॥ श्रीगणेशाय नमः॥
॥ श्रीमदध्यात्मरामायणम् ॥
(माहात्म्यकथन)
सर्वप्रथम गणेशवंदना केल्यानंतर प्रत्यक्ष ज्ञानस्वरुप असलेल्या, दक्षिणामूर्तीरुपाने ज्ञात असलेल्या त्या श्रीशिवशंकराला नमस्कार असो.
ज्ञान संपादनासाठी प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ति, अनुपलब्धि या सहा प्रमाणांची आवश्यकता असते. परंतु या प्रमाणांनी सुद्धा जे कळत नाही, जे अधिभौतिक, अधिदैविक, आध्यात्मिक याच्या पलीकडे असून ईश्वर, माया, जीव ह्या तिन्हीच्या पलीकडे आहे. विकार किंवा विषयांनी जे अवलिप्त नाही अशा त्या शुद्ध, निर्मल, ज्ञानस्वरूप असल्यामुळे मन, वाणी याच्या पलीकडे असलेल्या शिवस्वरुपाला वंदन असो.
पुराणामध्ये ज्यांचा उल्लेख येतो असे प्राचीन ऋषि सूत हे व्यासांचे शिष्य होते. सूतमुखाने आपल्याला अध्यात्मरामायण समजून घ्यायचे आहे. ही झाली प्रस्तावना.
सुरुवातीलाच नारद आणि ब्रह्मदेव यांची भेट वर्णन केलेली आहे. त्रैलोक्यामध्ये सर्वत्र संचार करणारे नारदमुनी सद्भावनेने अर्थात इतरांवर अनुग्रह करण्याच्या इच्छेने एकदा सत्यलोकात म्हणजेच ब्रह्मलोकास प्राप्त झाले. मार्कंडेय इ. मुनींकडून सरस्वतीसह बसलेल्या ब्रह्मदेवाला नारदाने साष्टांग नमस्कार केला. सर्व जगाचा स्वामी, चतुर्मुख अशा ब्रह्मदेवाला नारदांनी वंदन केले. स्तुति करण्यास आरंभ केला. नारदांवर संतुष्ट झालेल्या ब्रह्मदेवांनी नारदाला येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा नारदमुनी सातव्या श्लोकापासून सोळाव्या श्लोकापर्यंत कलियुगात लोकांचे आचरण कसे राहील, चारही वर्णांचे लोक आपला स्वधर्माचा त्याग करून हिंसाप्रवण, पशुवत् बुद्धि धारण करून क्रूर कर्मे करतील इ. चे वर्णन करून सांगतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे तीनही वर्ण धर्मानुसार आचरण करीत नसून शूद्र मात्र ब्राह्मणांचे आचार पालन करण्याचा सतत प्रयत्न करतील. स्त्रिया भ्रष्ट होतील. हे सर्व समाजात कलिमुळे घडलेले परिवर्तन पाहून खिन्न झालेले नारद चिंतेने व्याकूळ होऊन या सर्व लोकांना परलोक कसा प्राप्त होईल याबद्दलचा उपाय सांगावा असे ब्रह्मदेवाला म्हणतात. ब्रह्मदेव नारदाला प्रश्नाचे उत्तर देतात.
भक्तांवर कृपा करणारी माता पार्वती भगवान शंकराला श्रीरामाच्या तात्त्विक स्वरुपाविषयीच्या उत्सुकतेने विनयपूर्वक विचारते. यापुढे शिव-पार्वती संवाद श्लोक 19 ते 27 पर्यंत आलेला आहे.
श्रीशिव-पार्वती संवाद
श्री शिवशंकराने आपल्या प्रिय पत्नीला अर्थात पार्वतीला आजवर गुप्त असलेल्या ‘अध्यात्मरामायण’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या एका उत्तम अशा पुराणग्रंथाची स्वतःहून सर्व कथा सांगितली.
