श्री महादेव म्हणाले,
‘‘कालनेमीचे अमृतासारखे भाषण ऐकून रावण अतिशय संतापला. त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले. तापलेल्या तुपात पाणी टाकल्याने ते जसे अधिक पेट घेते तशी त्याची स्थिती झाली. तो म्हणाला, ‘‘माझी आज्ञा मोडणाऱ्या तुला दुष्टाला मी ठार करतो. शत्रूकडून काही लाच इ. घेऊन तू रामाचा सेवक झाला आहेस आणि म्हणूनच असे बोलत आहेस.’’ त्यावर कालनेमी म्हणाला, ‘‘राजन्! आपण कशाला रागावता? जर माझे भाषण आपणास आवडत नसेल तर आपण सांगाल त्याप्रमाणे जाऊन करतो.’’ असे बोलून मारुतीला विघ्न करण्याची रावणाज्ञा घेऊन तो महासुर कालनेमी तत्काळ तेथून निघाला. हिमालयाच्या समीप जाऊन तेथे त्याने एक तपोवन तयार केले. तो दुष्ट तेथे मुनिवेष धारण करून शिष्यपरिवारासह राहिला. महात्मा मारुती ज्या वाटेने जायचा तीच वाट रोधून तो कालनेमी राहिला. मारुती तेथून जात असता तो रम्य आश्रम त्याच्या दृष्टीस पडला. ते पाहून त्या वैभवशाली मारुतीने विचार केला, ‘हे उत्तम आश्रमस्थान ह्यापूर्वी माझ्या पाहण्यात आले नाही. माझा रस्ता चुकला किंवा माझ्या चित्ताला भ्रम झाला, काही कळत नाही. असो. आपण आता ह्या आश्रमात शिरावे. सर्व मुनींना भेटावे. जलप्राशन करावे आणि मग त्या उत्तमोत्तम द्रोणपर्वताकडे जावे.’ असे बोलून औरसचौरस चार कोस लांब अशा त्या आश्रमात मारुतीने प्रवेश केला. त्या आश्रमात केळी, शाल, खर्जूर, फणस इ. वृक्ष सर्वत्र लागलेले असून त्यावरील पक्व फळांनी त्यांच्या ङ्गांद्या वाकून गेल्या होत्या. ते स्थान वैभवरहित होते. तेथे सर्वत्र पवित्रता आणि निर्मलता दिसत होती. त्या आश्रमात कपटयोगाचा स्वीकार करून कालनेमी शंकराचे पूजन करीत होता. हनुमंताने आदरपूर्वक त्या महासुराला वंदन केले आणि म्हटले, ‘‘भगवन्! मी हनुमान नावाचा रामदूत आहे. रामाचे महत्त्वाचे कार्य करण्याचे योजून मी क्षीरसमुद्राकडे जात आहे. ब्रह्मन्! मी तहानेने व्याकूळ झालो आहे. पाणी कोठे बरे आहे? पोटभर पाणी पिण्याची माझी इच्छा आहे. तर मुनिश्रेष्ठा, कोठे पाणी मिळेल मला सांगा.’’ ते मारुतीचे भाषण ऐकून कालनेमी त्याला म्हणाला, ‘‘माझ्या कमंडलुतील जल प्राशन कर. ही पक्व फळे खा. नंतर सुखाने येथे रहा आणि निद्रा घे. इतकी घाई करण्याचे काही कारण नाही. तपश्चर्येच्या योगाने मी स्वतः भूत, वर्तमान आणि भविष्य सर्व जाणतो. लक्ष्मण उठला असून सर्व वानरही रामदर्शनाने जिवंत झाले आहेत.’’ ते ऐकून हनुमंत म्हणाला, ‘‘मला फार तहान लागली आहे. कमंडलुतील पाण्याने तहान भागणार नाही. म्हणून मला जलाशय दाखव.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून कालनेमीने मायेने निर्माण केलेल्या एका बटुला आज्ञा दिली, ‘‘बटो! ह्या वायुपुत्राला विस्तीर्ण असा जलाशय, सरोवर दाखव. नंतर माझ्याकडे ये. मी तुला मंत्रोपदेश करीन, त्यामुळे तुला औषधी दिसतील.