श्री महादेव म्हणाले,
‘‘पुढे सहस्त्रनयन इंद्र, यम, वरुण, महातेजस्वी कुबेर, वृषवाहन शंकर, ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ असा ब्रह्मदेव, मुनि, सिद्ध चारण, पितर, ऋषी, साध्य, गंधर्व, अप्सरा, सर्प हे सर्व व दुसरेही अनेक उत्तम विमानात बसून राम होता त्या ठिकाणी आले आणि हात जोडून परमात्मा रामाला म्हणाले, ‘‘तू सर्व लोकांचा कर्ता आहेस, त्यांच्या कर्माचा तू साक्षी आहेस, तू ज्ञानरुपी आहेस. तू वसुंपैकी आठवा आहेस. तू रुद्रांमध्ये शंकर आहेस. सर्व लोकांचा आदिकर्ता चतुर्मुख ब्रह्मदेव तू आहेस. अश्विनीकुमार तुझ्या नाकपुड्या आहेत. चंद्रसूर्य तुझे नेत्र आहेत. तू लोकांचा आद्यंत आहेस. तू सर्वदा उदय पावलेला आहेस. तू नित्य, शुद्ध, ज्ञानस्वरूप, नित्य मुक्त, निर्गुण आणि अद्वय असा आहेस. तुझ्या मायेने जे वेष्टिलेले आहेत त्यांना तू मनुष्याकार दिसतोस, परंतु तुझे नामस्मरण करणार्यांना तू सर्वदा चिद्रूप वाटतोस. रावणाने आमचे स्थान, आमचे तेज, पराक्रम यांचे हरण केले होते. परंतु आज तुझ्याकडून त्या दुष्टाचा वध झाला असल्यामुळे आमचे पद आम्हाला पुन्हा मिळाले आहे.’’ अशाप्रकारे देव स्तुती करीत असता साक्षात पितामह ब्रह्मदेव नम्र होऊन सत्यमार्गात नित्य राहणाऱ्या रामाला बोलला, ‘‘विष्णुरूपा देवा, तू सर्वांच्या रक्षणाचे कारण आहेस. अध्यात्म ज्ञानसंपन्न योगी हृदयात तुझे ध्यान करीत असतात. त्यांना तू ध्येय आहेस. तुझ्या ठिकाणी त्याज्य व ग्राह्य हा भेद नाही. तू परिपूर्ण, एक सत्तारूप सर्वांच्या हृदयात वास करणारा ज्ञानरूप असा आहेस. निश्चयबुद्धिने प्राण आणि अपान ह्या वायूंना हृदयात रोधून त्याचप्रमाणे सर्व संशयबंधांचा आणि विषयसमूहांचा छेद करून योगीजन तमोगुणाचा निरास करतात आणि रत्नकिरीट धारण करून सूर्यासमान शोभणाऱ्या ज्या तुझे दर्शन घेतात त्या तुला माझे वंदन असो. जो मायातीत आहे, जो लक्ष्मीचा पती आहे, जो पुरातन, जगताचे आदिकारण आहे, जो अमेय, परिमाणातीत आहे, जो मोहाचा नाश करतो, ज्याला सर्व मुनी वंदन करतात, ज्याचे योगीजन ध्यान करतात, ज्याने योगमार्गाची प्रवृत्ती केली, जो परिपूर्ण आहे, जो स्वतः रमणीय असून इतरांना रमवितो अशा त्या रामाला मी वंदन करतो. भावाभाव, अस्ति-नास्ति हे दोन्ही अनुभव ज्यासंबंधी नाहीत, योगासक्त होऊन विषयभोगावर आसक्त न राहाता शंकरप्रभृति देव ज्याच्या चरणकमलयुगुलाचे अर्चन करतात, जो नित्य निर्मल, ज्ञानघन, अनंत, प्रणवाचा, ओंकाराचा संज्ञक आहे, जो सकल दैत्यांचा वणव्यासारखा नाश करणारा होय, त्या परमवीराला, रामाला मी वंदन करतो. तू