श्रीमहादेव पार्वती यांचा संवाद वर्णन
पार्वती म्हणते, ‘‘हे प्रभो मी आज खरोखर धन्य धन्य झाले आहे. आपण माझ्यावर अनुग्रह करुन माझ्या मनातील संशयरुपी गाठी तोडून टाकल्या, नष्ट केल्या. मी कृतार्थ झाले आहे. आपण मला श्रीरामतत्त्वरुपी अमृतासारखे गोड रसायन दिले खरे पण अजूनही माझे समाधान झाले नाही. कारण संक्षेपाने थोडक्यात रामकथा ऐकली परंतु तीच कथा मला सविस्तर सुस्पष्ट रितीने ऐकावयाची आहे.’’ यावर महादेव म्हणतात, ‘‘अत्यंत गुह्यतर असे अध्यात्म रामचरित्र तुला ऐकविले आहे. श्रीरामाने मला पूर्वी जसे सांगितले तेच तुला मी सांगतो आहे.
अध्यात्मचरित्र हे त्रिविध तापांपासून रक्षण करणारे आहे. आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक असे तीन प्रकारचे त्रास मनुष्याला असतात. हे चरित्र ऐकल्याने अज्ञानाने निर्माण झालेल्या भयातून जीव मुक्त होतो. श्रेष्ठ असे ऐश्वर्य, दीर्घ आयुष्य, पुत्र संतती याचा लाभ मनुष्याला होतो.
पूर्वी रावण इ. अनेक राक्षसांच्या त्रासाने व्याकुळ झालेली पृथ्वी, गायीचे रुप धारण करुन ब्रह्मदेवाकडे, सर्व देव आणि मुनिजनांना सोबत घेऊन ब्रह्मलोकाला आली. रडत रडत तिने सर्व प्रकारचे संकट ब्रह्मदेवाला सांगितले. ब्रह्मदेवाने क्षणभर ध्यान करुन सर्व गोष्टी जाणून घेतल्या. पृथ्वी, देव, मुनीजन, या सर्वांना सोबत घेऊन ब्रह्मदेवाने श्रीविष्णुची स्तुति केली. त्यावेळी दैदीप्यमान सूर्याप्रमाणे तेजस्वी, सर्व दिशांचा अंध:कार नष्ट करणारा भगवान विष्णु पूर्व दिशेला प्रकट झाला. ज्यांचे दर्शन दुर्लभ आहे अशा त्या विष्णुचे दर्शन ब्रह्मदेवाला मोठ्या कष्टाने झाले. त्या भगवान विष्णुचा वर्ण इंद्रनील मण्याप्रमाणे होता. कमलनयन विष्णुच्या मुखावर स्मितहास्य होते. किरीट, हार, केयूर, कर्णफुले, कडी इ. अलंकारांनी शोभणारे श्रीवत्स आणि कौस्तुभ ह्यांचे तेज भगवंताच्या शरीराला विशेष झळाळी आणीत होते. स्तुति करणाऱ्या सनकादिक, सेवकवर्गानी वेढलेल्या, शंख, चक्र, गदा, कमल, वनमाला यांनी सुशोभित असे रुप होते. लक्ष्मी आणि भूमि यांच्यासह गरुडावर आरुढ असलेल्या अशा त्या विष्णुची सद्गदित वाणीने, आनंदाने स्तुती करण्यास आरंभ केला.
ब्रह्मदेव म्हणाले, ‘‘कर्मबंधनातून मुक्त होण्याची इच्छा करणारे मुमुक्षू आपल्या चरणांचे सदैव चिंतन करीत असतात. मी आपल्या चरणाशी विनम्र झालो आहे. पंचप्राण, बुद्धी, दशेंद्रिये, मन या सर्वासह मी नम्र झालो आहे. आपणच त्रिगुणमयी मायेने (सत्त्व, रज, तम) जगाची उत्पत्ती, पालन, संहार करता. परंतु आपणाला अभिमानाचा किंचितही स्पर्श होत नाही. आनंद अनुभवाचे आपले स्वरुप आपण जसेच्या तसेच ठेवता. आपल्या यशाचे भक्तिपूर्वक, गुणसंकीर्तन करणाऱ्यांना जशी शुद्धता मिळते तशी शुद्धता दुष्ट अंत:करणाच्या लोकांना वेदपठण, दान, यज्ञकर्मे करुनही मिळत नाही. आपल्या चरणांच्या दर्शनाने माझ्या ठिकाणचे दोष नष्ट होवो. ब्रह्मानंदाच्या प्रत्यक्ष अनुभवासाठी ज्ञानी लोक ध्यान करतात. आपल्या चरणांची भक्ति करणारे भक्त आपल्याला अधिक आवडतात. संसाररुपी रोगाने त्रस्त झालेल्या लोकांना औषध म्हणजे आपली भक्तीच होय.’’
अशाप्रकारे स्तुति करणाऱ्या ब्रह्मदेवाला भगवान विष्णु म्हणाले, ‘‘मी आता काय करावे?’’ तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, ‘‘हे भगवन, पौलस्त्य ऋषींचा पुत्र राक्षसराज, महापराक्रमी रावण हा मी दिलेल्या वरामुळे अतिशय उन्मत्त झाला आहे. तो त्र्यैलोक्याला, लोकपाल राजांना अतिशय त्रास देतो. संपूर्ण जगाला घातक, बाधक असा झाला आहे. हे देवा, मी त्याला मनुष्याकडून तुझा वध होईल असे सांगितले आहे. म्हणून आपण मनुष्यरुप घेऊन त्या शत्रूला जिंकावे.’’
असे ब्रह्मदेवाने म्हटले असता श्रीविष्णु म्हणाले, ‘‘पूर्वी ज्याने मी त्याचा पुत्र व्हावे असे मागणे मागितले होते तो कश्यप आता दशरथ होऊन पृथ्वीवर आलेला आहे. त्याचा पुत्र म्हणून मी एका शुभदिवशी कौसल्या आणि इतर दोन स्त्रियांच्या पोटी वेगवेगळे असे चार अवतार धारण करीन. त्याचवेळी योगमाया सुद्धा जनकाचे घरी ‘सीता’ म्हणून जन्म घेईल. तिच्यासह मी सर्व काही तुमचे हेतू पूर्ण करीन’’ असे बोलून भगवान विष्णु अंतर्धान पावले. भगवान विष्णुने असे सांगितल्यावर ब्रम्हदेव म्हणतात, ‘‘ श्रीविष्णु हे मनुष्यरुपाने रघुकुळामध्ये जन्म घेणार आहेत. तेव्हा हे देवांनो, तुम्ही सर्वजण वानरामध्ये अंशावतार घेऊन पृथ्वीवर जावे. जोपर्यंत विष्णु भूतलावर असतील तोपर्यंत तुम्ही त्यांचे साहाय्य करा.’’ अशाप्रकारे देवांना आदेश देऊन पृथ्वीला आश्वस्त करुन ब्रह्मदेव ब्रह्मलोकाला गेले. देवांनी सुद्धा महाबलवान, पर्वत वृक्ष ह्यांनी युद्ध करणाऱ्या वानरांची रुपे धारण केली आणि श्रीविष्णुच्या अवताराची वाट पाहू लागले.’’
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे बालकाण्डे द्वितीयः सर्गः।