श्री महादेव म्हणाले,
‘‘ब्रह्मपाशात बद्ध झाल्यानंतर ते पाश हातात धरून कपिश्रेष्ठ मारुती घाबरून गेल्यासारखा नगराकडे पहात जात होता. अत्यंत संतापलेले नागरिक अर्थात लंकेतील राक्षस त्याला पाहण्यासाठी चारही बाजूंनी त्याच्या मागे आले आणि त्याला मुष्टितलाने मारू लागले. इकडे ब्रह्मदेवाचा मारुतीला वर असल्यामुळे त्या ब्रह्मास्त्राने मारुतीच्या शरीराला क्षणभर स्पर्श केला आणि लगेचच ते निघून गेले. आपल्या भोवती केवळ फुसक्या दोऱ्यांचेच बंधन राहिले आहे ही गोष्ट मारुतीला चांगलीच माहीत होती. तरी पण त्याला काही विशिष्ट कार्य साधावयाचे असल्यामुळे तो तशाही परिस्थितीमध्ये पुढे चालला होता. ह्यावेळी रावण आपल्या सभेमध्ये बसला होता. त्याच्यापुढे इंद्रजिताने मारुतीला उभे केले आणि म्हटले, ‘‘ब्रह्मवराने माझ्याकडून बद्ध झालेला वानर येथे आला आहे. ह्याने अनेक मोठमोठ्या दैत्यांचा वध केला आहे. महाराज! मंत्र्यांचा सल्ला घेऊन जे काही करावयाचे असेल, शिक्षा द्यावयाची असेल ते आपण आता करावे. हा काही सामान्य वानर नाही.’’ हे ऐकून राक्षसाधिपती रावणाने मारुतीकडे पाहिले आणि समोरच बसलेल्या प्रहस्ताला बोलावले. हा प्रहस्त म्हणजे एक काजळाचा पर्वतच आहे की काय, असा भास होत असे. रावण त्याला म्हणाला, ‘‘प्रहस्ता! हा वानर का आला आहे येथे? त्याचे काय काम आहे? हा कोठून आला? सर्व वनाचा नाश याने का बरे केला? आणि याने माझे राक्षस का बरे मारले? हे सर्व त्याला विचार.’’ नंतर प्रहस्ताने मारुतीला आदरपूर्वक विचारले, ‘‘हे वानरा! तुला कोणी पाठविले? तुला भिण्याचे काही कारण नाही. मी तुला सोडून देईन. जो काही खरा वृत्तांत असेल तो या राजराजेश्वरासमोर सांग.’’ ते ऐकून वायुपुत्र मारुतीला आनंद वाटला. आपला शत्रू आणि तिन्ही लोकांना काट्यासारखा खुपणारा अशा त्या दैत्याला, रावणाला मारुतीने न्याहाळून पाहिले आणि चित्तात वारंवार रामाचे चिंतन स्मरण करून श्रीरामचंद्रांची मंगल कथा सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, ‘‘हे देवगणादिकांच्या शत्रो! नीट ऐक. सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या श्रीरामाचा मी दूत आहे. यज्ञातील पवित्र होमद्रव्य पळविणाऱ्या कुत्र्याप्रमाणे आपला स्वतःचाच नाश करून घेण्यासाठी त्रैलोक्याधीश रामाची पत्नी तू चोरून आणली आहेस. त्या राघवाने, रामाने मतंग पर्वतावर येऊन अग्नीच्या साक्षीने सुग्रीवाशी मैत्री केली आणि एकाच बाणात वालीचा वध करून त्या सुग्रीवाला वानरांचा अधिपती केले. अरे, तो महाबलवान वानरांचा राजा कोट्यावधी कळप घेऊन रामलक्ष्मणासह प्रवर्षण पर्वतावर राहातो आहे. त्याने पृथ्वीकन्या सीतेला शोधण्यासाठी मोठमोठे वानरवीर दशदिशांना पाठविले आहेत. त्यापैकी मी एक वानर आहे. मी वायुपुत्र मारुती असून सीतेचा शोध करीत हळूहळू येथे आलो