श्री महादेव म्हणाले,
‘‘सभेमध्ये राक्षसमंत्र्यांशी विचारविनिमय करून उरलेल्या राक्षसांना बरोबर घेऊन तो रावण रामावर चालून गेला. तेव्हा पतंगाने पतंगांना घेऊन प्रदीप्त अग्नीवर चाल करून जावे त्याप्रमाणे ही रावणाची कृती ठरली. ते सर्व राक्षस रामाकडून रणांगणावर मारले गेले. रावणाला, स्वतः रामाकडून वक्षस्थळी प्रहार झाला. त्यामुळे तो व्यथित होऊन लंकेला घाईघाईने परत गेला. रामाचा आणि मारुतीचा अलौकिक पराक्रम पाहून रावण त्वरेने शुक्राचार्याकडे गेला. रावणाने शुक्राचार्याला नमस्कार केला आणि हात जोडून म्हणाला, ‘‘भगवन्! लंकेचा आणि राक्षससेनापतींचा रामाकडून अशाप्रकारे नाश झाला आहे. माझे मोठमोठे दैत्य, पुत्र, बांधव त्याने ठार केले. आपल्यासारख्या माझ्या सद्गुरूसमक्ष ही दुःखपरंपरा माझ्यावर कोसळावी हे कसे?’’ अशी रावणाची विज्ञापना ऐकून दैत्यगुरु शुक्राचार्य रावणाला म्हणाला, ‘‘दशानना, तू प्रयत्नपूर्वक एकांतात होम कर. तुझ्या होमात जर काही विघ्न आले नाही तर त्या होमाग्नीपासून एक मोठा रथ, घोडे, धनुष्य आणि बाणांनी भरलेला भाता हे सर्व उत्पन्न होतील. ती तुला प्राप्त झाली असता तू अजिंक्य होशील. मी तुला मंत्र देतो तो घे आणि जाऊन लवकरच होम कर.’’
असे शुक्राचार्याने सांगितले असता राक्षसाधिपती रावण तेथून तत्काळ निघाला. त्याने पाताळासारखी एक गुहा आपल्या स्वतःच्या मंदिरात तयार केली. त्याने लंकेची दारे, कवाडे वगैरे चारही बाजूंनी प्रयत्नपूर्वक लावून घेतली. त्या अघोर अनुष्ठानासाठी सांगितलेली होमद्रव्ये त्याने संपादन केली आणि गुहेत प्रवेश करून मौनव्रताने एकांतात होम सुरू केला. तेथून निघालेला मोठा धूर पाहून रावणानुज बिभीषण भयभीत झाला. त्याने तो होमधूर रामाला दाखवून म्हटले, ‘‘रामा, पहा रावणाने होम करण्यास सुरूवात केली. हा होम पूर्ण होईल तर रावण अजिंक्य होईल. म्हणून ह्या होमात विघ्न करण्यासाठी मोठमोठे वानर त्वरित पाठवून दे.’’
‘ठीक आहे’ असे म्हणून रामाने सुग्रीवाच्या संमतीने अंगद आणि हनुमान वगैरे महाबलवान वीरांना तिकडे जाण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे तट ओलांडून रावणाच्या मंदिराकडे गेले. त्या दहा कोटी वानरांनी तेथे जाऊन पहारेकऱ्यांचे चूर्ण केले आणि तेथील घोडे आणि हत्ती क्षणात मारून टाकले. नंतर पहाटेस बिभीषणाच्या पत्नीने हस्तसंकेताने होमस्थान दाखविले. गुहेच्या तोंडी आच्छादन म्हणून ठेवलेली मोठी शिळा महापराक्रमी अंगदाने पादप्रहाराने फोडून टाकली आणि तो त्या महागुहेत शिरला. तेथे डोळे मिटून व दृढासन घालून बसलेला रावण दृष्टीस पडला. अंगदाच्या आज्ञेने सर्व वानर आत शिरले. त्या वानरांनी मोठा कल्लोळ करून तेथील सेवकांना छेडिले आणि चारी बाजूंनी सगळे साहित्य होमकुंडात फेकून दिले. वानरश्रेष्ठ मारुतीने क्रोधाने रावणाच्या हातातील सुची बळजबरीने हिसकावून घेतली आणि तिनेच तो रावणाला मारु लागला. त्या वानरांनी सर्वत्र दातांनी त्याचे चावे घेतले आणि त्याला