सूत म्हणाले, ‘‘विवाह सोहळ्यानंतर श्रीराम मिथिला नगरी सोडून थोडेफार दूर अंतरावर गेले असतांना राजा दशरथाला भयंकर अपशकून होऊ लागले. तेव्हा राजा दशरथाने मुनिवर्य वसिष्ठांना वंदन करुन विचारले, ‘‘मला सर्व बाजूंनी विपरीत अशी अशुभ चिन्हे का दिसत आहेत?’’ त्यावर वसिष्ठ म्हणाले, ‘‘भावी संकटांची ही सूचना आहे. ही संकटे लवकरच निघूनही जाणार आहेत. हे बघ, हे हरीण तुझ्या उजव्या बाजूने जात आहे, तुझे कल्याणच सुचवित आहे.’’ असे वसिष्ठ सांगत असतानाच भयंकर असा सोसाट्याचा वारा वाहू लागला. त्यामुळे सर्वांनाच खूप त्रास होऊ लागला. डोळ्यात धूळ गेल्यामुळे कुणालाही काहीच दिसत नव्हते. दशरथ पुढे समोर जात असता एखादी तेजोराशीच असावी असा अत्यंत तेजस्वी जमदग्निपुत्र परशुराम त्याला दिसला. जो परशुराम निलमेघासम कांती असणारा, धिप्पाड देहयष्टिचा, जटाभाराने मस्तक सुशोभित झाले असा धनुष्य, परशु धारण करणारा हा साक्षात मूर्तिमंत काळच आहे की काय असा भासणारा, कार्तवीर्याचा अंत करणारा, गर्विष्ठ क्षत्रियांचा संहार करणारा जणू कालपुरुष यमदेवाप्रमाणे भासणारा दशरथासमोर उभा राहिला.
परशुरामाला अचानकपणे पाहताच राजा भयभीत झाला. त्यामुळे अर्घ्यपाद्यादिंनी पूजा करण्याचे विसरुन गेला आणि ‘‘माझे रक्षण करा, मला जीवनदान द्या’’ असे म्हणू लागला.
अतिशय रागाने सर्वांगाने थरथर कापत असलेल्या त्या परशुरामाने रामाला उद्देशून कठोर भाषण केले. परशुराम म्हणाले, ‘‘अरे क्षत्रियाधमा, माझे ‘राम’ हे नाव धारण करुन तू या पृथ्वीवर ङ्गिरतोस पण तू जर खरा क्षत्रिय असशील तर माझ्याशी युद्ध करायला तयार हो. जीर्ण आणि जुने झालेले धनुष्य मोडून तू आपला मोठेपणा सांगत आहेस. हे रघुकुलोत्पन्न रामा, जर तू ह्या वैष्णव धनुष्याला प्रत्यंचा लावलीस तरच मी तुझ्याबरोबर युद्ध करीन. जर तू असे करु शकला नाहीस तर मी तुम्हा सर्वांचा वध करीन. मी क्षत्रिय संहारकच आहे.’’ असे परशुराम बोलत असता पृथ्वी भितीने थरथर कापू लागली. सर्वांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्यावेळी वीर्यवान दाशरथी रामाने त्या भार्गव रामाकडे क्रोधाने पाहिले. परशुरामाच्या हातातून धनुष्य हिसकावून घेऊन त्यावर सहजपणे प्रत्यंचा चढविली आणि भात्यातून बाण काढून धनुष्याला जोडून खऱ्या क्षत्रिय वीराप्रमाणे प्रत्यंचा ओढून धरली आणि राम परशुरामाला म्हणाला ‘‘हे ब्राह्मणा, मी बोलतो ते नीट ऐकून घे. माझा बाण अमोघ आहे. तर सांग याचा नेम कोठे धरु? ठिकाण सांग. हा बाण मी परलोकगति बंद करण्यासाठी सोडू किंवा पायाची गति बंद करण्यासाठी सोडू? माझी तुला आज्ञा आहे की लवकरात लवकर सांग. मी हा बाण सोडण्याने तुला परलोकी जाता येणार नाही किंवा ह्या लोकांतही ङ्गिरता येणार नाही. तुझी अशीच अवस्था होणे योग्य आहे. यासाठी सत्वर काय ते बोल.’’ श्रीराम असे बोलत असता परशुराम अगदी खिन्न झाला. त्याला पूर्वीचा वृत्तांत स्मरण झाल्यामुळे तो म्हणाला ‘‘हे महापराक्रमी रामा, तू साक्षात् परमेश्वरच आहेस हे मी जाणले. तू पुराणपुरुष आहेस. जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करणारा तू विष्णुच आहे. मी बालपणी तपश्चर्या करुन, अनन्य भक्तीने त्या महात्मा नारायणाला प्रसन्न केले. त्यानंतर हे रघुश्रेष्ठा, तो शंख, चक्र, गदा धारण करणारा प्रसन्न मुखकमल असलेला देवाधिदेव माझ्यावर प्रसन्न झाला.’’ असा पूर्ववृत्तांत सांगितला.