माझा नाथ आहेस. माझी सर्व प्रार्थित कार्ये तू तडीला नेली आहेस. तू प्रमाणातीत आहेस. तू लक्ष्मीपती विष्णुरुपी आहेस. तू चराचराचा आश्रय आहेस. तू भक्तीने प्राप्त होतोस. ध्यान केले असता तू संसाराचा नाश करतोस. योगाभ्यासाने ज्यांची अंतःकरणे शुद्ध झाली आहेत, त्यांच्याचबरोबर तू फिरतोस, त्यांनाच कळतोस. तू लोकसमुदायांचा उत्पत्तिकर्ता आणि लयकर्ता आहेस. तसाच तू लोकांचा मुख्य पालनकर्ता आहेस. लौकिक प्रमाणांनी तू कळण्यासारखा नाहीस. भक्ति, श्रद्धा आणि भाव ह्यांनीच ज्याचे भजन करता येते त्या नीलकमलासमान श्यामवर्ण सुंदर अशा रामा तुला मी वंदन करतो. हे माधवा, तू प्रमाणातीत आहेस. तुझ्या स्वरूपाला तोड नाही. मायेने इंद्रियासक्त झालेल्या लोकांना तुझे ज्ञान कसे होणार? तू मुनिजनांना मान्य आहेस. शंकरादि देवांनाही तू वंद्य आहेस तरी वृंदावनात कृष्णावतारात देवसमुदायाला तू वंदन करीत होतास. तू सुखकंद आहेस अशा तुला रामाला मी वंदन करतो. नाना शस्त्रे आणि वेदसमुदाय तुझे वर्णन करतात. तू नित्यानंदरूप व निर्विषयज्ञानस्वरूप आहेस. तू अनादि आहेस. माझ्या कार्यासाठी तू मनुष्यरूप धारण केले आहेस. मथुरापति असता पाचूसारखा नीलवर्ण धारण करणाऱ्या रामा! तुला वंदन करतो. भक्तांच्या इच्छित वासना परिपूर्ण करणाऱ्या श्यामवर्ण रामाचे ध्यान करून ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणाऱ्या ब्रह्मदेवाच्या ह्या आद्य स्तवनाचा जो मनुष्य पृथ्वीवर श्रद्धापूर्वक पाठ करील आणि त्याचे चिंतन करील त्याची सर्व पापे नाहीशी होतील.’’
लोकगुरु ब्रह्मदेवाने केलेली ही स्तुति ऐकताच जानकीला अंकावर घेऊन अग्नी प्रकट झाला. तिची कांती निर्मल व अरुणासारखी किंचित रक्तवर्णाची होती. तिने रक्तवस्त्र परिधान केले होते व दिव्य अलंकार धारण केले होते. शरणागतांची सकल दुःखे हरण करणाऱ्या त्या रघुत्तमा रामाला सर्व जगताचा साक्षी अग्नी म्हणाला, ‘‘हे रघुनाथा! पूर्वी तू वनामध्ये देवी जानकीला माझ्या स्वाधीन केले होतेस. तिचा आता तू स्वीकार कर. रामरुप हरे, रावणाचे प्राण हरण करण्यासाठी माया सीता निर्माण केलीस. तू रावणाचा पुत्र, बांधवांसह वध केलास आणि तेणेकरून हे प्रभो! पृथ्वीचा भार दूर केलास. छायारुप सीता ज्या कार्याकरिता निर्माण केली होती ते कार्य सिद्धिला गेले. त्यामुळे ती कृतकृत्य झाली व अंतर्धान पावली.’’ हे ऐकून रामाला आनंद झाला. त्याने अग्नीची पूजा केली आणि परम हर्षभरित होऊन सीतेचा स्वीकार करून त्या लक्ष्मीपतीने तिला मांडीवर बसविले. ती सीता म्हणजे त्रैलोक्यजननी अविनाशी लक्ष्मीच होय.