लाकडांनी बडविले. इतका मार बसला तरीही शत्रूला जिंकण्याच्या इच्छेने त्या रावणाने आपले ध्यान सोडले नाही. पुढे अंगद त्वरेने राजवाड्यातील अंतःपुरात शिरला आणि त्या कल्याणिनी मंदोदरीच्या वेणीला हात घालून तो तिला तेथे घेऊन आला. रावणाच्या पुढे ती अनाथासारखी शोक करू लागली असता अंगदाने तिची रत्नभूषित कंचुकी फाडून टाकली. त्याबरोबर कंचुकीवरील मोत्ये आणि अनेक रत्ने तुटून सर्वत्र गळून पडली. तिचा चित्रविचित्र रत्नांनी विभूषित कमरपट्टाही तुटून पडला. त्या रावणासमोर तिची निरी कटिप्रदेशापासून सुटली आणि तिचे सगळे अलंकार ठिकठिकाणी पडले. त्या आनंदित झालेल्या वानरांनी देवांच्या आणि गंधर्वांच्या कन्यांनाही त्या होमस्थानी आणले होते. इकडे मंदोदरी रावणाच्या समोर शोक करू लागली. ती दीनासारखी करुण स्वराने आक्रोश करीत रावणाला म्हणाली, ‘‘तुम्ही निर्लज्ज आहात. तुमच्यापुढे पत्नीला केशपाश धरून प्रत्यक्ष शत्रू ओढीत असता तुम्ही होम करता आहात! तुम्हाला लाज कशी वाटत नाही? दुष्ट शत्रू डोळ्यासमोर बायकोला मारीत असता जो काहीच करीत नाही त्याने तेथेच मरावे. त्याने जगण्यापेक्षा मरण पत्करणेच योग्य होय. मेघनादा, हाय, हाय! तुझ्या मातेचा वानर छळ करीत आहेत. तू जिवंत असता तर माझ्यावर असा दुःखद प्रसंग कसा आला असता? जीविताची आशा धरून माझ्या पतीने बायको आणि लाज दोन्ही सोडली आहे.’’
मंदोदरीचा तो विलाप ऐकून राजा रावण उठला. हातात खङ्ग घेऊन ‘‘सोड देवीला’’ असे म्हणत, न गडबडता त्याने अंगदाच्या कटिप्रदेशावर प्रहार केला. त्याबरोबर सगळे वानर त्या मोठ्या हवनकर्माचा विध्वंस करून ते स्थान टाकून पळाले आणि आनंदित होऊन रामाजवळ येऊन उभे राहिले. इकडे पत्नीचे, मंदोदरीचे सांत्त्वन करीत रावण म्हणाला, ‘‘प्रिये! हे सर्व काही दैवाधीन आहे. अशी कोणती गोष्ट आहे की ती या जगात राहणाऱ्या प्राण्यावर येणार नाही? तरी हे विशालनेत्रे, शोकाचा त्याग कर आणि आत्मज्ञानाचा आश्रय कर. शोक हा अज्ञानापासून होत असतो. शोक ज्ञानाचा नाश करतो. शरीरादि जड पदार्थावर ‘अहं’ ही बुद्धि होण्यासाठी अज्ञान हेच कारण आहे. पुत्र, स्त्री इत्यादी संबंध आणि पुढे संसार हे सर्व त्यातून निर्माण होतात. हर्ष, शोक, भय, क्रोध, लोभ, मोह, काम, स्पृहा इत्यादी सर्व त्याचप्रमाणे जन्म, मृत्यु, जरा ही सुद्धा अज्ञानापासूनच उद्भवतात. आत्मा तर एक, शुद्ध, सर्वांपेक्षा मायाकार्याहून भिन्न, अलिप्त, आनंदरूप, ज्ञानमय, सर्वभावविरहित असा आहे. त्या सत्स्वरूप आत्मतत्त्वाला संयोग नाही आणि वियोगही नाही. त्याप्रमाणे स्वकीय आत्म्याचे स्वरूप जाणून हे सच्छील मंदोदरी! शोक सोडून दे. आताच मी जातो आणि त्या रामलक्ष्मणांचा वध करून येतो. असे न झाल्यास श्रीराम आपल्या वज्रासारख्या बाणांनी माझा घात करील म्हणजे मी त्याच्या पदाला जाईन. प्रिये, तसे झाल्यास माझे तुला सांगणे आहे की तू माझे एक कार्य करावेस, इतकेच की सीतेला मारून मग तू माझ्याबरोबर अग्नीत प्रवेश करावा.’’