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून बटुने दाखवलेल्या सरोवरात मारूती शिरला आणि डोळे मिटून पाणी प्राशन करू लागला. तोच एक भयंकर सुसर तेथे आली आणि त्या मारुतीला भराभर गिळू लागली. तेव्हा हनुमंताने डोळे उघडून पाहिले की आपल्याला सुसरी गिळत आहे. मारुतीला क्रोध आला आणि त्याने दोन्ही हातांनी सुसरीचे तोंड फाडले. तेव्हा तत्काळ ती मरण पावली आणि आकाशात एक दिव्यरुपी स्त्री प्रगट झाली. ती धान्यमाली नावाची अप्सरा होती. ती हनुमंताला म्हणाली, ‘‘कपिश्रेष्ठा, तुझ्या प्रसादाने मी शापमुक्त झाले आहे. मी एक अप्सरा असून काही कारणाने एका मुनीने मला शाप दिला होता. आश्रमामध्ये जो मुनि तू पाहिलास, तो कालनेमी नावाचा दैत्य आहे. हे निष्पापा, तुझ्या मार्गात तुला विघ्न करावे म्हणून रावणाने त्याला पाठविले आहे. तो मुनिवेषधारी मुनि नसून ब्राह्मणांची हत्या करणारा राक्षस आहे. त्याचा शीघ्र वध कर आणि त्वरित अत्युत्तम द्रोणपर्वतावर जा. तुझ्या स्पर्शाने माझ्या पातकांचा नाश झाला आहे. मी आता ब्रह्मलोकी जाते.’’ असे बोलून ती स्वर्गाला गेली आणि हनुमंतही आश्रमात आला. तो आलेला पाहून कालनेमी म्हणाला, ‘‘वानरश्रेष्ठा, तुला का बरे एवढा विलंब झाला? तू माझ्यापासून मंत्र घे आणि मला गुरुदक्षिणा दे.’’ असे तो बोलत असता मारुतीने मूठ घट्ट आवळली आणि त्या राक्षसाला म्हणाला, ‘‘ही घे दक्षिणा!’’ असे बोलून मारुतीने त्याच्यावर मुष्टीप्रहार केला. तत्काळ तो महासुर मुनिवेष टाकता झाला आणि तो वायुपुत्र मारुतीबरोबर लढू लागला. नाना मायाप्रकार करून तो राक्षस लढला परंतु हा मारुती महामायिकाचा रामाचा दूत आणि मायावी कपटी राक्षसांचा शत्रू होता. त्याने कालनेमीच्या मस्तकावर मुष्टीप्रहार करताच मस्तक फुटून तो दैत्य मरण पावला. नंतर मारुती क्षीरसमुद्रावर गेला. तेथे महागिरी द्रोण त्याला दिसला. परंतु त्यावर त्याला औषधी दिसल्या नाहीत. मग हनुमंताने त्या पर्वतालाच उपटून घेतले आणि तो वायुवेगाने रामाजवळ आला. मग मारुती रामाला म्हणाला, ‘‘देवेशा, महापर्वत द्रोणाचल मी आणला आहे. आता जे करणे योग्य आहे ते करावे. ह्या कामात विलंब करणे योग्य नाही.’’ हनुमंताचे भाषण ऐकून रामाच्या मनाला संतोष झाला. मग महाबुद्धिमंत रामाने तत्काळ पर्वतावरील औषधी काढल्या आणि सुषेणाच्या हस्ते त्या महात्मा लक्ष्मणाची चिकित्सा करविली. तेव्हा जागृत झाल्याप्रमाणे लगेच उठून लक्ष्मण म्हणाला, ‘‘दशानना, थांब थांब. तू कोठे जाशील? तुझा आता वध करतो.’’ असे लक्ष्मण बोलत आहेत असे पाहून रामाने त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले. नंतर तो मारुतीला म्हणाला, ‘‘वत्सा! महाकपे! आज तुझ्या प्रसादाने माझा बंधु लक्ष्मण कुशल अवस्थेत मला दिसतो आहे.’’ इतके बोलून वानरांसह सुग्रीवाला बरोबर घेऊन बिभीषणाच्या मतानुसार राम युद्धासाठी सज्ज झाला. लढण्याची अति उत्कंठा धरून ते सर्व वानर, पाषाण, वृक्ष, पर्वताची शिखरे घेऊन युद्धासाठी सज्ज होऊन निघाले. त्या युद्धात रामाचे बाण लागून महासुर रावण घायाळ झाला. सिंहाकडून हत्तीची किंवा गरुडाकडून सापाची जशी गाळण उडावी त्याप्रमाणे रामाकडून रावणाची अवस्था झाली.
