श्री महादेव म्हणाले,
‘‘राम हा जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह मार्गावरुन जात असता कैकेयीला वर दिल्याची वार्ता ऐकून सर्व नगरजन दु:खपूर्ण मनाने म्हणू लागले की ‘‘अरेरे! राजा दशरथाने आपल्या प्रिय आणि सत्यप्रतिज्ञ पुत्राला फक्त पत्नीच्या हेतूपूर्तिसाठी त्यागिले असून त्यात दशरथाचा सत्यवचनीपणा (खरेपणा) कुठे दिसतो. ही कैकेयी तरी किती दुष्ट म्हणायची की त्या सत्यवचनी आणि सर्वांचे प्रिय करणाऱ्या रामाला वनात पाठविण्याचे क्रूरकर्म करण्यासाठी ही मूर्ख कशी बरे तयार झाली?’’ तेव्हा लोकही ‘आपण आजच आणि आताच त्या वनात जाऊ ज्या वनात हा राम सीता आणि लक्ष्मणासह जात आहे. आपणही तिकडेच जाऊ. पहा, पहा ही जानकी कशी पायीपायीच जात आहे. सर्वजण पहा. ही त्र्यैलोक्यसुंदरी जानकी आजपर्यंत कधी दृष्टीस पडली होती काय? आज मात्र सर्व लोकांसमोर अनवाणी पायाने जात आहे. राम सुद्धा त्रैलोक्यात सुंदर असलेला, हत्ती, घोडे यांचा त्याग करुन पायीच चालला आहे. सर्वांचा नाश करणारी ही कैकेयी नावाची कोण राक्षसीणच जन्माला आली आहे. सीतेला पायी चालताना बघून रामालाही वाईट वाटत असेल. अशा प्रसंगात दैवच बलवान असते. पुरुषाचे प्रयत्न दुर्बल होतात असे म्हटले पाहिजे.’ अशा तऱ्हेने ते नगरवासी जन शोकाने व्याकूळ झाले. त्या समुदायात मुनिश्रेष्ठ वामदेव होते ते म्हणाले, ‘‘लोकहो, राम-सीतेबद्दल शोक करु नका. याचे रहस्य मी तुम्हाला सांगतो. यातील रहस्यमय तत्त्व असे आहे की, राम हा साक्षात आदिनारायण विष्णु आहे. ही जानकी तर योगमाया लक्ष्मीच आहे. योगमाया या नावाने ती प्रसिद्ध आहे आणि ह्या रामाच्या मागून जाणारा लक्ष्मण हा तर शेष आहे. हा राम मायेच्या त्रि-गुणांनी युक्त असतो तेव्हा निरनिराळ्या स्वरुपाने जगाला दिसतो. तो रजोगुणाने युक्त असला म्हणजे त्रैलोक्याचे पालन करीत असतो. तोच तमोगुणयुक्त असला म्हणजे जगाचा संहार करणारा रुद्र होतो. पूर्वी ह्यानेच माशाचे रुप घेऊन आपला भक्त वैवस्वत मनुला नौकेत बसवून प्रलय काळात त्याचे रक्षण केले. ह्या रामानेच समुद्रमंथन प्रसंगी मंदार पर्वत सुतलात असता कासवाचे रुप घेऊन त्या पर्वताला पाठीवर धारण करुन आधार दिला होता. प्रलयकाळात पृथ्वी रसातळाला जात असता ह्यानेच वराहरुप घेऊन पृथ्वीचे रक्षण केले. त्याने आपल्या दाढेवर ह्या पृथ्वीला तोलून धरले होते. त्यानंतर प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी ह्या