श्री महादेव म्हणाले,
‘‘सर्व लोकांना सुखदायक अशा श्रीरामाला राज्याभिषेक झाल्यानंतर पृथ्वीवर धान्याची समृद्धि झाली. वृक्ष फळांनी संपन्न झाले. गंधहीन फुले सुगंधित होऊन शोभू लागली. रामाने दहा हजार घोडे, तितक्याच धेनु व गायी ब्राह्मणांना दिल्या. प्रथमतः शेकडो बैलांचे दान करून नंतर पुन्हा तीस कोटी सुवर्णदान त्याने ब्राह्मणांना दिले. वस्त्रे व अलंकार रत्ने सुद्धा ब्राह्मणांना त्याने दिले. त्या भक्तवत्सल रामाने सूर्यप्रभेप्रमाणे असलेल्या तेजाने शोभणारी, सर्व रत्नांची एक माळ प्रीतिपूर्वक सुग्रीवाला दिली. तशीच रघुनंदनाने दोन दिव्य बाहुभूषणे अंगदाला दिली. कोटिचंद्राप्रमाणे तेजस्वी, मणिरत्नांनी विभूषित असा हार त्या रघुकुलश्रेष्ठाने सीतेला दिला. जानकीने तो हार गळ्यातून काढला आणि त्या सर्व वानरांकडे आणि पतीकडे तिने वरचेवर नजर टाकली. ते पाहून तिचा अंतर्हेतू जाणून राम म्हणाला, ‘‘वरानने जानकी, ज्याच्यावर तू संतुष्ट झाली असशील त्याला हा हार दे.’’ मग सीतेने रामाच्या देखत तो हार हनुमंताला दिला. त्या हाराने आणि सीतेने केलेल्या गौरवाने मारुती फारच शोभू लागला. मग हात जोडून जवळ आलेल्या मारुतीला पाहून त्याच्या परमभक्तीने संतुष्ट झालेला राम त्याला म्हणाला, ‘‘हनुमंता, मी तुझ्यावर संतुष्ट झालो आहे. तुला जो इच्छित असेल तो वर माग. त्रैलोक्यात देवांनाही दुर्लभ अशी वस्तु मी तुला देईन.’’
हनुमंताच्याही चित्ताला आनंद वाटला. त्याने रामाला प्रणाम केला आणि म्हटले, ‘‘रामा, तुझे नामस्मरण करीत मी भूतलावर रहावे. तुझे नाव जोपर्यंत इहलोकी राहील तोपर्यंत हे माझे शरीर राहो. हाच माझा इच्छित वर होय.’’ त्यावर ‘ठीक आहे’ असे रामाने सांगितले आणि म्हटले, ‘‘तू मुक्त होत्साता यथेच्छ सुखाने रहा. कल्पांती तू माझ्या रुपी येऊन मिळशील ह्यात काही संशय नाही.’’
मग सीता त्या मारुतीला प्रीतिपूर्वक म्हणाली, ‘‘मारुते, तू कुठेही असलास तरी माझ्या आज्ञेवरून सर्व भोग तुला लाभतील.’’ त्या दोघा ईश्वरांनी, सीतारामचंद्रांनी असे सांगितल्यावर मारुतीच्या अंतःकरणाला मोठा हर्ष वाटला. त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने त्या दोघांना प्रणाम केला. मग तो महाबुद्धिमान मारुती तपाचरण करण्यासाठी हिमालय पर्वतावर गेला.
मग हात जोडून असलेल्या गुहाकडे वळून राम म्हणाला, ‘‘मित्रा, तू तुझ्या रम्य आणि उत्तमोत्तम अशा शृंगवेरपुराला जा. माझे नित्य चिंतन करीत स्वसंपादित उपभोग भोगीत रहा. शेवटी माझ्या सारुप्याला तू पावशील ह्यात संशय नाही.’’ असे म्हणून रामाने त्याला दिव्य आभरणे दिली व विपुल राज्यही देऊन त्या सर्वसामर्थ्याने त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला. नंतर रामाने आलिंगन दिल्यावर गुह आनंदित होऊन आपल्या घरी गेला.
दुसरे जे मोठमोठे वानर अयोध्येला आले होते त्यांचीही अमूल्य वस्त्राभरणे देऊन रामाने पूजा केली. सुग्रीव वगैरे सर्व वानर व बिभीषण ह्यांचाही योग्यतेप्रमाणे त्या परमात्मा रामाने सत्कार केला. त्यामुळे ते सर्व आनंदित मनाने आल्या मार्गाने परत गेले. बिभीषण निष्कंटक राज्य मिळवून व रामाकडून सत्कार घेऊन आनंदाने लंकेला गेला. आपल्या सद्वर्तनाने जो कोणालाही निंद्य झाला नाही तो प्रजावत्सल राम सकल राज्याचे पालन करू लागला. लक्ष्मणाची इच्छा नसतानाही रामाने त्याला यौवराज्याभिषेक केला. तो रामसेवा अत्यंत प्रेमपूर्वक तसेच तत्परतेने करीत असे.
