श्री महादेव म्हणाले,
‘‘बिभीषण, हनुमान, अंगद, लक्ष्मण, कपिराज सुग्रीव, जांबवान आणि इतर वानरांना पाहून रामाच्या अंतःकरणाला संतोष वाटला. तो सर्वांना म्हणाला, ‘‘तुमच्या बाहुवीर्याच्या साहाय्याने मी रावणाला मारले. चंद्रसूर्य आहेत, तोपर्यंत तुमची पुण्यकीर्ती जगात राहील. त्रैलोक्याला पवित्र करणाऱ्या आणि कलिदोषांना दूर सारणाऱ्या तुमच्या जयकीर्तीच्या कथांचे जे कीर्तन करतील ते परमगतीला, मोक्षपदाला जातील.’’
इतक्यात रावण मृत होऊन जमिनीवर पडला आहे असे पाहून मंदोदरी वगैरे रावणाने प्रतिपाळ केलेल्या सर्व स्त्रिया शोकाने भूमीवर अंग टाकून विलाप करू लागल्या. बिभीषणानेही अत्यंत शोकपीडित होऊन अनेक प्रकारे विलाप केला. त्याने रावणापुढे जमिनीवर लोळण घेतली. तेव्हा रामाने लक्ष्मणाला सांगितले की, ‘‘तू मान्यांचा मान करणारा आहेस. तरी बिभीषणाला उपदेशाच्या गोष्टी सांग. त्याने बंधुचे उत्तरकार्य करावे. आता विलंब कशाला? मंदोदरी, प्रभृति स्त्रिया जमिनीवर पडून विलाप करीत आहेत, त्या रावणाच्या प्रिय अशा सर्व राक्षसी स्त्रियांचे बिभीषणाने सांत्त्वन करावे.’’ असे रामाने सांगितल्यावर लक्ष्मण बिभीषणाकडे गेला आणि रावणाच्या शवापाशी प्रेततुल्य पडलेल्या, शोकाने विव्हल झालेल्या त्याला म्हणाला, ‘‘बिभीषणा, एवढ्या दुःखाने तू ज्याच्याकरिता शोक करीत आहेस, तो तुझा कोण आहे सांग पाहू? सृष्टीच्या पूर्वी तू त्याचा कोण लागत होतास? सध्या त्याच्याशी तुझा काय संबंध आहे व पुढे काय असणार हे सांग बरे. पाण्याच्या प्रवाहात पडलेले सिकता कण ज्याप्रमाणे ओघाला वश होऊन काही काळ एकत्र जमून राहतात आणि नंतर विखुरतात. त्याचप्रमाणे कालगतीने प्राण्यांचे संयोग आणि वियोग हे घडून येत असतात. दाणे भट्टीत टाकले असता ते जसे खालीवर उडत असतात, अगदी त्याप्रमाणेच ईश्वराच्या मायेने प्रेरित झालेल्या प्राण्यांचे प्राण्यांशी संबंध असतात. तू, आम्ही व दुसरेही सर्व ह्यांना कालगतीने जन्म घ्यावे लागतात. ज्यावेळी आणि ज्यापासून जन्ममृत्यु व्हावयाचे असतील, त्यावेळी त्यापासून ते होणारच. अजन्मा ईश्वर भूतांना निर्माण करून त्यांच्या साहाय्याने अनेक जीवांची उत्पत्ती करवितो व मुले क्रीडा करतात त्याप्रमाणे आपण उत्पन्न केलेल्या आणि स्वस्वाधीन ठेवलेल्या त्या भूतांशी निरपेक्षपणाने क्रीडा करतो. देहाच्या योगाने जीव देहवान होतात. जसे बीजापासून बीज निर्माण होते त्याप्रमाणे एका देहापासून दुसरा देह उत्पन्न होता. जीव देहाहून वेगळा व नित्य आहे. देहदेहिविभाग मुळीच अविवेकामुळे उत्पन्न झाला आहे. जसे काष्ठाचे लांबीरुंदी हे धर्म, विकार, अग्नीच्या ठिकाणी नसूनही त्यावर दिसतात त्याप्रमाणे देहाचे नानात्व, जन्म, नाश, क्षय, वृद्धि, सुखदुःखरूप कर्मफळे हे भाव द्रष्ट्यावर, जिवावर भासतात. ते नानात्वादि धर्म, देहाचा अंतःकरणाशी संयोग होऊन अहंतारूपी चुकीच्या ग्रहामुळे जीवावर दिसून येतात. असत्य, सत्य किंवा ह्याहून काही वेगळी वस्तु असो, जिचे प्राणी सतत आग्रहपूर्वक ध्यान करतो, तिचे ते ते सत्य की मिथ्या धर्म त्याच्यावर दिसून येतात. निद्रेमध्ये आता अहंकार नसल्यामुळे जीवाला संसार भासत