प्रसन्न झालेले भगवान म्हणाले, ‘‘हे ब्रह्मर्षि, उठ. तुझे तप आता पूर्ण झाले. तुझ्या ह्या तपश्चर्येचे फळ तुला प्राप्त झाले आहे. माझ्या चैतन्य अंशाने युक्त तू होशील. हैहय कुळातील पुरुषश्रेष्ठांचा तू नाश करशील. तुझ्या पित्याचा वध करणाऱ्या कार्तवीर्यांचा वध कर. त्यासाठीच तर तू कठोर तप केले होतेस. एकविस वेळा क्षत्रिय कुळाचा नाश कर. काश्यपाला सर्व भूमी देऊन मनाला शांत करुन सुखाने रहा. त्या युगाच्या आरंभी मी दाशरथी राम होऊन येणार आहे. तुझ्या ठिकाणी मी ठेवलेल्या शक्तीपेक्षा अधिक झाल्याचे जाणवेल तेव्हा मी तुला पूर्वी दिलेले तेज परत काढून घेईन. त्यानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस भरेल एवढा काळपर्यंत तू पृथ्वीवर तपश्चर्या करीत रहा.’’ एवढे बोलून देव अंतर्धान पावले. आता मात्र पूर्वी नियोजित केल्याप्रमाणे सर्व काही घडून आले. तेव्हा ‘‘हे रामा, ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यानुसार अवतार घेणारा तो विष्णु आपणच आहात. माझ्या ठिकाणचे तेज आता आपण परत घेतले आहे. हे प्रभो, आज माझ्या जन्माचे सार्थक झाले आहे. मायेच्या पलीकडे असलेले, ब्रह्मादिकांनाही सहजपणे न होणारे तुझे दर्शन आज प्रत्यक्ष दृष्टीला झालेले आहे.’’
‘‘अज्ञानातून निर्माण होणारे जे सहजभाव तुझ्या ठिकाणी नाहीत. तू विकाररहित आहेस, तू परिपूर्ण असूनही गमनादि क्रियांपासून तू मुक्त आहेस. जसे पाण्यावर फेस, अग्निवर धूर असतो त्याप्रमाणे तू आहेस. मायेचा आधारही तूच आहे. तुझ्या साहाय्याने ही माया विविध कार्ये उत्पन्न करीत असते. मायाभ्रमाने अज्ञानी लोक तुला जाणत नाहीत. अनादि काळापासून ही माया सिद्ध आहे. ज्ञानाला विरोध करणारी अशी आहे. अविद्येने निर्माण झालेल्या देहादिसमूह प्रतिबिम्बित ज्ञानरुप अशा चित्शक्तिला ह्या मृत्युलोकात ‘जीव’ असे म्हणतात. जोपर्यंत जीवाला देह, मन, प्राण, बुद्धि इ. चा अभिमान वाटत असतो, तोपर्यंत त्याला कर्तेपण, भोक्तेपण, सुख, दु:ख ही सर्व भोगावीच लागतात. वास्तविक आत्म्याला संसार नाही. बुद्धिला ज्ञान नाही. पण अविचाराने जीव आत्मा आणि बुद्धिला सचेत आहे असे समजून त्याचाच अभिमान बाळगतो आणि व्यवहार करतो. जल आणि अग्नि यांच्या संयोगात जसा एकमेकांचा एकमेकांवर परिणाम होतो अगदी तसेच चैतन्याच्या समागमाने जड पदार्थावर चैतन्याचे धर्म भासू लागतात. त्याप्रमाणे चैतन्यावरही जडाच्या समागमाने जडाचे धर्म भासू लागतात. जोपर्यंत मनुष्याला तुझ्या चरणांची सेवा करणाऱ्या भक्तांच्या संगतीचा सुखलाभ मिळत नाही तोपर्यंत माणूस संसारातील दु:ख प्रवाहातून कधीच मुक्त होत नाही. सत्पुरुषांच्या सहवासाने जेव्हा मनात तुझ्याविषयी भक्ति उत्पन्न होऊन लोक तुझी उपासना करू लागतात तेव्हा कुठे ही माया हळूहळू क्षीण होऊ लागते. त्यानंतर तुझ्या स्वरुपाचे योग्य ज्ञान असलेल्या सद्गुरुंची प्राप्ती होते. गुरुंपासून ‘तत्त्वमसि’ महावाक्याचे ज्ञान प्राप्त होऊन तो तुझ्या कृपेने मुक्त होतो. म्हणून हे रामा, तुझ्या भक्तांचा मला सहवास घडू दे. तुझी भक्ती आणि सत्संग यामुळे माझे अज्ञान नष्ट होते. सतत तुझ्या भक्तीत रममाण होणारे भक्त, तुझ्या धर्मामृताची वृष्टि करणारे असे भक्त जगाला पावन करतात आणि स्वत:च्या कुळात जन्माला आलेल्यांनाही पावन करतात. अशा हे जगत्पालका, तुला माझा नमस्कार असो. हे करुणावश भक्तीने प्रसन्न होणारा हे अनंता, रामचंद्रा, तुला माझा नमस्कार असो.’’