पार्वती देखील अध्यात्मरामायण ग्रंथाचे सतत पूजन, स्मरण, मनन अर्थात ध्यान करून जगाला आधार देणारी जगन्माता स्वानंदामध्ये मग्न होऊन राहिली. पार्वतीच्या निमित्ताने प्रगट होणारी ही कथा प्रगट होण्यापूर्वी कशा अवस्थेत होती हे प्रथम शिवशंकर सांगतात.
अध्यात्मरामायण जोपर्यंत प्रगट झालेले नव्हते तेव्हा अतोनात पापे घडत होती. ब्रह्महत्त्या इ. महापातके घडत होती. कलियुगात कलिचे माहात्म्य निश्चितपणे वाढत राहणार अशी अवस्था मृत्युलोकामध्ये होती. यमदूत निर्भयपणे संचार करीत होते. पृथ्वीतलावर सर्व शास्त्रे आपापसात भांडण करीत होती. जोवर अध्यात्मरामायण प्रगटरुपात येत नाही तोपर्यंत हे सर्व सुरू राहील.
श्रीरामाचे मूळ सत्यस्वरुप सहज समजण्यासारखे नाही. हे नारदमुनी! अध्यात्मरामायणाचे संकीर्तन, श्रवण, मनन इ. चे काय फल यासंबंधी योग्य रितीने मी वर्णन करून सांगू शकत नाही. असं जरी असलं तरी पण मी पूर्वी जे ऐकले ते तुला सांगतो. एकाग्रचित्ताने तू नीट ऐकून घे.
अध्यात्मरामायण फलश्रुती - श्लोक 28 ते 41 पर्यंत फलश्रुतीचे वर्णन केलेले आहे.
प्रतिश्वासं सविश्वासं रामं वद दिने दिने
को विश्वासः पुनः श्वासः आगमिष्यति वा न वा॥ राम राम
अध्यात्मरामायणातील श्लोक किंवा श्लोकार्थ जो कुणी भक्तिश्रद्धायुक्त होऊन पठण करील तो क्षणात पापातून मुक्त होईल, अशाप्रकारे जणू अभिवचनच दिलेले आहे. जो दररोज एकाग्रतेने भक्तिपूर्वक पठण करील तो मनुष्य खरोखर जीवन्मुक्तच होय. ग्रंथपूजनाने अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त होते. जो ग्रंथाचे श्रवण करतो तो सुद्धा पापमुक्त होतो. ग्रंथाजवळ जाऊन जो नमस्कार करतो त्याला सर्व देवतांची उपासना केल्याचे फळ मिळते.
जो कुणी अध्यात्मरामायण ग्रंथ लिहून रामभक्तांना देईल त्याच्या फलप्राप्तीबद्दल सांगतात - त्याला चारही वेदांचा अभ्यास करून किंवा शास्त्राचे व्याख्यान देऊन निरूपण केल्याचे जे फळ ते सर्व फळ लेखकाला मिळते. हे विष्णुभक्त नारदा, जो रामभक्त एकादशीच्या दिवशी उपवास करून अध्यात्मरामायणावर प्रवचन करतो त्याला होणारी फलप्राप्ती वर्णन करता - प्रवचन करणाऱ्या व्यक्तीला गायत्री पुरश्चरण केल्याचे फल प्राप्त होते. श्रीरामनवमीच्या दिवशी उपवास व्रत करून रात्री जागरण करून भक्तिने एकाग्र मनाने या ग्रंथाचे पठण करील, कुरूक्षेत्र इ. सर्व पुण्यतीर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी सूर्यग्रहणाच्या काळात पाण्यात उभे राहून स्वतःच्या वजनाएवढे धन ब्रह्मनिष्ठ अशा ब्राह्मणाला दान देऊन जे पुण्य मिळते ते या ग्रंथपठणाने मिळते. जो कुणी मोठ्या आनंदाने रात्रंदिवस ग्रंथाचे गायन करतो त्याची आज्ञा तर इंद्रादिक देव सत्त्वर पालन करतात. दररोज ग्रंथपठण करण्याचे व्रत जो कुणी करीत असेल त्याला केलेल्या कर्माचे कोटींनी फळ देणारे ठरते.
