॥श्रीमदध्यात्मरामायण॥ माहात्म्यकथन (मराठी)
प्रा. डॉ. अनुपमा डोंगरे
प्रा. डॉ. अनुपमा डोंगरे
.. प्रस्तावना ..
वाल्मीकी रामायणाची सुरुवात क्रौंचवधापासून झाली, असे म्हणण्यास काही हरकत नाही असे वाटते. तमसा नदीच्या तीरावर घडलेला प्रसंग हा मुख्य ठरला असून तेथूनच वाल्मीकी महर्षींनी छंदोबद्ध वाणीने निषादाला शाप दिला, इथूनच अनुष्टुभ छंदातून या महाकाव्याला आदिकाव्याला प्रारंभ झाला आहे. अयोध्येचे राजे प्रभु श्रीरामचंद्र या रामायण महाकाव्याचे प्रमुख नायक आहेत. त्यांचाच आदर्श सर्वतोपरी ग्राह्य मानला जातो.
महर्षींच्या मनातील शोक, कारुण्यभाव श्लोकांच्या माध्यमातून प्रगट झाला आणि एक महान आदिकाव्य ‘रामायण’ निर्माण झाले. ‘शोकः श्लोकत्वमागतः’ असे त्याबद्दल म्हटले आहे. तमसा नदीच्या तीरावर घडलेला प्रसंग आहे. महर्षी प्रातःस्नान, संध्यावंदन इ. करण्यासाठी नदीवर गेले असता तेथे त्यांना झाडावर क्रौंचपक्षाची जोडी विहार करताना दिसली. तेवढ्यात कुठून तरी पारध्याचा बाण आला आणि नरपक्षाला घायाळ केले, तसा तो पक्षी खाली पडला आणि मृत झाला. मृत झालेल्या त्या नरपक्षाला पाहून क्रौंची खूप विलाप करू लागली. नेमके हेच दृश्य वाल्मीकी महर्षींनी पाहिले आणि शोकायमान हृदयाने व्यथित होऊन पारध्याला शाप दिला. तीच ही छंदोमय शापवाणी रामायणाचा उगम स्त्रोत होय. ती वाणी अशी आहे,
‘‘मा निषाद प्रतिष्ठा त्वमगमः शाश्वति समा।
यत्क्रौंच मिथुनादेकं अवधिः काममोहितम्॥’’
अशी ही अनुष्टुभ छंदातून शापवाणी बाहेर पडली. अनुष्टुभ छंदाची सुरुवात या श्लोकापासून झाली. यानंतर पुढे काही दिवसांनीच महर्षींनी रामायण लिहिले. ते ही रामजन्मापूर्वीच, कारण ते आर्षदृष्टीचे महर्षी होते. राम अवतारासंबंधीचे सर्व वृत्तांत त्यांनी आपल्या आर्षदृष्टीने पाहिले आणि रामचरित्र लिहून काढले. तेच हे वाल्मीकी रामायण होय. या रामायणाला ‘चतुर्विशंति सहस्त्री संहिता’ असे म्हणतात. याची श्लोकसंख्या 24 हजार आहे. आदिकाव्य खऱ्या अर्थाने निर्माण झाले.
या मूळ वाल्मीकी रामायणापासूनच शिव-पार्वती यांच्या संवादातून अध्यात्मरामायण हा ग्रंथ आकाराला आलेला आहे. संवाद स्वरूपात असलेला ग्रंथ परमेश्वराच्या प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन असून भक्तीयोग यातून स्पष्ट दिसून येतो. अनेकविध प्रकारांनी परमेश्वराच्या स्वरूपाचे वर्णन अनेक वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहे. परमेश्वराचे, त्याच्या भक्तीचे खरे स्वरूप, योग्य रूप काय आहे हे जनसामान्यांना, अल्पबुद्धी मानवाला कळत नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी चित्त कसे ठेवावे? भक्तीभाव कसा ठेवावा? या महत्त्वाच्या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करणारा हा अध्यात्मरामायण ग्रंथ आहे. संवादरूपात असल्यामुळे त्यात आकर्षकता आलेली आहे. अध्यात्मरामायणाचे सार प्रामुख्याने त्याच्या उत्तरकांडामध्ये 5व्या सर्गात स्पष्टपणे वर्णन केलेले आहे. कोठेही संदिग्धता आढळत नाही.
भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या माहात्म्यामध्ये वर्णन करून अर्जुनाला सांगितले आहे,
‘‘सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः।
पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्॥’’
अगदी त्याचप्रमाणे रामायणाचे सुद्धा वर्णन केलेले आहे.
‘‘रामेणोपनिषत्सिंधुमुन्मथ्यात्पादितां मुदा।
लक्ष्मणायार्पिता गीतासुधां पीत्वामरो भवेत्॥’’ (सर्ग 1/48)
अध्यात्मरामायणात रामगीतेचे वर्णन आढळते. रामगीता आणि उद्धवगीता यावर जणू भगवद्गीतेची पडछाया पडली आहे असे वाटते किंवा रामगीतेची छाया श्रीमद्गीतेवर पडली आहे असा संशय निर्माण होतो. परंतु प्रभु श्रीरामाचा भगवंताने घेतलेला सातवा अवतार आहे आणि भगवान श्रीकृष्णाचा आठवा अवतार आहे. अर्थात गीतेवर रामगीतेची पडछाया पडली आहे, हे निःसंशय आहे. वास्तविक भगवंताच्या ह्या दोन्ही अवतारांचे खरे प्रयोजन म्हणजे सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करणे. ‘बीजं धर्मद्रुमस्य’ हे वचन प्रभु रामचंद्रांनी सार्थ केलेले दिसून येते.
‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे।’
हे प्रभुचे वचन आहे.
पित्याच्या सुखासाठी सत्य प्रतिज्ञेचे पालन करायचे म्हणून पितृआज्ञेचे काटेकोरपणे पालन करून अयोध्येच्या राजपदाचा, राज्यकारभाराचा त्याग केला. धर्माचे पालन करण्यासाठी, समाजात धर्म वाढविण्यासाठीच वालीचा वध केला. प्रजानुरंजनाचे, आदर्श राजाचे व्रतपालन करण्यासाठी प्राणापेक्षाही प्रिय असणाऱ्या पत्नीचा अर्थात सीतेचा त्याग केला, येथे राजाने राणीचा त्याग केला. या सर्व प्रसंगातून प्रभु रामचंद्राची धर्मनिष्ठाच प्रगट होते. म्हणूनच प्रभु रामचंद्राच्या चारित्र्याचे पठन, पाठन, मनन करीत असता एक गोष्ट लक्षात येते ती अशी, की प्रभु रामाच्या चरित्रातील श्रेष्ठतम असे सिद्धांत मानवी जीवनासाठी जणू आदर्शाचा साक्षात आरसाच आहे. रामायण म्हणजे नीतिशिक्षणाचा जणू वस्तुपाठच आहे असे वाटू लागते. जसे रामायण नीतिशिक्षण शिकवते, महाभारत आपल्याला निरनिराळ्या युक्त्या शिकविते. भागवत मात्र आपल्याला भक्ती कशी विकसित करावी हे सांगते. देवी भागवत म्हणजे साक्षात शक्ती. त्या शक्तीचे ज्ञान देवी भागवतातून शिकविले जाते. असे हे आपले धर्मग्रंथ जणू वैश्विक अशी मूल्यशिक्षणाची पाठशाळाच आहे, हे त्रिवार सत्य आहे. म्हणून ‘पुराणातील वांगी पुराणात’ असे उपहासाने म्हणण्यापेक्षा त्या धर्मग्रंथात अवगाहन करा, म्हणजेच अनुभूती येईल यात काहीच संशय नाही. यातल्या कोणत्याही कथा अंधश्रद्धा वाढविण्यासाठी नाहीत.