परशुराम म्हणतात, ‘‘हे जगत्पालका, लोकांना जिंकण्याच्या इच्छेने माझ्याकडून जे जे पुण्यकर्म घडले ते सर्व तुझ्या बाणाला अर्पण होवो. हे रामा तुला माझा नमस्कार असो.’’ त्यानंतर करुणामय भगवान श्रीराम प्रसन्न झाले आणि म्हणाले, ‘‘हे ब्राह्मणा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझ्या मनात जे काही आहे ते सर्व मी तुला देईन यात संशय घेऊ नको.’’ संतुष्ट मनाने परशुराम रामाला म्हणाले, ‘‘हे रामा, तुझ्या मनात जर माझ्यावर कृपा करावी असे असेल तर मला सदैव तुझ्या भक्तांचा सहवास मिळावा. तुझ्या ठिकाणी माझी सदैव दृढ भक्ती राहील असे कर.’’
‘‘जो कोणी भक्तिहीन जरी हे स्तोत्र नित्य पठण करील त्याला तुझी भक्ति, विशेष प्रकारचे ज्ञान आणि अंतःकाळी तुझे स्मरण हे सर्व प्राप्त होईल असे कर’’, असे परशुरामाने वरदान मागितले. रामानेही ‘तसेच होईल’ असे म्हटले. परशुरामाने रामाची पूजा करुन जाण्याची परवानगी मागितली. त्याने रामाला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला, त्यानंतर परशुराम महेंद्र पर्वतावर निघून गेले.
या प्रसंगी दशरथ राजाला अतिशय आनंद झाला. कारण रामाचा जणू तो पुनर्जन्म झाला आहे, असे दशरथाला वाटले. त्याने रामाला आलिंगन दिले. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. संकट समाप्त झाले म्हणून स्वस्थचित्त होऊन संतुष्ट मनाने दशरथ राजा आपल्या मुलांसह, सैन्यासह अयोध्या नगरीला गेला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे चौघेही आपापल्या पत्नीसह आपल्या मंदिरात आनंदात राहू लागले. वैकुंठात जसे विष्णु लक्ष्मीसह आनंदात राहतात तसे राम सुद्धा सीतेसह आनंदाने राहू लागला. काही दिवसांनंतर युधाजित नावाचा कैकेयीचा भाऊ, भरताचा मामा अयोध्येला आला. अत्यंत प्रेमाने भरताला आपल्या राज्यात घेऊन जाण्यासाठी आला. राजा दशरथानेही युधाजिताचा आदरसत्कार करुन भरताला शत्रुघ्नसोबत देऊन त्याच्याबरोबर पाठविले.
जशी देवमाता अदिती ही इंद्र आणि इंद्राणि यासह शोभून दिसते अगदी त्याप्रमाणेच भाग्यवान कौसल्याराणी राम आणि सीतेसह शोभून दिसत होती. लोकनाथ इंद्रादिकांनी ज्याचे गुणगायन केले, पृथ्वीवरील लोकांनी ज्याची कीर्ति गायिली आहे, ज्याच्या केवळ मूर्तिच्या दर्शनाने सर्व जनसमूहाला आनंदाचे उधाण येते, ज्याला विकार नाही, ज्याच्या ऐश्वर्याला मर्यादा नाही, जो नित्यमायेचा निरास करुनही मायेच्याच साहाय्याने कार्य करतो, विश्वाचा चालक असूनही मनुष्याप्रमाणे भासतो असे प्रभु श्रीराम सीतेसह अयोध्या नगरीत राहू लागले.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे बालकाण्डे सप्तमः सर्गः।
......