रामानेच नरसिंहाचे शरीर धारण करुन हिरण्यकश्यपूचा वध केला. तसेच अदितीने प्रार्थना करताच वामनरुप धारण करुन इंद्राचे गेलेले राज्य परत मिळवून दिले. पुढे दुष्ट क्षत्रिय भूमीला भार झाले तेव्हा तो भार हरण करण्यासाठी हा राम भार्गवराम परशुराम झाला. तोच जगाचा स्वामी पालनकर्ता आज रामरुपाने अवतरला आहे. आता मात्र तो कोट्यवधी राक्षसांचा नाश करणार आहे. त्या दुष्टात्मा रावणाचे मरण हे मनुष्याकडून होणार असे ठरले आहे. राजा दशरथाने सुद्धा तपश्चर्या करुन हरिची आराधना केली होती. त्याला पुत्रप्राप्तीची इच्छा होती म्हणून श्री विष्णु पुत्ररुपाने दशरथाचे पोटी आले. तो विष्णु म्हणजेच राम रावण इ. चा वध करण्यासाठी आला आहे. आजच आता तो लक्ष्मणाला सोबत घेऊन वनात जाणार आहे. ही सीता म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, स्थिति आणि लय करणारी अशी हरिची माया आहे. म्हणून राजा दशरथ, कैकेयी यापैकी कोणीच रामाच्या वनवासाचे कारण नाही हे समजून घ्या. कालच नारदाने भूभार हरणासंबंधी सांगितले. रामाला ब्रह्मदेवाचा निरोप सांगितला. त्यावेळी राम ‘उद्याच मी वनाला जाईन’ असे सुद्धा नारदांना म्हणाला. म्हणून हे अज्ञानी लोकहो, रामाला ओळखून घेऊन त्याची काळजी करणे सोडून द्या. जे लोक ह्या जगात ‘राम राम’ असा नित्य जप करतात त्यांना मृत्यु वा इतर कोणाचीही कधीच भीती वाटत नाही. अशा ह्या श्रेष्ठ महात्म्याला दु:ख होईल अशी शंकाच मनात ठेवू नका. ह्या कलियुगामध्ये रामनामानेच मुक्ति मिळते, अन्य कशानेही ती मिळत नाही. ह्या रामाने मायेने मनुष्यरुप धारण करुन हा सृष्टिकर्ता, लोककर्ता, सामान्य मनुष्याप्रमाणे वागतो आणि लोकांचे अनुकरण करतो आहे. ईश्वराचे भजन करण्यासाठी, रावणाचा वध करण्यासाठी तसेच दशरथ राजाचे अभिष्ट सिद्धीस जाण्यासाठी त्याने मानवदेह धारण केला आहे.’’ एवढे सांगून महामुनि वामदेव शांत बसले. मुनीचे भाषण ऐकून ‘राम हा साक्षात परमात्माच आहे’ अशी सर्वांची धारणा झाली. रामाबद्दल सर्व संशय मनातून काढून टाकले. सर्व लोक आश्वस्त झाले, ते केवळ रामाचेच चिंतन करु लागले. जो कोणी हे राम आणि सीता यांचे रहस्य हृदयात ठेवून नित्य चिंतन करील त्याला विशेष असे विज्ञान प्राप्त होऊन त्याची रामावर दृढ भक्ति जडेल. ‘‘हे लोकहो! तुम्ही सर्व रामभक्त आहात. हे रहस्य गुप्त ठेवा.’’ असे सांगून वामदेव मुनि निघून गेले. त्या सर्व ब्राह्मणांना ‘राम हा परमेश्वर आहे’ असे ज्ञान झाले.
