कौसल्येच्या हृदयाला आनंद देणारा, दशवदन रावणाचा वध करणारा असा जो कमलनयन रघुकुलतिलक, दशरथपुत्र श्रीराम, त्याचा सर्वत्र जयजयकार होत आहे. पार्वती म्हणाली, ‘‘भगवन्! कौसल्यानंदवर्धक भीमपराक्रमी रामचंद्राने युद्धात रावणादिकांचा वध केल्यानंतर पुढे काय केले? रामाला सीतेसह अयोध्येमध्ये अभिषेक झाला. पुढे मायेने धारण केलेल्या मनुष्यदेहात भूतलावर त्या परमात्मास्वरूप सनातन देवाने किती वर्षे लीलेने वास केला व अंती त्या रघुश्रेष्ठाने मनुष्यलोक कसा सोडला, हे प्रभो! भगवंता! मला सांगा. माझी आपल्यावर फार श्रद्धा आहे. ह्या कथामृताचा आस्वाद घेताघेता माझी तृष्णा अधिकाधिक वाढत आहे. भगवन्! श्रीरामचंद्राची कथा विस्ताराने सांगा.’’
श्री महादेव म्हणाले, ‘‘राक्षसांचा वध करून राज्यावर श्रीराम बसला असता त्याचे अभिनंदन करण्यासाठी विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, पुण्यसंपन्न सप्तर्षि हे सर्व मुनी आले. तसेच अगस्त्य ऋषीही आपल्या शिष्यमुनींसह तेथे आला. द्वाराजवळ आल्यावर त्याने द्वारपालाला सांगितले, ‘‘रामाला सांग की, अगस्त्यप्रभृति सर्व मुनी आशीर्वादपूर्वक तुझे अभिनंदन करण्यासाठी आले असून बाहेर उभे आहेत.’’ अगस्त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो द्वारपाल सत्त्वर आत गेला आणि नमस्कार करून व हात जोडून नम्रतापूर्वक प्रभु रामाला म्हणाला, ‘‘देवा! अगस्त्य ऋषी मुनीगणांसह आपल्या भेटीला आले असून बाहेर उभे आहेत.’’ त्या द्वारपालाला रामाने सांगितले की, ‘‘त्यांना खुशाल आत घेऊन ये.’’ नंतर सत्कार घेत नानारत्नविभूषित अशा त्या राममंदिरात ते मुनी आले. त्यांना पाहताच राम तत्काळ उठला. त्याने हात जोडले, पाद्य, अर्घ्य इत्यादिकांनी त्या मुनींची पूजा केली, शास्त्रोक्त विधीने मधुपर्कासाठी म्हणून वृषभ अर्पण केला व सर्वांना प्रणाम करून त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार दिव्य आसने दिली. त्यावर ते मुनी बसले. रामाने केलेल्या सत्कारामुळे त्यांना अत्यंत हर्ष झाला. कुशल प्रश्न रामाने त्यांना विचारला असता, त्या सर्वांनी आपले क्षेम कळविले. ते म्हणाले, ‘‘महाबाहो, रघुनंदना! तुझ्या राज्यात सर्वत्र कुशल आहे, हे अरिंदमा! शत्रूचा वध करून आल्यावर तुझी आम्हाला भेट होत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. रामा! हा राक्षसेश्वर रावण तुला भारी होता असे नाही. तू एकदा धनुष्य हाती धरलेस की त्रैलोक्य देखील जिंकण्यास तू समर्थ आहेस. तुझ्याकडून रावणादिक सर्व राक्षस मारले गेले ही उत्तम गोष्ट झाली. महाबाहो! रावणाचा वध करणे तुला शक्य होते. परंतु इंद्रजिताचा वध करणे अतिशय कठीण असतानाही तो तू केलास. कुंभकर्णादि सारे राक्षस रणांगणी प्रत्यक्ष मृत्युच होते. रघुत्तमा, मृत्युतुल्य बाणांच्या साहाय्याने तू त्यांचा युद्धात वध केलास. ही अभयदक्षिणा पूर्वीच तू आम्हाला दिली होतीस, त्याचप्रमाणे युद्धात राक्षसांचा वध करून आज तू कृतकृत्य होऊन राहिला आहेस.’’
