श्री महादेव म्हणाले,
‘‘श्रीरामाचे भाषण ऐकून अगस्त्य मुनीला परम आनंद झाला. त्या सभेतील सर्व मंडळी ऐकत असता तो म्हणाला, ‘‘पुढे काही काळ गेल्यानंतर वित्ताधिपति देव कुबेर पुष्पक विमानात बसून सहज आपल्या पित्याला भेटण्यास्तव आला. त्या महातेजस्वी व सामर्थ्यवान अशा कुबेराला पाहून कैकसी आपल्या पुत्रांजवळ जाऊन रावणाला म्हणाली, ‘‘पुत्रा! आपल्या तेजाने झळकत असणाऱ्या त्या कुबेराला पाहा! तू ही असा होण्यासाठी प्रयत्न कर.’’ ते ऐकून रावण क्रोधायमान झाला. त्याने तत्काळ प्रतिज्ञा केली की, ‘‘मी थोड्याच दिवसात धनदासारखा किंवा त्यापेक्षा जास्त मोठा होईन. आई! तू व्रतनिष्ठ आहेस. माझ्यावर कृपादृष्टि ठेव आणि काळजी सोडून दे.’’
असे बोलून तो दशानन रावण फलसिद्ध्यर्थ दुष्कर तप करण्यासाठी आपल्या बंधुंसह गोकर्णाला गेला. आपापले नियम पाळून तिघेही मोठी तपश्चर्या करू लागले. सर्व लोकांना अत्यंत तापदायक असे ते घोर आणि दुष्कर तप होते. कुंभकर्णाने दहा हजार वर्षे तप केले. धर्मात्मा सत्यधर्मपरायण बिभीषणाने देखील पाच हजार वर्षे एका पायावर उभे राहून तप केले. दशाननाने सुद्धा देवांची एक हजार वर्षे इतका काळपर्यंत उपोषण केले. नंतर हजार वर्षे पूर्ण होताच आपले एक मस्तक तोडून ते त्याने अग्नीला अर्पण करावे, अशाप्रकारे त्याची नऊ हजार वर्षे निघून गेली. दहावे वर्ष सहस्त्र संपून दहावे मस्तक तोडण्यास रावण सिद्ध झाला असता धर्मात्मा प्रजापति ब्रह्मदेव तिथे आला आणि म्हणाला, ‘‘वत्सा! दशग्रीवा! मी तुझ्या तपाने संतुष्ट झालो आहे. जो तुला इच्छित वर असेल तो माग, मी देईन.’’ ते ऐकून रावणाच्या अंतःकरणाला परम हर्ष झाला. तो म्हणाला, ‘‘जर आपण मला वर देणार आहात, तर मी अमरत्व मागणार आहे. गरुड, नाग, यक्ष, देवता, असुर ह्यापैकी कोणाच्याही हाताने माझा वध होऊ नये, असा वर मला दे. मनुष्ये मला तृणासारखी आहेत.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून ब्रह्मदेव रावणाला पुन्हा म्हणाला, ‘‘असुरश्रेष्ठा! जी मस्तके तू अग्नीत हवन केली आहेस ती पूर्ववत तुला अक्षय अशी प्राप्त होतील.’’ रामा! ह्याप्रमाणे रावणाला सांगून तो भक्तवत्सल ब्रह्मदेव नम्र झालेल्या बिभीषणाला म्हणाला, ‘‘वत्सा बिभीषणा! धर्मासाठी म्हणून तू उत्तम तप केले आहेस. तरी तुला इच्छित व कल्याणकारक वाटत असेल तो वर माग.’’ त्यावर बिभीषणाने त्याला नमस्कार केला आणि हात जोडून म्हटले, ‘‘देवा! माझी बुद्धि नेहमी धर्माच्या ठिकाणी अढळ राहो. माझ्या बुद्धिला केव्हाही व कोठेही अधर्म न आवडो.’’ नंतर प्रजापति संतुष्ट होऊन बिभीषणाला म्हणाला, ‘‘वत्सा! तू धर्मशील आहेस. तसाच राहशील. बिभीषणा! तू मागितले नाहीस, तरी मी तुला अमरत्व देत आहे.’’ नंतर ब्रह्मदेव कुंभकर्णाला म्हणाला, ‘‘हे सुव्रता! तू वर माग.’’ इकडे देवांच्या इच्छेप्रमाणे सरस्वतीने कुंभकर्णाच्या वाणीवर अधिष्ठित होऊन त्याला मोह झाल्यामुळे तो कुंभकर्ण ब्रह्मदेवाला म्हणाला, ‘‘देवा! मला सहा महिने गाढ निद्रा, त्यानंतर एक दिवस भोजनासाठी जागृति, एवढे दे.’’ ब्रह्मदेवाने देवांकडे पाहिले आणि ‘ठीक आहे’ असे त्या कुंभकर्णाला म्हटले. सरस्वतीही त्याच्या मुखातून निघून स्वर्गाला गेली. त्या दुष्ट हृदयाच्या कुंभकर्णाला वाईट वाटले. तो स्वतःशीच म्हणाला, ‘माझ्या तोंडून हे अनपेक्षित वचन निघाले तरी कसे? काय दैवाचा चमत्कार!’
