि कृत्यांनी ही संसृति जीर्ण होत नाही. उलट वाढतच जाते. मात्र तुझ्या चरणदर्शनानेच ती नाश पावते, हे निश्चित आहे. ज्याचे चित्त तुझ्या ठिकाणी अर्ध क्षण का होईना स्थिर राहते त्याच्या सर्व अनर्थाचे मूळ अज्ञान तत्काळ नष्ट होते. म्हणून रामा! माझे मन सदैव तुझ्या ठिकाणी स्थिर राहो. ‘राम राम’ असा मधुर जप वाणी क्षणभर जरी करील तरी सर्व पापातून मुक्त होते. रामा! मी शत्रूवर विजय मिळविण्याची इच्छा करीत नाही. स्त्रीसुखादिकांचीही मला इच्छा नाही. संसारबंधनातून मुक्त करणारी तुझी भक्ती मला नित्य घडावी, एवढीच माझी इच्छा आहे. हा संसार तुझ्या मायेने उत्पन्न झाला आहे. तसेच हे रघुत्तमा! मी तरी तुझाच अंश आहे, म्हणून तूच आपल्या चरणांची भक्ति मला दे. मला ह्या संसाररुपी संकटातून मुक्त कर. रक्षण कर. पूर्वी माझे चित्त मायामोहित झाले होते. म्हणून हा मित्र, हा शत्रू, हा उदासीन इ. माझ्या मनाला वाटत होते. परंतु आज तुझे चरणदर्शन होताच हे राघवा! मला सर्वत्र ब्रह्मच दिसत आहे. मला शत्रू, मित्र तरी कुठे आहेत? जोवर मायेचे आवरण जीवावर असते तोवरच गुणांचे त्यावर वर्चस्व असते आणि तोपर्यंतच शत्रू, मित्र हा भेदभाव असतो. ते आवरण एकदा नष्ट झाले की भेदबुद्धिच नष्ट होते. ही अज्ञानजन्य निर्माण होणारी भेदबुद्धि जोपर्यंत असते तोपर्यंतच मृत्युची भीती असते. म्हणून अविद्येच्या नादी जो लागतो तो घनदाट अशा अंधःकारात सापडतो. पुत्र, स्त्री इ. सर्व बंधने मायामूलकच आहेत. म्हणून हे रघुत्तमा! ह्या तुझ्या मायेला दूर कर. माझी चित्तवृत्ती तुझ्या पदकमली जडून राहो. माझी वाणी तुझ्या कथागायनात, नामात राहो. माझे हात तुझ्या भक्तांची सेवा करण्यात तत्पर राहोत. माझे शरीर तुझ्या सहवासात राहो. माझ्या नेत्रांना तुझ्या रुपाचे, तुझ्या भक्तांचे आणि स्वतःच्या गुरुंचे दर्शन घडो. कानांना तुझ्या अवतारकथा नित्य ऐकावयास मिळोत आणि माझे पाय तुझ्या मंदिराकडे जावोत. नित्य मंदिरात गमन करो. हे गरुडध्वजा! माझी अंगे तुझ्या पदधुलीचे कण ज्यात मिसळले आहेत अशा तीर्थाचे धारण करोत. रामा! शंकर, ब्रह्मदेव इत्यादि ज्याचे स्मरण करतात त्या तुझ्या चरणांना माझे मस्तक निरंतर प्रणाम करो.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे किष्किन्धाकाण्डे प्रथमः सर्गः।