रावणाने असे सांगितल्यावर मंदोदरीला अतिशय दुःख झाले. ती म्हणाली, ‘‘नाथा, माझे म्हणणे नीट ऐका आणि त्याप्रमाणे करा. आपल्याला काय किंवा दुसऱ्या कोणाला काय रामाचा पराभव करता येणे केव्हाही शक्य नाही. राम साक्षात् प्रधान पुरुष ईश्वर आहे. त्या भक्तवत्सल प्रभु राघवाने पूर्वी एका कल्पात मत्स्य होऊन वैवस्वत मनूला सर्व संकटातून वाचविले. पूर्वी ह्या रामाने लक्ष योजने विस्तीर्ण कूर्म शरीर धारण करून समुद्र मंथनाच्या वेळी सुवर्णाचलाला मंदार पर्वताला पाठीवर उचलून धरले. एका प्रसंगी ह्या महात्म्याने वराहरूप धारण करून पृथ्वीला वर ओढून काढले आणि अत्यंत दुर्वृत्त अशा हिरण्याक्ष दैत्याला ठार केले. पूर्वी त्रैलोक्याला काट्याप्रमाणे छळणारा तो हिरण्यकश्यपू, त्याचा ह्या रघुनंदनाने नारसिंहरूप धारण करून वध केला. त्या रघुत्तमाने बलिला बद्ध करून घेऊन तीनच पावलांनी त्रैलोक्याचे आक्रमण केले आणि ते आपल्या सेवकाला, देवेंद्राला दिले. क्षत्रियस्वरूपी राक्षस निर्माण होऊन पृथ्वीला भार झाला. त्यावेळी ह्या रामाने परशुरामाने त्या क्षत्रियांचा अनेक वेळा संहार करून पृथ्वी जिंकली आणि ती मुनीला कश्यपाला दिली तोच परमात्मा सांप्रत रघुकुळामध्ये अवतरला आहे. तोच रघुश्रेष्ठ राम होय. त्या परमात्म्याला तुझ्याकरिता मनुष्यरूप घ्यावे लागले. त्याची स्त्री सीता, हिला वनातून बलात्कार करून आणले त्याचे काय कारण आहे? हे तुमचे कृत्य म्हणजे माझ्या पुत्रांचा नाश आणि स्वतः तुमचे मरण एवढ्यासाठीच होय. ह्यापुढे तरी त्या जनकतनयेला रघुत्तमाकडे पाठवा आणि राज्य बिभीषणाला द्या. मग आपण वनात जाऊ.’’
मंदोदरीचे बोलणे ऐकून रावण म्हणाला, ‘‘हे कल्याणिनी! रणात रामाकडून पुत्रांचा, बंधुंचा आणि राक्षससमूहांचा घात करवून वनात जाऊन मी कसा बरे राहू? म्हणून मी रामाबरोबर युद्ध करीन. त्याच्या शीघ्रगतीच्या बाणांनी माझे शरीर विदीर्ण झाले असता मी विष्णुच्या त्या परमपदाला प्राप्त होईन. राम हा विष्णु व जानकी ही लक्ष्मी होय हे मी जाणतो. हे जाणूनच मी बलात्काराने जनककन्या सीतेला वनातून आणले. त्यामुळे रामाच्या हातून मृत्यु येऊन मी परमपदाला जाईन. प्रिये, तुला सोडून व ह्या संसाराचा त्याग करून ह्यापूर्वी मृत झालेल्या बांधवांस बरोबर घेऊन मी जाईन. मुमुक्षू ज्या परानंदरूप गतीला जातात त्या गतीला रामाने माझा रणांगणी वध केला असता जाईन. तसे झाले म्हणजे येथील सर्व पातके धुतली जाऊन मी दुर्लभ अशा मुक्तीला प्राप्त करून घेईन. हा संसार म्हणजे समुद्रच होय. ह्यात क्लेशादी पंचक लाटा असून सुखदुःखे हे भोवरे आहेत. स्त्री, पुत्र, आप्त, द्रव्य, बंधु इत्यादी त्यातील जलजंतू आहेत. क्रोध हा त्यात राहात असणारा वडवानल होय. त्यात मदनरूपी जाळे पसरलेले आहे अशा संसारसमुद्राला तरून मी हरिपदी जातो.’’
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे दशमः सर्गः।