श्री महादेव म्हणाले,
‘‘नंतर मारुती त्या परम सुंदर अशा लंकेत प्रवेश करता झाला. रात्रीच्या वेळी सूक्ष्मरूप धारण करून तो नगरात सर्वत्र फिरला. सीतेचा शोध करण्याच्या उद्देशाने तो राजवाड्यात शिरला. त्याने तेथे सगळीकडे शोधले. तरी त्याला सीता कोठेच दिसत नव्हती. तेव्हा त्याला लंकिनीच्या भाषणाची आठवण झाली. तसाच तो रमणीय अशा अशोकवनात गेला. त्या ठिकाणी सर्वत्र देवतरू भरगच्च लागलेले होते. ठिकठिकाणी विहिरी असून त्यांना रत्नांच्या पायऱ्या होत्या. विविध पशूपक्षी जिकडेतिकडे सर्वत्र व्यापून राहिले होते. अनेक सुवर्णमंदिरांनी त्या स्थळाला फारच शोभा आली होती. सभोवताली वृक्षांच्या राई होत्या. त्यावर भरपूर फळे लागली असल्यामुळे फळांनी त्यांचा शिखाग्र भाग वाकला, झुकला होता. मारुती प्रत्येक वृक्षाखाली सीतेचा शोध घेत चालला होता. इतक्यात तेथे एक उत्तम देवालय त्याला दिसले. त्याचे शिखर गगनाला भिडते की काय असे भासत होते. शेकडो रत्नखांबांनी जडवलेले असे ते देवालय पाहून मारुतीला खूप आश्चर्य वाटले. ते स्थान ओलांडून थोडे पुढे गेल्यावर एक शिंशपा वृक्ष दिसला. त्याची पाने खूप घनदाट अशी होती. त्या वृक्षाखाली सूर्यकिरण कधी दिसत नसे. जिकडेतिकडे सोनेरी पक्ष्यांचे थवे दिसत होते. अशा त्या शिंशपा वृक्षाच्या मुळावर राक्षसींमध्ये बसलेली सीता मारुतीने पाहिली. ही कोणी देवताच पृथ्वीवर अवतरली आहे असे त्याला वाटत होते. एक वेणी, मलिन वस्त्र धारण केलेली, जमिनीवर पडून राहिलेली, ‘राम राम’ म्हणत शोक करणारी, कोणीच त्राता न मिळाल्यामुळे उपवासांनी अत्यंत कृश झालेली अशा त्या कल्याणीनी सीतेला फांदीच्या अग्रभागी पानांमध्ये लपून बसलेल्या कपिश्रेष्ठाने मारुतीने पाहिले. तो म्हणाला, ‘आज जानकी मला दिसली. मी धन्य झालो. माझा कार्यभाग सिद्धीस गेला. परमात्मा रामाचे कार्य माझ्याच हातून सिद्ध झाले.’ एवढ्यात अंतःपुरात होणारा कलकलाट त्याला ऐकू आला. ‘काय बरे झाले असेल?’ असा विचार मनात येऊन मारुती वृक्षांच्या पानात लपून बसला. तो रावण तिकडेच येत आहे असे त्याला दिसले. त्याच्या भोवताली स्त्रीपरिवार होता. त्याला दहा मुखे, वीस हात असून काळ्या काजळाच्या राशीप्रमाणे त्याचा देह होता. अशा त्या रावणाला पाहून मारुतीला आश्चर्य वाटले. इकडे ‘रामाच्या हातून मला मरण कसे येईल! तो सीतेसाठी सुद्धा येत नाही. ह्याचे काय बरे कारण असावे?’ असा सारखा विचार रावण करीत होता. त्याच दिवशी उत्तररात्री त्या राक्षसाधीश रावणाला स्वप्न पडले. त्यात रामाच्या आज्ञेने कोणी एक कामरुपी वानर सूक्ष्मरुप घेऊन आला आहे आणि तो वृक्षाच्या अग्रावर बसून सीतेला पाहात आहे, असे स्वप्न दिसले. असे ते अद्भूत स्वप्न पाहिल्यावर त्याने स्वतःशीच विचार केला की, कदाचित हे स्वप्न खरे ठरेल तरी पण मी जानकीला वाग्बाणांनी अतिशय दुःख देईन आणि ते पाहून वानर रामाला सर्व सांगेल. असा विचार करून तो रावण लगेचच सीतेजवळ गेला. नूपुरांच्या आणि कमरपट्टट्यांच्या घागर्यांचा नाद ऐकून सीता भयभीत झाली. ती सुंदरी भयाने शरीर सावरून बसली. तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तिचे अंतःकरण पूर्णपणे रामाकडेच लागलेले होते. रावणही त्यावेळी सीतेला पाहून म्हणाला, ‘‘हे सुलोचने! तुझा कटिप्रदेश किती रमणीय आहे म्हणून सांगू! काही कारण नसताना तू अशी संकोचून का बरे बसलीस? राम कनिष्ठ बंधुसह वनचरांमध्ये राहात आहे. कधीच दृष्टीस पडत नाही. त्याला बघण्यासाठी मी अनेक लोकांना नानारुपे देऊन पाठविले. त्यांनी प्रयत्नपूर्वक सर्वत्र शोध घेतला. परंतु तो त्यांना सापडला नाही. रामाचे तुझ्यावर प्रेमच नाही. अशा पुरुषाशी तुला काय करायचे आहे? तू सर्वदा त्याला आलिंगून राहिलीस किंवा तो सर्वकाळ तुझ्याजवळ राहिला, तरी त्याच्या अंतःकरणात तुझ्याबद्दल प्रेम म्हणून निर्माण होत नाही. तुझ्या सर्व भोगांचा आणि गुणांचा तो उपभोग घेतो तरी त्याची जाणीव त्याला नाही. त्याच्या अंगी गुणांचा लवलेश नाही. तो कृतघ्न, अधम आहे. तुला मी हरण करून आणले. तू दुःखाने, शोकाने व्याकूळ झाली आहेस. तरी तो अजून येत नाही. प्रेमच नाही मग कसा बरे येणार? तो शक्तिहीन, ममताशून्य, मानी, मूढ, स्वतःला पंडित समजणारा आहे. मानिनि सीते! सर्वस्वी प्रतिकूल अशा त्या नराधम रामाशी तुला काय करायचे आहे? तुझ्या ठिकाणी मी अत्यंत आसक्त आहे. मी दैत्यांचा राजा आहे. माझा स्वीकार करशील तर तू देव, गंधर्व, नाग, यक्ष, किन्नर ह्या सर्वांची धनीण होशील.’’
हे रावणाचे भाषण ऐकून सीतेला अत्यंत क्रोध आला. तिने मान खाली घातली व मध्ये गवताची काडी ठेवून बोलण्यास सुरुवात केली. ‘‘रावणा, तुला रामाची भीती वाटत आहे म्हणून तू भिक्षूरूप धारण केले आणि यज्ञातील हविर्भाग जसे कुत्री हरण करून नेते त्याप्रमाणे हे नीचा! रामलक्ष्मण जवळ नाहीत हे पाहून माझे हरण केलेस. त्याचे तुला लवकरच फळ मिळेल. रामाच्या बाणांनी तुझे शरीर विदीर्ण होईल. रामाच्या मानवी रुपाची खरी योग्यता तुला कळेल तेव्हा तू यमसदनाला जाशील. समुद्र शुष्क करून किंवा समुद्रावर बाणांचा सेतू बांधून हे राक्षसाधमा! श्रीराम लक्ष्मणासह तुला रणांगणात ठार मारण्यासाठी नक्की येईल. तो तुझा, तुझ्या पुत्रांचा आणि तुझ्या सैन्याचा नाश करून मला नगराला घेऊन जाईल.’’