नाही, त्याचप्रमाणे जिवंत असताही जो अहंकाराचा त्याग करतो, तो मुक्तच होय. त्याला संसार नाही. म्हणून ‘अहं’ आणि ‘मम’ हा जो मायेचा मनावर आलेला धर्म त्याचा त्याग कर आणि सर्वशक्तिमान, भगवान, परमात्मा रामचंद्र, त्याच्या ठिकाणी चित्त ठेव. राम हा सर्व भूतांच्या अंतर्यामी राहणारा आहे. त्या परमात्मा रामाने मायेने मनुष्यरूप धारण केले आहे. तरी बाह्य इंद्रियविषयांच्या संबंधापासून हळूहळू मनाला काढून घे. त्या विषयांच्या ठिकाणी दोष आहेत हे लक्षात आणून रामचंद्राच्या आनंदरूपी चित्त ठेव. बंधु, माता, पिता, मित्र, प्रिय ही सर्व देहात्मबुद्धीमुळे आहेत. देहाहून आत्मा वेगळा आहे असे एकदा आत्मज्ञान झाले, म्हणजे मग बंधु कोण आणि कोणाचा? भ्राता, माता, पिता, मित्र हे सर्व संबंध वृथा होतात. स्त्री, गृह इत्यादी गोष्टी, शब्दादिविषय आणि अनेक प्रकारच्या संपदा हे सर्व मिथ्या ज्ञानामुळेच उद्भवले आहे. सैन्य, कोश, सेवकगण, राज्य, भूमी, पुत्र वगैरे ह्या सर्व गोष्टी अज्ञानापासून उत्पन्न झाल्या आहेत. त्यांचा समागम क्षणमात्र असून त्यांचा नाश हा ठरलेलाच आहे. म्हणून तू आता उठ आणि भक्तिभावाने प्राप्त होणाऱ्या रामाचे ध्यान कर आणि प्रारब्धभोगानुसार राज्यादि कार्य नित्य चालव. भूत किंवा भविष्य किंवा वर्तमान काळाचा विचार न करता यथान्याय वागत जा. तेणेकरून संसारदोष तुला लागणार नाही. बंधुचे उत्तरकार्य तुला करावयाचे आहे, ते शास्त्रानुसार कर आणि शोक करीत असणाऱ्या स्त्रियांचे निवारण कर. समजूत घाल. तू मोठा सूज्ञ आहेसच. त्यांना लवकर लंंकेत जाऊ दे.’’ बिभीषणाने लक्ष्मणाचे सर्व भाषण ऐकून शोक आणि मोह ह्यांचा त्याग केला. तो धर्मज्ञ होता. धर्म आणि अर्थ ह्यांनी युक्त अशा लक्ष्मणाच्या भाषणाचा मनात नीट विचार करून तो रामाकडे गेला. रामाचीच सेवा करण्याच्या दृढनिश्चयाने तो रामाला म्हणाला, ‘‘प्रभो, ह्या घातकी, खोडसाळ, क्रूर, धर्मव्रतहीन आणि परदारासक्त पुरूषाचे उत्तरकार्य करणे योग्य नाही.’’ हे बिभीषणाचे भाषण ऐकून रामाला संतोष झाला. तो म्हणाला, ‘‘वैर मरणाबरोबर संपत असते. आमचे कार्य पूर्ण झाले तरी त्याचे उत्तरकार्य कर.’’ रामाची आज्ञा शिरसावंद्य मान्य करून बिभीषणाने लगेचच त्या महाबुद्धिमानी राणी मंदोदरीचे सांत्त्वनपर शब्दांनी समाधान केले. बिभीषण धर्मात्मा असल्यामुळे त्याच्या मनाची नेहमी धर्माकडे प्रवृत्ती असे व धर्माचे पूर्ण ज्ञानही त्याला होते. त्याने उत्तरकार्याच्या निमित्ताने सकल बंधुजनांना त्वरेने आणविले. मग रावणाचे शव चितेवर ठेवून पितृयज्ञविधीस अनुसरून अग्निहोत्र्याचे करतात त्याप्रमाणे बंधुजन आणि मंत्रीवर्ग ह्यासह यथाशास्त्र रावणाचे और्ध्वदेहिक बिभीषणाने केले व शवास विधियुक्त अग्नि दिला. नंतर त्याने स्नान करून ओलेत्याने दर्भमिश्रित तिलोदक करून ते विधिपूर्वक अर्पण केले. पुढे त्याने जलांजलि दिली आणि शिरसाष्टांग नमस्कार केला. पुनःपुन्हा सांत्त्वनाच्या गोष्टी सांगून त्या स्त्रियांचे त्याने समाधान केले आणि त्यांना लंकेला जाण्यास सांगितले. नंतर त्या स्त्रिया लंकेत गेल्या. एवढे झाल्यानंतर तो बिभीषण रामाजवळ आला आणि नम्रपणे उभा राहीला.