आपल्या राक्षस नातवांना वर मिळाल्याचे समजल्यावर निर्भय होऊन सुमाली प्रहस्तादिकांना बरोबर घेऊन पाताळातून वर आला. त्याने रावणाला आलिंगन दिले आणि म्हटले, ‘‘माझ्या मनोरथाप्रमाणे तुझे मनोरथ होते ही अत्यंत आनंदाची गोष्ट होय. महाबाहो! ज्या भीतीने आम्ही लंका सोडून रसातळाला गेलो ते आम्हाला वाटणारे विष्णुचे फार मोठे भय निघून गेले. आम्ही ज्या लंकेत पूर्वी रहात होतो, ती तुझ्या भावाने कुबेराने बळकावली आहे. ती तू त्याच्याकडून परत मिळवावी हेच तुला योग्य आहे. ह्यासाठी सामाची किंवा शक्तीची योग्य ती योजना कर. राजाला बंधु किंवा सुहृत कोठून असणार?’’ सुमालीने असे म्हटल्यावर रावण म्हणाला, ‘‘असे बोलणे आपल्याला योग्य नाही. धनपति कुबेर हा आम्हाला ज्येष्ठ बंधु असल्यामुळे गुरुसारखा आहे.’’ हे ऐकून प्रहस्त नम्रपणे दशमुखी रावणाला म्हणाला, ‘‘रावणा! माझे म्हणणे यत्नपूर्वक ऐक. तुला असे म्हणणे योग्य नाही. राजधर्म किंवा नीतिशास्त्र ह्यांचे शिक्षण तुला मिळाले नाही. शूर म्हणून जे आहेत, त्यांना बंधुप्रेम हे नाहीच. प्रभो! माझ्या सांगण्याकडे लक्ष दे. महाबलिष्ठ देव आणि राक्षस हे दोघेही कश्यपाचेच मुलगे. त्यांनी आप्तपण सोडून आयुधांनी परस्परांशी युद्ध केले. राजा! देवांशी आपले असलेले वैर आजच सुरू झाले आहे अशातला प्रकार नाही.’’ त्या दुष्टहृदय प्रहस्ताचे भाषण ऐकून ‘ठीक आहे’ असे रावणाने म्हटले. त्याचे डोळे क्रोधाने लालभडक झाले आणि तो त्रिकूट पर्वतावर गेला. त्याने प्रहस्ताला आपला दूत म्हणून पुढे पाठविले. पुढे कुबेराला लंकेतून घालवून देऊन आणि ती लंका आपल्या ताब्यात घेऊन रावण सचिव राक्षसासह तेथे सुखाने राहू लागला. परमकीर्तीशाली कुबेर पित्याच्या आज्ञेनुसार लंका सोडून कैलास शिखरावर गेला आणि तेथे तपश्चर्या करून त्याने शंकराला प्रसन्न केले आणि त्यांच्याशी सख्य जोडले. त्यामुळे शंकरच त्याचे परिपालन करू लागला. पुढे विश्वकर्म्याकडून अलका नगरी बनवली आणि तेथे तो दिक्पाल होऊन राहिला. त्याचे रक्षण शंकराकडून होऊ लागले. इकडे रावणाला त्याच्या धाकट्या बंधुसह राक्षसांनी अभिषेक केला. तो दुष्ट रावण असुरांचे राज्य करू लागला. तेव्हापासून त्रैलोक्याला पीडा देऊ लागला. त्याने आपली विक्राळ स्वरूपाची बहीण, कालखंज कुळातील विद्युज्जिव्ह नावाच्या महाकपटी राक्षसाला दिली. नंतर राक्षसांचा शिल्पी व दितीचा पुत्र जो मय त्याने आपली मंदोदरी नावाची कन्या रावणाला दिली. ही सर्व लोकात अत्यंत सुंदर मुलगी होती. शिवाय रावणाला त्या मयासुराने संतुष्ट चित्ताने एक अमोघ शक्ती दिली. वृत्रज्वाला नावाची वैरोचनाची विख्यात नात, मुलीची मुलगी, ती तिच्या पित्याने स्वतःहून कुंभकर्णासाठी देण्याचे कबूल केले होते. ती मान्य करून रावणाने तिचे कुंभकर्णाशी लग्न लावले. महोदार गंधर्वराज शैलूष, ह्याची कन्या रावणाने बिभीषणाला पत्नी करून दिली. ती अत्यंत धर्मज्ञ होती. ती सर्वलक्षणसंपन्न असून थोर भाग्याची होती. तिचे नाव सरमा होते.
