श्री महादेव म्हणाले,
‘‘रामाला झोपलेला पाहून गुहाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तो विनयपूर्वक लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘बंधो! रामाला पाहिलेस का? जो राम पूर्वी उत्तम अशा मंदिरात, सुवर्णाच्या पलंगावर सुखशय्येवर निजायचा, तोच राम आज मात्र सीतेसह दर्भ आणि पाने यांच्या शय्येवर निजला आहे. दैवाने हे घडवून आणले आहे की कैकेयी रामाच्या दु:खाला कारण झाली आहे. मंथरेचे ऐकून कैकेयीने तिच्या म्हणण्याप्रमाणे वागून पापाचरण केले आहे.’’ ते ऐकून लक्ष्मण म्हणाला,‘‘मित्रा, सांगतो ते ऐक. कोण कोणाच्या दु:खाचे कारण किंवा सुखाचे तरी कारण कोण आहे? सुख किंवा दु:ख ह्याचे कारण तर त्या त्या प्राण्याचे केवळ पूर्वजन्मार्जित कर्मच असते. तेव्हा सुख, दु:खाचा कोणी दाता नसतो. किंवा दुसरा कुणी दु:ख किंवा सुख देतो हे समजणे सुद्धा खोटी बुद्धी आहे. मी काही करतो हा अभिमान सुद्धा व्यर्थ आहे. कारण सर्व लोक हे पूर्वजन्मात मिळवलेल्या आपापल्या कर्माच्या सूत्राने बांधले असतात. आपल्याला आप्त, मित्र, शत्रू, उदासीन, द्वेषी, मध्यस्थ, बांधव हे आपण जसे कर्म केले असेल त्यानुसार आढळतात.
मनुष्य हा स्वत:च्या कर्माच्या स्वाधीन असल्यामुळे त्याने सुख किंवा दु:ख जे जसे प्राप्त होईल तसे ते भोगून स्वस्थ रहावे. भोग भोगावेत अशी मला इच्छा नाही तसेच ते भोग टाकावेत असेही मला वाटत नाही. भोग मिळोत वा न मिळोत, मी भोगाच्या अधीन होणार नाही. ज्या स्थळी किंवा ज्या काळी, ज्यामुळे किंवा ज्या योगाने कसेही का असेना शुभ किंवा अशुभ कर्म जे ज्या कोणी केले असेल त्याला त्या स्थळी, त्या काळी, त्याच रितीने त्याचे फळ भोगावेच लागते. त्यात फरक मुळीच व्हायचा नाही. शुभ किंवा अशुभ कसेही फळ प्राप्त झाले तरी त्याचा हर्ष किंवा विषाद मानू नये कारण ब्रह्मदेवाने जे काही ठरविले आहे ते चुकविण्याचे सामर्थ्य देवांना किंवा दैत्यांनाही नाही. विधिविधान ते बदलवू शकत नाहीत. मनुष्याला सतत सुखदु:खाचा अनुभव येतच असतो. कारण शरीर हे पाप आणि पुण्य यापासून उत्पन्न झालेले असते, म्हणून त्याला सुखदु:खे प्राप्त होत असतात. सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुख ही दोन्ही दिवस आणि रात्रीप्रमाणे प्राणिमात्रांना कधीच टाळता येत नाहीत. सुखामध्ये दु:ख आणि दु:खात सुख हे पाणी आणि चिखलाप्रमाणे एकमेकात मिसळलेले असतात. म्हणून विद्वान लोक अनुकूल किंवा प्रतिकूल कोणत्याही प्रसंगात आनंदित होत नाहीत किंवा त्यांना मोहही होत नाही. ही सर्व माया आहे असे समजून धैर्यानेच वागत असतात.’’
