श्री महादेव म्हणाले,
‘‘मारुतीचे संपूर्ण भाषण ऐकून रामाला अतिशय आनंद झाला आणि तो म्हणाला, ‘‘देवांना देखील अत्यंत दुष्कर असे कार्य मारुतीने केले आहे. या पृथ्वीवर दुसऱ्या इतर कोणाला ‘हे कार्य सिद्धिस जाईल’ हा विचार सुद्धा मनात आणणे शक्यच नाही. शंभर योजने विस्तीर्ण अशा समुद्राला उल्लंघून जाईल असा कोण आहे? त्याचप्रमाणे अनेक राक्षसांनी रक्षण केलेल्या लंकेची धूळधाण करण्यास कोण बरे समर्थ आहे? सेवकाने जे काही करावयाचे ते सर्व मारुतीने केले आहे. अशाप्रकारे सुग्रीवाला लाभलेला सेवक आजपर्यंत जगात कोणाला मिळाला नाही. पुढे मिळणारही नाही. मारुतीला जानकीचे दर्शन झाले. अर्थातच त्याच्याकडून आज माझे रघुवंशाचे, लक्ष्मणाचे आणि कपीश्वर सुग्रीवाचे उत्तम रक्षण झाले असेच म्हणावयास हवे. जानकीचे केवळ स्मरण होताच माझे मन शोकाकुल होऊन जाते. जानकीचा शोध लावण्याचे कार्य मारुतीने सर्वस्वी उत्तमप्रकारे केले आहे. समुद्राचे स्मरण होताच माझे मन शोकाकुल तर होतेच परंतु सुसरी, मगरी यांनी भरलेला शतयोजन विस्ताराचा समुद्र मी कसा तरून जाणार, शत्रूचा वध कसा करणार आणि जानकीला कसा भेटणार!’’
रामाचे भाषण ऐकून सुग्रीव रामाला म्हणाला, ‘‘मोठमोठ्या सुसरी, मगरी यांनी समुद्र जरी व्याप्त असला तरी त्याला उल्लंघून आम्ही जाणार आणि लंकेची नासाडी करून टाकणार. लवकरच रावणाचा वध करणार. हे रघुश्रेष्ठा! काळजी केल्याने तर कार्याचा नाश होतो. म्हणून काळजी करणे सोडून दे. हे पहा, महासामर्थ्यवान आणि शूर असे वानरवीर तुला जे काही इष्ट असेल ते करण्यास तयार आहेत. तुझ्यासाठी अग्नीत प्रवेश करण्यासाठी ते सिद्ध आहेत. प्रथमतः समुद्र तरून जाण्याची युक्ति शोधून काढ, की पुढे लंका दृष्टीस पडताच रावण मेलाच म्हणून आम्ही समजू. हे राघवा! धनुष्य घेऊन सज्ज झालेल्या तुझ्यापुढे युद्धात उभा राहील असा तीनही लोकात कोणी मला दिसत नाही. रामा! सर्वथा आमचाच जय होणार आहे, यात काही संशय नाही. मला सर्वत्र निमित्ते, शकुन सुद्धा तसेच चांगले दिसून येत आहेत.’’