आहे. कमलपत्राक्षी सीता मला येथे दिसली. वानरजातीच्या स्वभावानुसार मी वनाचा विध्वंस केला आहे. त्यामुळे हातात धनुष्य-बाण घेऊन मला मारण्यासाठी वेगाने धावून आलेल्या राक्षसांना पाहून मी त्यांचा वध केला आणि स्वतःचे रक्षण केले. राजा! सर्व प्राण्यांना आपले शरीर प्रिय असतेच. पुढे मेघनाद नावाचा राक्षस ब्रह्मास्त्रपाशाने मला बांधून येथे घेऊन आला. ब्रह्मदेवाच्या वरप्रभावाने त्या अस्त्राने मला केवळ स्पर्श केला आणि ते निघून गेले. रावणा! हे सर्व मला माहीत असूनही तुला काही चार हिताच्या गोष्टी सांगाव्या म्हणून मी बांधल्यासारखा होऊन तुझ्या समोर आलो आहे. तुझ्याविषयी करुणा निर्माण होऊन माझे चित्त अतिशय कळवळले आहे. रावणा! विचारपूर्वक वागल्याने लोकांना सद्गती मिळते ही गोष्ट ध्यानात घे आणि आपल्या राक्षसी वृत्तीचा अवलंब तू करू नकोस. संसारातून मुक्त होण्याचे साधनभूत असलेल्या दैवी मार्गाचा अर्थात परपीडा न करणे या गोष्टीचा आश्रय कर. त्यातच तुझ्या आत्म्याचे कल्याण आहे. तू ब्राह्मण असून तुझा जन्म उत्तम, श्रेष्ठ कुळात झाला आहे. तू पौलस्त्याचा पुत्र असून कुबेराचा बंधु आहेस. नीट पाहा. देहात्मबुद्धिने म्हणजेच देह हाच आत्मा अशा बुद्धिने पाहिल्यास तू खरा राक्षस नाहीस, ब्राह्मणच आहेस. उलट आत्मबुद्धिने, आत्मा देहापेक्षा वेगळा आहे असे समजले तरी तू राक्षस नाहीस. हे वेगळे कशाला सांगायला पाहिजे. शरीर, बुद्धि, इंद्रिये ह्यापासून निर्माण होणारी दुःखे तुला लागत नाहीत. कारण दुःखपरंपरा ज्याचा धर्म ते चित्त तू नाहीस. तू आत्मा निर्विकारी आहेस. प्राण्याला स्वप्नात दिसणारे पदार्थ वास्तविक असत्य असतात त्याचप्रमाणे ही दुःखसंतति अज्ञानमूलक आहे म्हणून असत्य आहे. तुझे स्वरूप सत्य आहे. तुला विकार संभवतच नाही. ज्याप्रमाणे आकाश सर्वत्र भरलेले असून कशानेही लिप्त होत नाही त्याचप्रमाणे अत्यंत सूक्ष्म होत्साता तू देहात वास करूनही दुःखादिकांनी लिप्त होत नाहीस. सूक्ष्म शरीर, इंद्रिये, प्राण, स्थूल शरीर यांचा संबंध घडून, प्राणी ह्यांनाच अज्ञानाने आत्मा असे मानतो. म्हणून सर्व प्रकारच्या बंधनात अडकतो. मी चैतन्यरूप आहे. मी जन्मरहित आहे. मी अक्षर, नाशरहित आहे. मी आनंदमय आहे असा विचार केला की प्राणी मुक्त होतो. देह पृथ्वीच्या विकारापासून उत्पन्न झाला असल्यामुळे तो आत्मा नाही. प्राणही आत्मा नाही कारण तो प्राण केवळ वायु होय. मन हे अहंकाराचा विकार म्हणून ते आत्मा नव्हे. बुद्धि देखील आत्मा नव्हे कारण ती प्रकृतीच्या विकारापासून निर्माण होते. आत्मा चैतन्यरूप, आनंदमय, विकाररहित देहादि समुदायाहून निराळा, सर्वशक्तिमान, अलिप्त, सर्वदा उपाधीपासून मुक्त असे ज्ञान झाले म्हणजे पुरुष संसारातून मुक्त होतो. म्हणून महामते! रावणा! मोक्षाचे निश्चित असे साधन मी तुला सांगतो. विष्णुची