श्री महादेव म्हणाले,
‘‘अग्नीप्रमाणे तेजस्वी असे विश्वामित्र ऋषि, परमात्म्याने आपल्या मायेने ‘राम’ अवतार धारण करुन पृथ्वीवर जन्म घेतला आहे हे त्यांना समजले म्हणून ते रामाला पाहण्यासाठी अयोध्येला आले. विश्वामित्रांना पाहून दशरथ आनंदाने सिंहासनावरुन उठून स्वागतासाठी पुढे आला. वसिष्ठ ऋषिंच्या आदेशानुसार त्यांची यथोचित पूजा केली. विश्वामित्रांना वंदन करुन, हात जोडून भक्तीने आणि विनम्र होऊन दशरथ राजा म्हणाला, ‘‘आज मी खरोखर धन्य झालो आहे. आपणासारख्या थोर ऋषिंच्या आगमनाने सर्व तऱ्हेचे वैभव प्राप्त होते. आपण कोणत्या कार्याच्या निमित्ताने येथे आला आहात, कृपया सांगावे, मी ते पूर्ण करीन’’. राजाने असे म्हटले असता महाबुद्धिवान ऋषि अत्यंत संतुष्ट होऊन म्हणाले, ‘‘पर्वकाळ असताना मी जेव्हा देव आणि पितरांची आराधना करण्यास्तव यज्ञकार्याला सुरुवात करतो तेव्हा त्या यज्ञाच्या आरंभीच मारीच, सुबाहू आणि इतर दैत्य यज्ञात नेहमीच विघ्न आणीत असतात. म्हणून त्या राक्षसांचा नाश करण्यासाठी तुझा ज्येष्ठ पुत्र राम आणि त्याच्या सोबत लहान भाऊ लक्ष्मण या दोघांना माझ्याबरोबर पाठव. असे केल्याने तुझे निश्चितच कल्याण होईल. याबाबतीत हे राजा तू वसिष्ठांसोबत विचारविनिमय कर. नंतरच निर्णय घे.’’ चिंताग्रस्त झालेला दशरथ एकांतात वसिष्ठांबरोबर विचारविनिमय करतो. आपली मनःस्थिती वसिष्ठांना निवेदन करतो. ‘‘माझे मन काही राम-लक्ष्मणाला देण्यास तयार होत नाही. मोठ्या कष्टाने मला हे पुत्र प्राप्त झाले आहेत. या चार पुत्रांमध्ये राम माझा अतिशय लाडका पुत्र आहे. राम जर विश्वामित्रांबरोबर जाईल तर मी कसा जिवंत राहणार? कारण राम हा माझा प्राण आहे. परंतु विश्वामित्रांना नाही म्हटले तर ते खात्रीने शापच देतील, तेव्हा आचार्य तुम्हीच सांगा मी काय करु म्हणजे माझे कल्याण होईल आणि मला असत्य भाषणाचा स्पर्शही होणार नाही असे मला सांगा.’’
