श्री महादेव म्हणाले,
‘‘त्यावेळी कैकेयीपुत्र भरत मस्तकावर हातांची ओंजळ भक्तिपूर्वक धरून ज्येष्ठ बंधुला, रामाला म्हणाला, ‘‘रामा! तू माझ्या मातेचा सत्कार केलास आणि मला राज्य दिलेस. तू जसे ते मला दिले होतेस तसेच ते मी तुला परत देत आहे.’’ असे म्हणून रामाच्या पायावर भरताने भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घातला. नंतर त्याने, कैकेयीने आणि वसिष्ठानेही अनेक प्रकारे प्रार्थना केली. ‘ठीक आहे’ असे म्हणून मायेचा आश्रय करून सकल मनुष्यलीला करणाऱ्या त्या रामरूप ईश्वराने भरतापासून राज्याचा स्वीकार केला. ज्याचा नित्यशः अनुभव म्हणजे स्वराज्याचा, आत्मसुखाचा, सुखमय ज्ञान हेच ज्याचे एक रूप, ज्याच्या आनंदस्वरुपापलीकडे दुसरा कोणताही आनंद नाही अशा परमात्म्याला मानवी राज्याशी काय करावयाचे होते? ज्या जगन्नियंत्याच्या केवळ भ्रूभंगाने त्रैलोक्याचा नाश होत असतो, ज्याच्या कृपामात्रेकरून इंद्राची ऐश्वर्ये प्राप्त होतात, ज्याने ही महासृष्टी लीलेने निर्माण केली, त्या रमापतीला ह्या राज्याची किंमत ती काय? तथापि भक्तांच्या इच्छा तृप्त करण्यासाठी लीलेने मनुष्यदेह धारण करून हा देव नित्य तसतसा वर्तत असतो.
नंतर शत्रुघ्नाच्या सांगण्यानुसार कुशला नापित आला. रामाच्या अभिषेकाकरिता सर्व प्रकारचे साहित्यही आणले. सर्वांच्या पूर्वी भरताने स्नान केले. त्यानंतर महात्मा लक्ष्मणाने स्नान केले. वानरराज सुग्रीव आणि मग राक्षसेंद्र बिभीषण, ह्या सर्वांनी स्नाने केली. नंतर रामाने जटा मोकळ्या केल्या. स्नान केले. नाना पुष्पमाला धारण केल्या. अंगाला उटी लावली आणि उंची वस्त्रे धारण केली. अशा स्थितीत तेथे उभी असलेली राममूर्ती अत्यंत दैदीप्यमान दिसत होती. पुढे लक्ष्मणाने आणि भरताने रामाला भूषणे लेवविली. नंतर राजस्त्रियांनी सीतेला अलंकार घालून सुशोभित केले. त्यांनी त्या सिंहकटि जानकीला बहुमोल वस्त्रे आणि अलंकारांनी विभूषित केले. नंतर त्या सुशील पुत्रवत्सल कौसल्येने त्या सगळ्या वानरस्त्रियांनाही मोठ्या आनंदाने वस्त्रालंकारांनी भूषविले. मग शत्रुघ्नाच्या सांगण्यानुसार बुद्धिमंत सुमंत्राने सूर्यासमान तेजस्वी रथ जोडला आणि तो घेऊन रामापुढे उभा राहिला. सत्यधर्मपरायण श्रीराम त्या रथात बसला. सुग्रीव, युवराज अंगद, हनुमंत, बिभीषण ह्या सर्वांनी स्नान करून उत्तम वस्त्रे परिधान केली आणि दिव्यालंकार धारण केले. ते कोणी रथात, कोणी घोड्यावर, कोणी हत्तीवर बसून काही रामाच्या मागून, तर काही रामाच्या पुढे असे निघाले. सुग्रीवाच्या स्त्रिया आणि सीता पालख्यांमध्ये बसून मोठ्या राजधानीला जाण्यासाठी निघाल्या. हिरव्या घोड्याच्या रथात बसून देवांसह इंद्र जसा