श्री महादेव म्हणाले,
‘‘कुंभकर्णाचे भाषण ऐकून रावणाने रागाने भुवया वर चढविल्या. त्याचे मुख भयंकर दिसू लागले. हा आसनावरून उडी मारणार की काय असे सर्वांना वाटू लागले. तो म्हणाला, ‘‘तू थोर बुद्धिमान आहेस. मला काही उपदेश करावा म्हणून तुला येथे बोलावून आणले नाही. तुला आवडत असेल तर मी जे केले आहे ते मान्य करून युद्ध कर अन्यथा जा झोप घ्यायला. तुला आता झोपेची बाधा होत असेल.’’ रावणाचे ते बोलणे ऐकून त्या महाबलवान कुंभकर्णाला रावण रागावला आहे हे समजले. तो लगेचच युद्धाला निघाला. त्याचे शरीर महापर्वताकार होते. वानरांना भीती दाखवत, नगराचा कोट ओलांडून तो लगेच बाहेर आला आणि समुद्रातून प्रतिध्वनी उठेल अशी मोठी गर्जना त्याने केली. क्रोधाने दोन्ही हातांनी वानरांस धरावे आणि खाऊन टाकावे असा त्रास तो देऊ लागला. तो कुंभकर्ण पंखयुक्त पर्वतासारखा दिसत होता. त्याला पाहून हा मृत्युच आला काय असे वाटून सर्व वानर पळू लागले. मुद्गर हातात घेऊन तो महाबलवान कुंभकर्ण वानरसैन्यात फिरत असे. कित्येक वानरांना त्रासून सोडले. आसपास सापडतील त्यास खाऊन टाकावे, कित्येकांचे मुद्गराने चूर्ण करावे तर कित्येकांना अनेक प्रकारे बुक्क्यांनी आणि लाथांनी मारावे असा त्याचा क्रम होता. असा तो कुंभकर्ण त्याच वेळी हातात गदा घेऊन तेथे आलेल्या बिभीषणाला दिसला. त्या बुद्धिमान बिभीषणाने वडील बंधुच्या पायावर लोटांगण घातले. तो म्हणाला, ‘‘मी बिभीषण तुझा बंधु आहे. महामते, मजवर दया कर. बंधु रावणाला मी अनेक प्रकारे बोध केला की ‘सीता रामाला अर्पण कर. राम हा साक्षात जनार्दन, परमेश्वर आहे’ परंतु त्याने माझे ऐकले नाही. मला मारण्याकरिता तरवार उपसून तो म्हणाला, ‘तुझा धिक्कार असो, तू जा’ असे बोलून पापी राक्षस मंडळीत बसलेल्या रावणाने मला लाथ मारली. तेव्हा माझ्या चौघा मंत्र्यांसह मी रामाला शरण आलो.’’
ते ऐकून कुंभकर्णाला आपला बंधु बिभीषण आला आहे असे समजले. त्याने बिभीषणाला आलिंगन दिले आणि म्हटले, ‘‘वत्सा, तू रामपदाचा आश्रय केला आहेस. राक्षसांच्या कुळाचे संरक्षण आणि कल्याण व्हावे ह्यासाठी तू जिवंत राहा. तू महाभगवद्भक्त आहेस, हे मी पूर्वी नारदाच्या तोंडून ऐकले आहे. तू जा. मला आता माझे आणि परके काहीच दिसून येत नाही. रणमदाने माझे डोळे धुंद झाले आहेत.’’ असे कुंभकर्णाने सांगितले असता बिभीषणाच्या मुखावर अश्रू दिसू लागले. त्याने बंधुच्या चरणांना वंदन केले आणि तो रामाजवळ येऊन चिंताक्रांत उभा राहिला. इकडे कुंभकर्ण हातांनी आणि पायांनी वानरांना चिरडीत वानरसेनेत फिरू लागला. गंधहस्ती जसा गजसमूहाची दाणादाण करून सोडतो त्याप्रमाणे कुंभकर्णाने वानरांची अवस्था केली. त्याला पाहून रामाला क्रोध आला. रामाने