भक्ति हे चित्ताला शुद्ध करण्याचे श्रेष्ठ साधन आहे. अशारितीने चित्त शुद्ध झाले असता अत्यंत निर्मल ज्ञान प्राप्त होते. त्या ज्ञानापासून परमशुद्ध असा तत्त्वानुभव प्राप्त होतो. ज्याला असे उत्तम तत्त्वज्ञान लाभते त्याला परमपदाची प्राप्ति होते. म्हणून तू आता रामाची भक्ति कर. हा राम म्हणजे साक्षात पुराणपुरुष आहे. शरणागत भक्तजनांविषयी त्याला फार प्रेम आहे. म्हणून हृदयातील मूर्खपणा व शत्रूभाव सोडून सीतेला पुढे कर आणि त्या श्रीरामाचा पुत्रबांधवांसह आश्रय कर. त्याला नमस्कार कर. असे केल्याने भयापासून तू मुक्त होशील. राम हा परमात्मा आहे. तो सर्वांच्या हृदयात राहणारा असून सुखरुप व अद्वितीय आहे अशी भक्तिपूर्वक भावना जो कोणी ठेवीत नाही तो मनुष्य दुःखरुपी लाटांनी तुडुंब भरलेल्या संसारसमुद्राच्या परतीराला कसा जाऊन पोहोचेल? अशी भक्तिपूर्वक भावना तू ठेवली नाहीस तर अज्ञानरूप अग्नीने जळणाऱ्या आत्म्याचे शत्रूप्रमाणे अरक्षण केल्यासारखे होईल आणि आपण स्वतः केलेल्या पातकांनी तू त्या आत्म्याला अधोगतीला नेशील. मग तुला मोक्षाची आशा करण्याची सुतराम शक्यता नाही.’’
ते वायुपुत्राचे अमृतासारखे गोड भाषण रावणाला सहन झाले नाही. त्याचे डोळे रागाने लाल झाले. त्याच्या अंगाचा भडका उडाला. तो त्या कपिश्रेष्ठ हनुमंताला म्हणाला, ‘‘तू हलकट दुष्ट बुद्धिचा वानर आहेस. माझ्यापुढे धिटाईने कसली बडबड करतो आहेस. राम तो काय? आणि वनचर सुग्रीव तो काय? मी त्या नराधमाला रामाला आणि त्या सुग्रीवालाही ठार मारीन. हे वानरा! आज आधी तुला मारून टाकतो. नंतर जानकीला, लक्ष्मणासह रामाला, त्यानंतर बलवान कपिराज सुग्रीवालाही तसेच त्याच्या सर्व वानरांना मारून टाकतो.’’ हे रावणाचे भाषण ऐकून मारुतीचा कोप अनावर झाला. तो त्या राक्षसाला रावणाला जाळून टाकतो की काय असे वाटले. तो म्हणाला, ‘‘अधमा! तुझ्यासारखे कोट्यावधी रावण झाले तरी त्यांची माझ्याशी तुलना करता येणार नाही. मी रामाचा दास असून माझ्या पराक्रमाला अंत नाही.’’ हे मारुतीचे भाषण ऐकून रावणाला भयंकर क्रोध आला आणि तो जवळच असलेल्या एका राक्षसाला म्हणाला, ‘‘ह्या वानराला मारून त्याचे तुकडे तुकडे कर. राक्षसांचे सर्व मित्र आणि बांधव पाहोत.’’ तेव्हा शस्त्र उगारून वध करण्यास उद्युक्त झालेल्या त्या महादैत्याचे बिभीषणाने निवारण केले. तो रावणाला म्हणाला, ‘‘राजन्! प्रतापी पुरुषाने परराजाकडून आलेल्या वानराचा वध कधीही करू नये. या दूत वानराला मारले असता, ज्याला उद्देशून तुम्ही हा वध करण्यास सिद्ध झाला आहात त्या रामाला ही वार्ता कोण सांगेल? म्हणून याला दुसरी कोणतीही शिक्षा द्या. तुम्ही असे काही केल्याची काही तरी निशाणी अथवा खूण घेऊन जाईल. ते चित्र पाहताक्षणीच राम सुग्रीवासह लगेचच निघून येईल. नंतर तुमच्यासोबत त्याचे युद्ध होईल.’’