पुढे मंदोदरीला मेघनाद नावाचा पुत्र झाला. जन्माला येताच त्याने मेघासारखी गर्जना केली. त्यामुळे सर्वजण त्याला ‘हा मेघनाद आहे’ असे वारंवार म्हणू लागले. पुढे कुंभकर्णाने म्हटले, ‘‘प्रभो! मला निद्रा फार त्रस्त करीत आहे.’’ म्हणून रावणाने त्याच्यासाठी एक लांब विस्तीर्ण गुहा बनविली. त्या गुहेत तो मूढमति कुंभकर्ण निद्रिस्त होऊन घोरत पडलेला असे. अशारितीने तो निजून राहिला असता रावण सर्व लोकांना पीडा देऊ लागला. ब्राह्मण, मोठमोठे ऋषी, देव, दानव, किन्नर, देवांच्या संपत्ती, मनुष्ये, मोठाले सर्प ह्यांचा तो घात करू लागला. रावणाने सुरू केलेल्या अनर्थाची गोष्ट कुबेराच्या कानी गेली. तेव्हा त्या प्रभूने ‘अधर्म करू नकोस’ असे दूतमुखाने कळवून त्याचे निवारण केले. तेव्हा रावण क्रुद्ध होऊन कुबेराच्या नगरावर चालून आला आणि कुबेराला जिंकून त्याचे उत्तम पुष्पक विमान हिरावून नेले. पुढे यम व वरूण यांना युद्धात जिंकून देवराज इंद्राला मारण्याच्या इच्छेने तो ताबडतोब स्वर्गलोकाला गेला. तेथे देवांसह त्याचे इंद्राशी युद्ध झाले. नंतर रावणावर चालून येऊन देवराजाने त्याला बांधून ठेवले. ते ऐकून प्रतापवान मेघनाद धावून आला आणि मोठे भयंकर युद्ध करून मोठमोठ्या देवांचा त्याने पराभव केला. त्या महाबलिष्ठ मेघनादाने इंद्राला धरून बांधले, आपल्या पित्याला सोडवले आणि त्या इंद्राला घेऊन तो लंका नगरीला गेला. पुढे ब्रह्मदेवाने इंद्राला मेघनादाच्या हातून सोडवले आणि त्या मेघनादाला अनेक वर देऊन ब्रह्मदेव आपल्या लोकी गेला. त्या विजयी रावणाने क्रमाने सर्व लोकांना जिंकून आपल्या परिघासारख्या बाहूंनी कैलास हलविला. ते पाहून तेथील नंदिश्वराने क्रुद्ध होऊन राक्षसराजा रावणाला शाप दिला की, ‘नरवानरांच्या हातून तुझा नाश होईल.’ तरीही त्या शापवचनाची रावणाने पर्वा केली नाही. तो हैहय राजाच्या नगराला गेला. त्याने रावणाला बांधून ठेवले. परंतु पुलस्त्याने तेथून त्याची सुटका केली. नंतर पूर्वीपेक्षाही अधिक बळ मिळवून तो रावण वानरराज वालीला मारण्याच्या इच्छेने त्याच्यावर धावून गेला. परंतु वालीने आपल्या बगलेत त्याला दाबून ठेवले. नंतर रावणाला चारी समुद्रावर गरगर फिरवून त्या वानराने, वालीने सोडून दिले. नंतर त्याच्याशी त्या रावणाने अत्यंत संतुष्ट होऊन सख्य केले. रामा! अशारितीने तो महाबलिष्ठ रावण सर्व जगतांना वश करून स्वतःच त्यांचा उपभोग घेऊ लागला. राजेंद्रा! असा प्रभाव रावणाचा होता तरी इंद्रजितासह सर्व लोकात गर्जत असणाऱ्या त्या रावणाचा युद्धात वध केलास. महात्मा लक्ष्मणाने मेघनादाचा वध केला. पर्वतासारखा कुंभकर्णही तू मारलास. जगाचा आदिकर्ता विभु नारायण तो