श्री महादेव म्हणाले,
‘‘एकदा यमुनातीरावरील सर्व मुनी लवण नामक राक्षसाच्या भीतीने रामाला भेटण्यासाठी म्हणून अयोध्येला आले. रामाकडून आपणास अभय मिळावे ह्या हेतूने च्यवनभार्गव नामक मुनिश्रेष्ठाला आपला मुख्य करून ते असंख्य ब्राह्मण रामाकडे आले. त्या रघुकुलोत्तम रामाने भक्तिपूर्वक त्यांचे पूजन केले. नंतर त्या मुनिजनांना आनंद देण्यासाठी तो मधुर शब्दांनी म्हणाला, ‘‘मुनिश्रेष्ठहो, मी आपली कोणती कामगिरी केली पाहिजे? आपण काय निमित्ताने आला आहात? माझ्या भेटीला आपण अत्यंत प्रेमाने आलात ह्याबद्दल मला फार मोठी धन्यता वाटते आहे. आपले कार्य कितीही दुष्कर असले तरी मी ते करीन. मी आपला सेवक आहे. ब्राह्मण माझे दैवत आहेत. आपण मला आज्ञा करावी.’’ ते ऐकून च्यवनमुनीला आनंद झाला. तो लगेचच म्हणाला, ‘‘प्रभो! पूर्वी कृतयुगामध्ये मधू नावाचा एक मोठा दैत्य होऊन गेला. तो अत्यंत धर्मात्मा असून देवब्राह्मणांचे पूजन करणारा होता. त्याच्यावर प्रसन्न होऊन शंकरांनी त्याला एक अतिशय उत्तम असा शूल दिला आणि म्हणाले की, ‘ह्याच्या साहाय्याने ज्याच्यावर प्रहार करशील त्याचे भस्म होईल.’ रावणाची धाकटी बहीण कुंभीनसी ती त्याची पत्नी, ही गोष्ट सर्वश्रुत आहे. तिच्या पोटी त्या मधू राक्षसाला लवण नावाचा एक पुत्र झाला. तो महापराक्रमी निघाला. हा अत्यंत दुष्ट, कोणालाही न आवरणारा व देवब्राह्मणांची हिंसा करणारा आहे. राजेन्द्रा! त्यापासून आम्हाला पीडा होत आहे म्हणून आम्ही तुला शरण आलो आहोत.’’ ते ऐकून राम म्हणाला, ‘‘मुनिश्रेष्ठ हो! आपणास भिण्याचे कारण नाही. मी लवणाचा नाश करवितो. त्यासंबंधी चिंतारहित होऊन आपण जावे.’’ असे ऋषींना सांगून राम आपल्या बंधुंना म्हणाला, ‘‘असा कोण बरे आहे?’’ ते ऐकून भरताने हात जोडून रामाला म्हटले, ‘‘प्रभो देवा! मला आज्ञा द्या. मीच त्याचा वध करतो.’’ नंतर रामाला नमस्कार करून शत्रुघ्न म्हणाला, ‘‘राघवा, युद्धामध्ये लक्ष्मणाने मोठे कार्य केले आहे. तसेच महाबुद्धिमान भरताला नंदिग्रामात कितीतरी दुःख सहन करावे लागले. म्हणून लवणाच्या वधासाठी मीच जातो. रघुश्रेष्ठा! तुझ्या प्रसादाने मी त्या राक्षसाचा युद्धात वध करीन.’’ त्या शत्रूमर्दन रामाने शत्रुघ्नाचे ते भाषण ऐकल्यावर शत्रुघ्नाला मांडीवर घेतले आणि म्हटले, ‘‘मी तुला आजच मथुराराज्याचा अभिषेक करतो.’’ रामाने लक्ष्मणाकडून अभिषेकाचे सर्व साहित्य आणवले आणि शत्रुघ्नाची इच्छा नसतानाही परम प्रीतिपूर्वक त्याला अभिषेक करविला. नंतर एक दिव्य बाण शत्रुघ्नाला देऊन राम त्याला म्हणाला, ‘‘लोकांना कंटकाप्रमाणे, शत्रूसमान वाटणाऱ्या लवणाचा ह्या बाणाने वध कर. तो लवण शंकराने दिलेल्या शूलाची पूजा करून तो शूल घरी ठेवतो आणि जंतूंचे भक्षण करण्यासाठी आणि अनेक प्राण्यांच्या वधाकरिता अरण्यात जातो. घरी न येता तो वनातच फिरत राहील अशी संधी साधून तू नगराच्या द्वारात धनुष्य घेऊन उभा रहा. तो क्रुद्ध होऊन तुझ्याशी लढेल आणि तुझ्या हाती मरण पावेल. त्या क्रूर लवणाचा वध केल्यानंतर त्याचे मधू नामक वन आहे, त्या ठिकाणी एक नगरी वसवून तेथे तू रहा. पाच हजार घोडे, अडीच हजार रथ, सहाशे हत्ती आणि तीस हजार पायदळ, इतकी सेना मागाहून येईल. तू पुढे जाऊन त्या राक्षसाचा वध कर.’’ असे बोलून शत्रुघ्नाच्या मस्तकाचे रामाने अवघ्राण केले. अनेक आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले आणि मुनिबरोबर त्याला पाठविले. शत्रुघ्नानेही रामाने सांगितले तसेच केले. त्याने मधूसुताचा, लवणाचा युद्धात वध केला आणि मथुरा नगरी वसविली. तसेच दान, मान, धनधान्य-समृद्धि यांच्या योगे तेथील लोकांना सुखी केले.