गुह आणि लक्ष्मण यांचा असा संवाद, गप्पागोष्टी चालल्या असताना आकाश स्वच्छ दिसू लागले, पहाट झाली. रामाने उदकस्पर्श करुन प्रात:कालीन सर्व व्यवहार उरकले. राम गुहाला म्हणाला, ‘‘मित्रा, आता माझ्याकरिता एक मजबूत अशी नौका सत्वर घेऊन ये.’’ गुहाने सुद्धा उत्तम अशी नौका आणली आणि म्हणाला,‘‘स्वामी, सीतेला आणि लक्ष्मणाला घेऊन नौकेत बसावे, मी स्वत:च मोठ्या दक्षतेने नौका चालवितो.’’ ‘ठीक आहे’ असे राम म्हणाला. त्याने सीतेला नौकेत चढविले, नंतर स्वत: राम नौकेत चढला. नंतर आपली आयुधे घेऊन लक्ष्मणही नौकेत चढला. गुहाने स्वत: आपल्या ज्ञातिजनांसह नौका चालविली. गंगेच्या मध्यभागी आल्यावर सीतेने गंगेची, ‘‘देवी गंगे, तुला नमस्कार असो. वनवासातून मी, राम, लक्ष्मणासह परत आल्यानंतर तुझी पूजा करीन, त्यावेळी तुला विविध उपहार आदरपूर्वक अर्पण करीन’’ अशी प्रार्थना केली. हळूहळू राम, सीता, लक्ष्मण नदीच्या पैलतीराला पोचले. गुह रामाला म्हणाला, ‘‘हे राजेन्द्रा, मी सुद्धा आपल्याबरोबर येतो, आपण अनुज्ञा द्यावी अन्यथा मी प्राणत्याग करीन.’’ हे गुहाचे बोलणे ऐकून राम त्याला म्हणाला, ‘‘चौदा वर्षे दण्डकारण्यात राहून मी पुन्हा येईन हे माझे सत्यवचन आहे. रामाचे वचन कधीही असत्य नसते.’’ असे सांगून रामाने त्याचे सांत्त्वन केले. गुह सुद्धा मोठ्या कष्टाने घरी गेला.
त्यानंतर एक मेघ्य - पवित्र हरिण मारुन नंतर होम इ. करुन मग त्या तिघांनी भोजन कले. झाडाच्या पानांवर शयन करुन ती रात्र सुखाने घालविली. त्यानंतर ते तिघे भरद्वाज मुनीच्या आश्रमापाशी पोचले. राम बाहेर उभा राहिला. तेथे एका लहान मुलाला बघून राम त्याला म्हणाला, ‘हे बालका! दाशरथी राम, सीता आणि लक्ष्मणासह आला आहे. आश्रमाच्या बाहेर उभा आहे, असे मुनिवर्यांजवळ जाऊन सांग’’ ते ऐकून तो बटू घाईघाईने जाऊन मुनिवर्यांच्या पाया पडून सांगू लागला, ‘‘गुरुवर्य, राम आला आहे. आश्रमाच्या बाहेर उभा आहे. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि धाकटा बंधु आलेला आहे.’’ ते ऐकताच भरद्वाज मुनी ताबडतोब उठले आणि अर्घ्य, पाद्य घेऊन रामाजवळ आले. रामाचे दर्शन घेऊन त्यांनी त्याची व लक्ष्मणाची यथाविधी पूजा केली आणि म्हणाले,‘‘हे कमलनयन रामा, माझ्या या पर्णशाळेत येऊन आपल्या पायधुळीने माझी पर्णकुटी पवित्र कर’’ असे म्हणून राम-लक्ष्मण सीतेला आपल्या पर्णकुटीत आणले.