तू साक्षात आहेस. हे सर्व स्थावर-जंगमात्मक जगत् तुझेच स्वरूप होय. लोकांचा पितामह तुझ्या नाभिकमलामध्ये उत्पन्न झाला आहे. हे रघुत्तमा! वाग्देवी आणि अग्नि तुझ्या मुखापासून उत्पन्न झाली आहेत. लोकपालांचे समुदाय तुझ्या बाहूंपासून झाले आहेत. तुझ्या चक्षुंपासून चंद्रसूर्य झाले आहेत. दिशा आणि विदिशा तुझ्या कर्णापासून झाल्या आहेत. तुझ्या घ्राणापासून प्राण व देवश्रेष्ठ अश्विनीकुमार जन्मला आहे. तुझ्या जंघा, जानू, उरु व कटिभाग ह्यापासून भुर्वलोक इ. झाले. हे हरे! तुझ्या कुक्षीपासून चार समुद्र उत्पन्न झाले. स्तनद्वयांपासून इंद्रवरुण, रेतापासून वालखिल्य झाले. तुझ्या उपस्थापासून यम, गुदापासून मृत्यु व क्रोधापासून त्रिलोचन शंकर निर्माण झाले. अस्थीपासून पर्वत झाले व केसापासून मेघसमुदाय उद्भवले. तुझ्या रोमापासून औषधी व नखांपासून गर्दभादि प्राणी झाले. तू विश्वात्मक विराट स्वरूप असून माया शक्तीला अंगी ठाव दिलास. त्रिगुणांच्या कमीअधिक प्रमाणाने तू नानारुपांनी नटलेला आहेस. तुझाच आश्रय करून देव यज्ञात अमृत प्राशन करीत असतात. हे सर्व चराचरात्मक विश्व तू निर्माण केले आहेस. तुझा आश्रय करूनच सर्व स्थावरजंगम पदार्थ जीव धरतात. राघवा! व्यवहारातदेखील सर्व वस्तू त्वद्रूप आहेत. दुधामध्ये असलेले तूप जसे दुधात सर्वत्र व्यापून असते त्याप्रमाणे तू सर्वांठायी व्यापून आहेस. तुझ्याच तेजाने सूर्यादि प्रकाश पावतात. तू त्यांच्या योगे प्रकाशतोस असे नाही. सर्वव्यापी, नित्य, अद्वय अशा तुला ज्ञानदृष्टिचाच पुरुष पाहू शकेल. आंधळे सूर्याला पाहू शकत नाहीत, त्याप्रमाणे अज्ञानदृष्टि लोक तुला ओळखत नाहीत. योगिजन दिवसरात्र आपल्या शरीरामध्ये तुला शोधीत असतात. वेद शिरोभागी शोभणाऱ्या उपनिषदांनी ‘नेति नेति’ इत्यादी प्रकारच्या निरसनाद्वारा केलेल्या बोधावरून ते अहर्निश तुझा शोध घेतात. त्या योग्यांच्या ठिकाणी तुझ्याविषयी भक्तिलेश का होईना जड वसत असेल, तरच तुझ्या चिद्रूपाचे त्याला दर्शन होईल, अन्यथा होणार नाही. देवेशा! तू सर्वज्ञ आहेस. तुझ्या अग्रभागी जी काही बडबड केली त्याबद्दल तू मला क्षमा करावी. माझ्यावर तुझी कृपादृष्टी असावी. ज्याला दिशा, देश किंवा काल ह्या सीमा नाहीत, ज्याच्याहून वेगळा दुसरा कोणी नाही, जो एक ज्ञानस्वरूप आहे, जो नाशरहित, शाश्वत आहे, जो जन्मरहित आहे. ज्याला चलनादि जाणे येणे नाही, जो सर्वज्ञ आहे, सर्वसमर्थ आहे, ज्याच्या गुणांना अंत नाही, ज्याने माया दूर ठेवली आहे, जो भक्तांना आपल्यापेक्षा वेगळा भासत नाही अशा त्या रघुपतीचे मी भजन करतो.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे उत्तरकाण्डे द्वितीयः सर्गः।