जानकीसह कांतीने उज्ज्वल शोभणाऱ्या रामाला पाहून सुरनायक इंद्राला आनंद वाटला. रामाजवळ येऊन, भक्तिपूर्वक हात जोडून सद्गदित वाणीने रामाची स्तुती करण्यास त्याने सुरुवात केली. इंद्र म्हणाला, ‘‘राम नीलकमलवर्ण आहे. त्याचे नाव संसाररूपी दावानलाचा नाश करणारे आहे. त्याच्या आनंदरुपाचे चिंतन पार्वती अंतःकरणात करीत असते. तो संसाराचा नाश होण्याचे कारण आहे. शंकरादि देव त्याला शरण येत असतात. देवगणांच्या दुःखपरंपरेचा नाश करणारा हा एक रामच होय. हा निराकार असूनही मनुष्यदेह धारण करून आला आहे. हा स्तुत्य आहे. हा पृथ्वीचा भार नाहीसा करणारा आहे. अशा परमसमर्थ, परानंदरूप, श्रेष्ठ, रामरूप हरिला मी भजतो. राम भक्ताधीन असून हा शरणागतांना सकलानंद देणारा आहे. त्याचे नावच असे आहे की ते त्या शरणागतांची दुःखे निःशेष करते. तपाच्या योगे योग साधणारे योगीश सत्तारूपाने त्याचे चिंतन करीत असतात. तो सुग्रीवादिकांचा मित्र झाला. अशा त्या रामरुपी सूर्याचे मी भजन करतो. भोगावर मन ठेवणाऱ्या लोकांना हा राम दूर वाटतो. परंतु योगाभ्यासी लोकांना अगदी जवळ आहेसा वाटतो. हा सर्वदा चिदानंदकंद आहे. त्याचे रूप जनककन्येला आनंद देणारे आहे. ह्या रघुत्तम रामाला मी शरण जातो. रामा! तू योगमायेच्या विशेषांनी युक्त होतोस त्यावेळी लीलेसाठी निराकारवृत्ती धारण करून वागतोस. तुझ्या आनंददायक लीलाचरित्रांच्या श्रवणाने ह्या लोकी ज्यांचे कान भरून जातात ते नित्य आनंदरूप होतात. वैभवाभिमानरुपी मद्यप्राशनाने मी अत्यंत उन्मत्त झालो होतो. सर्व श्रीमंत लोक अभिमान बाळगतात, तसाच अभिमान मलाही वाटून मी तुला जाणले नाही. परंतु आता तुझ्या पदकमलांच्या कृपेने ‘त्रैलोक्याचा अधिपति’ म्हणून मला वाटणारा गर्व नाहीसा झाला आहे. ज्याच्या शरीरावर रत्नांची बाहुभूषणे व हार चमकत आहेत व त्यामुळे ज्याचे स्वरूप रमणीय वाटत आहे, पृथ्वीला भार झालेल्या दैत्यांना जो वणव्यासारखा वाटतो, ज्याचे मुख शरदऋतूतील चंद्राप्रमाणे आहे, ज्याचे नेत्र कमळाप्रमाणे शोभणारे आहेत, ज्याच्या महिम्याचा थांग कोणासही लागणे अत्यंत कठीण आहे अशा राघवेशाला मी भजतो. इंद्रनील मण्याप्रमाणे किंवा मेघाप्रमाणे ज्याची कांति श्यामवर्ण आहे, विराधादि राक्षसांचा वध करून ज्याने लोकांमध्ये शांति प्रस्थापित केली आहे, किरीटादिकांनी ज्याला शोभा आली आहे, शंकराला जो अलभ्य लाभासारखा वाटतो, त्या रघुपति रामचंद्राला मी भजतो. जिचा वर्ण सुवर्णासमान तेजःपुंज व जिची कांती विद्युल्लतापुंजासारखी आहे त्या सीतेला अंकावर घेऊन कोटिचंद्राप्रमाणे शोभणाऱ्या, उत्तम सिंहासनावर बसणाऱ्या रामचंद्राला मी भजतो. रामचंद्रापासून दुःख आणि आळस ही दूर असतात.’’
