श्री महादेव म्हणाले,
‘‘तेवढ्यातच सुमित्रेने रामाला पाहून ते वृत्त घाईघाईने कौसल्येला कळविले. रामाचे नाव ऐकताच तिने रामाकडे पाहिले. त्या विशालनयन रामाला पाहताच त्याला आलिंगन देऊन आपल्या मांडीवर बसविले. रामाचे मस्तक हुंगून त्याच्या नीलवर्ण कमळाप्रमाणे असलेल्या शरीरावरुन हात फिरविला. नंतर त्याला म्हणाली, ‘‘बाळा, तू फार भुकेला असशील तर हे गोड पदार्थ खाऊन घे.’’ रामाने त्यावर म्हटले ‘‘माते, आज मला आता भोजनाला देखील वेळ नाही. कारण आज आताच मी ताबडतोब दण्डकारण्यात जावे हे निश्चित झाले आहे. माझ्या सत्यप्रतिज्ञ पित्याने कैकेयीला दिलेल्या वराने भरताला राज्य दिले आहे आणि मला उत्तम असा अरण्यवास दिला आहे. मुनिवेष धारण करुन चौदा वर्षे तेथे राहून नंतर मी लगेच पुन्हा परत येईन. तू चिंता करु नकोस.’’ असे रामाचे भाषण ऐकून कौसल्या एकाएकी दु:खी होऊन मूर्च्छित झाली. काही वेळाने सावध झाल्यानंतरही ती अतिशय दु:खाने रामाला म्हणाली, ‘‘हे रामा! जर तू खरोखर वनात जाणार असशील तर तू मलाही तुझ्यासोबत घेऊन चल. तुझ्याशिवाय मी क्षणभर सुद्धा प्राण धारण करणे शक्य नाही. तू मला प्राणापेक्षाही प्रिय आहेस. तुला सोडून मी राहूच शकत नाही. भरताला महाराजांनी खुशाल राज्य द्यावे. परंतु तू त्यांचा अतिशय प्रिय असूनही तुला वनवासाला जाण्याची आज्ञा ते कशी काय करतात? त्याचे कारण काय आहे? कैकेयीला राजांनी वर दिला असेल तर तिला सर्वस्व द्यावे. पण हे रामा, तू त्यांचा असा कोणता अपराध केला म्हणून तुला वनवासाला पाठवित आहेत? पिता हा गुरुप्रमाणे पूज्य असतो म्हणून तुला ते पूज्य आहेत. जरी त्यांनी तुला वनात जाण्याचा आदेश दिला तरी मी तुला, माझ्या मुलाला ‘पाठवू नये’ असा प्रतिबंध करते. जर तू माझ्या आज्ञेचे उल्लंघन करुन राजाज्ञेने वनात जाशील तर मी तत्काळ प्राणत्याग करीन.’’ कौसल्येचे असे भाषण ऐकून लक्ष्मण अतिशय क्रुद्ध झाला. त्यावेळी तो त्रैलोक्याला जाळेल की काय असे वाटू लागले. त्याने रामाकडे पाहून म्हटले ‘‘हे रामा! हा भरत उन्मत्त झाला आहे. त्याच्या मनात भ्रम निर्माण झाला आहे. कैकेयीच्या अधीन राहून वागणारा झाला आहे म्हणून त्याला साहाय्य करणारे बंधु, त्याला आणि मातुलांना सुद्धा बांधून ठार करतो. पूर्वी प्रलयकारी लोकांचे दहन करणाऱ्या शंकराने जसे शौर्य दाखविले तसेच आज माझे शौर्य लोकांनी पहावे. हे रामा, शत्रूनाशना, तू स्वत:च्या अभिषेकासंबंधी यत्न कर. तुलाच अभिषेक होईल असे कर. मी स्वत: तेथे हातात धनुष्य घेऊन तयार राहतो. जे कोणी विघ्न आणतील त्यांना सर्वांना मी ठार करीन.’’