बाहेर पडतो त्याप्रमाणे रथात बसून राम आपल्या राजधानीला निघाला. त्या रथाचे सारथ्य भरताने स्वीकारले. महातेजस्वी शत्रुघ्नाने रत्नांचा दांडा असलेले शुभ्र छत्र धरले आणि लक्ष्मणाने पंखा धरला. जवळच उभा असलेला शत्रूमर्दन सुग्रीव एक चवरी वारू लागला. दुसरी चवरी असुरनायक बिभीषणाने घेतली. त्या चवऱ्या चंद्रतेजाप्रमाणे प्रकाशत होत्या. देव, सिद्धसमुदाय, दिव्यदर्शन ऋषि रामाची स्तुती करत असून तो मधुर नाद सर्वत्र ऐकू येत होता. मनुष्यरूपे धारण करून वानर हत्तीवर बसले होते. भेरी, शंख वाजवित आणि मृदंग, पणव व टिमक्या ह्यांचा गजर करीत ते चालले होते. अशारितीने रघुश्रेष्ठ त्या शृंगारलेल्या राजधानीत येऊन पोचला. श्रीरामचंद्र येताना नगरवासी जनांच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याचे श्याम शरीर दुर्वादलाप्रमाणे शोभत होते. त्याच्या मस्तकावर महामूल्यवान किरीट होता व अंगावर रत्नालंकार घातले होते. नेत्रप्रांत आरक्त व कमळासारखे दीर्घ होते. अशा त्या रामाला पाहून पुण्यवान अयोध्यावासियांना पराकाष्ठेचा आनंद झाला. रामाने पितांबर परिधान केला असून त्यावर चित्रविचित्र रत्नखचित कमरपट्टा घातला होता. त्याच्या विशाल वक्षःस्थलावर महामोल मुक्ताफळांचा हार शोभत होता. अशी ती रघुनंदन मूर्ती प्रजाजनांच्या दृष्टीस पडली. सुग्रीवादी प्रशांत स्वभावाची वानरमंडळी त्याची सेवा करीत होती. त्याचे तेज सूर्यासारखे चकाकत होते. त्याच्या अंगाला कस्तुरी आणि चंदन ह्यांची उटी लावली होती. त्याच्या कंठात कल्पवृक्षपुष्पांची माळ घातली होती. राम जवळ आल्याचे ऐकून अयोध्येतील स्त्रियांना पराकाष्ठेचा आनंद वाटून त्यांच्या मुखावर अतिशय टवटवी दिसू लागली. अगत्याची सर्व कामे टाकून त्यांनी अंगावर अलंकार धारण केले आणि त्या वाड्याच्या गच्च्यांवर जाऊन बसल्या. सर्वांच्या दृष्टीला आनंद देणारी ती रामरूप हरि मूर्ती पाहून त्या स्त्रियांनी रामावर पुष्पवृष्टि केली. त्यावेळेस त्यांच्या मुखावर आनंदाचे हास्य झळकत होते. डोळ्यांना आणि मनाला आनंदाचा विषय होणाऱ्या त्या स्वानंदमूर्ती रामाला पाहून त्यांनी त्याला मनाने आलिंगन दिले. प्रभु रामचंद्रही सस्मित आणि प्रेमळ दृष्टीने प्रजाजनांना बघत बघत हळूहळू पित्याच्या मंदिराकडे येऊन पोचले. ह्यावेळी तो रामरूप हरि सर्वांचा पितामह, दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय असे सर्वांना वाटले. ते मंदिर आज महेंद्रभुवनासारखे अलंकृत केले होते. राजवाड्यात प्रवेश केल्यावर राम एका अभ्यंतरगृहात थांबला. तेथे त्याने प्रथमतः आपल्या मातेच्या चरणांना आनंदाने वंदन केले. नंतर पित्याच्या सर्व स्त्रियांना, आपल्या सावत्र मातांना क्रमाने त्या रघुकुलदीपकाने भक्तिपूर्वक प्रणाम केले. नंतर त्या सत्यपराक्रमी रामाने भरताला सांगितले की, ‘‘सर्व संपत्तीने भरलेले माझे उत्तम मंदिर माझा मित्र वानरराज सुग्रीव, त्याला रहावयास दे. त्याचप्रमाणे दुसऱ्याही सर्वांना सुखाने राहता येईल अशी मंदिराची व्यवस्था कर.’’ रामाने सांगितल्याप्रमाणे भरताने सर्व व्यवस्था केली. तो महातेजस्वी रामाचा धाकटा बंधु भरत सुग्रीवाला म्हणाला, ‘‘सुग्रीवा, श्रीरामाच्या अभिषेकासाठी चतुःसिंधुचे पवित्र जल आणण्याकरिता तू आपल्या दूतांना लवकर पाठव. ते सत्वर गतीने जाऊन येतील.’’ सुग्रीवाने जांबवंत, मारुती, अंगद आणि सुषेण अशा चौघांना जाण्याची आज्ञा करताच ते वायुवेगाने निघून गेले आणि जलपूर्ण सुवर्णकलश घेऊन आले. आणलेले तीर्थोदक शत्रुघ्नाने मंत्र्यांसह रामाभिषेकासाठी म्हणून वसिष्ठांकडे नेऊन दिले. मग त्या परमशुद्ध वयोवृद्ध वसिष्ठ मुनीने अनेक ब्राह्मण बरोबर घेऊन सीतेसह रामाला रत्नसिंहासनावर बसविले. मग वसिष्ठ, वामदेव, जाबालि, गौतम आणि वाल्मीकी ह्या सर्वांनी आनंदाने दर्भांची अग्रे आणि तुलसी ह्यांनी युक्त अशा पवित्र गंधजलांनी रामाला अभिषेक केला. ज्याप्रमाणे वसु इंद्राला अभिषेक करतात त्याप्रमाणे त्या ऋषींनी ऋत्विज, श्रेष्ठ ब्राह्मण, कन्या, मंत्रिगण, आकाशस्थ देवता आणि स्तुतिपाठक, सपरिवार, चार लोकपाल ह्यांसह सर्व औषधींच्या रसांनी रामाला अभिषेक केला. रामाच्या मस्तकावर शुभ्र छत्र शत्रुघ्नाने धरले व सुग्रीव आणि बिभीषण ह्या दोघांनी श्वेत चवऱ्या हातात धारण केल्या. इंद्रप्रेरित वायुने येऊन रामचंद्राला सुवर्णमाला दिली. इंद्राने स्वतः सर्व रत्नांनी गुंफलेला व मणिकांचनाने भूषित केलेला हार भक्तिपूर्वक रामराजाला अर्पण केला. देवगंधर्व गाऊ लागले व अप्सरांच्या गणांनी नृत्याला आरंभ केला. देवदुंदुभि वाजू लागल्या व आकाशातून पुष्पवृष्टि झाली.
रामाची मूर्ती नवदुर्वादलाप्रमाणे श्यामवर्ण दिसत होती. त्याचे नेत्र कमलपत्रासमान लांब दिसत होते. कोटिसूर्याप्रमाणे दैदीप्यमान किरीटाने त्याला विशेषच शोभा आली होती. त्याचे लावण्य कोटिमदनाएवढे होते. त्याने पितांबर धारण केला होता, अंगावर दिव्यालंकार धारण केले होते व दिव्य चंदनाची उटी लावलेली होती. तो दहा हजार सूर्यांप्रमाणे शोभत होता. त्याच्या वामभागी सीता बसली होती. तिची शरीरकांति सुवर्णासारखी होती. तिने सर्वालंकार घातले होते. ती रामाच्या डाव्या मांडीवर बसली होती. तिने आपल्या करकमलात रक्तकमल घेतले होते. राम आपला डावा हात तिच्या खांद्यावर टाकून बसला होता. अशा त्या परम दीप्तिमंत रघुनंदनाला पाहून सकल देवगणांना बरोबर घेऊन पार्वतीसह भगवान शंकरांनी स्तुति करण्यास आरंभ केला.