अशाप्रकारे वाचक, पाठक, श्रोता या सर्वांना ग्रंथश्रवणाचे फल कसे मिळते याचे वर्णन केलेले आहे. यापुढे श्रीरामहृदय पठण माहात्म्य स्पष्ट करून सांगतात.
श्रीरामहृदय पठण माहात्म्य
अध्यात्मरामायण या ग्रंथारंभीच असलेल्या ‘श्रीरामहृदय’ या भागाचे स्थिरचित्ताने पठण करणारा, अतिशय भयंकर अशा ब्रह्महत्त्या इ. पापांनी युक्त असला तरी तो तीन दिवसातच शुद्ध होतो, पापमुक्त होतो. जो भक्त हनुमंतरायासमोर बसून मौन धारण करून दररोज तीन वेळा श्रीरामहृदयाचे पठण करतो त्याला मनोवांछित सर्व पूर्ण झाल्याचे भाग्य प्राप्त होते. तुळस, अश्वत्थ ह्या वृक्षांना प्रदक्षिणा करताना श्रीरामहृदय पठण करील त्याच्या प्रत्येक अक्षराला ब्रह्महत्त्येचे पाप नाहीसे होते.
श्रीरामगीता माहात्म्य
ह्या रामगीतेचे माहात्म्य श्री शिवशंकर पूर्णपणे जाणतात. माता पार्वती त्यांच्यापेक्षा निम्मे जाणते. त्याहीपेक्षा मी निम्मे जाणतो. असे ब्रह्मदेव मुनिश्रेष्ठ नारदांना सांगतात. श्लोक 45 पासून तर 59 पर्यंत रामगीता माहात्म्य वर्णन केले आहे.
श्रीरामाने उपनिषदरुपी सागराचे मंथन करून गीतारुपी अमृत निर्माण करून लक्ष्मणाला दिले. लक्ष्मणाने हे श्रीरामगीतारुपी अमृत सर्वप्रथम प्राशन केले. त्यानंतर जमदग्नीचा पुत्र परशुराम हा कार्तवीर्य राजाचा पराभव करण्याच्या हेतुने धनुर्विद्येचा अभ्यास करण्यासाठी शंकराकडे राहिला. तेथे पार्वतीदेवीने दररोज पठण आणि अध्यापन केल्यामुळे परशुरामाने प्रयत्नपूर्वक श्रवण करून रामगीता मुखोद्गत केली आणि नारायणस्वरूपाला प्राप्त करता झाला. दुष्ट दानाचा स्वीकार, वाईट अन्नाचे भोजन, वाईट, दुष्ट शब्दोच्चार यामुळे होणारे पाप श्रीरामगीता पठणाने नष्ट होते.
शाळिग्राम शिळा, तुळशीच्या जवळ, संन्याशापुढे जो रामगीता पठण करतो त्याला मिळणारे फळ तर वर्णनही करता येत नाही असे आहे. श्राद्धाच्या वेळी रामगीतेचे भक्तिने पठण करून जो ब्राह्मणभोजन करतो त्याचे सर्व पितर विष्णुच्या श्रेष्ठ पदाला पोचतात. केवळ रामगीतापठणाने दान, ध्यान, तीर्थयात्रा न करताही त्यापासून मिळणारी अनंत फळे प्राप्त होतात.
ब्रह्मदेव नारदाला सांगतात, श्रुति, स्मृति, पुराणे, इतिहास इ. आगम किंवा शास्त्रे ही सर्व अध्यात्मरामायणाच्या एका छोट्याश्या भागाच्याही योग्यतेची होणार नाहीत. जो मनुष्य श्रीरामचरित्राचे माहात्म्य पठण करील, श्रवण करील तो देवांनाही पूजनीय होईल. अंती विष्णुपद प्राप्त करून घेईल.
.........