असे बोलणाऱ्या लक्ष्मणाला रामाने आलिंगन दिले आणि म्हटले, ‘‘हे रघुकुलश्रेष्ठा, तू शूर आहेस मी हे चांगलेच जाणतो परंतु तसे करण्याची ही वेळ नाही. अरे जर हे राज्य, देह इ. जे काही सर्व दिसते आहे ते जर सत्य असते तर त्या बाबतीत केलेला प्रयत्न यशस्वी झाला असता. पण हे भोग म्हणजे मेघात चमकणाऱ्या विजेप्रमाणे चंचल आहेत आणि आपले आयुष्य तरी काय आहे, अग्निने तप्त लोखंडावर पडलेल्या जलबिंदूप्रमाणे क्षणभंगूर आहे. जसा सापाच्या तोंडात सापडलेला बेडूक त्याही परिस्थितीत चावा घेण्याची अपेक्षा करतो त्याप्रमाणे कालरुपी सर्पाकडून ग्रासलेला मनुष्य सुद्धा नश्वर अशा भोगाची इच्छा करतो. शरीराला विविध भोग मिळावे म्हणून मनुष्य रात्रंदिवस कष्ट करतो. अनेक प्रकारची कामे करीत असतो. परंतु हा देहच जर त्या अंतरात्म्यापासून भिन्न आहे तर मग कोणते भोग त्या पुरुषाला भोगायला मिळतात? पिता, पुत्र, माता, बंधू, पत्नी, सोयरे-धायरे इत्यादिकांचा समागम म्हणजे खऱ्या अर्थाने पाणपोईवर अनेक लोक क्षणभर एकत्र येतात तशाच प्रकारचा हा सर्व जीवमात्रांचा समागम आहे. वाहत्या नदीत काष्ठ आणि प्रवाहाचा संबंध जसा चंचल असतो त्याप्रमाणे जीवमात्राचा समागम क्षणिक आहे. ऐश्वर्य हे छायेप्रमाणे चंचल असते. तसेच तारुण्यसुद्धा पाण्याच्या लाटांप्रमाणे अस्थिर आहे. स्त्रीसुख तर स्वप्नासारखे असून आयुष्य तर अतिशय थोडे आहे. हे सर्व प्रत्येकाच्या अनुभवास येत असूनही प्राणिमात्र त्याचाच अभिमान बाळगत असतात. संसार हा स्वप्नाप्रमाणे आहे. रोग इ.नी त्रस्त झालेला असतो. गंधर्वनगर हेच नाव त्याला योग्य आहे. तरी सुद्धा मूर्ख लोक त्या संसाराला सुख मानून त्यातच राहतात.
सूर्याचा उदय आणि अस्त यानुसार आयुष्य हे सतत क्षीण होत असते. इतरांचे वार्धक्य आणि मृत्यू पाहून सुद्धा त्यापासून काही बोध घेत नाही. तोच दिवस आणि तिच रात्री आहे. मनुष्य मात्र भोग भोगण्यात आसक्त होतो आणि काळाचा वेग त्याला कळतच नाही. प्रत्येक क्षणाला आपले आयुष्य, कच्च्या घटातील पाण्याप्रमाणे कमी कमी होत जाते. रोगाचे शरीरावर शत्रूसारखे सतत प्रहार होत असतात. वृद्धावस्था एखाद्या वाघिणीप्रमाणे भीती दाखवित पुढे उभीच असते. मृत्यु तर जन्मापासून आपल्या सोबतच असतो, तो फक्त वेळेचीच वाट पाहात असतो.
मनुष्य मात्र देहाचा अभिमान बाळगतो, ‘मी राजा आहे, सर्व लोकात प्रसिद्ध आहे’ असे स्वत:ला समजत असतो. वास्तविक ह्या देहाला किडे, भस्म, मल इ. पैकी नाव देणे योग्य ठरेल. हा देह त्वचा, हाडे, मांस, मल, मूत्र, रेत, रक्त इ. नी युक्त आहे. देह हा विकारी आहे, परिणाम पावणारा आहे तर तो निर्विकारी आत्मा कसा काय असेल? सांग बरे. अशा ह्या नश्वर देहाचा अभिमान धरुन हे लक्ष्मणा, तू लोकांना जाळू इच्छितो आहे. देहाभिमानामुळेच मनुष्याकडून सर्व दोष घडत असतात. ‘हा देह म्हणजे मी’ अशी जी बुद्धि तिलाच अविद्या म्हणतात. या उलट मी देह नसून ज्ञानस्वरुप आहे अशी जी बुद्धि म्हणजे विद्या होय. ही अविद्याच संसाराचे मूळ कारण आहे. विद्या मात्र संसाराला दूर करणारी अशी आहे. म्हणून मुमुक्षू लोकांनी विद्या अभ्यासाच्या, ज्ञानाच्या बाबतीत सतत प्रयत्नशील असावे. हे शत्रूनाशना लक्ष्मणा! ह्या कार्यात काम, क्रोधादि शत्रू आहेत. तरी पण मोक्षाच्या कामी विघ्न आणण्यासाठी एकटा क्रोध पुरेसा आहे. म्हणून क्रोधाविष्ट होऊन मनुष्य आप्त, मित्र, पिता इ. चा नाश करण्यासाठी प्रवृत्त होतो. क्रोध हे मन:स्तापाचे मुख्य कारण आहे आणि त्यामुळेच मनुष्य संसारबंधनात अडकतो. क्रोध हा धर्माचा क्षय करणारा आहे म्हणून हे लक्ष्मणा, क्रोधाचा त्याग कर. क्रोध हा महान शत्रू आहे. तृष्णा म्हणजेच काम इत्यादिकांची इच्छा म्हणजे एक वैतरणी नदीच आहे. ही यमाच्या नगराजवळ असून गलिच्छ पदार्थांनी भरलेली आहे. याउलट संतोष हे खरे नंदनवन आणि शांति म्हणजे साक्षात कामधेनुच होय.
