श्री महादेव म्हणाले,
‘‘एकदा संध्यासमयी श्रीराम पर्वताच्या रत्नशिखरी बसला असता सीतेच्या विरहाने झालेला शोक असह्य होऊन म्हणाला, ‘‘लक्ष्मणा, पहा माझी सीता राक्षसाने बळजबरीने हरण करून नेली आहे. ती स्त्री जिवंत आहे किंवा मृत झाली हे निश्चयपूर्वक मला काहीच कळत नाही. कोणी येऊन ती जिवंत असल्याचे मला सांगेल तर तो माझा प्रियकर्ता आहे असे मी समजतो. ती साध्वी कोठेतरी जिवंत आहे असे मला कळेल तर देवांनी जसे सागरमंथनातून अमृत काढले त्याप्रमाणे वाटेल ते परिश्रम करून मी तिला आणीन. बंधो! माझी प्रतिज्ञा ऐक. ज्या कोणी माझी जानकी नेली असेल त्याला पुत्र, सैन्य, वाहने या सर्वांसह भस्मसात करून टाकीन. हे चंद्रवदने सीते! तुला राक्षसगृही राहाणे प्राप्त झाले आहे. दुःखाकूल अवस्थेत मी तुझ्या दृष्टीस न पडल्यामुळे तू प्राण कसे बरे धारण करशील? त्या चंद्राननेवाचून चंद्रही मला सूर्यासारखा तापदायक वाटत आहे. चंद्रा! तू आपल्या किरणांनी प्रथम जानकीला स्पर्श करून नंतर ते किरण शीतल झाल्यावर मगच त्या किरणांनी मला स्पर्श कर. सुग्रीव सुद्धा निर्दय झाला आहे. माझ्या ह्या शोकाकूल अवस्थेत मला भेटत सुद्धा नाही. निष्कंटक असे राज्य मिळाले म्हणून अतिकामुक होऊन एकांतात स्त्रियांशी रममाण झाला आहे. शिवाय मद्यपानात गुंग होऊन गेला असेल. तो कृतघ्न झाला आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. शरत्काल आल्याचे पहात असून सुद्धा तो माझ्या प्रियेचा शोध करण्यासाठी येत नाही. मी यापूर्वी केलेले उपकार विसरून तो दुष्ट कृतघ्न झाला आहे. राक्षसांबरोबर ह्या सुग्रीवाचा सुद्धा नगर आणि बंधुवर्गासह वध करतो. वालीप्रमाणे सुग्रीवाचाही आज माझ्या हातून अंत होणार!’’ अशा त्या क्रुद्ध झालेल्या रामाला पाहून लक्ष्मण म्हणाला, ‘‘आत्ताच मी जाऊन त्या दुष्ट हृदय असलेल्या सुग्रीवाचा वध करून आपल्याजवळ येतो. मला आज्ञा करा.’’ असे म्हणून लक्ष्मणाने धनुष्य, खङ्ग आणि भाता हातात घेतला. सुग्रीवावर आक्रमण करायला उत्सुक झालेल्या लक्ष्मणाला पाहून राम म्हणाला, ‘‘वत्सा! तू सुग्रीवाचा वध करू नकोस. तो माझा प्रिय मित्र आहे. त्याला हवा तर धाक दाखव की ‘हे सुग्रीवा, तू वालीप्रमाणे मारला जाऊ नये’ असे त्याला सांग आणि त्याचे काय उत्तर येते ते घेऊन सत्त्वर ये. नंतर जे काही करणे योग्य असेल ते निःसंशय करीन.’’ त्यावर, ‘ठीक आहे’ असे म्हणून तो भीमपराक्रमी लक्ष्मण किष्किन्धेला गेला. तो एवढा संतप्त झाला होता की आता हा सर्व वानरांना जाळून टाकतो की काय असे भासत होते. वस्तुतः राम हा सर्वज्ञ असून लक्ष्मी-माया सर्वदा त्याच्याजवळच असते. तसेच तो विज्ञानाची केवळ मूर्तीच आहे असे असूनही एखाद्या सामान्य माणसाने आपल्या लौकिक पत्नीबद्दल शोक करावा अगदी त्याप्रमाणे रामाने सीतेकरिता शोक केला. तो राम बुद्ध्यादिकांचा साक्षी असून मायेच्या कार्यापलीकडे, मायेला त्याचा ठाव लागत नाही असा आहे. तसेच रागादि प्रेम, लोभ वगैरे विकार त्याला मुळीच नाहीत. मग अशा ठिकाणी त्यापासून उत्पन्न होणारा शोक कसा संभवेल? तरी पण ब्रह्मदेवाचे वचन सत्य करण्यासाठी आणि दशरथ राजाला त्याच्या तपश्चर्येचे फल देण्यासाठी देवाने मनुष्यवेष धारण केला. सर्व लोक मायेने मोहित आहेत