श्री महादेव म्हणाले,
‘‘पुढे सुतीक्ष्ण, जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह मध्याह्नसमयी राम अगस्तींच्या कनिष्ठ बंधूच्या आश्रमात पोचला. त्याने रामाची उत्कृष्ट पूजा केली. नंतर रामाने उत्तम मुळे, फळे इ. चा यथेष्ट आहार घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी ते सर्व अगस्तींच्या आश्रमात गेले. त्या आश्रमात सर्व ऋतूंची फळे आणि फुले सदैव भरपूर उपलब्ध होती. अनेक जातीचे पशुसमुदाय होते. विविध तऱ्हेचे पक्षी एकसारखे शब्द करीत असत. त्यामुळे त्या ठिकाणाला नंदनवनाची शोभा प्राप्त झाली होती. तेथे अनेक ब्रह्मर्षि, देवर्षि रहात होते. अनेक मुनिमंदिरे होती. त्यामुळे तो प्रदेश सुशोभित झालेला होता. जणू दुसरा ब्रह्मलोकच होता. राम आश्रमाच्या बाहेर येऊन सुतीक्ष्ण मुनिला म्हणाला, ‘‘हे सुतीक्ष्णा, तू लवकर जा आणि मी लक्ष्मण, सीतेसह आलेलो आहे असा ऋषि अगस्तींना निरोप दे.’’
हा आपल्यावर फार मोठा अनुग्रहच आहे असे समजून तो घाईघाईने अगस्तींच्या आश्रमात गेला. तेथे ऋषिसमुदाय अगस्तींच्या सभोवताली बसला होता. त्या सर्वांमध्ये जास्तीत जास्त रामभक्तच होते. भक्तिपूर्वक राममंत्राचा अर्थ समजावून सांगत होता. मुनिश्रेष्ठ अगस्तींना बघून बुद्धिमान सुतीक्ष्ण त्यांच्याजवळ गेला. साष्टांग नमस्कार घालून म्हणाला, ‘‘ब्रह्मन्! दशरथपुत्र राम सीता, लक्ष्मणासह आपल्या दर्शनासाठी आला असून हात जोडून बाहेर उभा आहे.’’
अगस्ती मुनि म्हणाले, ‘‘सुतीक्ष्णा, तुझे कल्याण होवो. रामाला लवकर येथे घेऊन ये. तो माझ्या हृदयात राहतो आहे. त्याच्या आगमनाची इच्छा धरून त्याचेच चिंतन करीत मी येथे राहिलो आहे.’’ असे म्हणून अगस्ती मुनि सर्व मुनिंसह उठून भक्तिपूर्वक रामाला सामोरे गेले. रामाजवळ जाऊन म्हणाले, ‘‘रामा! तुझे कल्याण असो. आज तुझा समागम घडला म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी सफल झाला आहे.’’
अगस्ती मुनि येत आहेत असे पाहून रामाला सुद्धा अत्यंत आनंद झाला. त्याने लक्ष्मण आणि सीतेसह जमिनीवर साष्टांग दंडवत प्रणाम केला. त्या मुनिश्रेष्ठाने तत्काळ रामाला उठविले आणि भक्तिपूर्वक त्याला आलिंगन दिले. रामाच्या स्पर्शाने त्याला अतिशय आनंद होऊन त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. त्या मुनिश्रेष्ठाने रामाचा हात धरला, अतिशय आनंदित मनाने आपल्या आश्रमात गेला. राम आनंदाने बसला असता अगस्तीमुनिने षोडषोपचारे त्याची पूजा केली आणि अरण्यातील विविध प्रकारच्या खाद्यफलांचे यथायोग्य भोजन दिले.
पुढे तो चंद्रवदन राम एकांतात बसला असता अगस्तीमुनि हात जोडून म्हणाले, ‘‘हे रामा! तुझ्या आगमनाची मी प्रतीक्षा केली. बरीच वाट पाहिली. पूर्वी जेव्हा ब्रह्मदेवाने प्रार्थना केली होती तेव्हापासून मी तुझ्या दर्शनाची इच्छा करून तुझेच चिंतन करीत राहिलो. सृष्टीच्या पूर्वी तू एक निर्विकल्प आणि उपाधिरहित असा होतास. तुझ्या ठिकाणी आश्रय घेऊन व विषयत्वाने असणारी माया ही तुझीच शक्ति आहे असे म्हटले आहे. तुला निर्गुणाला ही शक्ति जेव्हा आवृत्त करते तेव्हा वेदान्तशास्त्रविद्वान लोक ‘अव्याकृत’प्रधान असे म्हणतात. कित्येक लोक तर तिला मूल प्रकृति, माया, अविद्या तर कोणी संसृति, कोणी बंध अशी निरनिराळी नावे देतात. तुझ्याकडून क्षुब्ध केली गेली म्हणजे ती माया महतत्त्व प्रसवते. तुझ्याकडून प्रेरणा झाली की मग अहंकार निर्माण होतो. आता या महतत्त्वाने युक्त असे अहंकाराचे तीन प्रकार आहेत. त्यांना सात्त्विक, राजस, तामस असे म्हणतात. तामस अहंकारापासून ‘सूक्ष्मभूते’ झाली. त्या सूक्ष्मभूतांपासून स्थूलभूते झाली. त्यामध्ये क्रमाने एक एक गुण अधिक निर्माण झाला. राजस अहंकारापासून ‘दश इंद्रिये’ आणि सात्त्विक अहंकारापासून देवता आणि मन उत्पन्न झाले. त्यापासून सूत्रात्मा अर्थात प्राण निर्माण झाला आणि हे