श्री महादेव म्हणाले,
‘‘बिभीषणाचे भाषण ऐकून राम म्हणाला, ‘‘बिभीषणा, त्या तामसी राक्षसांचे सर्व कपट मला माहीत आहे. तो ब्रह्मास्त्रविद्यानिपुण आहे. शूर आहे. महाबलवान आहे तसेच तो मायावी, कपटी आहे. लक्ष्मणाचे स्वरूप व तो माझी करीत असलेली सेवा मला कळते आहे. हे समजत असूनही मी स्वस्थ राहिलो आहे, ह्याचे कारण म्हणजे त्याच्या हातून पुढे होणारी महत्त्वाची कामगिरी हेच आहे.’’ असे बोलून त्या महाज्ञानी रामाने लक्ष्मणाला म्हटले, ‘‘लक्ष्मणा, मोठे सैन्य घेऊन जा आणि इंद्रजिताचा वध कर. लक्ष्मणा, मारुती वगैरे सर्व सेनापती बरोबर घे. सकल सैन्यासह अस्वलांचा राजा जाम्बवान तसेच बिभीषणही आपल्या मंत्र्यांसह तुझ्याबरोबर येतील. त्या देशाचा तो माहितगार आहे. तेथील विवरांचीही त्याला माहिती आहे.’’ रामाचे ते भाषण लक्ष्मणाने बिभीषणासह मान्य केले. त्या भीमपराक्रमी लक्ष्मणाने दुसरे मोठे धनुष्य हातात घेतले. नंतर रामाच्या पदकमलांना वंदन करून लक्ष्मण आनंदाने म्हणाला, ‘‘आज माझ्या धनुष्यातून सुटलेला बाण इंद्रजिताचे मस्तक घेऊन पाताळातील भोगावती नदीच्या उदकात स्नान करण्यासाठी जाईल.’’ एवढे बोलून त्याने रामाला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला आणि इंद्रजिताला मारण्याची इच्छा धरून तो वेगाने चालू लागला. त्याच्यामागून अनेक सहस्त्र वानर घेऊन मारुती निघाला. बिभीषणही मंत्र्यांसह त्वरित निघाला. तसेच जांबवान वगैरे रीस लक्ष्मणामागून घाईने निघाले. अशारितीने लक्ष्मण वानरांसह निकुंभिला प्रदेशी पोचला. इतक्यात लांबूनच राक्षसांनी भरलेला एक सैन्यसमूह त्याच्या दृष्टीस पडला. त्यावर तो महापराक्रमी लक्ष्मण आपले धनुष्य सज्ज करून तयार झाला. त्याच्याबरोबर अंगदवीर व जांबवान हे सुद्धा सिद्ध झाले. तेव्हा राक्षसाधिप बिभीषण लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘लक्ष्मणा, हे पहा राक्षस, हे जे मेघासारखे श्यामवर्ण राक्षससैन्य दिसते आहे, त्या मोठ्या सैन्याला फोडण्याचे प्रयत्न कर. ह्या सैन्याची वाताहत झाली म्हणजे तो राक्षस राजपुत्र इंद्रजित तुला दिसेल. त्याने सुरूवात केलेले अनुष्ठान कर्म संपले नाही तोवर त्याच्या अंगावर जा. हे वीरा! त्या दुष्टाचा वध कर. हिंसा करणे हे मोठे धर्मकार्य होय, असे त्याला वाटते.’’ त्या सुलक्षणी लक्ष्मणाने बिभीषणाचे भाषण ऐकून त्या राक्षसाधिपतीच्या पुत्रावर बाणांची सतत वृष्टी केली. त्याचबरोबर वानर सेनापतींनी पाषाण, पर्वतशिखरे आणि वृक्ष ह्यांचा चारी बाजूंनी दैत्यांवर मारा केला. त्यांनीही वानरसेनापतींवर आणि त्यांच्या सेनेवर कुर्हाडी, तीक्ष्ण बाण, तलवारी, काठ्या आणि तोमर यांचा वर्षाव केला. त्या शस्त्रांचा मोठा खणखणाट होत होता. ते वानरांचे आणि राक्षसांचे युद्ध मोठे भयंकर झाले. आपले सर्व दैत्य रणांगणावर शत्रूकडून मार खात असल्याचे पाहून निकुंभिला आणि होम टाकून देऊन इंद्रजित बाहेर पडला.