महात्मा राघवाकडून पराभव झाला असता राजा रावण तेथून निघून गेला आणि सिंहासनावर बसून तो राक्षसांना म्हणाला, ‘‘पूर्वी ब्रह्मदेवाने मनुष्याच्याच हातून माझा मृत्यु होणार असे सांगितले आहे. पृथ्वीवर माझा वध करील असा कोणीही मनुष्य नाही. म्हणून साक्षात नारायण मनुष्य झाला आहे यात काही संशय नाही. तो दशरथपुत्र राम होऊन माझ्या वधासाठी येथे आला आहे. राक्षसश्रेष्ठ हो, अनरण्याने पूर्वी मला शाप दिला होता की ‘माझ्या वंशात सनातन परमात्मा अवतार घेणार आहे आणि त्याच्याकडून तुझा पुत्र, पौत्र, बांधव सर्वांसह वध करील यात काही संशय नाही’ असे बोलून तो अनरण्य स्वर्गाला गेला. तोच हा राम माझ्याकरिता उत्पन्न झाला असून तो माझा वध करणार आहे. कुंभकर्ण हा तर अगदी मूर्ख असून सदासर्वदा निद्रावश झालेला असतो. तो महासामर्थ्यवान आहे. त्याला जागे करून माझ्याजवळ आणा.’’ रावणाने असे सांगितले असता ते प्रचंड देह धारण करणारे राक्षस लगेचच गेले आणि अनेक प्रकारचे प्रयत्न करून कुंभकर्णाला जागे केले. त्याला रावणाजवळ नेले. त्याने राजा रावणाला नमस्कार केला आणि तो आसनावर बसला. त्या आपल्या बंधुला रावण दीनवाणीने म्हणाला, ‘‘कुंभकर्णा, माझ्यावर फार मोठे संकट आले आहे. त्याचा काही विचार कर. माझे शूर पुत्र, पौत्र, बांधव या सर्वांचा रामाने वध केला आहे. आता माझा मृत्युसमय आला आहे. आता मी काय करावे? हा बलवान दाशरथी राम सुग्रीवाला बरोबर घेऊन सैन्यासह समुद्र ओलांडून इकडे आला आहे. तो आमची मुळे खणून काढीत आहे. आमचे मुख्य मुख्य राक्षस वानरांकडून रणांगणात मारले गेले. वानरांचा युद्धात वध झाल्याचे मला काहीच माहीत नाही. महाबाहो, शत्रूचा नाश कर. त्यासाठीच तुला जागे केले आहे. तू महापराक्रमी आहेस. हे दुष्कर कर्म आहे. तरी बंधुकरिता ते हाती घे.’’ असे ते रावण राजाचे शोकयुक्त भाषण ऐकून कुंभकर्ण मोठ्याने हसला. तो म्हणाला, ‘‘राजा, पूर्वीच गुप्त मसलत चालली असता मी तुला सांगितले होते तेच तुझ्या पापकर्माचे फळ आज तुला प्राप्त झाले आहे. मी तुला पूर्वीच सांगितले होते की राम हा परमात्मा नारायण व सीता ही योगमाया आहे. तुला मी बोध केला तरी तू शहाणा झाला नाहीस. एकदा रात्रीच्या वेळी अरण्यात पर्वत शिखरावर एका विस्तीर्ण शिलेवर मी बसलो होतो. तेथे दिव्य ज्ञानी साक्षात नारदमुनि माझ्या नजरेस दिसले. मी त्यांना विचारले, ‘‘महाभागा, आपण कोठून आला? मला सांगा.’’ असे मी म्हणालो असता तो म्हणाला, ‘‘देवांच्या मसलती चालल्या असता मी तेथे होतो. तेथे घडलेला सर्व वृत्तांत तुला सांगतो ऐक. तुम्ही दोघांनी देवांना त्रास दिला म्हणून ते विष्णुकडे गेले. मनापासून त्या देवाधिदेवाची स्तुती करून ते देव म्हणाले, ‘‘देवा, हा रावण दुरात्मा असून त्रैलोक्याला शत्रूसारखा झाला आहे. त्याचा वध करावा. मनुष्याच्या हातून त्याचा वध होणे शक्य नाही. अशी ब्रह्मदेवाने पूर्वी योजना करून ठेवली आहे. म्हणून आपण मनुष्यरूप धारण करून ह्या रावणरूपी शत्रूचा नाश करावा. त्यावर तो सत्यसंकल्प ईश्वर महाविष्णु ‘ठीक आहे’ असे म्हणाला. त्याप्रमाणे रघुकुलामध्ये तो देव राम नावाने अवतीर्ण झाला आहे. तो तुम्हा सर्वांचा वध करील’’ असे सांगून तो नारदमुनी गेला. म्हणून हा राम सनातन परब्रह्म होय असे समज. वैराचा त्याग कर आणि आता त्या मायेने मनुष्यरूप धारण करणाऱ्या रामाची भक्ती कर.’’
भक्तिभावाने भजणाऱ्याला रघुश्रेष्ठ राम प्रसन्न होतो. भक्ती ही ज्ञानाची जननी आहे. तसेच भक्ती ही मोक्षदायिनी आहे. भक्तिहीनाने जरी काही केले तरी ते न केल्याप्रमाणेच होय. आजपर्यंत विष्णुने अनेक अवतार घेतले असून त्यानुसार लीला केल्या आहेत. अशा सहस्त्र अवतारांप्रमाणे हा ज्ञानरूप व कल्याणरूप असा रामावतार आहे. जे शहाणे लोक मनाने आणि वाणीने रामाचे रात्रंदिवस भजन करतात ते सहजपणे संसार तरून जातात आणि हरिपदाला प्राप्त करून घेतात. जे साधुपुरूष सतत शुद्धभावाने पृथ्वीवर रामाचे ध्यान करतात आणि त्याच्या चरित्राचे पठण करतात ते संसाररूपी महासर्पाच्या पाशातून मुक्त होऊन अंती सीतापतीच्या अनंत सौख्यदायक पदाला प्राप्त करतात.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे सप्तमः सर्गः।