इकडे वाल्मीकीच्या आश्रमात सीतेला दोन पुत्र झाले. वाल्मीकीमुनीने ज्येष्ठ पुत्राचे कुश आणि धाकट्याचे लव, अशी नावे ठेवली. पुढे हळूहळू सीतेची मुलं विद्यासंपन्न झाली. त्या मुलांचे मुनींनी उपनयनसंस्कार केले. वेदाध्ययनही त्यांच्याकडून करवून घेतले. नंतर त्या मुलांना संपूर्ण रामायण शिकविले. हे रामायण त्रिपुरासुराचा नाश करणाऱ्या शंकराने पार्वतीला वेदांचा गुह्य अर्थ कळावा म्हणून सांगितले. तेच आता त्या मुलांकडून वाल्मीकीने पाठ करविले. ते अश्विनीकुमारांसारखे सुंदर कुमार तालसुरात अत्यंत प्रवीण झाले. त्यांचा स्वरही अतिशय मधुर होता. असे ते अरण्यात सर्वत्र रामायणकथा गात फिरत असत. देवांसारख्या मनोहर स्वरूपाचे ते दोन कुमार सर्वत्र रामकथा गाताना पाहून मुनींना आश्चर्य वाटे व ते म्हणत, ‘‘आम्ही येथे चिरकाल रहात आहोत. दिशादिशांच्या ठायी पुष्कळ वेळा आम्ही प्रवाससुद्धा केला तरी गंधर्वकिन्नरात, भूलोकात, देवलोकात, स्वर्गलोकात, पाताळात, ब्रह्मसदनी किंवा सर्व लोकात अशा प्रकारचे गायनवादनकौशल्य आम्हाला कोठेच दिसून आले नाही किंवा ऐकायलाही मिळाले नाही.’’ अशारितीने ते मुनि त्यांची दररोज स्तुती करीत. ती मुले वाल्मीकीच्या आश्रमात चिरकाल एकांतात सुखाने राहिली.
इकडे त्या अतितेजस्वी रामाने अनेक अश्वमेधादि यज्ञ करून त्यात ब्राह्मणांना भरपूर दक्षिणा दिल्या. त्या यज्ञात स्वर्णमयी सीता, सीतेची सोन्याची प्रतिमा रामाने पत्नीच्या जागी योजली. तो यज्ञसमारंभ पाहण्यासाठी अनेक ऋषी, राजर्षि, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आले होते. मुनिश्रेष्ठ वाल्मीकी सुद्धा त्या गायन करणाऱ्या कुशलव यांना सोबत घेऊन तेथे आले होते. ऋषींकरिता ठरवलेल्या मंडपाजवळ उतरले होते. एकदा समाधी उतरल्यावर वाल्मीकी मुनी एकांतात शांत बसले होते. तेथे अनेक प्रकारच्या गोष्टी सुरू असताना कुशाने ज्ञानशास्त्राविषयी प्रश्न विचारला. तो म्हणाला, ‘‘भगवन्! आपल्या मुखाने सर्व गोष्टी थोडक्यात ऐकाव्या अशी माझी इच्छा आहे. देह धारण करणाऱ्या देह्याला हे दृढ संसारबंधन कसे उत्पन्न होते? तो देही ह्या संसारनामक दृढ बंधनातून कसा सुटतो? मुने! आपण सर्वज्ञ आहात. तरी मला हे सांगावे. मी आपला शिष्य आहे.’’