वायव्यास्त्राची योजना करून ते लक्ष्यपूर्वक कुंभकर्णावर सोडले आणि मुद्गरासह त्याचा उजवा हात तोडून टाकला. तो हात जमिनीवर पडत असताना अनेक वानर त्याखाली चिरडले गेले. इतका वेळ निर्भयपणे त्याजवळ राहणारे सर्व वानर भयकंपित झाले. रामराक्षसांचे युद्ध पाहात स्तब्ध उभे राहिले. कुंभकर्णाचा एक हात तुटला तरी दुसऱ्या हाताने एक वृक्ष उपटून तो भयंकर गर्जना करत रामाला मारण्यासाठी वेगाने धावून गेला. परंतु रामाने इंद्रास्त्र सोडून कुंभकर्णाचा डावा हातही वृक्षासह तोडून टाकला. दोन्ही हात तुटलेल्या स्थितीतही कुंभकर्ण आपल्यावर गर्जना करीत येत आहे असे पाहून दोन तीक्ष्ण अर्धचंद्राकार बाण घेऊन त्यांच्या साहाय्याने त्याचे दोन्ही पाय तोडून टाकले. नंतर ते पाय मोठा आवाज करीत लंकेच्या दारात येऊन पडले. दोन्ही हात आणि दोन्ही पाय तुटले तरीही तो अत्यंत भयंकर कुंभकर्ण वडवामुखाप्रमाणे आपले तोंड पसरून, राहू चंद्रावर धावून जातो त्याप्रमाणे तो रामावर धावून गेला. त्यावर तीक्ष्ण अग्राचे बाण मारून रघुत्तम रामाने ते तोंड भरून टाकले. बाणांनी तोंड भरले तरी तो अतिभयंकर कुंभकर्ण मोठ्याने आक्रोश करू लागला. नंतर रामाने सूर्यासारखा तेजस्वी अत्युत्तम ऐंद्र बाण घेऊन तो दैत्य मारावा ह्या उद्देशाने त्याच्यावर सोडला. तो बाण म्हणजे प्रत्यक्ष इंद्रवज्र किंवा वीज होती असे वाटत होते. कुंभकर्णाचे मस्तक पर्वतासारखे प्रचंड होते. त्यावर कुंडल व दाढा चकाकत होत्या. इंद्रवज्राने वृत्रासुराला ठार मारले होते. त्याचप्रमाणे इंद्रास्त्राने त्या राक्षसाधिपतीचे मस्तक तोडून टाकले. ते मस्तक लंकेच्या दरवाजात येऊन पडले. त्याचे मस्तक पडल्याने लंकाद्वार बंद झाले. धडानेही सागरातील नक्रादिकांचे चूर्ण केले.
तेव्हा देव, ऋषी, गंधर्व, सर्प, पक्षी, सिद्ध, यक्ष, गुह्यक, अप्सरा या सर्वांनी आनंदित होऊन रामावर पुष्पवर्षाव करून त्याची स्तुती केली. ह्या प्रसंगी देवर्षी नारद रामाला भेटण्यासाठी आकाशातून त्वरेने आले. त्यांच्या अंगकांतीने दिशा उज्ज्वल दिसत होत्या. रामाची अंगकांति नीलकमलाप्रमाणे श्यामल होती. त्याच्या शरीरावर उदारतेचे तेज झळकत होते. त्याने हातात धनुष्य धारण केले होते. त्याचे नेत्र किंचित रक्तवर्ण आणि विशाल होते. दुसऱ्या हातात त्याने ऐंद्रास्त्र धरले होते. शरपीडित वानरांकडे दयार्द्र दृष्टीने पहात होता, अशा रामाला पाहून नारदाचा कंठ भरून आला. त्याने भक्तिपूर्वक रामाची स्तुती करण्यास सुरूवात केली. नारद म्हणाले, ‘‘देवाधिदेवा, तू जगन्नाथ आहेस. तू सनातन परमात्मा आहेस. तू सकलाधार नारायण आहेस. तू सर्व विश्वाचा साक्षी आहेस. तुला नमस्कार असो. विशुद्ध ज्ञान हेच तुझे रूप आहे. तथापि मायेने मनुष्यावतार