मोठ्या क्रोधाने रथात बसून व धनुष्य हाती घेऊन तो आला आणि रणभूमीवर लक्ष्मणाला युद्धाला बोलावून म्हणाला, ‘‘लक्ष्मणा, मी इंद्रजित आहे. तुझी माझ्या हातून जिवंत सुटका होणार नाही.’’ तेवढ्यात तेथे बिभीषणाला पाहून इंद्रजित निष्ठूरपणे म्हणाला, ‘‘तू माझ्या पित्याचा साक्षात बंधु असून ह्याच लंकेत जन्मला आहेस व वाढलास आणि आता आपल्या स्वजनांना सोडून तू शत्रूची सेवा करीत आहेस. मी तुला पुत्रासारखा असून तू माझा द्वेष करीत आहेस. तू महान पापी, दुर्मति आहेस.’’ असे बोलून हनुमंताच्या पाठीवर बसलेल्या लक्ष्मणाला त्याने पाहिले. त्यावेळी इंद्रजित मोठ्या रथात बसला होता. त्यात अनेक आयुधे आणि तरवारी सज्ज करून ठेवल्या होत्या. मोठ्या आकाराचे एक धनुष्य उचलून घेऊन त्याचा त्याने भयंकर टणत्कार केला. तो म्हणाला, ‘‘वानरांनो, आज माझे बाण तुमच्या प्राणांचे प्राशन करणार आहेत.’’ इकडे शत्रूला हाय-हाय करविणाऱ्या लक्ष्मणानेही धनुष्यावर बाण जोडला आणि तो राक्षसश्रेष्ठावर सोडला. ह्यावेळी तो क्रुद्ध होऊन फुत्कार टाकणाऱ्या सर्पाप्रमाणे दिसत होता. इंद्रजिताचे डोळे क्रोधाने लाल झाले. त्याने क्रोधाने लक्ष्मणाकडे पाहिले. त्याचवेळी लक्ष्मणाने इंद्राच्या वज्रासमान सोडलेले तीक्ष्ण बाण अंगाला लागून इंद्रजित क्षणभर मूर्च्छित झाला. पण लगेचच तो शुद्धीवर आला. दशरथपुत्र वीर लक्ष्मण आपल्यापुढे उभा आहे असे पाहून क्रोधाने लाल डोळे करून तो वीर इंद्रजित लक्ष्मणावर धावून गेला. त्याने धनुष्यावर बाण जोडला आणि लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘प्रथम युद्धात माझा पराक्रम तुझ्या दृष्टीस पडला नाही तरी तो आज मी तुला दाखवतो. माझ्यापुढे आता व्यवस्थितपणे उभा रहा’’ असे बोलून इंद्रजिताने लक्ष्मणाला सात बाण मारले. तसेच तीक्ष्ण धारेचे दहा उत्तम बाण त्याने मारुतीवर सोडले. नंतर अधिक क्रोधसंतप्त झालेल्या त्या वीर्यशाली इंद्रजिताने बिभीषणावर शंभर बाण टाकून त्याला जर्जर केले. लक्ष्मणानेही तशीच शत्रूवर सारखी शरवृष्टि केली त्या लक्ष्मणाच्या बाणांनी इंद्रजिताचे सोन्यासारखे शोभिवंत कवच, चिलखत तुटून रथात पडले. त्याच्यावर पुन्हा लक्ष्मणाचे बाण पडून त्याचे तिळासारखे तुकडे होऊन ते जमिनीवर पडले. नंतर अतिक्रोधायमान होऊन इंद्रजिताने रणभूमीवर त्या भीमपराक्रमी लक्ष्मण वीराला सहस्त्र बाण मारले. त्यामुळे लक्ष्मणाचे दिव्य कवच तुटून पडले. पुढे त्या दोघांनी एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन परस्परांचे उसने फेडले. त्या दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. दोघेही सारखे दीर्घ श्वास टाकीत होते. दोघांच्याही सर्वांगावर बाणाचे घाव लागून ते पूर्णपणे रक्ताने न्हाले होते. पुष्कळ वेळपर्यंत परस्परांवर तीक्ष्ण बाण टाकून ते दोघे महापराक्रमी वीर लढले. पण जय किंवा पराजय कोणाच्याही वाट्याला येईना. लक्ष्मणाने पाच बाण टाकून इंद्रजिताचा सारथी, तसेच त्याचा रथ आणि घोडे यांचा चुराडा केला. त्याचप्रमाणे त्याचे धनुष्यही आपल्या बाणाने तोडून टाकून आपले हस्तचापल्य दाखविले त्यावर इंद्रजिताने लगेचच दुसरे उत्तम धनुष्य सज्ज केले. लक्ष्मणाने त्या धनुष्याचाही तीन बाण टाकून छेद केला. धनुष्य तुटून पडले असतानाही त्याने आयुधहीन झालेल्या इंद्रजितावर अनेक बाण सोडले. त्यावर त्या पराक्रमी इंद्रजिताने दुसरे धनुष्य घेतले आणि आपल्या सूर्यासारख्या दिव्य बाणांनी लक्ष्मणाला विंधिले. त्याने चारही दिशांना बाणांचा पूर करून वानरांची धूळधाण केली. तेव्हा लक्ष्मणाने ऐंद्र शराची धनुष्यावर योजना केली आणि तो इंद्रजितावर रोखून धनुष्य दृढ धरले आणि रामाचे चरणकमल स्मरण करून आकर्ण प्रत्यंचा ओढली. तो म्हणाला, ‘‘ह्या भूमीवर दाशरथी राम जर धर्माला सत्यप्रतिज्ञ आणि त्रैलोक्यात अद्वितीय वीर असेल तर हे बाणा! तू ह्या इंद्रजिताचा वध कर.’’ असे बोलून तो सरळ जाणारा बाण आकर्ण ओढून रणांगणावर त्या वीर लक्ष्मणाने इंद्रजितावर सोडला. त्या बाणाने कानातील चमकणारी कुंडले आणि शिरस्त्राण ह्यासह इंद्रजिताचे मस्तक धडापासून वेगळे केले आणि जमिनीवर पाडले.
त्यावेळी देवांना परमानंद होऊन ते रघुत्तम रामाची कीर्ती गाऊ लागले. त्याची वारंवार स्तुती करून त्यांनी स्वर्गातून त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. भगवान इंद्र, सकल देव आणि महर्षि ह्यांना हर्ष झाला आणि आकाशात देवांचे दुंदुभि वाजू लागले. त्याचा नाद ऐकू येऊ लागला. आकाश स्वच्छ झाले आणि पृथ्वी इंद्रजिताचा वध झाल्याचे पाहून स्थिर झाली. सर्वांकडून लक्ष्मणाचा जयजयकार झाला. लक्ष्मणाला आता श्रम दूर झाल्यासारखे वाटून त्याने रणभूमीवर शंख वाजविला. नंतर सिंहनाद करून त्या शक्तिमान लक्ष्मणाने धनुष्याच्या प्रत्यंचेचा टणत्कार केला. तो नाद ऐकून वानरांना हर्ष होऊन त्यांचेही श्रम दूर झाल्याचे वाटले. वानरवीरांच्या अंतःकरणात हर्ष दाटून त्यांनी लक्ष्मणाची स्तुती करण्यास प्रारंभ केला. लक्ष्मणाचेही मन संतुष्ट झाले. तो वानरांसह परतला.
