श्री महादेव म्हणाले,
‘‘सेतू बांधण्यास आरंभ करण्यापूर्वी रामाने तेथे ‘रामेश्वर’ म्हणून शिवलिंग स्थापन केले आणि त्याची पूजा केली. लोकहिताकरिता त्याने असा वर दिला की ‘जो कोणी रामेश्वर लिंगाचे दर्शन घेईल आणि सेतूबंधनास वंदन करील, तो माझ्या अनुग्रहाने ब्रह्महत्यादि पापांपासून मुक्त होईल.’ सेतूबंधनाच्या ठिकाणी मनुष्याने स्नान करून रामेश्वर लिंगाचे दर्शन घ्यावे, संकल्पपूर्वक काशीस जाऊन तेथील गंगोदक आणून रामेश्वरास अभिषेक करावा आणि उरलेले जल, पात्र वगैरे समुद्रात टाकावे. असे केल्याने निःसंशय ब्रह्मप्राप्ती होते.
नलाने पहिल्या दिवशी चौदा योजने सेतू बांधला. दुसऱ्या दिवशी वीस योजने, तिसऱ्या दिवशी एकवीस योजने, चौथ्या दिवशी बावीस योजने बांधला असे ऐकिवात आहे. पाचव्या दिवशी तेवीस अशा प्रमाणाने त्या वानरश्रेष्ठ नलाने समुद्रावर सर्वत्र सेतू बांधला. त्या सेतूवरून ते असंख्यात वानर शंभर योजने समुद्र सहजपणे ओलांडून गेले. नंतर त्या वानरश्रेष्ठांनी सुवेल पर्वताला वेढा दिला. मारुतीवर राम आरुढ झाला. लक्ष्मण अंगदावर आरुढ झाला. लंका बघण्याच्या इच्छेने राम त्या पर्वतावर उंच चढला. तेथून ती अत्यंत विस्तीर्ण लंका रामाने पाहिली. तेथे नानाप्रकारच्या विचित्र ध्वजा फडकत होत्या. सुंदर वाडे एकमेकांना लागून राहिले होते. भोवतालचे तट व तोरणे सुवर्णाची होती. सभोवार खंदक असून ठिकठिकाणी तोफा ठेवल्या होत्या. मधूनमधून पूलही होते. त्यामुळे त्या नगरीला सुंदर शोभा आली होती. त्या समयी राजवाड्याच्या विस्तीर्ण माडीवर दशानन रावण आपल्या पराक्रमी मंत्र्यांसह बसला होता. दहा मुकुटांनी तो तेजःपुंज दिसत होता. त्याची अंगकांती कृष्णमेघाप्रमाणे असून त्याचा आकार नीलपर्वताच्या शिखराप्रमाणे भासत होता. रत्नांच्या दांड्यांनी युक्त अशी अनेक शुभ्र छत्रे त्याच्यावर धरली होती. त्यामुळे तो विशेषच शोभत होता. इतक्यात वानरांनी बांधून आणि बराच मार देऊन मुक्त केलेला शुक तेथे आला. त्याला पाहून हसत हसत रावण म्हणाला, ‘‘शुका! शत्रूंकडून तुला पीडा झाली काय?’’ रावणाचे भाषण ऐकून शुक म्हणाला, ‘‘समुद्राच्या उत्तर तीरावर जाऊन मी आपला निरोप सुग्रीवाला बरोबर सांगितला. नंतर त्या वानरांनी त्याचवेळी मला धरले आणि मुष्टिंनी, नखांनी आणि दातांनी मारून माझे लचके तोडण्यास सुरूवात केली. तेव्हा ‘रामा! माझे रक्षण कर’ असे म्हणून मी आक्रोश केला. त्यानंतर ‘ह्याला सोडा’ असे तो रघुश्रेष्ठ राम म्हणाला आणि मला त्या वानरवीरांनी सोडले. ते वानरसैन्य पाहून मी भयभीत झालो आणि इकडे निघालो. राक्षसांचा सेनासमुदाय आणि वानरश्रेष्ठांचे सैन्य यांचा संधि होणे म्हणजे देवदानवांच्या सख्याएवढे कठीण आहे. वानर नगराच्या कोटावर येत आहेत. तरी दोन्हीपैकी कोणती तरी एक गोष्ट कर. एक सीता तरी त्याला