सर्व मिळून व्यापक समष्टि, अवयवी, लिंग शरीर निर्माण झाले. ह्याच विराट स्वरुपापासून सर्व स्थावरजंगमात्मक जगाची निर्मिती झाली. अशारितीने काल आणि कर्म यानुसार क्रमाने देव, पशुपक्षी, मानव इत्यादि निर्माण होतात. तू रजोगुणाचा आश्रय केलास म्हणजे सृष्टीचा उत्पादक ‘ब्रह्मदेव’ होतोस. सत्त्वगुणाचा स्वीकार करून ‘विष्णु’ होतोस. ह्या सृष्टीच्या लयकाळात तू ‘रुद्र’ होतोस. तुझ्या मायेच्या तीन गुणांच्या भेदाने कमीजास्त प्रमाणात बुद्धिवर निरनिराळे परिणाम होतात आणि त्यापासून जागृति, स्वप्न, सुषुप्ति अशा तीन वृत्ती, अवस्था होतात. तू मात्र त्यापासून वेगळा आहेस. तू त्यांचा केवळ साक्षी, ज्ञानस्वरुपी आणि विकाररहित असा आहेस. हे रघुनंदना! जेव्हा तुला सृष्टिरुप लीला करण्याची इच्छा होते तेव्हा तू स्वतः गुणवानाप्रमाणे मायेचा अवलंब करतोस. हे रामा! तुझी माया विद्या आणि अविद्या अशा दोन प्रकाराने सर्वदा भासते. प्रवृत्तिमार्गात-संसारात आसक्त असतात ते अविद्येला, अज्ञानाला वश होतात. तसेच जे निवृत्तिमार्गात आसक्त असतात ते वेदान्तार्थाचा विचार करतात आणि तुझ्या भक्तीत रममाण होतात. तेच विद्यामय, ज्ञानमय होत, असे म्हटले आहे. अविद्येच्या अधीन झालेले सर्वदा संसारीच राहतात. तसेच विद्याभ्यास, तत्त्वज्ञानाभ्यासात रममाण होणारे सर्वथा मुक्त असतात. जगात ते तुझी भक्ति करतात. तुझ्या नाममंत्राचे उपासक असतात. त्यांनाच ज्ञानप्राप्ति होते. इतरांना ती कधीही होत नाही. म्हणून ज्यांच्याजवळ भक्ति असेल तेच मुक्त होतात यात संशय नाही. तुझे भक्तिरुप अमृत ज्यांच्याजवळ नाही त्यांना स्वप्नात सुद्धा मुक्ति मिळणे शक्य नाही. रामा, थोडक्यात सांगतो, ह्या जगात साधुसंगति हाच एक मोक्ष हेतू होय, असे सांगितले आहे. जे समचित्त, निःस्पृह, इच्छारहित, इंद्रियनिग्रही, शांतचित्त तुझ्या भक्तीत रमलेले कोणत्याही प्रकारच्या वासनेपासून अलिप्त असतात ते साधुपुरुष होत. इष्टप्राप्ती किंवा संकटप्रसंगात ज्यांची एकच वृत्ति असते, कोणतीही आसक्ति न ठेवणारे, सर्व कर्मांचा त्याग करणारे आणि सर्वकाळ ब्रह्मस्वरुपात रममाण झालेले असतात. अशा प्रकारच्या साधुपुरुषांचा समागम घडला असता तुझ्या कथाश्रवणाची आवड उत्पन्न होते. भक्ति उत्पन्न झाली म्हणजे प्रत्यक्ष तत्त्वज्ञान होते. चतुर पुरुषांनी स्वीकारलेला हा मुक्तिमार्ग आहे. म्हणून तुझ्या ठिकाणी प्रेमरुप अशी उत्तम भक्ति मला नेहमी प्राप्त व्हावी तसेच हे भक्तजनदुःखहारका, विशेषतः मला तुझा समागम घडावा. आज तुझ्या दर्शनाने माझ्या जन्माचे सार्थक झाले आहे. हे प्रभो! आज माझे सर्व यज्ञ सफल झाले. तुझ्या ठिकाणी अनन्य निष्ठा ठेवून मी दीर्घकाळ तपश्चर्या केली. त्याचे फळ म्हणजे आज माझ्या हातून तुझे पूजन घडले हे होय. हे राघवा! तू सीतेसह माझ्या चित्तात सदैव वास कर. सदासर्वकाळ मला तुझे स्मरण असावे.’’
अशाप्रकारे सीतापति रामाची स्तुति करून मुनिश्रेष्ठ अगस्तींनी पूर्वी महेन्द्राने रामासाठीच म्हणून ठेवलेले धनुष्य त्याला दिले. तसेच कधीही रिकामे न होणारे बाणांचे दोन भाते आणि एक रत्नजडित खङ्गही मुनिंनी रामाला दिले आणि म्हणाले, ‘‘राघवा, पृथ्वीला भारभूत अशा राक्षस समुदायाचा वध कर. त्याच कामासाठी तू मायेने मनुष्यरूप धारण करून पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहेस. येथून दोन योजनांवर आठ कोसांवर गौतमीतीरी पुण्यारण्याने सुशोभित असा पंचवटी नावाचा आश्रम आहे. हे रघुकुलश्रेष्ठा, तुझा वनवासाचा काळ तेथे घालवावा. हे सज्जनपालका, तेथे देवांची अनेक कामे तुला करायची आहेत.’’ सत्यार्थाने युक्त अगस्तीचे उत्तम भाषण व स्तुती ऐकून प्रभु रामाने त्यांचा निरोप घेतला. स्वतः सर्वज्ञ असूनही मुनिंनी सांगितलेल्या मार्गाने प्रयाण केले.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अरण्यकाण्डे तृतीयः सर्गः।