म्हणून अज्ञानयुक्त आहेत. ह्यांना मोक्ष कसा बरे प्राप्त होईल याबद्दल विचार करीत असता सर्व लोकांची पापे जिच्या योगाने दूर होतील अशी ‘रामायण’ नावाची कथा आपण लोकांमध्ये प्रसिद्ध करावी, असे प्रभूने मनात आणले आणि त्यानुसार तो विष्णु रामावतार धारण करून मनुष्यरुपाने पृथ्वीवर आला. देहभावानुसार काम, क्रोध, मोह हे विकार तो धारण करतो आणि अनेक व्यवहारांच्या पूर्तीसाठी त्या त्या काळाला उचित असे आचरण करतो. अशारितीने तो अवश, गुणाधीन अशा प्रजांना मोहवितो. तो स्वतः गुणरहित, त्रिगुणातीत असूनही सकल गुणांच्या ठिकाणी अनुरक्त असल्याचे भासवितो. तो विज्ञानमूर्ती असून त्याची शक्तीही विज्ञानरुपच आहे. तो सर्वांचा साक्षी असून गुणांनी लिप्त होत नाही. म्हणून आकाशाप्रमाणे कामादि विकारांचा त्याला कधीही लेप होत नाही. त्याचे ज्ञान सनकादिक काही मुनींना होते आणि तेच त्याला प्राप्त करून घेतात. निर्मल अंतःकरणाचे त्याचे भक्तही त्याला सर्वदा उत्तम प्रकारे जाणतात. भगवान स्वतः अज, जन्मरहित असून भक्तांच्या इच्छेनुसार जन्म घेतो. इकडे लक्ष्मणानेही किष्किन्धा नगरीजवळ जाऊन चापाचा भयंकर टणत्कार केला आणि सर्व वानरांना भयभीत करून सोडले. त्याला पाहून पर्वतशिखरावर बसलेल्या प्राकृत वानरांनी पाषाण आणि वृक्ष हातात घेऊन मोठा कलकलाट केला. त्यावेळी त्यांना पाहून लक्ष्मण क्रोधाने तप्त होऊन त्याचे डोळे मोठे आणि लाल झाले. तो पराक्रमी लक्ष्मण धनुष्यावर प्रत्यंचा चढवून त्या वानरांचे निर्मूलन करण्यासाठी सिद्ध झाला. तेवढ्यातच लक्ष्मण आला आहे हे जाणून मंत्रीश्रेष्ठ अंगदाने तत्काळ त्या सर्व वानरांचे निवारण केले आणि लक्ष्मणाजवळ जाऊन त्याला साष्टांग नमस्कार केला. तेव्हा प्रियजनांच्या कल्याणकर्त्या त्या लक्ष्मणाने अंगदाला आलिंगन दिले आणि म्हटले, ‘‘वत्सा! जा आणि आपल्या काकाला कळव की राम आता क्रोधसंतप्त झाला आहे. त्याच्या सांगण्यावरूनच मी येथे आलो आहे.’’ ‘ठीक आहे’, असे म्हणून अंगदाने त्वरित सुग्रीवाकडे जाऊन सर्व वृत्तांत त्याला कळविला. तो म्हणाला, ‘‘बाहेर पुरद्वारी लक्ष्मण आलेला आहे. त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले आहेत.’’ ते ऐकून वानरराज सुग्रीव भयभीत झाला. मंत्रीश्रेष्ठ हनुमानाला बोलावून तो म्हणाला, ‘‘तू अंगदाबरोबर जा. लक्ष्मणाकडे लवकर जा आणि विनयपूर्वक त्या क्रोधसंतप्त वीराचे गोड शब्दांनी सांत्त्वन करून त्याला माझ्या मंदिरी घेऊन या.’’ अशारितीने हनुमंताला पाठवून कपिश्रेष्ठ सुग्रीव तारेला म्हणाला, ‘‘अनघे! तू जा आणि आपल्या मधुर वचनांनी त्या लक्ष्मणाचे सांत्त्वन कर आणि शांत झाल्यावर त्याला अंतःपुरात आणून माझी भेट करून दे.’’ ‘ठीक आहे’, असे म्हणून तारा मधल्या दालनात आली. इतक्यात अंगदासह हनुमान लक्ष्मणाजवळ आला. त्याने भक्तिपूर्वक शिरसा वंदन करून लक्ष्मणाचे स्वागत केले आणि म्हटले, ‘‘महाभाग वीरा! हे आपलेच घर आहे. निःशंक मनाने आपण आत यावे आणि राजपत्नी इत्यादिकांना व सुग्रीवाला भेटावे. नंतर आपण जशी आज्ञा कराल त्याप्रमाणे मी करीन.’’ असे बोलून मारुतीने भक्तिपुरस्सर लक्ष्मणाला हाती धरून नगरामधून मिरवीत त्याला राजवाड्यात आणविले. चारी बाजूंनी वानरनायकाचे मोठमोठे वाडे पहात पहात तो लक्ष्मण दुसरे इंद्रमंदिरच आहे की काय अशा त्या राजमंदिरी गेला. तेथे मधल्या दालनात चंद्रवदना तारा सर्व अलंकार अंगावर परिधान करून बसली होती. तिचे नेत्रप्रांत तारुण्यमदाने रक्तवर्ण दिसत होते. लक्ष्मणाला नमस्कार करून स्मितपूर्वक ती म्हणाली, ‘‘भावोजी! या, तुमचे कल्याण असो. तुम्ही सत्पुरुष असून भक्तजनांवर कृपा करणारे आहात. वानरराज सुग्रीव भक्त व सेवक आहे. त्यांच्यावर तुम्ही का बरे रागावला आहात? विश्रांतीरहित त्याने फार दिवसपर्यंत केवळ दुःखच भोगले आहे. आपण त्याला मोठ्या दुःखसमूहापासून रक्षिले आहे. आपल्या कृपेने ह्या महामति सुग्रीवाला सौख्यप्राप्ति झाली आहे. जातीने वानर असल्यामुळे अर्थातच विषयासक्त होऊन रघुपतिच्या सेवेला आला नाही. तरी हे प्रभो! नानादेशी असलेले वानर आता येतील. रघुत्तमा! महापर्वतासमान मोठमोठ्या वानरांना वेगवेगळ्या दिशांतून आणण्यासाठी दहा हजार वानर पाठविले आहेत. तेव्हा सुग्रीव स्वतःच येईल आणि सर्व वानरसेनापतींकडून दैत्यसमुदायांचा आणि रावणाचा वध करील. वानरश्रेष्ठ सुग्रीव आपल्याबरोबर आजच रामाकडे येईल. आमचे अंतःपूर पहा, तेथे पुत्र, स्त्री, इष्टमंडळी ह्यांनी युक्त असलेल्या सुग्रीवाला आपण भेटावे आणि त्याला अभयवचन देऊन आपल्याबरोबर न्यावे.’’
तारेचे भाषण ऐकून लक्ष्मणाचा कोप शांत झाला. नंतर अंतःपुरात सुग्रीव जेथे बसला होता तेथे तो गेला. रुमेला आलिंगन देऊन सुग्रीव पलंगावर बसला होता. लक्ष्मणाला पाहून अत्यंत भयभीत होऊन तो उठला. मद्यधुंद डोळे झाले आहेत, अशा अवस्थेत सुग्रीवाला पाहून लक्ष्मण पुन्हा क्रुद्ध झाला. तो सुग्रीवाला म्हणाला, ‘‘दुष्टा! तू रघुत्तमाला विसरलास ना? वाली ज्या बाणाने मारला गेला तोच बाण आज तुझी वाट पहात आहे. माझ्याकडूनच तू मारला जाऊन वालीच्या मार्गाला जाणार होतास.’’ अशाप्रकारे अत्यंत कठोर भाषण लक्ष्मण करीत असता, वीर हनुमान त्याला म्हणाला, ‘‘आपण असे कसे म्हणता? रामाच्या ठिकाणी आपल्यापेक्षा अधिक भक्ति ह्या वानरराजाची आहे. रामकार्यासाठी तो सदासर्वदा तत्पर आहे. तो विसरला नाही. प्रभो! चोहोकडून कोट्यावधि वानर आले आहेत. ते लवकरच सीतेच्या शोधासाठी जातील. रामाचे कार्य सुग्रीव पूर्णपणे शेवटपर्यंत करील.’’ हे हनुमंताचे भाषण ऐकून लक्ष्मण लज्जित झाला. सुग्रीवाने सुद्धा अर्घ्यपाद्यादिकांनी लक्ष्मणाचे पूजन केले. त्याने लक्ष्मणाला आलिंगन दिले आणि म्हटले, ‘‘मी रामाचा दास असून त्याने माझे रक्षण केले आहे. राम आपल्या तेजाने सर्व लोकांना एका क्षणार्धात जिंकील. समर्था! वानरांसह मी त्याचा केवळ नावाचा सहकारी आहे.’’ लक्ष्मणही सुग्रीवाला म्हणाला, ‘‘मी जे काही तुला बोललो असेन त्याची हे महाभागा! मला क्षमा कर. ते प्रेमाचे भाषण होते. सुग्रीवा! जानकीविरहाने अत्यंत दुःखी होऊन प्रभु राम अरण्यात एकटाच बसला आहे. तेथे आपण जाऊ या.’’ ‘‘होय’’ असे म्हणून लक्ष्मणासह राजा सुग्रीव रथात बसला आणि वानरांना बरोबर घेऊन रामाकडे गेला. भेरी, मृदंग, अनेक अस्वले, वानर, शुभ्र छत्रे, चवऱ्या ह्यांच्या योगे शोभायमान आणि नीळ, अंगदासमान मारुतीप्रभृति वानरांसह तो सुग्रीव रामाकडे आला.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे किष्किन्धाकाण्डे पञ्चमः सर्गः।