श्री महादेव म्हणाले,
‘‘इकडे ते वानर झाडांच्या राईत बसून विचार करू लागले. त्यांना काहीच सुचत नव्हते. सीतेचा शोध करता करता ते अगदी थकून गेले. तेव्हा त्या वानरांचा प्रमुख जो अंगद त्याने काही वानरांना म्हटले, ‘‘सीताशोधासाठी आम्ही रानोरानी फिरायला लागल्यापासून एक महिना तर पूर्ण होऊन गेला. आम्हाला सीतेचा शोध लागला नाही म्हणजे आम्ही राजाज्ञा पाळली नाही. आता आपण किष्किन्धेला गेलो तर सुग्रीव आमचा वध करील. विशेष करून मी शत्रूपुत्र असल्यामुळे मला तो त्या निमित्ताने मारील. माझ्यावर त्याचे प्रेम कोठून असणार? माझे रक्षण रामाने केले आहे. माझ्याकडून रामाचे कार्य झाले नाही हे त्या दुष्ट सुग्रीवाला मला मारण्यासाठी आयतेच एक निमित्त मिळणार आहे. हा पापात्मा आईसमान वडील बंधूच्या पत्नीचा उपभोग घेत आहे. म्हणून हे वानरश्रेष्ठहो! यापुढे मी त्याच्याजवळ जाणार नाही. कोणत्या तरी युक्तीने मरण आणवून मी येथे प्राणत्याग करणार आहे.’’ असे बोलत असता अंगदाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ते पाहून कित्येक वानरवीरांना दुःख झाले. त्यांच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ते युवराज अंगदाला म्हणाले, ‘‘हा काय म्हणून तू शोक करीत आहेस? आम्ही तुझे प्राणरक्षक आहोत. आपण येथे ह्या गुहेत राहू या. ह्या ठिकाणी आम्हाला भीती नाही. हे नगर देवनगरासमान असून सर्व ऐश्वर्यानी भरलेले आहे.’’ अशी त्यांची आपापसात हळूहळू भाषणे चालली असता ती मारुतीच्या कानावर गेली. नयनिपुण मारुतीने अंगदाला आलिंगन दिले आणि म्हटले, ‘‘हे विचार कसे काय तुझ्या मनात येत आहेत? वाईट विचार करणे तुझ्यासाठी योग्य नाही. तू तारेचा पुत्र असल्यामुळे सुग्रीवाला अत्यंत प्रिय व आवडता झाला आहेस. रामाचे सुद्धा तुझ्यावर लक्ष्मणापेक्षाही अधिक प्रेम आहे. ते नित्य वाढत जात आहे. म्हणून तुला रामाची भीती नाही. विशेषकरून राजा सुग्रीवाची तर नाहीच नाही. वत्सा! मी तुझ्या कल्याणाकरिता सदैव तत्पर आहे. माझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही तू काही विचारू नकोस. आता ह्या गुहेत राहाणे निर्भय आहे म्हणून वानर म्हणत आहेत. तरी ते म्हणणे अयोग्य आहे. त्रिजगतामध्ये ह्या रामबाणांना अभेद्य असे काय आहे? वानरश्रेष्ठा, जे हे वानर तुला वाईट सल्ला देत आहेत ते तरी पुत्र, स्त्रिया इत्यादिंना टाकून तुझ्याबरोबर कसे राहणार? वत्सा, आणखी एक अत्यंत गुप्त अशी रहस्याची गोष्ट तुला सांगतो. ऐक, राम हा मनुष्य नाही. तो साक्षात् प्रभु नारायणच आहे. सीता ही जगाला मोह घालणारी भगवती माया आहे आणि लक्ष्मण म्हणजे जगाला आधारभूत असा साक्षात् नागराज शेष आहे. राक्षस समुदायांचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यावरून ह्या सर्वांनी मायेने मनुष्यरुप धारण केले आहे. ह्यापैकी प्रत्येक जगाचे रक्षण करण्यास योग्य आहे. आम्हीही सर्व वैकुंठवासी विष्णुचे अनुचर आहोत. त्या परमात्म्याने स्वेच्छेने मनुष्यरूप धारण केले असता त्याच्याच मायेने आम्हीही वानररुपाने जन्माला आलो. आम्ही पूर्वी तपश्चर्येच्या योगाने जगत्पतीची आराधना केली होती. म्हणूनच आम्हावर अनुग्रह केला असल्यामुळे हे त्याचे पार्षदत्व, अनुचरत्व आम्हाला प्राप्त झाले. आता सुद्धा त्याच्याच मायेला अनुसरून आपण त्याची सेवा करू.’’ अशारितीने मारुतीने अंगदाची समजूत घातली. पुढे ती मंडळी विंध्य नावाच्या मोठ्या पर्वतावर गेली. तेथून सावकाश सीतेचा शोध करीत करीत ते दक्षिण समुद्राच्या तीरावर महेंद्र नामक पर्वताच्या पवित्र पादप्रदेशी येऊन पोचले. तेथून तो दुष्पार, अगाध आणि भीती वाढविणारा समुद्र पाहून, ‘आता काय करायचे’ ह्या विचाराने ते वानर भयभीत होऊन गेले. मग ते महाबलिष्ठ अंगदादि वीर चिंताग्रस्त होऊन समुद्राच्या तीरावर बसून राहिले. त्यांनी परस्परांशी विचार केला की, ‘फिरता फिरता ह्या गुहेमध्येच आमचा एक महिना निघून गेला. अजून रावणही दिसला नाही किंवा जनककन्या सीतेचाही पत्ता लागला नाही. भयंकर शिक्षा देणारा सुग्रीव आता आम्हाला ठार मारील. ह्यात काही संशय नाही. सुग्रीवाच्या हातून मरण्यापेक्षा प्रायोपवेशनाने प्राणत्याग करणे हेच अधिक योग्य आहे.’ असे ठरवून त्या सर्वांनी सर्वत्र दर्भ अंथरले आणि मरणाचा निश्चय करून ते तेथे बसून राहिले. इतक्यात त्या महेंद्रपर्वताच्या गुहेतून पर्वतासमान शरीराचा एक गृध्र बाहेर आला. प्रायोपवेशनाच्या संकल्पाने तेथे बसलेल्या त्या वानरश्रेष्ठांना पाहून तो गृध्र सावकाशपणे म्हणाला, ‘‘आज मला खूप मोठाच आहार मिळणार आहे. प्रत्येक दिवशी एक एक अशा क्रमाने मी सर्वांना भक्षण करीन.’’ ते त्या गृध्राचे भाषण ऐकून वानर मनात भयभीत झाले, ते म्हणाले, ‘‘हा गृध्र आम्हा सर्वांना खाऊन टाकील ह्यात संशय नाही. वानरश्रेष्ठहो! आमच्याकडून रामकार्य किंचित सुद्धा झाले नाही. सुग्रीवाचे आणि आमचे स्वतःचेही काही हित आम्ही साधले नाही. ह्या गृध्राच्या हातून विनाकारण मरण पावून आम्ही यमसदनाला जाणार! अहो! तो जटायु किती तरी धार्मिक आणि बुद्धिमान होता. त्याला रामकार्याकरिता मृत्यु आला. म्हणून योग्यांनाही दुर्लभ असे मोक्षपद त्या शत्रूदमनाला प्राप्त झाले.’’ हे वानरांचे भाषण त्या संपातीने ऐकल्यावर तो म्हणाला, ‘‘वानरश्रेष्ठ हो! कानाला अमृतासमान वाटणारे माझ्या भावाचे ‘जटायु’ नाव घेऊन तुम्ही परस्पर बोलत आहात. तरी तुम्ही कोण आहात? बोला. माझ्यापासून तुम्हाला काहीही पीडा होणार नाही.’’ त्यावर अंगद उठला आणि गृध्राजवळ जाऊन त्याला म्हणाला, ‘‘दशरथपुत्र श्रीमान राम, लक्ष्मण आणि पत्नी सीतेसह महारण्यात फिरत असता त्याची भार्या, पतिव्रता सीता, दुष्ट रावणाने चोरून नेली. श्रीराम व लक्ष्मण मृगयेकरिता गेले असता बळजबरीने तो दुष्ट तिला घेऊन चालला तेव्हा ती ‘रामा, रामा’ म्हणून आक्रोश करू लागली. तो आक्रोश कानी पडताच प्रतापी जटायुनामक पक्षिराजाने त्याच्याशी युद्ध केले. त्या युद्धात रामकार्यासाठी त्या महाबलवान जटायु वीराला रावणाच्या हस्ते मृत्यु प्राप्त झाला. त्याचे दहन रामाने केले. त्यामुळे त्याला क्षणात रामरुपी सायुज्य मुक्ति प्राप्त झाली. त्यानंतर रामाने सुग्रीवाकडे येऊन अग्निच्या साक्षीने त्याच्याशी मैत्री केली. सुग्रीवाच्या सांगण्यावरून अजिंक्य अशा वालीला महाबलिष्ठ रामाने ठार केले आणि वानरांचे राज्य सुग्रीवाला दिले. पुढे त्या महापराक्रमी सुग्रीवाने आम्हा सामर्थ्यवान वानरसमुदायांना सीतेच्या शोधासाठी पाठविले. ‘महिना संपण्यापूर्वी परत या नाही तर तुमचे प्राण घेईन’ ह्या त्याच्या आज्ञेप्रमाणे फिरत फिरत आम्ही ह्या वनातील गुहेत आलो. एक महिना झाला तरी सीतेचा किंवा रावणाचा काहीच वृत्तांत समजला नाही. म्हणून आम्ही प्रायोपवेशनाने मरण्याचा निश्चय करून ह्या क्षीरसागराच्या तीरावर बसलो आहे. हे पक्ष्या! त्या कल्याणीनी सीतेची तुला काही माहिती असेल तर सांग.’’ अंगदाचे हे भाषण ऐकून संपातीच्या अंतःकरणाला आनंद झाला. तो म्हणाला, ‘‘हे वानरश्रेष्ठ हो! तो जटायु म्हणजे माझा प्रिय बंधु होय. अनेक वर्ष सहस्त्रांनी आज मला बंधुची वार्ता कळली. वानरवीर हो! मी वाचेने तुमचे साहाय्य करीन. परंतु बंधुला उदक देण्यासाठी मला उदकाजवळ न्या. नंतर तुमच्या कार्यसिद्धीसाठी हितकर असे सर्व वृत्त तुम्हाला सांगतो.’’ ‘ठीक आहे’ असे म्हणून त्यांनी त्या गृध्र पक्ष्याला समुद्रतीरावर नेले. त्यानेही त्या जलात स्नान केले आणि आपल्या बंधूला जलांजलि दिली. नंतर त्या वानरवीरांनी त्याला पुन्हा स्वस्थानी नेले. तेथे बसल्यावर संपातीने वानरांस जी माहिती दिली, त्यामुळे त्यांना सर्वांना आनंद झाला. तो म्हणाला, ‘‘त्रिकूट पर्वताच्या मस्तकावर लंका नावाची एक नगरी आहे. तेथे अशोकवनात सीता असून तिच्या संरक्षणासाठी राक्षसी ठेवल्या आहेत. ती लंका येथून शंभर योजनांच्या पल्ल्यावर समुद्रामध्ये आहे. तरी ती माझ्या दृष्टीस दिसत आहे. मी गृध्र आहे अर्थातच मला दूरदृष्टी आहे. तेव्हा माझ्या म्हणण्यावर शंका घेऊ नका. शंभर योजने विस्तीर्ण असा हा समुद्र जो कोणी ओलांडून जाईल तोच खरोखर जानकीची भेट घेऊन पुन्हा परत येईल. बंधुचा घात करणाऱ्या त्या दुष्ट रावणाचा मी एकट्याने वध करावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. परंतु मला पंख नाहीत. अत्यंत श्रमपूर्वक समुद्र उल्लंघून जाण्याचा प्रयत्न करा. मग राक्षसाधिपती रावणाचा रघुश्रेष्ठ राम वध करील. शंभर योजने लांब असा समुद्र ओलांडून लंकेत शिरून पुढे जनककन्येला सीतेला भेटून तिच्याशी संभाषण करून आणि पुन्हा समुद्र तरून जो येईल असा तुमच्यामध्ये कोणी समर्थ आहे काय? याचा प्रथम विचार करा.’’
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे किष्किन्धाकाण्डे सप्तमः सर्गः।