पुन्हा भक्तिपूर्वक त्यांचे पूजन केले. त्यांचे उत्तम असे आदरातिथ्यही केले. भरद्वाजमुनी म्हणाले, ‘‘हे रामा, तुझ्या भेटीमुळे आज माझी तपश्चर्या पूर्ण झाली. मी तुझे सर्व वृत्त, पूर्वीचे आणि सध्याचे आणि पुढे होणारे सर्व जाणतो. तू परमात्मा आहेस आणि काही कार्य करण्यासाठी तू मनुष्यरुप धारण केले आहेस, हे मला चांगले माहीत आहे. पूर्वी ब्रह्मदेवाने तुझी प्रार्थना केली होती. ज्या कार्यासाठी तू अवतार घेतलास त्या कार्यासाठी तुला वनवास भोगावा लागत आहे आणि यापुढे तू जे काही करणार आहेस ते मी जाणतो. ज्ञानदृष्टीने ते मी पहातो, यापेक्षा मी तुला अधिक काही सांगू शकत नाही. हे रघुत्तमा, मी आज खरोखर धन्य झालो आहे. ककुत्स्थ कुळात अवतार घेऊन तू आज माझ्या दृष्टीस पडला. तू प्रकृतीच्याही पलीकडे असलेला जो पुरुष तोच तू आहेस.’’ यानंतर सीता, लक्ष्मण यांच्यासह रामाने मुनिवर्यांना प्रणाम केला आणि म्हटले, ‘‘ककुद म्हणजे बैलाचे वशिंड आणि त्यावर बसणारा यावरुन ककुत्स्थ! रघुकुलातील एक पुरंजय नावाचा राजा बैलाच्या वशिंडावर बसून फिरत असे म्हणून त्याला ककुत्स्थ असे नाव पडले. त्यानंतर त्याच्या वंशजांना ककुत्स्थ असे नाव पडले. हे ककुत्स्थ म्हणजे श्रीरामाचे रघुकुल होय. हे ब्राह्मण! आम्हा क्षत्रिय बांधवावर आपला कृपानुग्रह असावा.’’ असे ते दोघे भरद्वाज आणि राम एकमेकांना बोलले आणि त्या दिवशी ते तिघे मुनींच्या आश्रमात रात्री मुक्कामी राहिले.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नानादि कर्मे उरकून मग भरद्वाज मुनींनी रामाला पुढील मार्ग दाखविला आणि मार्ग दाखविण्यासाठी मुनीकुमारांना त्यांच्या सोबत दिले. त्यांच्यासह राम यमुना नदी पार करुन चित्रकूट पर्वतावर आले. तेथून जवळच वाल्मिकी मुनींचा आश्रम होता. राम तेथून पुढे वाल्मिकींच्या आश्रमात आले. त्या आश्रमात अनेक ऋषी रहात होते. नाना तऱ्हेच्या पशूपक्षांनी परिसर गजबजलेला होता. तेथील वृक्ष सदैव फुले, फळे यांनी समृद्ध होते, अशा त्या आश्रमात एके ठिकाणी मुनिश्रेष्ठ वाल्मिकी रामाला दिसले. लक्ष्मण, सीता यांच्यासह रामाने मुनिवर्यांना साष्टांग नमस्कार केला. त्या लोकसुंदर, लक्ष्मीपति रामाला पाहून वाल्मिकी, ज्याच्या बरोबर सीता आणि लक्ष्मण आहे, जटामुकुटाने ज्याचे शिर मंडित झाले आहे, मदनाप्रमाणे सुंदर कमळाप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत, अशा त्या रामाला पाहताच ते आश्चर्यचकित झाले. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत आहेत अशा त्या मुनींनी रामाला आलिंगन दिले. सर्व जगाला पूज्य असलेल्या रामाची वाल्मिकींनी भक्तिभावाने आणि अर्घ्यादिकांनी आदरपूर्वक पूजा केली. मधुर अशी फळे, मुळे खाण्यास देऊन त्याचा प्रेमाने सत्कार केला. त्यानंतर हात जोडून, विनयपूर्वक राम वाल्मिकींना म्हणाला, ‘‘वडिलांच्या आज्ञेला मान्य करुन आम्ही दण्डकारण्यात आलो आहोत. आपण सर्व काही जाणता, म्हणून मी अधिक कशाला सांगू? येथे राहण्यासाठी कोणते ठिकाण उत्तम राहील आणि निवारा सुखाचा होईल असे स्थान आपण मला सांगावे. सीतेसह मी काही काळ तेथे घालविन.’’
