सूत म्हणाले, विश्वामित्र लक्ष्मणासह असलेल्या रामाला म्हणाले ‘‘आता आपण सर्व जनक राजाच्या मिथिला नगरीला जाऊ या. कारण तेथे फार मोठा यज्ञ समारंभ सुरु आहे. तो यज्ञोत्सव बघून नंतर आपण अयोध्येला जाऊ शकतो’’. असे सांगितल्यावर ऋषिवर्य रामलक्ष्मणासह गंगा नदी ओलांडून पुढे जाण्यासाठी निघाले. तेव्हा मात्र नाविकाने रामाला अडथळा केला. नाविक रामाला म्हणाला, ‘‘हे रामा, मी सर्वप्रथम आपले चरणकमल स्वत: स्वच्छ धुवून काढतो. तसे पाहता लाकूड आणि पाषाण यात फरक तो काय आहे. आपल्या चरणधुलीसंबंधात एक प्रसिद्ध गोष्ट मी ऐकली आहे. हे रामा, तुझ्या चरणधुलीस्पर्शाने दगडातून स्त्री निर्माण झाली. प्रथम ते तुझे चरण मी स्वच्छ धुतो आणि नंतर तुला पैलतीराला नेतो. असे केले नाही तर माझी लाकडाची नौका स्त्री होईल आणि पुढे सर्व अनर्थ घडेल. माझ्या कुटुंबाची हानी होईल. म्हणून मी तुझे चरण धुतो.’’ असे म्हणून त्या नाविकाने रामाचे पाय धुतले आणि मग त्यांना पैलतीरावर नौकेत बसवून नेले. विश्वामित्र रामलक्ष्मणासह त्या जनकराजाच्या मिथिला नगरीला जाण्यासाठी निघाले. प्रात:काळी ते मिथिला नगरीत पोचले. ऋषिंकरता असलेल्या निवासस्थानी उतरले. आपल्या नगरीत विश्वामित्र ऋषी आले हे ऐकून जनक राजाला अतिशय आनंद झाला. पूजासाहित्य घेऊन उपाध्यायासह जनक राजाने तेथे येऊन साष्टांग दंडवत घालून विश्वामित्रांची पूजा केली, वंदन केले. त्यांच्यासोबत आलेल्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या राम-लक्ष्मणांना पाहून जनकाने विचारले, ‘‘मानवांमध्ये श्रेष्ठ, देवपुत्रांप्रमाणे, मनाला तृप्त, समाधानी करणारी ही दोघे कुणाची बरे मुले आहेत? मला तर हे साक्षात नरनारायण भासतात.’’ हे ऐकून विश्वामित्रांना आनंद झाला. मोठ्या प्रेमाने ते सांगू लागले, मुनिवर्य म्हणाले, ‘‘हे दोघे राम आणि लक्ष्मण दशरथ राजाचे सुपुत्र आहेत. माझ्या यज्ञकार्याचे संरक्षण करण्यासाठी म्हणून मी त्यांना अयोध्यानगरीतून आणले आहे. सर्वांना त्रास देणाऱ्या ताटकेचा या रामाने एकाच बाणात वध केला. नंतर माझ्या यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या सुबाहू इ. राक्षसांना ठार मारले. मारीच राक्षसाला तर समुद्रात फेकले. त्यानंतर गंगेच्या किनाऱ्यावर असलेल्या गौतमऋषिंच्या आश्रमात शिळा होऊन पडलेली गौतमांची पत्नी अहिल्या रामाच्या चरणकमलाच्या स्पर्शाने पुन्हा स्त्रीरुप प्राप्त करती झाली. अहिल्येला बघून रामाने तिला नमस्कार केला. अहिल्येनेही रामाची उत्तमप्रकारे पूजा करुन वंदन केले. आता मात्र हे राजा, तुझ्या घरी असलेले शिवधनुष्य बघण्याची रामाची इच्छा आहे. हे राजा, मी असे ऐकले आहे की आजपर्यंत सर्व राजे शिवधनुष्य नुसते बघून गेले, त्याची फक्त पूजा करुन गेले. म्हणून हे राजा, ते शिवधनुष्य रामाला दाखव. ते धनुष्य बघून नंतर अयोध्येला प्रस्थान करण्याचा त्यांचा विचार आहे.’’ विश्वामित्रांनी असे सांगितल्यानंतर ते दोघेही राम-लक्ष्मण पूजनीय आहेत असे जाणून राजा जनकाने त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली. नंतर जनकाने आपल्या विद्वान अशा प्रधानाला पाठवून सांगितले की, ‘‘शिवधनुष्य लवकर आणून रामाला दाखव’’ मंत्रीश्रेष्ठ धनुष्य आणण्यासाठी गेला असता राजा विश्वामित्रांना म्हणतो, ‘‘जर राम हातात धनुष्य घेऊन त्याच्या कोटीवर दोरी चढविल तर माझी कन्या सीता मी त्याला देईन.’’ असे राजाने म्हटले असता रामाकडे बघून हसतहसत विश्वामित्र ‘ठीक आहे’ असे म्हणाले आणि ‘‘रामाला ते शिवधनुष्य सत्वर दाखव’’ असे विश्वामित्र म्हणत असताना चापवाहक धनुष्य घेऊन पोचले. पाचसहस्त्र बलवान अशा वाहकांनी ते धनुष्य आणले. त्या धनुष्याला शेकडो घंटा लावल्या होत्या. रत्न, हिरे जडवून धनुष्य सुशोभित केले होते. ज्येष्ठ मंत्र्याने रामाला ते शिवधनुष्य दाखविले. बघताक्षणीच रामाला अतिशय आनंद झाला. रामाने आपली कंबर घट्ट कसून घेतली आणि पाहता पाहता आपल्या डाव्या हाताने ते धनुष्य सहज उचलले आणि सर्व राजेलोक पहात असताना धनुष्यावर प्रत्यंचा सुद्धा चढविली. रामाने उजव्या हाताने प्रत्यंचा किंचित ओढली. तत्क्षणी ते धनुष्य मोडून पडले. त्यावेळी जो फार मोठा नाद झाला, त्या नादाने सर्व दिशा मात्र दणाणून गेल्या. स्वर्ग, मृत्यु, पाताळ सर्व लोक, सर्व दिशाही भरुन गेल्या. स्वर्गातून बघणाऱ्या देवांना तो फार मोठा चमत्कार वाटला. त्यांनी रामावर पुष्पवृष्टि केली. निरनिराळी स्तोत्रे गाऊन त्याची स्तुति केली. धनुष्याचे दोन तुकडे झालेले बघून जनक राजाने रामाला आलिंगन दिले. अंत:पुरातील स्त्रियांनाही या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले.
यावेळी सुवर्णाप्रमाणे कांती असलेली, सर्व अलंकारांनी विभूषित असलेली हसतमुख, हातात सुवर्णमाला घेतलेली सीता श्रीरामाला आपल्या हातातील माळ घालते. तेव्हा सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले होते. सर्व राजस्त्रिया अत्यंत आनंदाने नटून थटून सर्व अलंकारांनी विभूषित झालेल्या होत्या. सर्वांना आपल्या रुप, गुण, पराक्रमाने मोहित करणारा राम सर्वांचे आकर्षणस्थान झालेला होता.
त्यावेळी सर्वशास्त्रपारंगत विश्वामित्र मुनिवर्यांना राजा जनक म्हणाला, ‘‘हे मुनिवर्य, राजा दशरथ शीघ्र येथे पोहोचेल असे पत्र पाठवा. ह्या पुत्रांच्या विवाहासाठी आपल्या स्त्रिया, पुत्रादिकांसह, मंत्र्यांसह शीघ्र यावे असा दूताकरवी संदेश पाठवा’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून विश्वामित्रांनी ताबडतोब अयोध्येला दूत पाठविले. दूत संदेश घेऊन राजा दशरथाकडे येऊन त्याने रामाच्या थोर अशा भाग्याचा वृत्तांत निवेदन केला. रामाने धनुर्भंग केल्याची विस्मयकारी घटना ऐकून राजाला खूप आनंद झाला. त्याने मिथिला नगरीला जाण्यासाठी घाई करण्याची आज्ञा केली. ‘‘हत्ती, घोडे, रथ, पायदळ इ. सर्व सज्ज करा. माझा रथ सुद्धा लवकर आणा. मी आजच मिथिलेला जाणार आहे. वसिष्ठगुरु अरुंधतीसह अग्नि घेऊन पुढे जाऊ द्या. आमचे गुरुवर्य वसिष्ठमुनी, राजमातांनाही सोबत घेऊन जावे.’’ अशाप्रकारे सर्वांना पुढे पाठवून राजा दशरथ सुद्धा रथात बसून प्रचंड सेनेसहित मिथिला नगरीला निघाला. राजा दशरथ आपल्या नगरीला आला आहे हे ऐकून राजा जनकाला खूप आनंद झाला. शतानंद पुरोहिताला बरोबर घेऊन जनक राजा दशरथ राजाला सामोरा गेला. सत्कारपूर्वक राजाची यथाशास्त्र पूजा केली.