त्यानंतर राम, लक्ष्मण सीतेसह कोणताही प्रतिबंध न होता पित्याच्या मंदिरात गेला आणि कैकेयीला म्हणाला ‘‘माते! तुझ्या इच्छेनुसार आम्ही तिघे वनात जाण्याचा निश्चय करुनच येथे आलो आहे. तेव्हा आता आम्हाला पित्याची आज्ञा लवकर मिळावी.’’ हे ऐकताच कैकेयी झटकन उठली. तिने रामाला, लक्ष्मणाला, सीतेला तिघांनाही स्वत:च्या हाताने वल्कले आणून दिली. राम, लक्ष्मणांनी वल्कले धारण केली. पण सीतेला मात्र ती वल्कले कशी धारण करावी हे माहीत नव्हते. तेव्हा तिने लाजून रामाकडे पाहिले. रामाने तिला वल्कले नेसविली. हे सर्व बघून राजस्त्रिया रडू लागल्या. त्या स्त्रियांचे रडणे ऐकून वसिष्ठांनी रागाने कैकेयीची निर्भत्सना केली. म्हणाले, ‘‘हे दुराचारी स्त्रिये, तू एकट्या रामाला वनात पाठविण्याचा वर मिळवला होतास तर आता हे दुष्टे, सीतेला तू वल्कले का बरे देत आहेस? पतिव्रता सीता ही भक्तीने रामाबरोबर जात आहे तर तिने दिव्य वस्त्रे धारण करुन आणि नित्य सर्व अलंकार अंगावर घालून स्वत:ला भूषित करावे आणि रामाला सदैव रमवावे. असे केल्याने रामाचे वनवासातील दु:ख निवारण होईल.’’ इकडे दशरथ राजा सुमंत्राला म्हणाला, ‘‘रथ घेऊन ये. वनात राहणारे ऋषिमुनी ह्यांना प्रिय आहेत म्हणून ह्या तिघांना रथात बसवून वनात घेऊन जावे.’’ असे सांगून राजाने राम, लक्ष्मण, सीता यांच्याकडे पाहिले आणि अतिशय दु:खाने राजा मूर्च्छा येऊन जमिनीवर पडला आणि रडू लागला. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. तेवढ्यात सीता सुद्धा रामाच्या देखत रथात चढून बसली. रामाने पित्याला प्रदक्षिणा घातली आणि रथात बसला. लक्ष्मण सुद्धा दोन खङ्गे, दोन धनुष्य आणि दोन भाते हातात घेऊन रथात बसला. सारथ्याला रथ हाकण्यास सांगितले. ‘‘सुमंत्रा, थांब थांब’’ असे दशरथ राजा म्हणाला. परंतु रामाने ‘‘रथ जाऊ दे, जाऊ दे’’ असे म्हणून रथ न थांबविण्याची सूचना केली. सुमंत्राने रथ पुढे चालविला. राम दूर गेल्यानंतर मात्र राजा मूर्च्छा येऊन जमिनीवर पडला. रामाचा रथ पुढे जात असता नगरातले बाल, वृद्ध, प्रौढ, श्रेष्ठ ब्राह्मण ‘‘थांब थांब, रामा थांब’’ असे मोठमोठ्याने ओरडत रथामागून जात राहिले. राजा मात्र बराच वेळ रडत राहिला. नंतर सेवकांना म्हणाला, ‘‘मला राजमाता कौसल्येच्या मंदिरात घेऊन चला. तिच्या मंदिरात मी थोडा काळ तरी जिवंत राहीन. यापुढे मी रामाशिवाय फार काळ जगणार नाही.’’ कौसल्येच्या मंदिरात गेल्यानंतर तो पुन्हा मूर्च्छित झाला. बऱ्याच वेळानंतर तो शुद्धीवर आला. परंतु काहीही न बोलता स्वस्थ बसून राहिला.
इकडे राम आता तमसा नदीच्या काठावर सुखाने राहिला. त्याठिकाणी काहीही न खाता, केवळ पाणी पिऊनच तो परमात्मा एका वृक्षाच्या तळाशी निद्रा घेत सीतेसह राहिला. लक्ष्मण मात्र हातात धनुष्य घेऊन सुमंत्रासह आपण धर्मपालन करीत आहे अशा भावनेने रामाचे व सीतेचे रक्षण करीत राहिला.
सर्व नगरवासी लोक रामाच्या जवळच राहिले. आपणाकडून रामाला नगराला परत नेणे शक्य नाही म्हणून आपणच रामाबरोबर वनात राहू, असा त्यांनी निश्चय केला. रामाला हे जेव्हा कळले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. ह्या सर्वांना केवळ माझ्यासाठी क्लेश भोगावे लागणार हे मात्र स्पष्ट दिसत आहे. अशाप्रकारे विचार करुन तो सुमंत्राला म्हणाला, ‘‘सुमंत्रा, आता आपण निघू या. रथ आण’’ अशी रामाची आज्ञा ऐकून रथाला घोडे जुंपले. राम, लक्ष्मण, सीता तिघेही रथात बसून ताबडतोब निघाले. अयोध्येच्या दिशेने थोडे अंतर जाऊन नंतर ते सर्व जण दूर निघून गेले. इकडे नागरिक मात्र सकाळी उठून पाहतात तर तेथे राम दिसला नाही त्यामुळे नागरिकांना खूप दु:ख झाले. रथ ज्या मार्गावरुन गेला त्या मार्गावरील रथाची चाकोरी बघत बघत ते सर्व लोक अयोध्या नगरात परतले. त्यानंतर सीता-राम यांचे हृदयात सदैव चिंतन करीत राहिले.