घेऊन आपणालाही सुखदुःखादि भोगावी लागत असल्याचे दाखवून लोकांना तू फसवित आहेस. मायेने आच्छादित होऊन तू सर्वांच्या हृदयात वास करीत असतोस. तुझे स्वरूप स्वयंप्रकाश आहे. ज्याची अंतःकरणे शुद्ध आहेत त्यांनाच तू स्पष्टपणे दिसून येतो. रामा, तू जेव्हा नेत्र उघडतोस तेव्हा हे त्र्यैलोक्य निर्माण करतोस. जेव्हा तू डोळे मिटतोस तेव्हा त्याचा प्रलय होतो ज्याच्या ठिकाणी हे सर्व भासते. ज्याच्यापासून ह्या चराचर विश्वाचे उत्पत्तिस्थितिलय होतात. ज्याहून ह्या लोकात दुसरे असे काही नाही, अशा ब्रह्मरूपा, तुला नमस्कार असो. प्रकृति, पुरुष, व्यक्त व अव्यक्त काल ही ज्याची रूपे आहेत असे मोठमोठे मुनी समजतात, असा जो तू त्या तुला, रामाला नमस्कार असो. तुझे स्वरूप विकाररहित, शुद्ध ज्ञानरूप आहे असे श्रुति सांगते. तीच श्रुति सर्व जगदाकार म्हणजेच तू असेही म्हणते. देवा, असा वेदवादी पुरूषांचा श्रुतिमतात विरोध दिसून येतो. असा विरोध नाही, ही निश्चित गोष्ट तुझ्या कृपेवाचून अज्ञानी लोकांना कळावयाची नाही. देवा, तू मायेच्या योगाने क्रीडा करत असल्यामुळे हा श्रुतिमतातील विरोध रहात नाही. ज्याप्रमाणे भ्रमामुळे रविकिरणसमूह जलासारखे मृगजळ दिसते, त्याप्रमाणे रामा, तुझ्या ठिकाणी भ्रांतिज्ञानाने हे सर्व जग कल्पिले जात आहे. देवा, तुझे अत्यंत निर्गुणस्वरूप मनाला न समजण्यासारखे आहे. ते कसे दिसेल? ते स्वरूप अव्यक्त दिसण्यासारखे नसल्यामुळे भक्ती तरी कशी करावी? म्हणून बुद्धिमान लोक पृथ्वीवर वेगवेगळे अवतार घेऊन जी रूपे तू धारण करतोस, त्याचे भजन करतात आणि मग तेच लोक बुद्धिसंपन्न होऊन भवसागर तरून जातात. जशी मांजरे उंदरांना भिववितात त्याप्रमाणे येथेही काम, क्रोधादि अनेक शत्रू मनाला नित्य भिववितात. तुझे नामस्मरण करणाऱ्या लोकांच्या अंतःकरणापुढे तुझे रूपही नित्य व्यक्त होते. रामा, जे लोक तुझी पूजा करण्यात तत्पर असतात, तुझे चरित्रामृत सेवन करण्यात उत्कंठित असतात आणि तुझ्या भक्तांची संगति धरतात त्यांना संसार म्हणजे गोष्पदासारखा वाटू लागतो. म्हणून मी सर्वदा तुझ्या सगुण रूपाचे चित्तात ध्यान करून मुक्त होत्साता त्रैलोक्यात फिरत असतो आणि त्यामुळेच मी सर्व देवतांनाही पूज्य झालो आहे. रामा, देवांचे हित योजून तू फार मोठे कार्य केले आहेस. प्रभो, कुंभकर्णाचा वध केल्यामुळे पृथ्वीला झालेला भार नष्ट झाला आहे. उद्या युद्धामध्ये लक्ष्मण इंद्रजिताला मारील आणि परवा तू दशाननाचा वध करशील. देवेशा, हा सर्व प्रकार मी सिद्धांसह आकाशातून पाहीन. देवा, माझ्यावर कृपा कर. मी देवलोकाला जातो.’’ असे बोलून देवांनाही पूज्य अशा त्या भगवान नारदऋषींनी रामाचा निरोप घेतला आणि ते निष्पाप अशा ब्रह्मलोकाला गेले.
