श्री महादेव म्हणाले,
‘‘ताटकेचा जिथे वध झाला होता त्या ‘कामाश्रम’ नावाने प्रसिद्ध असलेल्या रमणीय अशा आश्रमात, अनेक मुनी जिथे वावरत असत त्या आश्रमात एक रात्र राहून राम, लक्ष्मण, विश्वामित्र तिघेही सकाळच्या वेळी हळूहळू पुढील मार्ग चालू लागले. तेथून पुढे सिद्ध, चारण इ. चे वसतिस्थान असलेल्या सिद्धाश्रमाला ते तिघेही पोचले. या सिद्धाश्रमाला वामनाश्रम देखील म्हणतात. असा हा विश्वामित्रांचा आश्रम होता. तेथे राहणाऱ्या मुनिंनी विश्वामित्रांकडून आदेश मिळाल्यानुसार राम-लक्ष्मणांचा आदरसत्कार करुन त्यांची पूजा केली. विश्वामित्राला ‘‘आता आपण यज्ञदीक्षा धारण करावी’’ असे राम म्हणाले.
मारीच आणि सुबाहू - पराभव वर्णन
राम म्हणाला, ‘‘आपण आता यज्ञकर्मास प्रारंभ करावा.’’ ‘‘ठीक आहे’’, असे म्हणून विश्वामित्रांनी इतर मुनींसह यज्ञाला सुरुवात केली. माध्याह्नसमयी इच्छारुप धारण करणारे मारीच आणि सुबाहू हे दोघे राक्षस दिसले. ते दोघे यज्ञकुंडात रक्त, हाडे इ. चा वर्षाव करीत होते. रामाने त्यांना पाहिले, आकर्ण धनुष्यावर बाण ओढून त्या दोघांवर दोन बाण सोडले. एका बाणाने मारीचाला शंभर योजने गरगरा फिरवून समुद्रात फेकले. अद्भूतच घडले. दुसऱ्या अग्निरुप बाणाने एका क्षणात सुबाहूला जिंकले. त्यांच्या इतर अनुयायांचा लक्ष्मणाने नाश केला.
देवांनी राम-लक्ष्मणावर पुष्पवृष्टि केली. देवदुदुंभि वाजू लागल्या. सिद्धचारणांनीही त्या दोघांची स्तुति केली. विश्वामित्रांनीही त्यावेळी रामाची पूजा केली. त्याला मांडीवर बसवून प्रेमाने आलिंगन दिले. विश्वामित्रांचे डोळे मोठ्या आनंदाने भरुन आले होते.
विश्वामित्रांनी राम आणि लक्ष्मणांना पिकलेली फळे खायला देऊन आणि पुराणातील सुंदर-सुंदर कथा सांगून तीन दिवस तेथे घालविले. तीन दिवस राहिले. चौथा दिवस उजाडल्यावर पहाटेच विश्वामित्र म्हणाले, ‘‘रामा, आता आपण एक मोठा यज्ञ बघायला जाऊ. जनक राजाच्या विदेह नामक नगरीमध्ये श्रीशंकराचे पिनाक धनुष्य, ज्याचे नाव माहेश्वर धनुष्य असे ठेवले आहे, असे ते प्रचण्ड धनुष्य तुला बघता येईल आणि जनकराजा तुझा मोठा सत्कारही करील’’ असे म्हणून विश्वामित्र राम-लक्ष्मणांसह गंगेच्या किनाऱ्यावर आले.
आता ते तिघेही गौतमऋषिंच्या आश्रमात पोचले, ज्या ठिकाणी अहिल्या तप करुन राहिली होती. तो आश्रमपरिसर दिव्य अशा फुलांनी, फळांनी बहरुन आला होता. मात्र तेथे कुणी चिटपाखरुही दिसत नव्हते. हे सर्व बघून राम विश्वामित्रांना म्हणाला, ‘‘हा सुंदर आणि पवित्र असा कोणाचा आश्रम आहे? माझ्या मनाला अतिशय आनंद, प्रसन्नता वाटत आहे. कृपया मला मला येथील सर्व वृत्तांत सांगावा’’. असे रामाने म्हटले असता विश्वामित्र म्हणाले, ‘‘हे रामा, मी तुला येथील पूर्ववृत्तांत सांगतो, ऐक. येथे अत्यंत धार्मिक, तपश्चर्येने परमेश्वराची आराधना करणारे, लोकांमध्ये सुपरिचित असलेले गौतमऋषि रहात होते. त्यांच्या ब्रह्मचर्यव्रताने संतुष्ट होऊन ब्रह्मदेवाने त्यांना अत्यंत रुपवान, सौंदर्यवती, सेवातत्पर अशी अहिल्या नावाची कन्या दिली. अहिल्येसह गौतमऋषि या आश्रमात रहात असत. इंद्राच्या मनात मात्र तिच्या पातिव्रत्याचा भंग करण्याचे विचार होते, म्हणून तो दररोज संधी शोधत होता. एकदा गौतमऋषि आश्रमातून बाहेर गेले असता इंद्र कपटाने गौतमऋषिंचा वेष धारण करुन आला आणि अहिल्येचे पातिव्रत्य भंग करुन गेला. तेवढ्यात गौतमऋषि सुद्धा तेथे पोहचले. आपले रुप घेऊन आलेल्या इंद्राला बघून संतप्त झाले. त्याला विचारले ‘‘माझे रुप घेऊन आलेला तू कोण अधम आहेस? खरे सांग, नाही तर तुला भस्म करीन’’ तेव्हा इंद्र म्हणाला, ‘‘मी देवराज इंद्र आहे. मी कामासक्त अर्थात कामाचा दास झालो आहे. आपण माझ्यावर कृपा करा. माझे रक्षण करा. माझ्या मनात वाईट प्रवृत्ती वाढल्यामुळे मी हे निंद्य असे कुकर्म केले आहे.’’ असे इंद्राने म्हटल्यावर संतप्त होऊन गौतमऋषिंनी इंद्राला शाप दिला. ‘कामासक्त, दुरात्मा, स्त्रीभोगासक्त अशा तुझ्या शरीरावर सहस्त्र छिद्रे पडतील’ असा इंद्राला शाप देऊन गौतमऋषि घाईघाईत आपल्या आश्रमात गेले. आश्रमात हात जोडून थरथर कापत असलेल्या अहिल्येला पाहून ऋषि म्हणाले, ‘‘दुराचरण करणाऱ्या दुष्ट स्त्रिये, तू या आश्रमात शिळा होऊन रहा. रात्रंदिवस, उपाशी राहून कठोर तप करीत रहा. उन, वारा, पाऊस सर्व सहन करीत, त्या परमेश्वराला, रामाला आठवून त्याचे चिंतन, एकाग्र मनाने ध्यान कर. या आश्रमात आजपासून कोणताही जीवजंतू राहणार नाही. अशाप्रकारे हजारो वर्षे या अवस्थेत घालविल्यानंतर तो दाशरथी राम आपल्या कनिष्ठ बंधुसह येथे येईल. तू ज्या शिळेचा आश्रय घेतला त्या शिळेला जेव्हा राम आपल्या चरणांनी ती शिळा ओलांडताना स्पर्श करतील तेव्हाच तू शापमुक्त होशील. रामाचे भक्तिपूर्वक पूजन करशील, त्यांना प्रदक्षिणा करुन स्तुति केल्यानंतर शापमुक्त होऊन तू पूर्ववत आनंदाने माझी सेवा करशील’’, असे गौतमऋषि अहिल्येला बोलून नंतर हिमालय पर्वतावर निघून गेले. तेव्हापासून हे रामा, आजपर्यंत कोणाच्याही दृष्टीस न पडता, आश्रमात तुझ्या चरणधुळीच्या स्पर्शाची इच्छा करीत वायुभक्षण करुन, अतिशय कठीण तपश्चर्या करीत राहिली आहे. अशी ही ब्रह्मदेवाची कन्या, गौतम ऋषिंची पत्नी अहिल्या आहे. तिला पावन कर.’’ असे म्हणून मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी रामाचा हात धरुन उग्र तप करीत असलेली अहिल्या दाखविली. रामाने त्या शिळेला चरणस्पर्श करताच तत्काळ महान तप करणारी ती तपस्विनी अहिल्या रामाच्या दृष्टीस पडली.
‘मी राम आहे’ असे म्हणून रामाने अहिल्येला नमस्कार केला. त्यावेळेस अहिल्येला शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले चतुर्भूज असे भगवंताचे रुप दिसले. त्याचबरोबर हातात धनुष्यबाण धारण केलेले, लक्ष्मणासह रामावतारातील प्रभु रामही दिसले. सुहास्य वदन, कमल नयन, श्रीवत्सलांच्छन धारण केलेले भगवान विष्णु, इंद्रनील मण्याप्रमाणे ज्याच्या अंगकांतीने सर्व दिशा व्यापल्या आहेत अशा रुपातील भगवंताला पाहून अत्यानंदाने अहिल्येचे डोळे प्रफुल्लित झाले. गौतमऋषिंच्या भाषणाचे स्मरण होऊन तिला कळून चुकले की, राम हा साक्षात परमेश्वरच आहे, भगवान विष्णु आहे, याची खात्री पटली. अहिल्येने यथाविधी श्रीरामाचे पूजन केले. आनंदाश्रू नेत्रात दाटून आले. तिने रामाला साष्टांग प्रणिपात अर्थात दंडवत नमस्कार केला. तिने पुन्हा पुन्हा रामाला पाहिले. तिच्या सर्वांगावर रोमांच दाटून आले. सद्गदित कंठाने ती रामाला म्हणाली, ‘‘हे जगन्निवासा रामा, तुझ्या चरणधुलीस्पर्शाने मी आज कृतार्थ झाले आहे. चिंतामग्न होताक्षणीच ब्रह्मदेव, शंकर इ. देव जिचा शोध घेत असतात अशा त्या तुझ्या चरणधुलीला मी स्पर्श करीत आहे. हे रामा! तुझी चरित्रलीला अगाध आहे. तू मनुष्यरुप धारण करुन संपूर्ण जगाला मोहित केले आहेस. तू संपूर्ण जगात नित्य मुक्त संचार करीत असतो. तुझे रुप पूर्ण आनंदस्वरुप असून ते अत्यंत मायावी आहे. माझ्या पूर्वजन्मीच्या भाग्यानेच तू आज प्रत्यक्ष माझ्या दृष्टीचा विषय झाला आहे. मी खरोखर भाग्यवान आहे.’’