वाल्मीकी म्हणाले, ‘‘तुला बंधमोक्षाचे स्वरूप व संसारातून मुक्त होण्याचे साधन थोडक्यात सांगतो, ते माझ्याकडून ऐकून घे व मी सांगितल्याप्रमाणे आचरण ठेव म्हणजे तुझे कल्याण होईल व तू जीवन्मुक्त होशील. हा आत्मा चैतन्यरूपी असून हा अदेह आहे. देह हे त्याचे मोठे गृह आहे. ह्या देहामध्ये त्यानेच आत्म्याने कल्पिलेला एक मंत्री आहे. तो मंत्री म्हणजे अहंकार हा होय. हा मंत्री स्वतःचा देहगेहाभिमान चिदात्म्यावर लादतो. मग त्याच्याशी तादात्म्य पावून हा आपण स्वतः जे जे करतो ते ते सर्व त्या चिदानंदरूप आत्म्यावर आरोपित करतो. अहंकाराचे शरीर आत्म्याकडूनच प्रकाशित होते. आत्मा हा सगळे संकल्प त्याला करू देतो आणि आपण स्वतः त्या संकल्पशृंखलांनी बांधला जाऊन पुत्र, स्त्रिया, गृहे इत्यादिंचे चिंतन करीत राहतो. अशा चिंतनानेच देह्याला सदैव शोक करीत राहणे भाग पडते. ह्या अहंकाराचे अधम, उत्तम, मध्यम असे तीन देह आहेत. त्यांची क्रमाने तम, सत्त्व, रज अशी तीन नावे आहेत. हे तीन देह ह्या जगताच्या स्थितीचे कारण आहेत. संकल्प तमोरूप असला तर मनुष्याच्या हातून तामस कर्मे होऊ लागतात आणि तो अत्यंत तमोगुणी होऊन कृमिकीटकयोनीत जन्म घेतो. सत्त्वगुणरूप संकल्पाने मनुष्य धर्मज्ञानपरायण होतो. म्हणूनच त्याला मोक्षसाम्राज्य दूर नसते. तो सुखरूप होऊन राहतो. राजस संकल्पाने प्राणी लोकांमध्ये व्यवहारी होतो. तो संसारात पुत्र, स्त्रिया ह्यासोबत क्रीडा करीत असतो. हे महामते कुशा! ज्याचा संकल्प ही तिन्ही रूपे सोडतो त्याला तो संकल्पच आत्मनाशातून परमपदाची प्राप्ती करून देतो. म्हणून विषयांवरील दृष्टी सोडून दे. मनाने मनाचे नियमन कर आणि बाह्य अभ्यंतर विषयसंकल्पांचा नाश कर. हे अनघा! हजारो वर्षे जरी तू भयंकर तप केलेस, पाताळात राहिलास, पृथ्वीवर वस्ती केलीस किंवा स्वर्गलोकी वास केलास तरी दुःखरहित, विकाररहित आणि परम पावन अशा आत्मसुखाच्या प्राप्तीचा उपाय संकल्पाचा क्षय करण्याच्या कामी धैर्याने मोठा प्रयत्न कर. हे निष्पापा! ह्या संकल्परूप तंतूच्या आधाराने सर्व भाव, विकार असतात असे म्हटले आहे. तो तंतूच तोडला असता ह्या मोठमोठ्या विषयभावना कोठे जातील हे कळतच नाही. म्हणून संकल्प सोडून यथाप्राप्त व्यवहार करीत रहा. संकल्पाचे जाळे नष्ट झाले असता जीव ब्रह्मत्वाला पावतो. ब्रह्मस्वरूपी प्राप्त झालेल्याची वृत्ती धारण कर. विकल्पाचे मोठे जाळे जबरदस्तीने दूर टाकून दे. सुषुप्तिकाळी असते तशी चित्तवृत्ती धारण कर आणि नित्य सुखासाठी त्या अद्वितीय पदाची प्राप्ती करून घे.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे षष्ठः सर्गः।