भगवान प्रभु श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांनीही मानवी अवतार धारण केला. दोघांचेही उद्दिष्ट मात्र एकच होते, ते म्हणजे सज्जन साधु पुरुषांचे रक्षण आणि खलनिग्रह म्हणजेच दुष्टांचा नाश करणे. रामाने वनवासात असताना अनेक राक्षसांचा नाश केला. अर्थात त्यांचा उद्धार केला. तसेच श्रीकृष्णानेही अनेक राक्षसांना यमसदनी पाठविले. अगदी बालपणापासूनच हे कार्य सुरू केले. अनेक असुरांना ठार मारले. धर्माचे काटेकोरपणे पालन दोघांनीही केलेले दिसून येते. श्रीकृष्णाने तर गीतेमध्ये सांगून ठेवले आहे की,
‘‘यदा यदा ही धर्मस्य ग्लानीर्भवति भारत
अभ्युत्थानमर्धस्य तदात्मानौ सृजाम्यहं।
परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम्
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥’’
एकाच ध्येयाने अवतार धारण करून, मानव देह धारण करून कर्म, धर्म, कार्यासाठी संपूर्ण जीवन वेचले आहे, हे त्यांच्या चरित्रातून सहज स्पष्ट होते. अशा चरित्रगायनाचे, वाचनाचे फायदेही होतात. मानवी जीवनात याचा भरपूर लाभ नक्की होतो. सर्वप्रथम सकारात्मक उर्जा वाढते. धर्माचरण करण्यासाठी जणू आयुष्य वाढते. संकटे, पाप नष्ट होतात. धर्म, यश, कीर्ती वाढते, अपयश नष्ट होते. प्रभु श्रीरामाच्या चरित्रातील श्रेष्ठतम असे सिद्धांत मानवी जीवनासाठी जणू आदर्शाचा एक स्वच्छ असा आरसाच आहे.
वाल्मीकी रामायणात वर्णन केलेला पुत्रकामेष्टी यज्ञ हा प्रसंग लक्षात घेतल्यास असे दिसून येते की अग्नीने दिलेला पायस दशरथाने कौसल्या, सुमित्रा, कैकेयी या तीनही राण्यांमध्ये वाटून दिला. भावार्थ रामायणात एकनाथ महाराजांनी हाच प्रसंग वेगळ्या प्रकाराने वर्णन करून सांगितला. कैकेयी ही दशरथाची लाडकी राणी. ती रुसून बसली. ‘मी राजाची लाडकी राणी म्हणून मला ज्येष्ठ भाग मिळाला पाहिजे’ असे म्हणत हटून बसली. या सर्व प्रकारात मात्र घारीने तिच्या हातातील पायस झडप घालून पळवून नेला. अशा वेळी कौसल्या आणि सुमित्रा ह्या दोघींनी आपापल्या भागातील अर्धा भाग कैकेयीला दिला आणि तिची समजूत काढली. अशाप्रकारे भावार्थ रामायणात एकनाथांनी प्रसंग वर्णन केला आहे. हा प्रसंग मात्र मूळ रामायणात नाही. शिवरामायणात या प्रसंगाचे वर्णन केले आहे. एकनाथांनी शिवरामायणाचा अध्याय चौथा सुरुवातीलाच नमूद केला आहे. अध्यात्मरामायणात कौसल्या आणि सुमित्रा यांनी आपल्या भागातून अर्धा भाग कैकेयीला दिला एवढेच वर्णन केले आहे.
कैकेयी चाथ भरतमसूत कमलेक्षणा।
सुमित्रायां यमौ जातौ पुर्णेन्दुसदृशाननौ॥ (बालकाण्ड 3/18)
वरील सर्व प्रसंगवर्णन मूळ वाल्मीकी रामायणाला अनुसरूनच केले आहे, हे स्पष्ट आहे.