अहिल्या रामाची स्तुती करते. ‘‘हे रामा मी तुला शरण आले आहे. मी तुझ्याशिवाय इतर कुणाचेही ध्यान करीत नाही. सदैव तुझेच ध्यान करते. ज्या चरणाच्या धुळीचा शोध श्रृतींकडून केला जातो, ज्याच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाला, ज्याच्या नामाची गोडी साक्षात भगवान शिवशंकराने ओळखली अशा त्या विष्णुचा अवतार असलेल्या रामाचे मी हृदयात सदैव ध्यान करते. राम हा परमात्मा पुराणपुरुष आहे. स्वयंप्रकाशी, अंतरहित असून आद्य आहे. लोकांना मोह पाडील असे याचे मायेने धारण केलेले शरीर केवळ लोकांवर अनुग्रह करण्यासाठीच आहे. हा जगाची उत्पत्ती, स्थिति, लय करणारा आहे. स्वत:च मायेच्या साहाय्याने सत्त्व, रज, तम त्रिगुणांनी प्रतिबिंबित होऊन, ब्रह्मा, विष्णु, शिव अशी भिन्न भिन्न नामरुपे धारण करतो. तो स्वतंत्र स्वयंपूर्ण असा सर्वांतरात्मा आहे. तूच जगाचे आदितत्त्व आहेस, तूच जग आहेस, जगाचा आधारही तूच आहेस. सर्व प्राणिमात्रांमध्ये तू राहतोस पण कोणाशीही तुझा संबंध नाही. तू एक असून सर्व भूतांमध्ये भासतोस. तुझे वर्णन फक्त ॐ कारानेच केल्या जाते, वाणीने वर्णन करता येत नाही. कार्य, कारण, कर्तृत्त्व, फल आणि साधने या भेदामुळे जरी भिन्न भासत असला तरी तू एकच आहेस. तुझ्या मायेमुळे बुद्धिला मोह पडतो म्हणूनच लोक तुला जाणत नाहीत. मायेला स्वाधीन ठेवणाऱ्या तुला मनुष्यच समजतात, परमेश्वर म्हणून मानत नाही. तू सर्वव्यापी, दोषरहित, काहीच कृति न करणारा, सनातन, शुद्ध ज्ञानस्वरुप, सत्तारुप असून अविनाशी आहेस. हे प्रभो, मी अज्ञानी स्त्री आहे. म्हणून तुझे सत्यस्वरुप प्रकट करणारे तत्त्व जाणू शकत नाही. म्हणून हे रामा, मी तुला अनन्य बुद्धिने शतश: प्रणाम करते. मी सदैव तुझ्या चरणांचीच भक्ति करीन, भक्तित मग्न राहीन. हे पुरुषाध्यक्षा, तुला नमस्कार असो. हे भक्तवत्सला, हे हृषिकेशा, हे नारायणा मी तुला वंदन करते. जो एकमात्र सर्व संसारभय नष्ट करणारा आहे, जो कोटिसूर्याप्रमाणे तेजस्वी असून हातात धनुष्य-बाण धारण केलेला आहे, जो श्यामलवर्ण आहे, सुंदर सुवर्णवस्त्रे परिधान केलेली आहेत, रत्नजडित कुंडले धारण केली आहेत, कमलनयन अशा कनिष्ठ बंधु लक्ष्मणासह असलेल्या रामाची मी स्तुति करते.’’
अशाप्रकारे अहिल्येने रामरुपात असलेल्या परमात्म्याची स्तुति करुन प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला. त्याच्या अनुज्ञेने आपल्या पतिकडे गेली.
(62 ते 65 पर्यंत फलप्राप्ती वर्णन केली आहे.) अहिल्येने केलेली रामाची स्तुती जो कोणी भक्तिपूर्वक पठण करील तो सर्व तऱ्हेच्या पापातून मुक्त होवून परब्रह्मस्वरुपाला प्राप्त होतो. पुत्रप्राप्तीसाठी जी स्त्री श्रीरामाला हृदयात ठेऊन या स्तोत्राचा पाठ करील तिला सुपुत्र होईल. तिचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. जो कोणी अधर्मी, पापी, ध्यानपूर्वक अंत:करणात रामाला ठेवून स्तोत्र पठण करील त्याला सुद्धा मुक्ति प्राप्त होईल. स्वधर्माचे आचरण करणारा मनुष्य ह्या स्तोत्र पठणाने मुक्ति प्राप्त करुन घेईल.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे बालकाण्डे पञ्चमः सर्गः।