म्हणून हे लक्ष्मणा! तू क्षमा, शांति धारण कर, म्हणजे तुला कोणीच शत्रू राहणार नाही. आत्मा हा देह, इंद्रिये, मन, प्राण, बुद्धी इ. पासून वेगळा आहे. जोपर्यंत देह, इंद्रिय, प्राण यापेक्षा आत्मा भिन्न आहे हे ज्ञान झालेले नसते तोपर्यंत संसारातील दु:खाने प्राणी त्रस्त होतो, दु:खी होतो. मृत्युच्या भितीने भयभीत होतो. म्हणून तू नेहमी आत्मा हा देहादिकांहून भिन्न आहे हे पक्के लक्षात ठेव. आपण बुद्धी इ. पेक्षा वेगळे आहोत असे समजले तर सर्व बाह्य व्यवहार त्याप्रमाणे समजून घे. त्यात वाईट वाटून घेऊ नकोस. प्रारब्धकर्मानुसार सुख, दु:ख भोगीत राहा. अशा तऱ्हेने संसाररुपी प्रवाहात राहून सर्व कर्मे करशील तर ती कर्मे तुला बाधणार नाहीत. तुला कर्माचा दोष लागणार नाही. हे रघुकुलोत्पन्ना, लक्ष्मणा, वरवर जरी सर्व कर्माचे कर्तेपण तुझ्याकडे असले तरी तुझ्या अंत:करणात शुद्ध भाव असल्यामुळे त्या कर्माचा दोष तुला लागणार नाही, हे तू नीट ध्यानात ठेव. एवढे केले म्हणजे संसारात कोणतीही आणि कितीही दु:खे आली तरी तुला बाधणार नाहीत. हे माते! तू सुद्धा माझे म्हणणे सदैव लक्षात ठेव. माझ्या परत येण्याची वाट पहा. फार काळ तुला दु:ख भोगावे लागणार नाही. ह्या कर्मलोकात असलेल्या प्रत्येकाला नित्य संगती फार काळ लाभत नाही. ते शक्यही नाही. जसे नदीच्या प्रवाहात पडलेल्या नौकांचे एकत्रित राहणे फार काळ शक्य नसते. अगदी त्याचप्रमाणे संसारी मनुष्याचे आहे. चौदा वर्षाचा काळ जरी मोठा वाटत असला तरी अर्ध्या क्षणाप्रमाणे सहज निघून जाईल. तेव्हा माते! मला अनुमति दे. तुझे दु:ख दूर सारुन ठेव. तू असे केलेस तरच माझा वनवास सुखाचा होईल.’’ असे म्हणून मातेपुढे लोटांगण घालून राम तिच्या पायावर तसाच बराच वेळ पडून राहिला. कौसल्येने उठवून त्याला आपल्या मांडीवर बसविले. आशीर्वाद देऊन त्याचा गौरव केला आणि कौसल्या म्हणाली, ‘‘हे रामा, जेव्हा तू प्रवासात असशील तेव्हा ब्रह्मा, विष्णु, शिव इ. सर्व देव देवता, गंधर्व इ. सर्व प्रवासात तू जिथे कुठे असशील, राहशील, निद्रा घेत असशील त्यावेळी तुझे सदैव रक्षण करो.’’ एवढे बोलून रामाला निरोप देण्यापूर्वी त्याला पुन्हा पुन्हा आलिंगन दिले. लक्ष्मणानेही रामाला नमस्कार केला. त्यावेळी लक्ष्मणाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. कंठ दाटून आला. तो म्हणाला ‘‘रामा! माझ्या मनातील संशय तू दूर केला आहेस. म्हणून हे रामा! तुझी सेवा करण्यासाठी मी तुझ्या मागोमाग येतो. मला अनुमती दे, माझ्यावर एवढी दया कर. नाही तर माझे प्राण निघून जातील.’’ ‘‘ठीक आहे, तर चल आता. वेळ लावू नको.’’ असे श्रीराम लक्ष्मणाला म्हणाला. नंतर श्रीराम सीतेचे समाधान करण्यासाठी तिच्या मंदिराकडे निघाला. आपले पती येत आहेत असे पाहून ती सुहास्यवदनाने पुढे येऊन सुवर्णपात्रातील जलाने रामाचे पाय तिने धुतले. पतिकडे बघून विचारले, ‘‘महाराज बरोबर सेना घेतल्याशिवाय आपण एकटेच कसे बरे निघालात? आपण कोठे गेला होतात? आपले शुभ्र छत्र कोठे आहे? आपल्या आगमनाची सूचना देणारी वाद्य वाजत नाहीत. राजचिन्हे सुद्धा आपण धारण केलेली नाहीत, हे कसे काय आहे? आपण मांडलिक राजासोबत आला नाहीत. फार घाई झाली म्हणून काय?’’ असे अनेक प्रश्न सीतेने विचारले असता हसत हसत राम म्हणाला, ‘‘हे कल्याणी, महाराजांनी दण्डकारण्याचे संपूर्ण राज्य मला दिले आहे. म्हणून आज्ञा पालनासाठी आज मी वनात जाणार आहे, तेव्हा तू सुद्धा आपल्या सासुजवळ जाऊन, तेथे राहून मातेची सेवा कर. आम्ही कधीच खोटे बोलत नाही.’’
हे रामाचे बोलणे ऐकून सीता एकदम घाबरली आणि म्हणाली, ‘‘आपल्या पित्याने, त्या महात्म्याने आपणाला हे वनराज्य का म्हणून दिले? त्याचे कारण काय?’’ त्यावर रामाने उत्तर दिले ‘‘हे पुण्यवान स्त्रिये! कैकेयीवर संतुष्ट होऊन, महाराजांनी तिला वर दिला आहे. त्या वराने भरताला राज्य आणि मला वनवास दिला आहे. मी चौदा वर्षे वनात रहावे अशी तिने याचना केली होती. महाराज दयाळू, सत्यवादी असल्यामुळे त्यांनी कैकेयीचे ते मागणे देऊन टाकले. म्हणून हे सुंदरी, मी लवकरच निघणार आहे. तू माझ्या मार्गात विघ्न आणू नकोस.’’ रामाचे बोलणे ऐकून अत्यंत प्रेमपूर्वक सीता म्हणाली, ‘‘हे राघवा! मी आपल्या आधीच वनात जाणार आहे. आपण माझ्या मागून यावे. मला घेतल्याशिवाय आपण तेथे जाणे योग्य होणार नाही.’’ अशारितीने मधुर भाषण करणाऱ्या प्रिय सीतेचे भाषण ऐकून रामाला अतिशय संतोष वाटला. तो म्हणाला, ‘‘अनेक व्याघ्र, हिंस्त्र पशू इ. नी गजबजलेल्या वनात मी तुला कसे नेऊ? तेथे मनुष्याला खाणारे भयंकर राक्षस असतात. चारही बाजूला सिंह, वाघ, रानडुकरे सतत फिरत असतात. तेथे भोजनासाठी कडू, आंबट फळे आणि मुळे असेच खावे लागते. तेथे पुरी, भाजी, चटणी वगैरे काहीच अन्नपदार्थ मिळत नाहीत. फळेसुद्धा कधीकाळी कुठे एखाद्या ठिकाणी मिळाली तरच मिळतात. मार्ग सुद्धा खडे, कंटक यांनी आच्छादलेला असतो. कधी कधी तर मार्ग सुद्धा मिळत नाही वा दिसत नाही. वनात गुहा किंवा दऱ्यांमध्ये रहावे लागते. तेथे डास, माशा इ. अनेक जंतू भरलेले असतात. अशा त्रासदायक दण्डक नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनात पायीच प्रवास करावा लागतो. शिवाय थंडी, वारा, ऊन हे सारे सहन करावे लागते. त्या वनातील राक्षसांना पाहून तू तर भयभीत होऊन तत्काळ प्राण सोडशील. म्हणून हे शुभदे, सीते, तू घरीच रहा. पुनश्च लवकरच आपली भेट होईल.’’ असे रामाचे म्हणणे ऐकून सीता अतिशय दु:खी झाली. किंचित रागानेच तिने रामाला प्रत्युत्तर दिले. म्हटले, ‘‘मी आपली पतिव्रता पत्नी आहे. आपण माझा त्याग करण्याची कशी बरे इच्छा करता? माझे आपल्याशिवाय अन्यत्र लक्ष नाही. आपण धर्मज्ञ आणि दयाळू आहात. आपल्या सहवासात अरण्यात मला कोण बरे त्रास देईल? कंद, मुळे, फळे इ. आपण भक्षण केल्यानंतर जे काही उर्वरित राहील ते मला अमृताप्रमाणे मधुर वाटेल. मी त्यावरच संतुष्ट राहीन, आनंदात राहीन. आपल्याबरोबर ङ्गिरताना गवत, दर्भ, काटे मला पुष्पशय्येप्रमाणे सुखद वाटतील, यात काही संशय नाही. मी आपल्याला कोणताही त्रास देणार नाही. उलट आपल्या कार्यात साहाय्यक होईन. बालपणी मला कोण्या एका ज्योतिषाने सांगितले होते की, ‘तुला पतीसह अरण्यवास घडणार आहे’ त्या ब्राह्मणाचे वचन सत्य होऊ द्यावे. आणखी एक गोष्ट मी आपणास सांगणार आहे. आपण अनेक ब्राह्मणांच्या तोंडून कित्येक रामायणे ऐकली असतील त्यामध्ये ‘राम सीतेशिवाय वनात गेले’ असा कुठे उल्लेख असल्याचे आपण ऐकले का? म्हणून मी आपली साहाय्यक म्हणून आपल्याबरोबर येते. जर आपण मला टाकून जाल तर मी आपल्यासमोरच प्राणत्याग करीन.’’
अशा तऱ्हेने सीतेचा निश्चय ऐकून रघुनंदन राम म्हणाला, ‘‘हे देवि! तर मग तू माझ्याबरोबर चल. तुझी सर्व आभूषणे, हार इ. ताबडतोब अरुंधतीला देऊन टाक. आपले सर्व धन आपण ब्राह्मणाला देऊन वनात जाऊ.’’ असे बोलून लक्ष्मणाकरवी त्वरित ब्राह्मणांना बोलावून भक्तिपूर्वक त्या कुटुंबवत्सल, विद्वान, सच्छिल अशा ब्राम्हणांना शेकडो गाईंचे कळप, विपुल धन, दिव्य वस्त्रे आणि अलंकार त्या रघुश्रेष्ठाने दिले. सीतेने आपले मुख्य अलंकार अरुंधतीला दिले. रामानेही आपल्या मातेच्या सेवकांना पुष्कळ धन दिले. अंत:पुरात राहणाऱ्या सेवकांना नगरातील आणि ग्रामीण भागातील लोकांना, हजारो ब्राह्मणांना धन दिले. लक्ष्मणानेही सुमित्रेला कौसल्येच्या स्वाधीन केले आणि तो धनुष्य हातात घेऊन रामासमोर उभा राहिला. नंतर राम, लक्ष्मण, सीता असे सर्व राजाच्या मंदिराकडे जाण्यास निघाले. हजारो मदनांएवढे सुंदर शरीर ज्याचे आहे, तेजाने सर्व दिशा उजळून टाकणारा, आपल्या पदन्यासाने संपूर्ण जगाला पवित्र करणारा असा तो श्यामवर्ण राम, सीता, लक्ष्मण यांच्यासह पित्याच्या मंदिराकडे राजमार्गाने जात असता वाटेत नागरिक तसेच ग्रामवासी यांच्याकडून कौतुकाने पाहिल्या गेलेला तो आपल्या पित्याच्या मंदिरात पोचला.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे अयोध्याकाण्डे चतुर्थः सर्गः।