रामगीता सांगण्याआधी अध्यात्म रामायणाचे महत्त्व वर्णन केलेले असून शिवशंकर पार्वतीला ‘रामहृदय’ वर्णन करून सांगतात. त्यानंतर ‘रामगीता’ सांगतात. श्रीशंकराने एका संपूर्ण अध्यायात रामहृदयाच्या स्वरूपाचे वर्णन करून सांगितले. यानंतर बालकाण्डाचा आरंभ होतो. पहिल्या सर्गामध्ये सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे या भूतलावर सूर्यवंशामध्ये मायेने मनुष्यावतार धारण केला आणि संपूर्ण राक्षसकुळाचा संहार केल्याचे वर्णन आहे. आरंभ मंगल श्लोकातून असे वर्णन केले आहे. अत्यंत मनोवेधक असा श्लोक -
‘पुरारिगिरिसंभूता श्रीरामार्णवसंगता।
अध्यात्मरामगंगेयं पुनाति भुवनत्रयम्’॥
त्रिपुरारी शंकररूपी पर्वतापासून निर्माण झालेली, श्रीरामरूपी समुद्राला मिळणारी, अध्यात्मरामायणरूपी गंगा संपूर्ण त्रिभुवनाला पावन करणारी आहे.
या रामयणपाठाचे फल निवेदन करून पार्वती शिवाला विचारते तेव्हा शिवशंकर रामहृदय प्रस्तावना करून त्याचे संपूर्ण माहात्म्य सांगितल्यावर रामहृदयाचे वर्णन करतात. या प्रथम सर्गाचे नावच मुळी श्रीरामहृय नावाचा बालकाण्डाचा प्रथम सर्ग असाच उल्लेख केला आहे.
द्वितीय सर्गात पार्वती शंकराला म्हणते, ‘‘मी आज खरोखर धन्य झाले आहे. कारण माझ्या अंतःकरणातील गाठ खऱ्या अर्थाने सुटली आहे. माझ्यावर आपला हा फार मोठा अनुग्रहच झाला आहे.’’ श्रीशिव पार्वतीला अत्यंत गुह्य असे अध्यात्मरामायण, रामचरित्र सांगतात. ‘‘रामचंद्रानेच पूर्वी जे शंकराला सांगितले आहे तेच रामचरित्र तुला सांगतो’’ असे शंकर म्हणतात. हे सर्व ऐकून आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक हे तापत्रय नष्ट होतात. त्यानंतर पृथ्वी गाईचे रूप घेऊन देव आणि मुनिजनांसह ब्रह्मलोकाला गेली. सर्व संकटांचे वर्णन करून सांगितले. ब्रह्मदेव क्षणभर ध्यानस्थ झाले आणि परिस्थिती जाणून घेतली. तेथून सर्व देव पृथ्वीसहित क्षीरसमुद्राच्या तीरावर गेले. सर्वसामर्थ्यसंपन्न अशा विष्णुकडे गेले. ब्रह्मदेवाने श्रीविष्णुची स्तुती करण्यास सुरूवात केली. एकूण 14 ते 24 श्लोकांपर्यंत विष्णुस्तुती केली आहे.
त्यानंतर भगवान म्हणतात, ‘‘कश्यपाच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन मी त्याला वर दिला होता. ‘मी त्याचा पुत्र व्हावे’ असा त्याने वर मागितला होता. मी त्याला ‘तथास्तु’ म्हणालो. आता हा कश्यप दशरथ म्हणून पृथ्वीवर आलेला आहे. मी त्याचा पुत्र होऊन अवतार घेणार आहे. कौसल्या आणि इतर दोन राण्यांच्या पोटी मी अवतार घेणार आहे. तसेच माझी योगमाया ‘सीता’ नावाने जनक राजाचे घरी जन्म घेणार आहे. तिच्यासह मी सर्व गोष्टी पूर्ण करीन.’’ असे सांगून श्रीविष्णु अंतर्धान पावले. या घटनेनंतर ब्रह्मदेव सर्व देवांना म्हणाले, ‘‘रघुच्या वंशात मनुष्यरूपाने श्रीविष्णु अवतार घेणार आहेत आणि तुम्ही सर्व देवांनी वानरांमध्ये आपापले अंशावतार निर्माण करावे. सर्व देव महापराक्रमी अशा वानररूपात अवतार घेऊन पर्वत, वृक्ष इ. शस्त्रे धारण करून रामअवताराची प्रतीक्षा करू लागले. इथे दुसरा सर्ग समाप्त होतो.