त्याच वेळी पार्वतीसह विमानात बसून आकाशमार्गे जात असलेल्या शंकरांनी त्या कमलपत्राक्ष रामाला म्हटले, ‘‘रामा! तुझा अयोध्येमध्ये राज्याभिषेक समारंभ होईल. तो बघायला मी येणार आहे. सांप्रत ह्या तुझ्या देहाचा जनक जो दशरथ त्याला ह्या विमानात पहा.’’ तेव्हा विमानात अग्रभागी बसलेला दशरथ रामाच्या दृष्टीस पडला. कनिष्ठ बंधु लक्ष्मणासह त्याने भक्तीपुरस्सर व आनंदपूर्वक पित्याच्या चरणी शिरसाष्टांग वंदन केले. दशरथाने रामाला आलिंगन दिले आणि त्याचे मस्तक हुंगून म्हटले, ‘‘वत्सा! ह्या संसाराच्या दुःखस्वरूप सागरातून तू मला तारले आहेस’’ असे म्हणून पुनः दशरथाने रामाला आलिंगन दिले. मग रामाने पूजा केल्यानंतर दशरथ निघून गेला. इकडे राम आपल्यापुढे हात जोडून उभ्या असलेल्या देवेंद्राला पाहून म्हणाला, ‘‘सहस्त्राक्षा! माझ्यासाठी लढाईत मरून पडलेल्या वानरांना अमृतवृष्टि करून लवकर सजीव कर, अशी माझी तुला आता आज्ञा आहे.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून अमृतवृष्टि करून इंद्राने त्या वानरांना जिवंत केले. पूर्वी युद्धात जे जे मारले गेले होते, ते ते निद्रेतून जागे झाल्याप्रमाणे आनंदाने रामाजवळ आले. आता ते सर्व पूर्ववत बलवान दिसत होते. तेथे राक्षसांना अमृताचा स्पर्श झाला तरी ते उठले नाहीत. बिभीषणाकडून सत्कार झाल्याचे पाहून रामाने त्या वानरश्रेष्ठांचे रीतसर अभिनंदन केले आणि त्यांना जाण्यास निरोप दिला.
मग बिभीषणाने आणलेल्या त्याच्या सूर्यासारख्या तेजःपुंज अत्युत्तम पुष्पक विमानात राम आरुढ झाला. त्याने सीतेला मांडीवर घेतले होते. ह्यावेळी कीर्तिसंपन्न सीतेच्या चेहऱ्यावर लज्जा होती. रामाजवळच पराक्रमी बंधु लक्ष्मण धनुष्य घेऊन बसला होता. मग श्रीराम विमानातून सर्व वानरांना, कपिराज सुग्रीवाला, अंगदाला आणि बिभीषणाला म्हणाला, ‘‘तुम्ही सर्वांनी वानरांसह येऊन मित्रकार्य केले. मी तुम्हा सर्वांना परवानगी देतो. तुम्ही वाटेल तेथे सुखाने जा. सुग्रीवा! सर्व सैनिकांसह तू शीघ्र किष्किंधेला जा. बिभीषणा! तू लंकेत आपल्या राज्यात जाऊन रहा. तू माझा भक्त असल्यामुळे इंद्रासह देव चालून आले तरीही त्यांच्याकडून तुझे काही अनिष्ट होऊ शकणार नाही. माझ्या पित्याच्या अयोध्येत जाण्याची माझी इच्छा आहे.’’
असे रामाने सांगितल्यानंतर ते महाबलवान वानर आणि राक्षसराजा बिभीषण हात जोडून म्हणाले, ‘‘रघुत्तमा! तुझ्याबरोबर आमच्याही मनात अयोध्येस यावे असे आहे. तुला राज्याभिषेक झाल्याचे पाहून आणि कौसल्यामातेला वंदन करून आम्ही आपापल्या राज्याला जाऊ. प्रभो! आम्हाला अनुज्ञा द्या.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून राम म्हणाला, ‘‘सुग्रीवा! वानर, बिभीषण आणि हनुमान ह्या सर्वांसह तू आता लवकर पुष्पक विमानात बस.’’ मग सैन्यासह सुग्रीव आणि अमात्यांसह बिभीषण असे सर्व त्या विमानात ताबडतोब बसले. सर्वजण चढून बसल्यावर रामाने आज्ञा दिली आणि कुबेराचे उत्तम विमान आकाशमार्गाने जाण्यास निघाले.
त्या तेजस्वी विमानाला हंस जोडला होता. त्यामुळे आत बसलेला आनंदित राम दुसरा ब्रह्मदेवच की काय असा भास होत होता. कुबेराने तपश्चर्येने मिळविलेले ते विमान ह्या वेळी आकाशात सूर्यबिंब चमकावे तसे चमकत होते. सीता आणि लक्ष्मण ह्यांना घेऊन राम त्यात बसल्यामुळे त्या विमानाला विशेषच शोभा प्राप्त झाली होती.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे त्रयोदशः सर्गः।