राम-लक्ष्मणानेही पित्याच्या चरणांना त्वरेने वंदन केले. आनंदित होऊन दशरथ रामाला म्हणाले, ‘‘हे रामा, तुला पाहून मला खूप आनंद झाला. मुनिवर्यांच्या कृपेनेच ह्या सर्व मंगल गोष्टी माझ्या भाग्यात आल्या आहेत’’ असे म्हणून रामाच्या मस्तकाचे अवघ्राण केले. पुन:पुन्हा रामाला आलिंगन दिले. राजा दशरथ अतिशय हर्षित होऊन आनंदमग्न झाला.
धर्मपरायण अशा त्या जनक राजाने एका शुभदिवशी शुभलग्न, उत्तम मुहूर्त असताना सर्व बंधुंसह रघुकुलश्रेष्ठ अशा त्या रामाला बोलावले. रत्नाचे खांब ज्याला आहेत असा विस्तिर्ण मंडप तयार केला. सुंदर तोरणे, मोती, फुले, फळे इ. च्या साहाय्याने तो मंडप सुशोभित केलेला होता. त्या मंडपात वैदिक ज्ञानात निष्णात असलेले अलंकारविभूषित असे ब्रह्मवृंद बहुसंख्येने उपस्थित होते. तसेच सुवासिनी स्त्रियाही सुवर्ण अलंकारांनी विभूषित होऊन त्या मंडपात आल्या होत्या. भेरी, दुंदुभी इ. वाद्यांच्या घोषांनी आणि गीत, नृत्य ह्यांच्या ध्वनींनी संपूर्ण सभामंडप दुमदुमून गेला होता. अशा मंडपात एका दिव्य रत्नजडित सुवर्ण सिंहासनावर राजा जनकाने रामाला बसविले. श्रीरामाच्या दोन्ही बाजुंना वसिष्ठ आणि विश्वामित्र बसलेले होते. शतानंद पुरोहिताने त्यांची पूजा केली. त्यानंतर जनक राजाने यथाविधी अग्निची स्थापना करुन होम प्रज्वलित केला. विविध अलकांरांनी, रत्नभूषणांनी सुशोभित अशा सीतेला मंडपात आणले. नंतर आपल्या पत्नीसह राजा जनक रामाजवळ गेला. विधिपूर्वक त्याचे पाय धुतले आणि ते उदक आपल्या मस्तकावर धारण केले. पूर्वी हे उदक साक्षात शंकराने, ब्रह्मदेवाने आणि मुनिवर्यांनी नित्य आपल्या मस्तकावर धारण केले होते. त्यानंतर सीतेला हाती धरुन अक्षतायुक्त असे जल रामाच्या हातावर देऊन, मोठ्या संतुष्ट मनाने त्याने सुवर्णालंकारानेयुक्त अशा सीतेला, ‘‘माझी कन्या मी तुला देत आहे. हे रघुत्तमा, तू संतुष्ट हो, आनंदाने स्वीकार कर.’’ असे म्हणून सीतेला रामाच्या स्वाधीन केले. सीतेचा हात रामाच्या हाती दिला. पूर्वी जसा क्षीरसागराला, विष्णुला लक्ष्मी देताना आनंद झाला होता, अगदी तसाच आनंद राजा जनकाला झाला. नंतर राजा जनकाने आपली कन्या उर्मिला मोठ्या आनंदाने लक्ष्मणाला दिली. त्याचप्रमाणे आपल्या भावाच्या दोन मुली मांडवी आणि श्रृतकीर्ती ह्या दोघी भरत आणि शत्रुघ्नाला दिल्या. अशाप्रकारे राजा दशरथाच्या चारही पुत्रांचा विवाह मिथिला नगरीत पार पडला.
राजा जनकाने वसिष्ठ आणि विश्वामित्रांना उद्देशून नारदाने सांगितलेला स्वत:च्या कन्येचा वृत्तांत सांगितला. राजा जनक म्हणाले ‘‘मी पूर्वी यज्ञभूमि शुद्ध करण्यासाठी नांगराने नांगरीत असताना नांगराच्या ङ्गाळाने पडलेल्या रेषेमधून एक शुभलक्षणांनी युक्त अशी कन्या उत्पन्न झाली. ती अतिशय सुंदर होती. तिला पाहताच माझी दृष्टी स्नेहार्द्र झाली. ती आपली मुलगी आहे अशी भावना मनात निर्माण झाली म्हणून मी तिला आपल्या प्रिय पत्नीच्या स्वाधीन केले.