वसिष्ठ ऋषि म्हणाले, ‘‘हे राजा, मी देवांचे एक विशेष गुपित तुला सांगतो ते ऐक. राम हा काही साधारण मनुष्य नाही तर तो जन्ममरण नसलेला असा परमात्मा अवतार घेऊन आला आहे. पूर्वी पृथ्वीवरील पातकांचा भार दूर सारण्यासाठी, ब्रह्मदेवाने याची प्रार्थना केली होती. तोच परमात्मा, हे राजा, तू निष्पाप असल्यामुळे तुझ्या घरी कौसल्येच्या पोटी अवतार घेऊन आला. हे राजा, पूर्वजन्मात तू ब्रह्मदेवाचा पुत्र कश्यप नावाचा प्रजापति होतास आणि कौसल्या ही त्या काळात देवमाता अदिती होती. तुम्ही दोघांनी अनेक वर्षे भयंकर असे उग्र तप केले. सर्व निंद्य अशा विषयांचा त्याग करुन केवळ श्रीविष्णुचे ध्यान, पूजन यात तत्पर राहून रममाण होत असत. म्हणून भक्तांबद्दल विशेष प्रेमभाव मनात ठेवणारे भक्तवत्सल आणि वर देणारे भगवान विष्णु प्रसन्न झाले. ‘वर माग’ असे म्हणाले तेव्हा तू म्हणालास, हे निर्मलस्वरुपा ‘तू माझा पुत्र हो’ भगवान म्हणाले ‘ठीक आहे’. याप्रमाणे वरप्रदान केल्यामुळे तो परमात्मा आता तुझा पुत्र झाला आहे. हे राजा, भगवान विष्णुचा शेष लक्ष्मणाचे रुप घेऊन आला आहे. भरत आणि शत्रुघ्न सुद्धा त्या परमात्म्यापासूनच आले आहेत आणि योगमाया ही जनक राजाची कन्या सीता म्हणून अवतीर्ण झाली आहे. रामाचा योगमायेशी संबंध जुळवून आणण्यासाठीच तर विश्वामित्र आलेले आहेत. यज्ञरक्षणाचे फक्त निमित्त आहे. म्हणून हे राजा, हे गुपित केव्हाही, कुणालाही सांगू नको. अतिशय गुप्त ठेव. आता मात्र संतुष्ट मनाने विश्वामित्राचे पूजन करुन राम-लक्ष्मणाला त्यांच्यासोबत यज्ञ संरक्षणासाठी पाठव’’.
अशा प्रकारे वसिष्ठ ऋषिंनी सर्व हकीकत सांगितल्यानंतर मनातून अतिशय आनंदित होऊन त्याला कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. त्याने अतिशय प्रेमाने आदरपूर्वक ‘रामा, लक्ष्मणा’ अशी हाक देऊन बोलावले. त्यांना आलिंगन दिले, त्यांच्या मस्तकाचे चुंबन घेऊन त्यांना विश्वामित्रांच्या स्वाधीन केले. विश्वामित्र ऋषि मात्र विशेष प्रसन्न झाले. त्यांनी दशरथाला अनेक उत्तम आशीर्वाद देऊन त्याचे अभिनंदन केले. राम-लक्ष्मण धनुष्यबाण, खङ्ग, बाणांचा भाता सर्व घेऊन सज्ज झाले. विश्वामित्रांबरोबर निघाले. थोडाफार मार्ग चालून गेल्यानंतर विश्वामित्रांनी रामाला भक्तिपूर्वक जवळ बोलावून बला-अतिबला नावाच्या देवांनी निर्माण केलेल्या दोन विद्या दिल्या. ह्या दोन विद्या मिळाल्या म्हणजे भूक किंवा वेदना अशा काही वेदना होत नाही.
नंतर ते तिघेही गंगानदी पार करुन ताटकावनात पोहोचले. विश्वामित्र रामाला म्हणाले, ‘‘या वनात ताटका नावाची राक्षसी, जी इच्छारुपधारिणी आहे, जी लोकांना त्रास देते, ती राहते. कसलाही विचार न करता तू तिचा वध कर’’ असे विश्वामित्रांनी सांगितले असता रामाने तात्काळ धनुष्यावर प्रत्यंचा चढवून टणत्कार केला. त्या धनुष्य टणत्काराने सर्व अरण्य दणाणून गेले. तो आवाज ऐकून विचलित झालेली ताटका अत्यंत क्रोधित होऊन रामावर धावून आली. तिला रामाने एकच बाण मारला. तत्क्षणी ती राक्षसी अक्षरश: रक्त ओकीत त्या अरण्यात पडली. त्यानंतर शापामुळे पिशाचयोनीला आलेली राक्षसी रामकृपेने शापमुक्त झाली आणि सर्वांगावर विविध अलंकार घालून नटलेली अतिशय सुंदर अशी यक्षिणी होऊन रामासमोर उभी राहिली. रामाला नमस्कार करुन तिने प्रदक्षिणा घातली आणि रामाची आज्ञा मागून स्वर्गाला गेली.
मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांनी अतिशय आनंदित होऊन रामाला आलिंगन दिले. त्याच्या मस्तकाचे अवघ्राण केले. विश्वामित्राने रहस्यमंत्रासह सर्व अस्त्रविद्यांचा मोठ्या प्रेमाने रामाला उपदेश केला.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे बालकाण्डे चतुर्थः सर्गः।
....