मग लक्ष्मणाने हनुमान आणि बिभीषण ह्यांना बरोबर घेऊन नम्रतापूर्वक रामाची भेट घेतली व सर्वव्यापी साक्षात नारायण असा आपला ज्येष्ठ बंधु राम, त्याला वंदन केले आणि म्हणाला, ‘‘रघुश्रेष्ठा, आज रणांगणावर रावणपुत्राचा वध झाला आहे, ही तुझी कृपाच होय.’’ लक्ष्मणाच्या तोंडून ती गोष्ट ऐकून रामाला आनंद झाला. त्याने प्रेमाने लक्ष्मणाला आलिंगन दिले आणि मस्तकाचे अवघ्राण करून प्रेमाने म्हटले, ‘‘लक्ष्मणा, फार चांगले केलेस. तू दुष्कर कार्य शेवटास नेले ह्याबद्दल संतोष वाटत आहे. मेघनाद मृत्यु पावला त्यामुळे हे शत्रूमर्दना! आम्ही सर्व जिंकल्यासारखे झाले आहे. तीन दिवस आणि तीन रात्री कष्टाने युद्ध करून तू त्या वीराला भूमीला मिळवलेस. आज तू माझे सर्व शत्रू नाहीसे केले आहेस. आता रावण पुत्रशोकामुळे माझ्याबरोबर युद्ध करण्यास येईल. त्या रावणाचा मी वध करीन.’’
इकडे लक्ष्मणाने महाबलवान इंद्रजिताचा वध केला असे ऐकून रावण मूर्च्छित होऊन जमिनीवर पडला. बऱ्याच वेळाने पुनः शुद्धीवर येऊन तो अत्यंत दीन होऊन पुत्रशोकाने विलाप करू लागला. मुलाचे गुण आणि त्याची पराक्रमादि कृत्ये आठवून तो शोक करू लागला. तो म्हणाला, ‘‘इंद्रजित मृत झाल्याचे कळले की आज सर्व देवगण, लोकपाल आणि मोठमोठे ऋषी निर्भय होऊन सुखाने झोप घेतील’’ इत्यादी अनेक प्रकारे त्या पुत्रवत्सल रावणाने शोक केला. नंतर अत्यंत क्रोधसंतप्त होऊन सर्व राक्षसांचा रणांगणी नाश करण्याचीच जणू इच्छा मनात धरून त्याने युद्धाला जाण्याची आज्ञा केली. पुत्रवधाने अत्यंत संतप्त होऊन तो क्रोधाधीन झाला. त्याने विचार करून सीतेला मारण्याचे ठरविले आणि तो सीतेवर धावून गेला. तरवार हातात घेऊन आपल्याकडे येणाऱ्या क्रोधाविष्ट रावणाला पाहून राक्षसींमध्ये बसलेली सीता भयभीत होऊन शोक करू लागली. इतक्यात त्या रावणाचा बुद्धिमान, पवित्र आचरणाचा व विचारी सुपार्श्व नावाचा मंत्री जवळच होता. तो रावणाला म्हणाला, ‘‘दशमुखा रावणा, तू प्रत्यक्ष कुबेराचा कनिष्ठ बंधू आहेस. वेदविद्या व व्रते ह्यात तू निष्णात आहेस. स्वकर्माचरणात तू दक्ष आहेस. तू अनेक गुणसंपन्न आहेस. असे असून स्त्रीवधाची इच्छा करीत आहेस, हे काय! आम्हाला बरोबर घेऊन चल आणि रणांगणात रामाचा आणि लक्ष्मणाचा वध कर. म्हणजे तेव्हाच तुला सीतेची प्राप्ती होईल.’’ असे त्या सुपार्श्वाचे न्याय्य म्हणणे मान्य करून रावण माघारी परत फिरला. नंतर त्याचे म्हणणे मान्य करून घरी गेला. शोकामुळे त्याची बुद्धी मूढ होऊन गेली होती. तो लगेचच आप्तेष्टांना सोबत घेऊन सभेत आला.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे नवमः सर्गः।