लवकर नेऊन दे किंवा प्रभो! युद्धाला तयार हो. रामाने मला सांगितले आहे की, ‘‘शुका! रावणाला असा माझा निरोप सांग की ज्या शक्तीच्या जोरावर तू माझ्या सीतेचे हरण केले आहेस ते बळ तुझे सैन्य आणि बांधव यासह आता मला खुशाल दाखव. उद्याच्या दिवशी कोट आणि वेशी यासह सर्व लंकानगरीचा आणि राक्षससैन्याचा शरांनी विध्वंस करीन ते पहा. मी भयंकर क्रोध सांडीन. रावणा, धीर धरून रहा.’’ असे बोलून तो कमललोचन राम मग उभा राहिला. तेथे चार पुरुषश्रेष्ठ एकत्र जमले आहेत. राजा रावणा, श्रीराम, लक्ष्मण, सुग्रीव आणि बिभीषण हे चौघे तुझ्या सर्व लंकेचा नाश करण्यास समर्थ आहेत. लंकेचा नाश करण्याच्या कामात दुसरे वानर तर राहू द्यात, एकट्या रामाचे जे बळ, स्वरूप आणि त्याची शस्त्रे मी जी पाहिली आहेत त्यावरून सांगतो की तो एकटाच संपूर्ण नगराचा नाश करील. त्या तिघांचीही गरज नाही. वानरांची असंख्यात सेना सर्वत्र भरून राहिली आहे ती पहा. तेथील पर्वतासमान वानर कसे गर्जना करीत आहेत ते पहा. त्यांची गणना करणे सुद्धा शक्य नाही. तरी मुख्य मुख्य मंडळी सांगतो. हा लंकेकडे तोंड करून गर्जना करीत जो उभा आहे आणि ज्याच्या सभोवती शेकडो सहस्त्र सेनाधिपती आहेत, तो सुग्रीवाचा सेनापती नील नावाचा असून तो अग्नीचा पुत्र आहे. त्याचा आकार पर्वतशिखरासारखा असून त्याची अंगकांति कमळाच्या केशरासारखी आहे. अत्यंत क्षुब्ध होऊन तो आपले शेपूट वारंवार आपटीत आहे. तो अतिवीर्यवान वालीपुत्र अंगद युवराज आहे. रामाच्या अत्यंत प्रिय जानकीची ज्याने भेट घेतली आणि तुझ्या पुत्राचा ज्याने वध केला, तो हा विख्यात मारुती पहा. रुप्यासारख्या अंगकांतीचा, ज्याची बुद्धी आणि पराक्रम थोर आहेत आणि जो सुग्रीवाकडे येऊन लवकर परत जात आहे तो श्वेत नामक वानर होय. जो हा अतुल पराक्रमी सिंहासारखा पाहत आहे तो रंभ नावाचा महाबुद्धिमान वानर आहे. तो एकटाच लंकेचा नाश करू शकेल. लंकेला जाळून टाकण्याच्या इच्छेने तिच्याकडे पाहणारा हा शरभ नावाचा वानर आहे. राजेंद्रा! हा कोटी वानरांच्या सेनापतींचा नायक आहे. महावीर्यशाली पनस, मैंद, द्विविद, समुद्रावर सेतू बांधणारा विश्वकर्म्याचा बलवान पुत्र नल पहा. वानरांचे वर्णन किंवा गणती कोण बरे करू शकेल? हे सर्व शूर, शरीराने धिप्पाड आणि युद्धाविषयी अत्यंत उत्सुक असे आहेत. हे सर्व राक्षसांसह लंकेचे चूर्ण करून टाकणारे आहेत. त्या प्रत्येकाचे सैन्य किती आहे ते आता सांगतो ऐक. ह्या प्रत्येकाच्या हाताखाली एकवीस सहस्त्र कोटी, हजारो शंख आणि शेकडो अर्बुद इतके सैन्य आहे. हे मी सुग्रीवाच्या सचिवांचे बल तुला सांगितले. रावणा, दुसर्यांच्या सामर्थ्याचे वर्णन करण्यास मी समर्थ नाही. राम हा मनुष्य नसून तो साक्षात् परमात्मा आदिनारायण होय. सीता ही साक्षात् जगताचे कारण जगत्स्वरूपी चिच्छक्ति