वस्तुतः राम हा परमात्मा, सर्व कर्माचा साक्षी, निर्मल, कर्तृत्वादि धर्मरहित, नित्य, निर्विकार, स्वानंदतुष्ट असा होता. तरीही लोकांना उद्धाराचा मार्ग दाखवावा या उद्देशाने त्या परमानंदस्वरूप रामाने मनुष्यदेहाचा स्वीकार करून अश्वमेधादि सर्व यज्ञ केले व विपुल दक्षिणा दिल्या. रामराज्यात वैधव्य पावून स्त्रिया रडल्या असे कधी झाले नाही. सर्पदंशाची भीती कोणाला नव्हती किंवा रोगपीडासुद्धा कोणाला नव्हती किंवा झाली नाही. लोकांना चोरांचे भय नव्हते व कोणत्याही प्रकारचा अनर्थ उद्भवत नसे. तसेच वृद्ध माणसे हयात असताना लहान मुलांना कधीही मृत्युभय वाटले नाही. सर्व लोक रामपूजनात तत्पर व रामचिंतनात मग्न असत. मेघसुद्धा यथाकाली लोकांना पाहिजे तितकी वृष्टि करीत. प्रजा स्वधर्मरत राहून वर्णाश्रमगुणांनी संपन्न होती. सर्व प्रजांचे औरस पुत्रांप्रमाणे राम पालन करीत असे. तो राम सर्वलक्षणसंपन्न व सर्वधर्मपरायण होता. त्या रामाने दहा हजार वर्षे राज्य केले.
हे गुप्त असलेले अध्यात्म नावाचे पवित्र रामायण पूर्वी आदिशंभु शंकर ह्यांनी सांगितले. हे अत्यंत पवित्र असून त्याचे पठण करणार्यांना धनधान्य, ऐश्वर्य, त्याचप्रमाणे दीर्घ आयुष्य व आरोग्य प्राप्त होते. जो मनुष्य हे भक्तीने लक्षपूर्वक श्रवण करील किंवा आनंदित मनाने ह्याचे पठण करील त्याचे सर्व वांछित हेतू परिपूर्ण होऊन तो क्षणात कोट्यवधी पापांपासून मुक्त होईल. धनेच्छुक मनुष्याने शुद्ध होऊन हे रामाभिषेक वर्णन ऐकले असता त्याला भरपूर धनप्राप्ति होईल. पुत्राची इच्छा असेल त्याने आरंभापासून रामायणाचे पठण करावे म्हणजे त्याला विद्वन्मान्य पुत्र होईल.
जो कोणी राजा ह्या अध्यात्मिक रामसंहितेचे पठण करील त्याला सर्व वैभवसंपन्न पृथ्वीचे राज्य मिळेल. तो शत्रूंना जिंकील, शत्रू त्याला भीती दाखविणार नाही. त्याची सर्व दुःखे दूर होतील व सर्वत्र त्या राजाला जय मिळेल.
स्त्रिया या रामसंहितेचे श्रवण करतील, तर त्यांची मुले जगतील व सर्वत्र त्यांचा मान होईल. जी कोणी वंध्या स्त्री भक्तियुक्त होऊन ह्या कथेचे श्रवण करील, तिला देखील सुरुपवान पुत्राची प्राप्ती होईल. जो मनुष्य क्रोधाला जिंकून आणि मत्सर सोडून श्रद्धेने ह्या ग्रंथाचे श्रवण आणि पठण करील, त्याच्या अंगी रामभक्ति जडून तो सर्व संकटातून पार पडेल व निर्भय आणि सुखी होईल.
जे अध्यात्म रामायण ग्रंथ मुळापासून श्रवण करतील त्यांच्यावर सर्व देव प्रसन्न होतील, त्यांची सर्व विघ्ने दूर होतील आणि सर्व प्रकारच्या श्रेष्ठ संपत्ती त्यांना प्राप्त होतील. रजस्वला स्त्रीने देखील रामाच्या ठिकाणी मन ठेवून हे रामायण आरंभापासून ऐकले तर तिला चिरायुषी उत्तम पुत्र होईल आणि थोर पतिव्रता म्हणून तिचा लोकात अत्यंत मान होईल.
जे कोणी भक्तिपूर्वक पूजा करून ह्या ग्रंथाला नित्य वंदन करतील ते सर्व पापापासून मुक्त होऊन विष्णुच्या परम पदाला पावतील. जे लोक सर्व अध्यात्म रामचरित्र भक्तिपूर्वक ऐकतात किंवा स्वतः मुखाने पठण करतात त्यांना राम प्रसन्न होतो. अर्थ, काम, मोक्ष ह्यापैकी मनुष्याला ज्याची इच्छा असेल ते प्राप्त होईल. हे रामायण नियमाने खंड पडू न देता ऐकावे, तेणेकरून मनुष्याला आयुरारोग्य प्राप्त होते आणि कोटिकल्पात त्याच्या हातून घडलेल्या पातकांचा नाश होतो. रामायण ऐकल्याने सर्व देव, ग्रह आणि सर्व महर्षि हे सर्वदा तृप्त होतात. तसेच पितरही तृप्त होतात.
अध्यात्म रामायण हा अद्भुत ग्रंथ असून ह्यात वैराग्य व विज्ञान, तत्त्वज्ञान ह्यासंबंधी गोष्टी सांगितल्या आहेत. हा ग्रंथ प्राचीन आहे. जे लोक ह्या जन्मात ह्या ग्रंथाचे पठण, श्रवण किंवा लेखन करतील त्यांना पुनर्जन्म प्राप्त होणार नाही. समस्त वेदराशींचे वारंवार आलोडन करून भूतपति शंकराने ‘राम म्हणजेच तारक ब्रह्म आणि राम हा विष्णुची गूढ मूर्ती होय’ हे जाणले आणि नंतर ज्यात रामाचे गूढ तत्त्व भरलेले आहे असे सर्व ज्ञानाचे सार शंकराने एकत्र काढून ते त्याने ह्या ग्रंथाद्वारे आपल्या प्रिय पत्नीला सांगितले.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे षोडशः सर्गः।