जानकीचे हे कठोर भाषण ऐकून त्या राक्षसाधिपतीला क्रोध आला. क्रोधायमान होऊन त्याने लगेचच आपली तलवार उगारली आणि जानकीला मारण्यास तो सिद्ध झाला. त्याचे डोळे लाल झाले. इतक्यातच पतीचे कल्याण करण्यात तत्पर अशा मंदोदरीने पतीचे, रावणाचे निवारण केले आणि म्हटले, ‘‘ह्या दीन, दुःखित आणि कृश झालेल्या मनुष्य स्त्रीला सोडून द्या. तारुण्यमदाने ज्यांचे डोळे पाणीदार दिसत आहेत, ज्या आपणालाच वरण्याविषयी अतिशय उत्सुक आहेत, अशा देव, गंधर्व, नाग जातीच्या अनेक उत्तमोत्तम स्त्रिया आहेत.’’ नंतर रावण तेथे असलेल्या विक्राळ मुखाच्या राक्षसींना म्हणाला, ‘‘सीतेला भीती दाखवून किंवा इतर दुसऱ्या कोणत्याही युक्तीने ती माझी इच्छा करेल आणि मला वश होईल असे प्रयत्न करा. दोन महिन्यात जर सीता मला वश होईल तर तिला सर्व सुखे प्राप्त होतील आणि ती माझ्यासह राज्याचा उपभोग घेईल. दोन महिन्यांनंतर माझ्या शय्येवर येण्याचे नाकारल्यास त्या मानवी स्त्रीला मारून तिच्या मांसाने माझ्या सकाळच्या फराळाची तयारी करा.’’ असे बोलून तो रावण स्त्रियांसह आपल्या अंतःपुराच्या महाली गेला. इकडे त्या राक्षसिणी सीतेजवळ येऊन आपापल्या बुद्धिनुसार निरनिराळ्या प्रकारांनी तिला भीती दाखवू लागल्या. त्यापैकी एक सीतेला म्हणाली, ‘‘तुझे तारुण्य व्यर्थ गेले. रावणाचा अंगीकार केल्याने ते सफल होईल.’’ दुसरी रागाने म्हणाली, ‘‘उगीचच कशाला वेळ घालविता! आत्ताच हिचे तुकडे तुकडे करून ते शिजवू या.’’ तिसरी तलवार उगारून जानकीला मारायला पुढे झाली. दुसरी एक विक्राळ मुखाची राक्षसी आपले तोंड पसरून तिला भीती दाखवू लागली. अशारितीने त्या विद्रूप मुखाच्या राक्षसी सीतेला भयभीत करीत असता त्रिजटा नावाच्या एक वृद्ध राक्षसीने त्या सर्वांना हाकलले आणि त्यांना म्हणाली, ‘‘दुष्ट राक्षसींनो! माझे म्हणणे ऐका. त्यातच तुमचे कल्याण आहे. ह्या रडणाऱ्या जानकीला घाबरवू नका. तिला नमस्कार करा. आताच माझ्या स्वप्नात शुभ्र ऐरावतावर बसून कमलनयन श्रीराम लक्ष्मणासह वर्तमान आला. त्याने सर्व लंका जाळून टाकली. युद्धात रावणाचा वध झाला आणि जानकीला आपल्या मांडीवर घेऊन तो पर्वतशिखरावर बसला आहे असे मला स्वप्नात दिसले. तेल चोपडलेला नग्न रावण आपल्या मुखांची माळ हातात घेऊन पुत्रपौत्रांसह शेणाच्या डोहात बुडाला आहे. संतुष्ट अंतःकरणाने बिभीषण रामाच्या जवळ राहून भक्तिपूर्वक त्याच्या पायांची सेवा करीत आहे असे मी पाहिले. श्रीराम रावणाचा सहकुटुंब वध करील आणि बिभीषणाला राज्य देऊन सुवदना जानकीला मांडीवर घेऊन लवकरच नगराला जाईल यात काही संशय नाही.’’
त्रिजटेचे ते भाषण ऐकून राक्षसी स्त्रिया घाबरून गेल्या आणि आपापल्या ठिकाणी स्वस्थ राहिल्या. अशा स्थितीत त्यांना गाढ झोप लागली. राक्षसिणींनी दाखविलेल्या भीतीने सीता भयविव्हळ झाल्यामुळे दुःखाने ती मूर्च्छित झाली. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. स्वतःशीच चिंतन करीत ती म्हणाली, ‘‘प्रभातकाळी राक्षसी मला खाऊन टाकतील हे मात्र नक्की आहे. तर मग आताच कोणत्या उपायाने मला मरण येईल बरे?’’ अशाप्रकारे दुःखाने अत्यंत व्याकूळ झालेली सीता मरणाचा निश्चय करून हातात वृक्षाची फांदी धरून उभी राहिली. त्या सुंदरीला काहीच उपाय सुचत नव्हता.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे सुंदरकाण्डे द्वितीयः सर्गः।