इकडे पूर्वी वृत्रासुर मारल्याने इंद्राला हर्ष झाला तसाच राम, त्याचे सैन्य, सुग्रीव आणि लक्ष्मण ह्यांना शत्रूचा वध झाल्याने हर्ष झाला. ह्यावेळी मातलीनेही रामाला प्रदक्षिणा घातली आणि नमस्कार केला. मग रामाच्या अनुमतीने तो आकाशमार्गे स्वर्गाला गेला. नंतर आनंदित होऊन राम लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘मी बिभीषणाला लंकेचे राज्य पूर्वीच दिले आहे. तर आता तू जा आणि लंकेमध्ये बिभीषणाला ब्राह्मणांकडून यथाविधी मंत्रपूर्वक अभिषेक करवून घे.’’ रामाने असे सांगितल्यावर लक्ष्मण वानरांसह ताबडतोब लंकेला निघाला. तेथे त्याने समुद्रजलाने भरलेले सुवर्णकलश आणविले व त्या जलाने बुद्धिमान राक्षसेंद्राला उत्तम प्रकारे अभिषेक केला. नंतर नाना प्रकारच्या भेटी हातात घेऊन लक्ष्मण आणि पौरजन ह्यासह वर्तमान बिभीषण रामाच्या भेटीला आला. त्याने ते नजराणे पुढे करून रामाला साष्टांग नमस्कार केला. कोणतीही गोष्ट म्हटली की रामाला त्याचे क्लेश वाटत नसे. बिभीषणाला लंकाराज्याधिष्ठित झाल्याचे पाहून रामाला आनंद झाला. त्याला व लक्ष्मणालाही कृतकृत्य झालो असे वाटले. रामाने सुग्रीवाला आलिंगन दिले आणि म्हटले, ‘‘हे निष्पाप वीरा! तू साह्य केलेस म्हणूनच माझ्याकडून त्या महान रावणाचा पराभव झाला आणि बिभीषण लंकेत राज्याभिषिक्त झाला.’’ नंतर जवळच नम्रपणे असलेल्या हनुमंताला राम म्हणाला, ‘‘बिभीषणाच्या अनुमतीने तू रावणाच्या वाड्यात जा, रावणाचा वध झाला इत्यादी गोष्टी जानकीला कळव आणि जानकी उत्तर देईल, ते सत्त्वर येऊन मला कळव.’’
अशी रामाची आज्ञा झाल्यावर वायुपुत्र मारुतीने लंकापुरीमध्ये प्रवेश केला. सर्व राक्षसांनी ह्यावेळी त्याचा आदरसत्कार केला. रावणाच्या वाड्यात प्रवेश करून शिंशपा वृक्षाच्या मुळाचा आश्रय करून बसलेल्या जानकीची मारुतीने भेट घेतली. ती निष्पाप सीता कृश व दीन झालेली दिसत होती. तिच्या सभोवती राक्षसींचा वेढा असून, तिने केवळ रामाचे ध्यान चालू ठेवले होते. त्या पवनतनयाने, मारुतीने नम्रतापूर्वक तिला प्रणाम केला. त्याने हात जोडले आणि नम्रतेने भक्तिपूर्वक तिच्या पुढे तो उभा राहिला. त्याला पाहून जानकी क्षणभर स्तब्ध राहिली. तेवढ्यात तिला पूर्वगोष्टींचे स्मरण झाले. हा रामाचा दूत आहे, असे जाणून तिला हर्ष झाला व तिचे मुख प्रसन्न झाले. तिचे ते प्रसन्न मुख पाहून मारुतीने रामाचा समग्र निरोप तिला सांगण्यास सुरुवात केली. ‘‘देवि! सुग्रीव, साह्य झालेला बिभीषण, वानरांची सैन्ये आणि लक्ष्मण यासह राम खुशाल आहे. रामाने रावणाचा पुत्र, सैन्य आणि मंत्री यांसह वध केला आणि बिभीषणाला राज्यावर बसविले. त्याने माझ्या मुखातून तुला कुशल कळविले आहे.’’