एकदा मी असाच एकांतात बसलो असता नारदमुनी त्यांची महती वीणा वाजवित ‘नारायण नारायण’ म्हणत माझ्याकडे आले. मी त्यांची पूजा केली. आसनावर बसून संतुष्ट प्रसन्न मनाने मला म्हणाले, ‘‘हे राजा मी तुला एक गुप्त गोष्ट सांगणार आहे. ती तू ऐक. ऐकल्याने तुझे कल्याण होणार आहे. भगवंताने भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी आणि रावणाचा वध करण्याच्या इच्छेने मनुष्य अवतार धारण करुन देवाचे कार्य सिद्ध करण्यासाठी तो परमात्मा राजा दशरथाच्या चार पुत्रांच्या रुपाने अवतरला आहे. आणि योगमायेने सुद्धा ‘सीता’ नाव धारण करुन तुझ्या घरी अवतार घेतला आहे. म्हणून ही सीता प्रयत्नपूर्वक रामालाच दे. इतर कुणाशीही तिचा विवाह करु नको.’’ असे सांगून नारदमुनी तेथून अंतर्धान पावले. नारदमुनी देवलोकाला निघून गेले. तेव्हापासून ही सीता म्हणजे साक्षात विष्णुची लक्ष्मीच आहे असे मी समजतो, मानतो. आता ही शुभलक्षणसंपन्न सीता माझ्याकडून रामाला कशी बरे दिल्या जाईल? या विचाराने मी व्याकूळ झालो असता मला एक युक्ति सुचली. माझ्या आजोबांपासून हे धनुष्य माझ्याकडे ठेव म्हणून ठेवले आहे. हे स्वत: शंकरांनीच पूर्वी त्रिपुरासुराच्या नगराचा नाश केल्यानंतर आमच्या घरी ठेवले होते. तेव्हा या धनुष्याचा सीतास्वयंवरासाठी उपयोग करावा आणि त्यानुसार सीतास्वयंवर ठरविले गेले. सीतेच्या पाणिग्रहणासाठी आलेल्या सर्व राजांचा गर्व ह्या धनुष्याने नाहीसा केला. पण मुनिश्रेष्ठ, आपल्या कृपेने हा कमलनयन राम धनुष्य बघण्यासाठी येथे आला म्हणूनच माझे मनोरथ सफल झाले. हे रामा, माझ्या जन्माचे आता खऱ्या अर्थाने सार्थक झाले. हे रामा, सीतेसह तुला एकाच आसनावर बसलेला मी पाहीन. तू सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेस. तुझे चरणतीर्थ ब्रह्मदेवही मोठ्या आदराने मस्तकावर धारण करतो. पूर्वी बलिराजाने तुझे चरणतीर्थ मस्तकी धारण केले आणि त्याला इंद्रपद प्राप्त झाले. तुझ्या पदस्पर्शाने अहिल्या शापमुक्त झाली. तुझ्यापेक्षा आणखी मोठा असा रक्षणकर्ता दुसरा कोण आहे? ज्याच्या चरणकमलांवर अत्यंत प्रेम ठेवून आणि कालचक्राला स्वाधीन ठेवून योगिजन संसार बंधनातून मुक्त झाले, ज्याच्या नामसंकीर्तनाने देवांनी दु:ख आणि शोक यावर विजय मिळविला. अशा त्या श्रीरामप्रभुला मी नित्यशरण आहे.’’ अशाप्रकारे रामाची स्तुति केल्यावर राजा जनकाने रामाला शंभर कोटी सुवर्णमुद्रा, सहस्त्र रथ, दहा लक्ष घोडे, सहाशे हत्ती, एकलक्ष पायदळ सैन्य, तिनशे दासी दिल्या आणि आपल्या लाडक्या सीतेला दिव्य वस्त्राभरणे, मोत्याचे, रत्नांचे तेजस्वी हार मोठ्या प्रेमाने दिले. वसिष्ठ, विश्वामित्र इ. ची सन्मानाने पूजा करुन तसेच भरत, शत्रुघ्न, राजा दशरथ ह्या सर्वांचा यथायोग्य सत्कार केला. रघुकुलश्रेष्ठ अशा त्या राजपुरुषांची सन्मानाने पाठवणी केली. सासरी जाताना रडू लागलेल्या सीतेला तिच्या मातांनी पोटाशी धरुन तिला मायेने सांगितले, ‘‘सीते, सासुसासऱ्यांची सेवा शुश्रूषा कर, रामाच्या सेवेतही सदैव तत्पर रहा. पतिव्रता धर्माचे पालन करुन सदा सुखात, आनंदात रहा.’’
रामाच्या अयोध्याप्रस्थान समयी नगारे, मृदंग, चौघडे, झांजा, शिंगे इ. वाद्यांचा गजर सुरु झाला. त्याचवेळी स्वर्गातूनही चौघडे, झांजा, शिंगे इ. चा आवाज त्यात मिसळला.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे बालकाण्डे षष्ठः सर्गः।