आहे. त्यांच्यापासूनच हे सर्व स्थावरजंगमात्मक जगत् निर्माण झाले. म्हणून राम आणि सीता हे चराचर सृष्टीचे मातापिता आहेत. पृथ्वीपालका रावणा! त्यांच्याशी कोण वैर करू शकणार आहे? जगन्माता अशा त्या जानकीला तू आणलेस, हा तुझा केवळ अविचार आहे. हा संसार क्षणात नाश पावणारा आहे. देहही क्षणभंगूर आहे. राजन्, तो देह पंचभूतात्मक असून चोवीस तत्त्वांचा बनलेला आहे. ह्यात मल, मांस, हाडे, दुर्गंध यांचाच विशेषकरून भरणा आहे. हा अहंकाराचे स्थान आहे. अशा तुझ्याहून भिन्न जड देहाची तू सचेतनाने का आस्था धरावी? ज्याकरिता ब्रह्महत्यादि पातके तू केलीस तो भोग भोगणारा देह तर इथेच पडणार आहे. सुख आणि दुःख ह्यांच्या प्राप्तीची कारणे जे पुण्य, पाप सुद्धा जीवाबरोबर येतात आणि त्यांच्यामुळेच देहाचा संबंध वगैरे होऊन आत्म्याला सदासर्वकाळ सुखदुःखे भोगावी लागतात. जोपर्यंत परवश झालेला आत्मा ‘मी देह आहे’, ‘मी कर्ता आहे’ असा अभिमान धरतो तोपर्यंतच त्याच्या मिथ्या ज्ञानाने त्याला जन्म, मृत्यु ही दुःखे भोगावी लागतात. म्हणून हे महाबुद्धिमंता! तू देहादिकांवरील अभिमान सोडून दे. आत्मा अत्यंत निर्मळ, शुद्ध, ज्ञानमय, निश्चल आणि निर्विकार आहे. त्याला अज्ञानाच्या योगाने स्वस्वरूपज्ञान नसल्यामुळे जन्मादि संबंध घडून मोह होतो. त्याकरिता विशुद्ध भावाने आत्मज्ञान प्राप्त करून घे आणि सर्वदा त्याचे चिंतन कर. पुत्र, स्त्रिया, गृह इत्यादिकांविषयी वैराग्य धारण कर. कारण नरकात काय आणि कुत्री, डुकरे ह्या शरीरात काय इंद्रियांचे भोग हे भोग म्हणून भोगायचे असतातच. आधीच नरदेह दुर्लभ, त्यातही विशेषकरून विवेकयुक्त ब्राह्मणत्व आणि ते सुद्धा भरतखंड नामक कर्मभूमीत प्राप्त होणे म्हणजे अत्यंत दुर्लभ होय. ते मिळाले असता कोणता विद्वान मनुष्य देहावर आत्मबुद्धि ठेवून, देह मी असे मानून भोगाच्या मागे लागेल? तरी तुला ब्राह्मणजन्म प्राप्त झाला आहे आणि त्यातही पौलस्त्याचा तू पुत्र आहेस. अज्ञान्यासारखा नित्य भोगाच्या मागे व्यर्थ लागला आहेस, ते कशासाठी? ह्यापुढे सर्वसंगपरित्याग करून भक्तिपूर्वक परमात्मा जो राम त्याचाच आश्रय कर. सीता रामाला नेऊन दे आणि त्याच्या चरणाची सेवा कर. म्हणजे तू सर्व पापांपासून मुक्त होऊन विष्णुलोकाला जाशील. असे केले नाही तर उत्तरोत्तर अधोगति होऊन अधोलोकी जाशील. तू वर येण्याची आशाच करू नको. माझे हितकारक वचन तू ऐक. रावणा! सज्जनांची संगती धर. जो भक्तांची संकटे दूर करतो, जो शरणागताचे कल्याण करतो, ज्याची अंगकांति पाचूमण्यासारखी सुंदर आहे, ज्याच्या हातात नित्य धनुष्यबाण आहे, ज्याच्या चरणाची सेवा सुग्रीव, लक्ष्मण, बिभीषण करीत असतात, त्या रामचंद्राची भक्ती कर.
इति श्रीमद्ध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे चतुर्थः सर्गः।