इकडे सुमंत्रानेही आदरपूर्वक अत्यंत वेगाने रथ चालविला. सीतेसह राम तो सुंदर प्रदेश बघत असता ते गंगातीरावर येऊन पोचले. नंतर शृंगवेर नावाच्या नगराजवळ गंगेचे दर्शन घेतले. रामाने गंगास्नान केले. त्यामुळे त्याच्या मनाला खूप आनंद झाला. तेथे असलेला गुहराजा, जो भिल्लांचा राजा आणि रामभक्त होता त्याची भेट झाली.
राम आणि गुहराजाची भेट
नंतर तो रघुत्तम राम शिंशप म्हणजेच अशोक वृक्षाच्या तळापाशी बसला. त्यावेळी लोकांकडून ‘राम आला आहे’ ही अतिशय आनंदाची वार्ता गुहराजाला समजली. ऐकल्याबरोबर तो आपला प्रिय मित्र आणि स्वामी जो राम त्याला भेटण्यासाठी, भक्तियुक्त अंतःकरणाने, आनंदाने फळे, मध, फुले इ. सामग्री घेऊन घाईघाईने रामाजवळ आला. आपल्या जवळची सामग्री रामापुढे ठेवून त्याने रामाला साष्टांग प्रणिपात केला. रामाने गुहाला उठवून त्याला आलिंगन दिले. सर्व क्षेमकुशल विचारल्यानंतर गुहाने हात जोडून रामाला म्हटले, ‘‘हे लोकपावन रामा, मी भिल्ल कुळात जन्म घेतला, पण मी आज खरोखर धन्य झालो आहे. मी तुझ्या शरीराला स्पर्श केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. हे रघुत्तमा! तुझ्या ह्या दासाचे भिल्ल राज्य तुझेच आहे, तुझ्या स्वाधीन आहे. येथे राहून तू आमचा प्रतिपाळ कर. चल, आपण नगरात जाऊ. माझे घर तू पावन कर. हे भगवन्! तुझ्याकरिता आणलेली फळे, मुळे इ. चा तू स्वीकार कर आणि आमच्यावर कृपा कर, अनुग्रह कर. मी तुझा दास आहे.’’ त्यावर संतुष्ट होऊन राम त्याला म्हणाला, ‘‘हे मित्रा, मी सांगतो ते ऐक. चौदा वर्षांपर्यंत मला घरात किंवा गावात प्रवेश करता येणार नाही. दुसऱ्या कोणी दिलेली फळे, मुळे इ. काहीच खावयाचेही नाही. तुझे सर्व राज्य माझेच आहे. तू तर माझा परमप्रिय मित्र आहेस.’’
नंतर रामाने वडाच्या झाडाचा चिक आणवून आपल्या व लक्ष्मणाच्या जटांचा मुकुट आदरपूर्वक व्यवस्थित बांधला. तेथे राम-सीता केवळ पाणी पिऊन, दर्भ आणि झाडाची पाने इ.च्या लक्ष्मणाने केलेल्या शय्येवर पूर्वी जसे नगरीत प्रासादांच्या गच्चीवर शृंगारलेल्या पलंगावर निजत असत, तसेच येथेही ते सुखाने निजले. तेथे जवळच बाणांच्या भात्यासह आणि धनुष्य सज्ज ठेवून लक्ष्मण चोहोबाजूंकडे लक्ष ठेवून रामाचे रक्षण करीत होता. लक्ष्मणाबरोबर गुह राजा सुद्धा धनुष्य घेऊन रक्षण करीत होता.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अयोध्याकाण्डे पञ्चमः सर्गः।