श्री महादेव म्हणाले, ‘‘सीतेसह रामाला नमस्कार असो. हा राम नीलकमलाप्रमाणे श्याम आणि कोमल आहे. किरीट, हार आणि अंगदादि अलंकार अंगावर घालून तो सिंहासनावर बसला आहे. त्याची कांति महातेजस्वी आहे. रामा, तू आदिमध्यान्तरहित आहेस. तू अद्वितीय आहेस. तू आपल्या मायेने लोकसमूहाला निर्माण करतोस, रक्षण करतोस व त्यांचा नाशही करतोस. तरीही त्या कार्याचा तुला लेप लागत नाही. तू निर्दोष होऊन स्वस्वरुपसुखात नित्य रममाण होत असतोस. शरणागत भक्तांच्या इच्छा तृप्त करण्यासाठी गुणांनी आवृत्त होऊन अनेक लीला करतोस. देव, मनुष्य इत्यादी अनेक अवतार तू धारण करतोस. तुझे खरे स्वरूप ज्ञानिजनांना मात्र नित्य कळते. तू आपल्या अंशाने संपूर्ण जग निर्माण केलेस. पुढे तूच खाली फणीश्वर होऊन ते मस्तकावर धारण करतोस. त्याप्रमाणे वर सूर्य, वायु, चंद्र, ओषधि, पर्जन्य ह्या रुपांनी अनेक प्रकारे त्या जगताचे तू रक्षण करतोस. प्राण्यांच्या शरीरात तू अग्नीरुपाने राहून सर्वदा त्यांनी भक्षण केलेले सर्व अन्न पचवितोस. त्या कामी पंचप्राणवायुंचे त्या जठराग्नीला साह्य होते. तू आपल्या अखंड रूपाच्या योगाने जगाला धारण करतोस. ईश, चंद्रसूर्यामध्ये, अग्नीमध्ये जे तेज आहे, सर्व प्राण्यांमध्ये जे चैतन्य आहे, त्याचप्रमाणे ह्या जगात जनांच्या अंगी जे काही धैर्य, शौर्य आयुष्य म्हणून असते ते सर्व तुझ्याच सत्त्वांशापासून होय. तूच विरिंच, शिव, विष्णु ह्या भिन्न रूपांनी भासतोस व काल, कर्म, चंद्र, सूर्य हे तुझ्याच रूपाचे प्रकार दिसून येतात. ईशा! नाना मतांच्या लोकांना तू नाना रूपाने भासतोस. तरी तू ह्या लोकी एक परब्रह्मरुपच आहेस, ही निश्चित गोष्ट आहे. तू मत्स्यादि रूपे घेऊन अवतार धारण केलास. ही गोष्ट श्रुतीमध्ये, पुराणात आणि लोकात सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे सत्, ब्रह्म आणि असत् विश्व हे तुझेच विभाग आहेत. तुझ्यापेक्षा वेगळे असे काही नाही. ह्या अनंत सृष्टीत जे जे काही उत्पन्न झाले, पुढे उत्पन्न होणार आहे व सध्या उत्पन्न होत आहे ह्याचा विचार केल्यास ह्या चराचरात तुझ्यापेक्षा भिन्न असे काहीच दिसत नाही. म्हणून तू सर्वांहून जो श्रेष्ठ आहे त्याहूनही अधिक श्रेष्ठ आहेस. हे सर्व लोक तुझ्या मायेने मोहित झाल्यामुळे तुझ्या परमात्मस्वरूपाचे तत्त्वज्ञान त्यांना समजत नाही. तुझ्या भक्तांची सेवा करून ज्यांचे चित्त पवित्र झाले आहे त्यांनाच सर्वव्यापी अद्वितीय परमात्मस्वरूप कळून येते. ब्रह्मदेवादिकही बाह्य विषयावर मोहित होऊन जातात, त्यामुळे त्यांना तुझे स्वरूप, ज्ञानमय आत्मतत्त्व कळून येत नाही. म्हणून अज्ञानी लोक तुझ्या ह्याच रुपाचे भक्तिपुरस्सर भजन करतील, तर त्यांची दुःखे नाहीशी होऊन त्यांना मुक्ति मिळेल. मी तुझ्या नामाचा जप करतो त्यामुळे कृतार्थ होऊन मी काशीत भवानीसह नित्य राहतो. जो कोणी मरणोन्मुख प्राणी असेल त्याला मुक्तिकरिता हे रामा! मी तुझ्याच नामाचा उपदेश देत असतो. जे कोणी हा स्तव अनन्यभक्तीने ऐकतील, गातील किंवा लिहितील त्यांना सर्व सौख्य पूर्णपणे मिळून तुझ्या कृपेने अंती तुझे पदही प्राप्त होईल.’’