बिभीषणाचे भाषण ऐकून रावणही म्हणाला, ‘‘वानरांना मोठी मानास्पद वाटणारी वस्तू म्हणजे त्यांचे शेपूट होय. म्हणून प्रयत्नपूर्वक त्याच्या शेपटीला वस्त्रे बांधा, तिला अग्नी लावा आणि अशा अवस्थेत त्याला नगरात सर्वत्र फिरवा आणि नंतर सोडून द्या. सर्व वानर सेनापती हे पाहोत.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून त्या राक्षसांनी तेलात भिजलेल्या तागाच्या फडक्यांनी आणि अनेक प्रकारच्या दुसऱ्या वस्त्रांनी मारुतीचे शेपूट घट्ट बांधले आणि पुच्छाग्राला थोडासा अग्नी लावला. त्या बलवान राक्षसांनी त्या मारुतीला बळकट दोऱ्यांनी आवळून धरले होते आणि ‘हा चोर आहे’ असे ओरडत नगरात चोहोकडे फिरविले. वाद्यांच्या गजरात ते त्याला सारखे बडवीत होते. परंतु काही तरी चमत्कार करण्याचे ठरवून मारुतीने ते सर्व सहन केले. पश्चिमद्वारापाशी येताच मारुतीने अगदी सूक्ष्मरुप धारण केले आणि तो बंधनातून निसटला. नंतर पुन्हा पर्वतप्राय रुप धारण करून मारुतीने नगराच्या वेशीवर उडी मारली. तेथील एक खांब त्याने उपटून हातात घेतला आणि त्याच्या साहाय्याने एका क्षणात आपल्या रक्षणासाठी ठेवलेल्या रक्षकांना त्याने मारून टाकले. पुढे शिल्लक राहिलेले लंका दहनाचे कार्य करण्याचा विचार करून ह्या वाड्यावरून त्या वाड्यावर, ह्या घरावरून त्या घरावर तो उड्या मारीत चालला. जाता जाता आपल्या पेटलेल्या प्रचंड पुच्छाच्या योगाने त्या मारुतीने बाजार, वाडे, वेशी यांसह संपूर्ण लंकेला आग लावली. दैत्यांच्या स्त्रिया वाड्यांच्या शिखरावर चढून बसल्या होत्या. त्यांनी चोहोकडून ‘हाय, हाय! पिता! पुत्रा! अहो नाथा!’ असा आक्रोश केला. फक्त बिभीषणाचे घर सोडून बाकी सर्व नगर मारुतीने भस्म करून टाकले. नंतर तो वायुपुत्र हनुमंत उडी मारून समुद्रावर आला आणि त्याने आपले पुच्छ पाण्यात बुडविले. ह्यावेळी त्याच्या चित्ताला मोठी स्वस्थता वाटली. हनुमंताचा पिता वायु आपला प्रिय मित्र असल्यामुळे आणि सीतेने प्रार्थना केली म्हणून अग्नीने मारुतीचे पुच्छ जाळले नाही. उलट तो अत्यंत शीतल होऊन राहिला. ज्याचे नामस्मरण करीत लोकांची सर्व पापे नष्ट होतात आणि ते तापत्रयरुपी अग्नीलाही तत्काळ तरून जातात त्याच रघुनाथाचा मुख्य दूत लौकिक अग्नीने कसा बरे संतप्त होईल?
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे सुंदरकाण्डे चतुर्थः सर्गः।