पतीचा प्रेमाचा निरोप ऐकून तिचा कंठ दाटून आला. ती सद्गदीत वाणीने म्हणाली, ‘‘काय करून आज मी तुला संतोषवू? तुझ्या प्रिय वाक्याची बरोबरी करील अशी तुला देण्यालायक जगात एकही वस्तु मला दिसत नाही. रत्ने आणि भूषणे ह्या आनंदाची फेड करण्यास व्यर्थ होत.’’ जानकीने असे सांगितल्यावर मारुती म्हणाला, ‘‘विविध रत्नसमूहापेक्षा किंवा देवराज्यापेक्षाही शत्रूला मारून व जय मिळवून सुस्थिर झालेल्या रामाचे दर्शन मी घेतो हाच मोठा लाभ समजतो.’’ मारुतीचे हे भाषण ऐकून जानकी त्याला म्हणाली, ‘‘हे सौम्य हनुमंता! सौम्य गुण म्हणून जे काही आहे ते सर्व तुझ्या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. रामाला मी केव्हा पाहीन असे मला झाले आहे. तरी रामाने तशी शीघ्र आज्ञा द्यावी असे कर.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून मारुतीने तिला प्रणाम केला आणि तो रघुत्तमाच्या भेटीसाठी निघाला.
रामाकडे येऊन जानकीचे सर्व भाषण रामाच्या पुढे मारुतीने निवेदन केले. तो म्हणाला, ‘‘जिच्याकरिता एवढ्या कार्याला आरंभ केला आणि जी ह्या सर्व कर्मांची फलप्राप्ती होय, त्या शोकसंतप्त जानकीदेवीला आणवून तू भेटावे, हे योग्य आहे.’’ असे हनुमंताचे म्हणणे ऐकल्यानंतर त्या ज्ञानीश्रेष्ठ रामाने माया सीतेचा त्याग करून अग्नीत असलेल्या जानकीला प्रकट करावे असे मनात आणले. मग राम बिभीषणाला म्हणाला, ‘‘राजा, तू जा आणि जानकीला माझ्याकडे सत्त्वर घेऊन ये. तिला स्नान घालून निर्मल वस्त्रे नेसवून आणि सर्वालंकारांनी भूषवून आण.’’ ते ऐकून बिभीषण मारुतीसह तिकडे गेला. त्याने अत्यंत वृद्ध अशा राक्षसींकरवी जानकीला स्नान घातले. सर्व अलंकार लेवविले आणि उत्तम पालखीत बसविले. त्या सुंदरीबरोबर संरक्षणासाठी म्हणून अनेक भालदार होते. त्यांच्या अंगात कंचुक पायघोळ अंगरखे व डोक्यावर पागोटी होती. त्या जनककन्येला पाहण्याकरिता सर्व वानर धावून आले असता अनेक वेत्रधार त्यांना बाजूला सारू लागले.
मेण्यात बसून आलेल्या त्या जानकीला दुरूनच पाहून राम म्हणाला, ‘‘बिभीषणा, तुझे लोक वानरांना काय म्हणून निवारीत आहेत? सर्व वानरांनी मातेप्रमाणे जानकीचे दर्शन घ्यावे. सीतेने माझ्याजवळ पायी चालत यावे.’’ हे रामाचे बोलणे ऐकून ती सीता पालखीतून उतरली आणि पायी चालत हळूहळू रामाकडे आली. रामानेही विशिष्ट कार्यासाठी निर्माण केलेल्या त्या माया सीतेकडे पाहिले आणि मग तो रघुनंदन राम तिला अनेक दुःशब्द बोलला. हे राघवाने उच्चारलेले शब्द सीतेला सहन झाले नाहीत. ती लक्ष्मणाला म्हणाली, ‘‘माझ्याकरिता लवकर अग्नी पेटवा. रामाचा विश्वास पटावा आणि लोकांची खात्री व्हावी याकरिता मी हे दिव्य करते.’’ रामाची या कृत्याला अनुमती आहे हे जाणून लक्ष्मणानेही लगेचच काष्ठांची मोठी रास रचली आणि अग्नी पेटवला. नंतर तो शत्रुंजय लक्ष्मण रामाजवळ जाऊन उभा राहिला.
पुढे सर्व लोक, देव व राक्षसस्त्रिया ह्या सर्वांसमोर सीतेने भक्तिपूर्वक रामाला प्रदक्षिणा घातली. देवतांना आणि ब्राह्मणांना नमस्कार केले आणि अग्निजवळ जाऊन व हात जोडून सीता म्हणाली, ‘‘माझ्या हृदयात रामावाचून दुसरा विचार कधीही आला नाही, ही गोष्ट खरी असेल तर लोकसाक्षी अग्नी माझे सर्वथा रक्षण करो.’’ असे म्हणून सीतेने अग्नीला प्रदक्षिणा घातली आणि मग पेटलेल्या अग्नीत त्या पतिव्रतेने प्रवेश केला. तिच्या अंतःकरणाला भीती कशीच वाटली नाही. त्या घोर अग्नीमध्ये सीतेने प्रवेश केला हे पाहून सर्व सिद्ध आणि भूतगण अत्यंत उद्विग्न झाले आणि परस्परांना म्हणाले, ‘‘ही सीता म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी, असे असता राम एवढा ज्ञानी असून त्याने त्या सीतेचा त्याग केला, हे कसे?’’
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे द्वादशः सर्गः।