तृतीय सर्गामध्ये वसिष्ठ ऋषींना राजा दशरथ प्रश्न विचारतो. वसिष्ठ ऋषी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टि यज्ञ करण्याचा उपदेश देतात. ते दशरथ राजाकडून पुत्रकामेष्टि यज्ञ करवून घेतात. पोटी संतान नसल्यामुळे राजा नेहमी दुःखी असतो. म्हणून वसिष्ठ ऋषी त्याला यज्ञ करण्यास सांगतात. त्या यज्ञाकरिता तपोधन ऋष्यशृंग ऋषीला घेऊन येण्यास सांगतात. शांता नावाची दशरथाची मुलगी, तिचा पति ऋष्यशृंग हा विभांडक ऋषींचा मुलगा होता. ऋष्यशृंग ऋषींना यज्ञकार्यासाठी बोलावले. त्यांच्याद्वारे पुत्रकामेष्टि यज्ञ संपन्न झाला. त्या यज्ञातून सुवर्णपात्रात पायस घेऊन साक्षात अग्निनारायण प्रगट झाले आणि सांगितले की, ‘‘हा देवांनी दिलेला पायस आहे. पुत्रप्राप्तीचे हे फार मोठे साधन आहे. हा दिव्य पायस घे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरच पुत्ररुपाने तुझ्या पोटी येईल, हे निश्चित समज.’’ असे सांगून अग्निदेव गुप्त झाले. राजानेही वसिष्ठ आणि ऋष्यशृंग या दोन्ही मुनीवर्यांना वंदन केले. त्यांची अनुमती घेऊन त्या पायसाचे दोन समान भाग केले. कौसल्या, कैकेयी या दोन राण्यांमध्ये वाटून दिले. पुत्रदायक पायसाचा लाभ व्हावा म्हणून सुमित्रा तेथे आली असता कौसल्येने आपल्यातील अर्धा भाग आनंदाने सुमित्रेला दिला. कैकेयीने सुद्धा आपल्या पायसातील अर्धा भाग मोठ्या प्रेमाने सुमित्रेला दिला. पायस भक्षण करून त्या तिनही राण्या गर्भ धारण करत्या झाल्या. त्या तिनही राण्या सुंदर अशी दिव्य कांती धारण केलेल्या, देवतांप्रमाणे सुंदर दिसू लागल्या. नऊ महिने पूर्ण होताच दहाव्या महिन्यात शुक्ल पक्षामध्ये नवमी तिथीला शुभकारक अशा पुनर्वसू नक्षत्रावर, कर्क लग्नी, पाच ग्रह उच्चस्थानी असताना चैत्र महिन्यात सूर्य मेषराशीला असताना श्रीरामाचा जन्म झाला. तेव्हा रामावर पुष्पवृष्टि झाली. शंख, चक्र, गदाधारी, चतुर्भुज विष्णुची हास्यमुद्रा पाहून कौसल्याराणी मात्र आश्चर्यचकित झाली. आनंदाने तिचे डोळे भरून आले. ‘‘हे देवा! तुझे हे अलौकिक रूप आवरून धर आणि हे विश्वात्मा, सुंदर, कोमल असे बालरूप धारण कर. तुझे हे चतुर्भुज रूप सदैव माझ्या अंतःकरणात राहो. तुझी मोहमाया मला कधीही मोहित न करो. तुझे बालरूप मला दाखव.’’ त्यावर विष्णु म्हणाले, ‘‘पृथ्वीचा भार हलका करण्यासाठी, रावणाला ठार मारण्यासाठी पूर्वी ब्रह्मदेवाने माझी प्रार्थना केली होती. म्हणून मी मनुष्यरूप धारण केले आहे. मी तुझ्या पोटी जन्माला यावे म्हणून तू आणि दशरथ दोघांनीही पूर्वी तप करून मला संतुष्ट केले. मी संतुष्ट होऊन तुझी इच्छा पूर्ण केली. पूर्वजन्मीच्या तपश्चर्येचे फळ म्हणून तुला माझे दर्शन घडले.’’ श्लोक 19 ते 29 पर्यंत कौसल्येने केलेली स्तुती वर्णन केली आहे. श्रीविष्णु आणि माता कौसल्या यांचा संवाद वर्णन केलेला आहे.