भक्ति आणि वीर्य यांनी युक्त असे ते सुग्रीवाचे भाषण ऐकून रामाने त्याचे म्हणणे कबूल केले आणि पुढे उभ्या असलेल्या हनुमंताला तो म्हणाला, ‘‘काही तरी युक्ती करून आपण महासागर तरून जाऊच. त्या आधी देवदानवांनाही प्रवेश करण्यास कठीण अशा त्या लंकेचे स्वरूप कसे काय आहे ते मला सांग. ते एकदा समजले म्हणजे हे कपीश्वरा! लंकेच्या नाशाचा उपाय मला करता येईल.’’ रामाचे भाषण ऐकून हनुमंताने नम्रतापूर्वक हात जोडले आणि तो म्हणाला, ‘‘देवा, मी जे काही पाहिले ते तुला नीट सांगतो. देवा! दिव्य लंकानगरी त्रिकूट पर्वताच्या शिखरावर वसली आहे. तिला सुवर्णाचे तट असून आत सोन्याने बांधलेली राजमंदिरे आहेत. सभोवती निर्मळ उदकांनी भरलेले खंदक आहेत. नाना प्रकारच्या उपवनांनी ती शोभून दिसते. तसेच ठिकठिकाणी उत्तम अशा विहिरी आहेत. तेथे रत्नस्तंभांची उत्तम गृहे असून त्याची शोभा अप्रतिम आहे. पश्चिमेकडील दरवाजावर हजारो हत्ती आणि घोडे असून उत्तर दरवाजावर घोडेस्वार, पायदळ आणि हत्तीघोडे आहेत. हे वीरा! पूर्वेकडे व दक्षिणेकडील दारावर दहा कोटी राक्षसवीर रक्षक म्हणून राहतात. प्रभो! मध्यभागाच्या बुरूजावर असंख्य हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ असून अनेक प्रकारच्या अस्त्रात कुशल असलेले वीर सर्वकाळ लंकेचे रक्षण करतात. लंकेत अनेक प्रकारच्या चोरवाटा असून तिच्या सभोवताली अनेक तोफा, प्रत्येक तोफ शंभर वीरांचा वध करील अशा प्रकारे ठेवल्या आहेत. देवश्रेष्ठा! असे असूनही मी तेथे काय काय केले ते सांगतो. रावणाच्या सैन्यसमूहाचा चौथा भाग मी नष्ट केला. लंकापुरी जाळली. तेथील सुवर्णमंदिरांची दुर्दशा केली. रघुत्तमा! तोफा आणि चोरवाटा ह्या सुद्धा नष्ट केल्या. देवा! केवळ तुझ्या दर्शनाने लंकापुरी भस्म होईल. देवेशा! चारी बाजुंनी महावीर असे वानरसमुदाय घेऊन आपण क्षीरसमुद्राच्या तीरी जाऊ या.’’
मारुतीचे भाषण ऐकून राम म्हणाला, ‘‘सुग्रीवा! आपल्या सर्व सैनिकांना निघण्यास आज्ञा दे. आताच विजयमुहूर्त आहे. तरी त्या मुहूर्तावर निघून अनंत राक्षस समुदायांनी आणि अनेक तटांनी अजिंक्य अशा लंकेचा रावणासह नाश करीन आणि सीतेला घेऊन येईन. माझ्या उजव्या डोळ्याची खालची पापणी स्फुरण पावत आहे. वेगवान अशा वानरांची सर्व सेना पुढे जाऊ द्या. वानरसमुदायाचे अधिपती पुढे, मागे व बाजुंना चालून सैन्याचे रक्षण करोत. हनुमंताच्या खांद्यावर बसून मी पुढे निघतो. मागून अंगदाच्या खांद्यावर बसून लक्ष्मणाला येऊ द्या. सुग्रीवा! तू माझ्याबरोबर चल. गज, गवाक्ष, गवय, मैंद, द्विविद, नल, नील, सुषेण आणि दुसरे सर्व शत्रूनाशक सेनापती चारी बाजुंनी निघोत.’’ वानरांना तशी आज्ञा देऊन राम लक्ष्मणासह निघाला. प्रभु रामचंद्र आनंदाने सैन्याच्या मध्यभागी चालत असून त्यांच्याबरोबर सुग्रीव होता. मोठमोठ्या हत्तींसारखे त्या वानरांचे देह असून इच्छेला येईल ते रूप त्यांना घेता येत असे. ते शूरांसारखे डौलाने चालत व गर्जना करीत दक्षिण दिशेकडे निघाले. मार्गात मिळतील ती फळे आणि मद्य भक्षण करीत ते पुढे जात होते. प्रत्येकजण रामापुढे येऊन ‘‘मी रावणाला मारून टाकतो’’ असे सांगत होता. अशाप्रकारे ते अतुल पराक्रमी वानरश्रेष्ठ जात होते. दोघा वानरांच्या खांद्यावर बसून रामलक्ष्मण चालले आहेत, हे पाहून आकाशात एकाच वेळी चंद्रसूर्य उगवून त्यांच्या भोवताली नक्षत्रे चमकत आहेत की काय असे भासत होते. सर्व पृथ्वीला आच्छादून ती सेना जात होती. कित्येक वानर आपली पुच्छाग्रे आपटीत होती तर कित्येक झाडे उपटून घेत होते. पर्वतावर वायुवेगाने धावत सुटणारे असे असंख्य वानर सर्वत्र भरून राहिले होते. रामाकडून त्यांचे रक्षण होत असल्यामुळे ते आनंदाने चालले होते. ती सेना अहोरात्र चालत असे. कोठेही क्षणभर थांबत नसे. मलय, सह्य पर्वतावरील विचित्र अरण्ये पाहात राम चालला होता. ते सह्य, मलय पर्वत मागे टाकत क्रमाने समुद्रावर येऊन पोचले. समुद्राची भयंकर गर्जना ऐकली. मारुतीच्या खांद्यावरून खाली उतरून रामाने सुग्रीवाला बरोबर घेतले आणि पाण्याजवळ येऊन तो म्हणाला, ‘‘मगरींचे वसतिस्थान अशा समुद्रावर आपण सर्वजण पोचलो तर. वानर हो, निरुपायाने यापुढे आता आपल्याला जाता येणार नाही. सध्या सेनेचा तळ येथेच असू द्या. हा समुद्र तरून जाण्याचा उपाय आपण शोधू या.’’ रामाचे भाषण ऐकून सुग्रीवाने लगेचच समुद्राजवळ सैन्याचा तळ दिला. त्या सेनेचे रक्षण मोठमोठे वानर करत होते. त्या भयंकर दिसणाऱ्या समुद्राला पाहून सर्वांना दुःख झाले. मोठमोठ्या उंच लाटा उसळत आहेत, भयंकर सुसरींनी ज्याचे उग्र रुप दिसत आहे, ज्याची किती खोली आहे हे कळत नाही. ज्याचा आकार आकाशासारखा आहे अशा त्या समुद्राला पाहून ते सर्वजण दुःखी झाले. ‘वरुणाचे वसतिस्थान अशा या भयंकर स्वरुपाच्या समुद्राला आम्ही कसे बरे तरून जाणार? त्या राक्षसाधम रावणाचा वध आम्ही आजच करायला पाहिजे’, अशा चिंतेने व्याकूळ होऊन ते सर्वजण रामाजवळ आले. सीतेचे स्मरण होऊन रामालाही खूप दुःख झाले. विशिष्ट अशा कार्यासाठी मनुष्यरूप धारण करणाऱ्या श्रीरामाने सीतेसाठी बराच शोक केला. राम हा अद्वितीय चैतन्यरूप, एक सनातन परमात्मा आहे. रामाचे स्वरूप ज्ञान ज्या पुरुषाला खऱ्या अर्थाने होते त्याला दुःखादिकांचा संपर्कही होत नाही. मग त्या आनंदरूप अव्यय परमात्म्याला दुःख होणारच नाही हे सांगण्याची आवश्यकता नाही. दुःख, हर्ष, शोक, भय, क्रोध, लोभ, मोह, मद इत्यादि अज्ञानाची चिह्ने आहेत. ज्ञानस्वरूपी परमात्म्याच्या ठिकाणी ही कशी असू शकणार? देहाभिमान बाळगणाऱ्या पुरूषाला दुःखे लागू होतात. देहाभिमान नाही अशा ज्ञानरूपी आत्म्याला नाही. ज्ञान झाले असता दुसरा म्हणून कोणी नसल्यामुळे केवळ सुखच दिसून येते. त्याचप्रमाणे शुद्ध आत्मस्वरूपी बुद्ध्यादिकांच्या अभावी दुःख कधीही दिसून येत नाही. ह्यावरून दुःखादि सर्व बुद्धिपासूनच होत असते यात संशय नाही. राम हा परात्मा, पुराणपुरूष, नाशरहित, नित्यसुखरुपी निर्व्यापार आहे. तरी अज्ञानी लोक त्याला मायागुणांशी आसक्त असल्याचे समजतात. म्हणूनच तो त्यांना सुखी किंवा दुःखी पुरूषांप्रमाणे वाटतो.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे प्रथमः सर्गः।