आपला महाबलिष्ठ बंधु कुंभकर्ण रामाने अनायासे मारला ही गोष्ट ऐकून रावण शोकसंतप्त झाला. मूर्च्छा येऊन तो जमिनीवर पडला. नंतर शुद्धीवर येऊन त्याने नानाप्रकारे विलाप केला. आपला काका कुंभकर्ण मृत्यु पावला आणि आपला पिता अत्यंत व्याकूळ आहे हे ऐकून त्या शोकाकूल पित्याला इंद्रजित म्हणाला, ‘‘महामते! शोक सोडून द्या. मी महाबलवान मेघनाद जिवंत असता आपल्याला शोक करण्याचे कारण काय? महामते, आपण देवांचाही नाश करणारे आहात. पृथ्वीपते, आपले सर्व दुःख नष्ट होवो. आपण स्वस्थ रहा. मी शत्रूंना मारीन आणि त्यांची आमची स्थिती सारखी करीन. आधी निकुंभिलेला जाऊन अग्नीला प्रसन्न करून घेतो. त्या अग्नीपासून रथादि साहित्य मिळवितो. असे केल्याने मी शत्रूला अजिंक्य होईन.’’ असे बोलून इंद्रजित त्या निर्देश केलेल्या निकुंभिलेच्या होमस्थानी गेला. त्याने तांबडी वस्त्रे धारण केली, रक्तगंधाची उटी अंगाला लावली, मौन व्रत घेतले आणि तेथे हवन करण्यास सुरुवात केली.
इकडे बिभीषणाला इंद्रजिताने आरंभिलेल्या कार्याची वार्ता समजली. तेव्हा त्या दुरात्म्याने सुरू केलेल्या होमाची सर्व कथा त्याने रामाला सांगितली. तो म्हणाला, ‘‘ह्या दुष्टाने सुरू केलेला होम समष्टीला जाईल तर रामा, हा मेघनाद देवांना आणि असुरांनाही अजिंक्य होईल. म्हणून मी लवकर ह्या रावणपुत्राचा लक्ष्मणाकडून वध करवितो. बलवंतामध्ये श्रेष्ठ अशा लक्ष्मणाला माझ्याबरोबर येण्याची आज्ञा दे. तो तुझा कनिष्ठ बंधु इंद्रजिताचा वध करील ह्यात संशय नाही.’’
राम म्हणाला, ‘‘इंद्रजित शत्रूचा वध करण्यासाठी मीच येतो. सर्व राक्षसांचा घात करण्याविषयी समर्थ अशा आग्नेय अस्त्राने मी ते कार्य करीन.’’ त्यावर बिभीषणाने त्याला सांगितले की, ‘‘हा इंद्रजित दुसऱ्या कोणाच्या हाताने मारल्या जाणार नाही. जो बारा वर्षे आहार व निद्रा यांचा त्याग करून राहिला असेल, त्याच्याच हातून ह्या दुष्टाचा वध होईल असे ब्रह्मदेवाने सांगितले आहे. लक्ष्मण तुझ्याबरोबर अयोध्येतून निघाला तेव्हापासून हे रघुत्तमा, तो तुझ्या सेवेत असल्यामुळे आहार आणि निद्रा त्याला ठाऊकच नाही. हे सर्व मी जाणतो. म्हणून देवेशा, लक्ष्मणाला माझ्याबरोबर येण्याची आज्ञा द्यावी. हा लक्ष्मण त्या इंद्रजिताला ठार करील, यात संशय नाही. तो लक्ष्मण साक्षात पृथ्वीला धारण करणारा शेष आहे. रामा, तू तर साक्षात सर्व जगताचा, चतुर्दश भुवनांचा अधीश नारायण आहेस आणि लक्ष्मण म्हणजे प्रत्यक्ष शेष आहे. तुम्ही दोघे जगद्रुपी नाटकाचे सूत्रधार असून पृथ्वीचा भार निवारण करण्यासाठी पृथ्वीवर अवतरला आहात.’’
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे युद्धकाण्डे अष्टमः सर्गः।