परब्रह्मस्वरूपी रममाण झालेल्या त्या मुनीचे असे भाषण ऐकून रामाला अत्यंत आश्चर्य वाटले. त्याने हात जोडून विचारले, ‘‘त्रैलोक्यविजयी रावण, कुंभकर्ण इत्यादी सोडून तुम्ही इंद्रजिताची स्तुति करता, हे कसे?’’ महासामर्थ्यवान राघवाचे ते भाषण ऐकून तो महातेजस्वी कुंभयोनि अगस्त्य प्रीतिपूर्वक रामाला म्हणाला, ‘‘रामा! रावणीचे अर्थात इंद्रजिताचे आणि रावणाचे चरित्र, त्यांचे जन्म, त्यांची कृत्ये, त्यांची वरप्राप्ती हे सर्व यथावृत्त मी संक्षेपाने सांगतो. ऐक. रामा! पूर्वी कृतयुगामध्ये ब्रह्मदेवाचा महामति व विद्वान् पुत्र पुलस्त्य तप करण्यासाठी मेरुपर्वताच्या जवळपासच्या भागात गेला. तेथे तो मुनिश्रेष्ठ तृणबिंदूच्या आश्रमात राहून तपश्चर्या करू लागला. तो सर्वदा वेदाध्ययनात आसक्त असे. त्या अत्यंत रमणीय आश्रमात देवांच्या, गंधर्वांच्या कन्या येऊन गात असत. नाचत असत, हसत असत. वाद्ये वाजवित असत. त्या सर्व निखिललावण्यसंपन्न मुलींच्या क्रीडांनी पुलस्त्याच्या तपाला विघ्न झाल्यामुळे तो महातेजस्वी मुनि क्रुद्ध झाला आणि कठोर भाषण करून बोलला, ‘‘जो कोण माझ्या दृष्टीसमोर येईल तो गर्भधारण करील.’’ त्या सर्व मुलींना शापाची भीती वाटून त्या स्थळी जाणे त्यांनी सोडून दिले. परंतु तृणबिंदु राजर्षीच्या कन्येच्या कानी हे वचन आले नव्हते. ती निर्भय चित्ताने त्या मुनीकडे पहात त्याच्या अग्रभागी गेली. तोच तिच्या पोटी गर्भ राहून त्याचे चिह्न, शरीरावरील पांडुरता दिसू लागली. ते आपले देहवैवर्ण्य पाहून ती भयभीत झाली व पित्याकडे गेली. त्या महाप्रभाव तृणबिंदु राजर्षिने तिच्याकडे पाहिले. थोडा वेळ ध्यान केल्यानंतर ज्ञानदृष्टीने त्या पुलस्त्य मुनीचे सर्व कृत्य त्याला समजले. मग पित्याने ती कन्या त्या मुनिश्रेष्ठ पुलस्त्याला दिली. त्या ब्राह्मणाने त्या कन्येचा स्वीकार केला व ‘ठीक आहे’ असे म्हटले. पतिसेवेत ती अत्यंत दक्ष असल्याचे पाहून त्या मुनीला, पुलस्त्याला संतोष वाटला आणि तो तिला म्हणाला, ‘‘उभयकुलांची कीर्ती वाढविल असा पुत्र मी तुला देतो.’’ पुढे पुलस्त्यापासून तिला एक पुत्र झाला, त्याची लोकात फार प्रसिद्धी झाली. हा पौलस्त्य. हा ‘विश्रवा’ ह्या नावाने प्रसिद्ध असून तो पुढे ब्रह्मवेत्ता मुनि झाला. त्याचे शील वगैरे पाहून महामुनि भरद्वाजाने त्या विश्रव्याला आनंदाने आपली कन्या भार्या करून दिली. तिच्या पोटी त्या विश्रव्यापासून एक लोकविख्यात पुत्र जन्माला आला. त्याचे नाव वैश्रवण असून तो अगदी पित्यासारखा होता. त्यावर ब्रह्मदेवाचे प्रेम होते. त्याच्या तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मदेवाने त्याला एक चांगला वर दिला. त्याच्या मनातील हेतू असा होता की ‘आपण सर्वदा धनाधिपति असावे’ नंतर त्याला पाहिजे तसा वर मिळाल्यावर ब्रह्मदेवाने दिलेल्या तेजस्वी पुष्पक विमानात बसून तो पित्याला भेटण्यास आला. त्याने पित्याला नमस्कार केला आणि आपल्या तपश्चर्येचे फळ सांगून म्हणाला, ‘‘भगवान्, ब्रह्मदेवाने मला उत्तम वर दिला. परंतु त्या परमेश्वराने मला निवासाला जागा दिली नाही. तर तुम्ही मला एखादे निश्चित स्थळ सांगा की जेथे कोणत्याही प्रकारची कोणालाही कोणापासून पीडा होणार नाही.’’ विश्रव्यानेही त्याला सांगितले की, ‘‘विश्वकर्म्याने लंका नावाची एक सुंदर नगरी राक्षसांना राहण्यासाठी म्हणून निर्माण केली आहे. विष्णुच्या भीतीमुळे त्या दैत्यांनी हे स्थळ सोडून रसातलात प्रवेश केला आहे. ती पूर्णपणे समुद्राच्या मध्यभागी वसली असल्यामुळे दुसऱ्या कोणापासूनही तिला त्रास होण्याचा संभव नाही. तेथे तू राहण्यासाठी जा.’’ पित्याने असे सांगितल्यानंतर धनद कुबेर त्या नगरीत राहण्यास गेला. तेथे पित्याच्या इच्छेप्रमाणे तो बरेच दिवस राहिला. असा काही काळ गेला. पुढे सुमाली नावाचा एक राक्षस रसातलातून येऊन पृथ्वीवर फिरत फिरत आला. त्या मांसभक्षक राक्षसाने आपल्याबरोबर आपली मुलगी आणली होती. रुपगुणांनी ती साक्षात लक्ष्मीदेवीच की काय असे वाटत होते. कुबेर पुष्पक विमानातून फिरताना पाहून त्या महाबुद्धिमान सुमालीने राक्षसांच्या हितासाठी म्हणून काही विचार मनात आणला. तो आपल्या कैकसी नामक मुलीला बोलावून म्हणाला, ‘‘वत्से! तुझा विवाहकाल येऊन ठेपला आहे. तुझा यौवनकाल जात आहे. हे कल्याणि! तुझ्याकडून मान्यता मिळणार नाही ह्या भीतीने तुझी मागणी कोणीही वर करीत नाही. म्हणून तू ब्रह्मकुलात जन्मलेल्या ह्या मुनीला, विश्रव्याला वर म्हणून स्वीकार. तुझे कल्याण होवो. हे पुण्यशीले! तुला अनायासे ह्या कुबेरासारखे महाबलाढ्य आणि सर्वसौंदर्यसंपन्न पुत्र होतील.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून ती त्या आश्रमात गेली व खाली मुख करून, पायाच्या अंगठ्याने भूमीवर रेघा काढीत लज्जायमान होऊन मुनीच्या पुढे उभी राहिली. तिला मुनीने प्रश्न केला, ‘‘सुंदरी, तू कोण मुलगी आहेस?’’ ती हात जोडून म्हणाली, ‘‘ब्रह्मन्! केवळ आपल्या ध्यानानेच आपण जाणू शकाल.’’ नंतर ध्यान करून मुनीने सर्व जाणले आणि तो तिला म्हणाला, ‘‘तुझा मनोदय मला कळला आहे. माझ्यापासून तुला पुत्र व्हावेत अशी तुझी इच्छा आहे. सुंदरी! तू ह्या भयंकर वेळी आली आहेस म्हणून तुला दोन क्रूर राक्षसपुत्र होतील.’’ ती कैकसी म्हणाली, ‘‘मुनिश्रेष्ठ हो! आपल्यापासूनही अशा प्रकारचे पुत्र होणार हे कसे?’’ त्यावर तो विश्रवा म्हणाला, ‘‘तुला ह्यानंतर जो पुत्र होईल तो महामति, परम भगवद्भक्त, ऐश्वर्यसंपन्न आणि रामभक्ति करण्यात अत्यंत तत्पर असा होईल.’’ असे तिला त्या मुनिने सांगितल्यावर तिला यथाकाल दहा मानांचा, वीस भुजांचा, दहा मस्तकांचा अत्यंत भयंकर असा मुलगा झाला. तोच हा रावण. तो राक्षस जन्माला येताच पृथ्वी थरथर कापली. सर्व प्रकारचे अनिष्टसूचक अपशकुन झाले. पुढे महापर्वतासमान आकाराचा कुंभकर्ण झाला. त्यामागून रावणाची बहीण शूर्पणखा जन्माला आली. नंतर शांत स्वभावाचा, सौम्यदर्शन, वेदाध्ययनशील, नियताहारी आणि नित्यकर्म परायण असा बिभीषण पुत्र झाला. कुंभकर्ण दुष्ट अंतःकरणाचा होता. तो अतिदारुण राक्षस संतुष्ट अंतःकरणाच्या ब्राह्मणांना आणि ऋषिसमूहाला खाऊन टाकत असे. प्राण्यांच्या पोटात जो रोग वाढतो तो त्यांच्या नाशासाठीच वाढतो, त्याप्रमाणे तो महापराक्रमी रावण लोकांच्या नाशासाठीच वाढत होता. तो लोकांना भीतीदायक वाटत असे. रामा! तू विज्ञानदृष्टी असून सर्व प्राण्यांच्या हृदयात जे जे काही चालले आहे ते ते पूर्णपणे ओळखतोस. तू सर्वसाक्षी आहेस. तू सर्वांच्या हृदयात राहाणारा आहेस. तू परम थोर, नित्य उदय पावणारा, निर्मल, लीलेने मनुष्यरूप धारण करणारा आहेस. तुझा महिमा थोर आहे. मायागुणांनी तू लिप्त होत नाहीस. तू लीलेसाठी प्रश्न केलास म्हणून तुला राक्षसाची जन्मकथा सांगतो. मी मूढ आहे तरी तुझ्या कृपेमुळे मी जाणतो की तू केवळ अनंत परब्रह्म आहेस. तुझी शक्ती अचिंत्य आहे. तू चिद्रूप आहेस. तू अक्षर, विकाररहित आहेस. तुला जन्म नाही. तू आत्मतत्त्व जाणतोस. तू आपले रूप गुप्त ठेवले आहेस. तरीही तू धारण केलेल्या मार्गाचेच अनुकरण करून मी वागत आहे.’’ अगस्त्य मुनीने असे सांगितले असता सूर्यवंशातील परम कीर्तीशाली तो रघुपति रामचंद्र हसत अगस्तीला म्हणाला, ‘‘हे संपूर्ण जग मायाश्रित आहे. ते परमेश्वर स्वरूपाहून, माझ्याहून वेगळे नाही. माझे कीर्तन जगात सकल पापांचा संहार करणारे आहे हे ओळख.’’
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे प्रथमः सर्गः।