इंद्र म्हणाला, ‘‘देवा! ब्रह्मदेवापासून वर मिळाल्यामुळे राक्षसाधिपतीने माझे सारे देवसौख्य हरण करून नेले होते. परंतु आता तो राक्षसरुपी दुष्ट शत्रू मारला जाऊन तुझ्या कृपेने ते सर्व सुख मला पुन्हा मिळाले आहे.’’ देव म्हणाले, ‘‘मुरारे विष्णो! ब्राह्मणांनी दिलेले यज्ञभाग हा दुष्ट दैत्याग्रणी घेत असे. त्याचा आज तू वध केल्यामुळे ते आमचे यज्ञभाग पूर्वीप्रमाणे आम्हाला मिळतील.’’ पितर म्हणाले, ‘‘हे महात्मन्! आज तुझ्या हातून जो दुष्ट दैत्य मारला गेला तो गयादि क्षेत्रात लोकांनी आम्हाला दिलेले पिंड खाऊन टाकत असे. तो आम्हा सर्वांना बलात्काराने धरून मारीत असे. आता आम्हाला पहिल्यासारखे सामर्थ्य येईल.’’ यक्ष म्हणाले, ‘‘हा आम्हाला वेठीस धरीत असे. त्यामुळे निरुपायाने दुःखी अंतःकरणाने आम्ही त्याला पालखीत वाहून नेत होतो. राघवेशा, तुझ्याकडून तो दुरात्मा मारला गेल्यामुळे आम्ही सर्व दुःखापासून मुक्त झालो आहोत.’’
गंधर्व म्हणाले, ‘‘आम्ही गायनकलेत निपुण असून पूर्वी तुझ्या कथामृताचे गायन करीत, आनंदामृताच्या डोहात पूर्णपणे मग्न रहात होतो. रामा, त्या दुष्ट रावणाने आम्हाला जिंकून टाकल्यामुळे त्याचेच गायन करून त्याच्या आराधनेत आजपर्यंत तत्पर होतो. तो दुष्ट राक्षस तुझ्याकडून मारला गेल्यामुळे आमची आज मुक्तता झाली आहे.’’
अशारितीने मोठमोठे सर्प, सिद्ध, किन्नर, देव त्याचप्रमाणे वसु, मुनि, गायी, गुह्यक, पक्षी, प्रजापति आणि अप्सरांचे गण हे सर्व रामाकडे येऊन नेत्रांना परमोत्सव देणाऱ्या त्याच्या मूर्तीला पाहाते झाले. त्या सर्वांनी रामाची वेगवेगळ्या प्रकारे स्तुती केल्यावर रामाने त्यांना वंदन केले. नंतर ते सर्व आपापल्या ठिकाणी गेले. ब्रह्मदेव, शंकर वगैरे देवांनीही आनंदाने रामाची स्तुति केली. नंतर त्याच्या चरित्राचे गायन करीत ते स्वलोकी गेले.
अभिषेकाच्या योगाने रामाचे शरीर आर्द्र झाले होते. त्याच्यासोबत सीता आणि लक्ष्मण होते. तो राजेंद्र राम सिंहासनावर बसला होता तरी सर्वांच्या अंतःकरणात वास करीत होता. अशा त्या राममूर्तीचे ध्यान करीत सर्व लोक निघून गेले. आकाशात वाद्ये वाजत होती. आनंदित अंतःकरणाने देवसमुदाय स्वर्गात स्तुति आणि पुष्पवृष्टि करीत होता. चारही बाजूंनी मुनि समुदाय स्तुति करीत होता. श्यामवर्ण रामाच्या प्रसन्न मुखावर हास्य विलसत होते. त्यामुळे ते विशेषच सुंदर दिसत होते. त्याचे तेज कोटिसूर्याप्रमाणे विलसत होते. सीता, लक्ष्मण, मारुती, ऋषी आणि वानर त्याची सेवा करीत होते. असा तो राम सिंहासनावर शोभून दिसत होता.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे पञ्चदशः सर्गः।