रामाने असे म्हणताच मुनिवर्य हसून म्हणाले, ‘‘अरे रामा! तूच तर सर्व लोकांचे उत्तम असे निवासस्थान आहेस. सर्व प्राणिमात्र ही तुझी राहण्याची स्थाने आहेत. सर्वांच्या ठिकाणी तू आहेस, हे रघुनंदना! मी तुझे सर्वसाधारण असे राहण्याचे स्थान सांगितले. परंतु सीतेसह राहण्यास योग्य असे ठिकाण कोणते? हा तू प्रश्न केला आहेस त्यासाठी म्हणून हे रघुश्रेष्ठा, आता मी तुझे नेहमीचे राहण्याचे ठिकाण सांगतो. सर्व प्राणिमात्रांमध्ये जे शांत आहेत, जे समदृष्टीने पाहतात, भेदभाव ठेवत नाही, इतर कुणाशीही द्वेष करीत नाहीत आणि सतत जे तुझी भक्ती करतात अशा लोकांचे हृदयस्थान हेच तुझे सदैव निवासस्थान आहे. तुझ्या ठिकाणी मन, बुद्धी ठेवून जो सदैव संतुष्ट राहतो, आपली सर्व कर्मे तुलाच अर्पण करतो अशा भक्ताचे मन हे तुझे निवासस्थान होय. जो अप्रिय गोष्ट प्राप्त झाली असता द्वेष करीत नाही, प्रियवस्तूच्या प्राप्तीने हरखून जात नाही, ही सर्व माया आहे असे समजून तुझी भक्ती करतो, त्याचे मन तुझे निवासस्थान आहे. सहा भाव आणि सहा विकार केवळ देहालाच होतात, आत्म्याला होत नाहीत, हे जाणून जो क्षुधा, तृष्णा हे प्राणाचे विकार आणि सुख, दु:ख, भीती हे बुद्धिचे विकार आहेत, असे जाणतो तो भक्त संसाराच्या धर्मापासून मुक्त असतो अशा मनात तुझा निवास असतो.
हे रामा, तू सर्वांच्या बुद्धित राहणारा, चित्स्वरुप, सत्यस्वरुप असून अनंत, अलिप्त आहेस. तू एकच आहेस, तू सर्वव्यापक आहेस, अशा दृष्टीने पाहणाऱ्याच्या हृदयकमळात तू सीतेसह वास करावास. हे रामा, सतत अभ्यासाने ज्यांची मने तुझ्या ठिकाणी रमली आहेत, तुझ्या चरणसेवेत जे एकनिष्ठ झाले आहेत, तुझ्या नामाचा सतत जप-संकीर्तन केल्यामुळे ज्यांची पापे नष्ट झाली आहेत अशा भक्तांच्या हृदयकमळात सीतेसह वास कर. तेच तुझे गृह आहे. हे रामा, तुझ्या नामाचा महिमा कोणाला आणि कसा वर्णन करता येईल. तुझ्या नामप्रभावानेच मी ब्रह्मर्षिपदाला प्राप्त झालो आहे.
मी पूर्वी भिल्लांच्या सहवासात वाढलो. केवळ जन्मानेच मी फक्त ब्राह्मण होतो. माझे सर्व आचरण शुद्रासारखे होते. त्यानंतर मी एका शुद्र स्त्रीसोबत रममाण झालो. तिच्यापासून मला अनेक पुत्र झाले. त्या नंतर मी चोरांमध्येच मिसळलो आणि चोर झालो. हातात धनुष्यबाण घेऊन असल्यामुळे प्राण्यांना मी मृत्युसारखा वाटत असे. एकदा एका मोठ्या अरण्यात सात मुनी बसले होते. मरीचि, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु, वसिष्ठ हे सप्तर्षि होते. ते मुनि मला साक्षात अग्नि आणि सूर्यासारखे तेज:पुंज भासले. त्यांच्याजवळचे सर्व काही हरण करावे ह्या मोहाने मी त्यांच्याकडे धावत गेलो आणि त्यांना प्रत्येकाला ‘थांबा, थांबा’ असे म्हणालो, मला बघून मुनींनी विचारले ‘हे ब्राह्मणाधमा! तू इकडे का येतो आहेस?’ मी त्या मुनींना म्हणालो, ‘अहो मुनीश्रेष्ठहो, तुमच्याजवळ जे काही आहे ते घेण्यासाठी आलो आहे, माझी बायकामुले पुष्कळ आहेत आणि ती सर्व उपाशी आहेत. तेव्हा त्यांच्या पालनपोषणासाठी पर्वत, अरण्य या प्रदेशात हिंडत असतो.’ तेव्हा माझी किंचितही भीती न वाटता त्या मुनींनी म्हटले, ‘‘घरी जा आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांना विचार की, मी जे दररोज पाप करतो त्यात तुम्ही भागीदार आहात किंवा नाही हे प्रत्येकाला वेगवेगळे विचार. तू परत येईपर्यंत आम्ही येथेच थांबतो हे नक्की समज.’’ मुनींनी ज्याप्रमाणे सांगितले तसेच सर्वांना विचारले, त्यावर सर्वांनी ‘तूच पापाचा धनी आहेस, आम्ही फक्त फळाचे भागीदार आहोत’ असे सांगितले. त्यामुळे मला फार दु:ख झाले. मी विचार केला आणि पुन्हा ते मुनीवर्य जेथे थांबले होते तेथे आलो. त्या मुनींच्या केवळ दर्शनाने माझे अंत:करण शुद्ध झाले. मी तत्काळ धनुष्य इ. टाकून देऊन मुनींना साष्टांग नमस्कार घातला. ‘हे मुनिश्रेष्ठ, नरकात पडलेल्या माझे आपण रक्षण करा’ अशी मी त्यांची प्रार्थना केली. आपल्यापुढे दंडवत घालत असलेल्या मला पाहून ते मुनिश्रेष्ठ म्हणाले, ‘‘ऊठ, ऊठ! तुझे कल्याण असो. तुला सत्संग घडला आहे आणि तो सफलही झाला आहे. आता आम्ही तुला उपदेश करतो त्यामुळे तू मुक्त होशील.’’ त्या मुनींनी आपसात विचार केला की हा ब्राह्मण असून दुराचारी अधम आहे. ह्याची खरे तर उपेक्षाच करणे योग्य आहे. तरी सुद्धा हा आता शरण आला आहे, म्हणून याचे प्रयत्नपूर्वक रक्षण केले पाहिजे. असा विचार करुन त्यांनी मला हे रामा! तुझ्या नावाचा उलट अक्षर स्वरुपात ‘मरा’ असा एकाग्र मनाने सतत जप करण्यास सांगितले आणि ‘येथे पुन्हा परत येऊ तोपर्यंत तू जप कर, नित्य जप कर’ असे सांगून ते सर्व दिव्यरुपी मुनी तेथून निघून गेले.
मी सुद्धा त्यांनी जसा उपदेश केला त्याप्रमाणे तत्काळ जप करु लागलो. एकाग्र मनाने जप करीत असता मला बाह्य जगाचे विस्मरण झाले. अशा प्रकारे सर्वसंगपरित्याग करुन एकाग्र होऊन जप करता करता अनंत काळ निघून गेला. माझ्या अंगावर वारुळ निर्माण झाले. पुढे हजार युगे संपल्यानंतर त्या मुनींचे पुनरागमन झाले. त्यांनी मला बाहेर बोलावले. मी लगेच उठलो, बाहेर आलो. कृत, त्रेता, द्वापार, कलि ही चार युगे संपून गेली होती. धुक्यातून सूर्य जसा बाहेर यावा त्याप्रमाणे मी वारुळातून बाहेर आलो. तेव्हा ते मुनीवर्य मला म्हणाले, ‘हे मुनिश्वरा, तू आता वाल्मिकी झाला आहेस. आता तुझा पुनर्जन्म झाला आहे. तुझा दुसरा जन्म झाला आहे’ असे सांगून ते मुनि हे रामा, रघुकुलोत्तमा, स्वर्गमार्गाला जायला निघाले. हे रामा! तुझ्या नावाच्या प्रभावाने मला अशी उत्तम गती प्राप्त झाली. आज तर सीता आणि लक्ष्मणासह साक्षात माझ्या दृष्टीसमोर हे कमलनेत्रा, रामा तू मला दिसतोस त्याअर्थी मी आता खरोखर मुक्त झालो यात शंकाच नाही. हे रामा! तर चल मी तुला ते पवित्र स्थळ स्वत: दाखवितो.’’ असे म्हणून त्या मुनिंनी शिष्यांसहित राम, लक्ष्मण यांना सोबत घेऊन पर्वत आणि गंगा यामधील स्थळ रामाला दाखविले. सर्व जगाचे वसतिस्थान असलेल्या रामाने तेथे एक विस्तीर्ण शाला तसेच एक पूर्व-पश्चिम आणि दक्षिण-उत्तर अशी दोन सुंदर मंदिरे तयार करविली. सीतेसह आणि लक्ष्मणाबरोबर राम तेथे राहू लागले.
वाल्मिकींनी सीता, लक्ष्मण ह्यांच्यासह रामाची पूजा केली. स्वर्गामध्ये देवराज इंद्र जसा इंद्राणी, सर्व देव, मुनिश्रेष्ठ यांसह राहतो त्याप्रमाणे राम हा सीता, लक्ष्मण, मुनींसह तेथे राहू लागला.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अयोध्याकाण्डे षष्ठः सर्गः।