प्रभु रामचंद्र बालरूपात प्रगट झाले आणि बालकासारखे रडू लागले. पुत्रजन्माची आनंदवार्ता ऐकून राजा दशरथ गुरु वसिष्ठांना घेऊन आला. तेवढ्यातच कैकेयीने भरताला जन्म दिल्याची आनंदवार्ता दासी घेऊन आली. सुमित्रेला दोन जुळी मुले झाल्याची शुभवार्ता आली. तेव्हा अतिशय आनंदाने राजा दशरथाने ब्राह्मणांना सोन्याचे अलंकार, रत्ने, वस्त्रे, चांगल्या उत्तम गाईंचे दान दिले. वसिष्ठ ऋषींनी चारही पुत्रांचे नामकरण केले. ज्येष्ठ पुत्र सर्वांना रमविणारा म्हणून त्याचे नाव ‘राम’ ठेवले. सर्वांचे भरण करणारा, पोषण करणारा म्हणून कैकेयीच्या मुलाचे नाव ‘भरत’ असे ठेवले. दशरथाच्या तिसऱ्या, सुमित्रेच्या जुळ्या पुत्राचे नाव ‘लक्ष्मण’ जो चांगल्या लक्षणांनी युक्त आहे आणि चौथा पुत्र ‘शत्रुघ्न’ अर्थात शत्रूचा नाश करणारा. अशाप्रकारे चारही बालकांच्या बाललीला सुरू झाल्या. सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले. दशरथ कौसल्यादि मातांना रमविणारी ही मुले कुमारावस्थेला प्राप्त झाली. यथाकाली त्या चौघांचेही उपनयन संस्कार झाले. चौघेही वेदाध्ययनासाठी गुरूगृही राहू लागले. वेदाध्ययन, शस्त्रविद्या, शास्त्रविद्या या सर्वामध्ये पारंगत झाले.
यापुढील सर्वांगसुंदर कथा रामकथा रामचरित्र वाचनातून आपणास कळणार आहे. आता प्रस्तावनेत एवढे सर्व पुरे झाले. रामजन्माचा, त्याच्या मातापित्यांचा पूर्ववृत्तांत आपण पाहिला आहे. प्रत्येक सर्गामध्ये आपल्याला सुंदर कथा, राक्षसांचे पूर्ववृत्तांत, त्यांचा रामाने केलेला उद्धार अशा सुंदर मनोरंजक कथा आपणास वाचावयास मिळणार आहेत. त्यामुळे आपणा सर्वांचा वाचकवर्गाचा उत्साह आणि उत्सुकता शिगेला पोचणार आहे, हे खात्रीने सांगू इच्छिते.
‘जय श्रीराम’
......
उपरोक्त सर्व तपशील हा ‘सार्थ श्रीमदध्यात्मरामायण’ या श्री. भालचंद्र देवस्थळी यांच्या पुस्तकातून घेतलेला आहे, येथे नम्रपणाने त्यांचा उल्लेख करते.
॥ श्रीराम॥
प्रा. डॉ. अनुपमा डोंगरे
सेवानिवृत्त प्राचार्या
बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय
यवतमाळ