श्री महादेव म्हणाले,
‘‘श्रीराम वल्कल व अजिन परिधान करून गुहाद्वारी शिलातलावर बसला होता. त्याच्या श्याम शरीरावर जटामुकुटाने शोभा आली होती. त्याचे डोळे विशाल आणि चेहरा शांत होता. त्याच्या मुखकमलावर हास्य शोभून दिसत होते. सीताविरहाने संतप्त होऊन तो पशुपक्ष्यांकडे पहात होता. अशा अवस्थेत त्याला दुरून पाहून सुग्रीव आणि लक्ष्मण ह्यांनी लगेचच रथातून उतरून भक्तिपूर्वक त्याच्या चरणांपुढे साष्टांग नमस्कार केला. धर्मज्ञ रामाने सुग्रीवाला आलिंगन देऊन कुशल विचारले आणि आपल्या जवळ बसवून त्याचा योग्य तो आदरसत्कार केला. रामविषयक असलेल्या भक्तीच्या योगाने हृदयात नम्रता निर्माण झाल्यामुळे तो सुग्रीव विनयपूर्वक रघुश्रेष्ठ रामाला म्हणाला, ‘‘देवा! ही पहा वानरांची भली मोठी वानरसेना येत आहे. ह्यापैकी काही कुलाचल नावाच्या पर्वतावर जन्मले असून देहाने मेरुमंदार पर्वतासारखे आहेत. दुसरे काही अनेक बेटे, नद्या, पर्वत ह्यावर राहणारे असून आकाराने पर्वतासमान आहेत. इच्छारुपधारी असे असंख्य वानर येत आहेत. हे सर्व देवांचे अंशावतार असून धनु, युद्धविद्येत निपुण आहेत. ह्यापैकी हे प्रभो! कित्येक हत्तीएवढ्या बलाचे ताकदवान आहे. कित्येकांमध्ये दहा हत्तींचे बळ आहे. कित्येक दशसहस्त्र हत्तींच्या बळाचे आहेत. तर कित्येकांच्या बळाला सीमाच नाही. कित्येकांची अंगकांति काजळाच्या शिखरासारखी आहे तर कित्येकांची सुवर्णासारखी आहे. कित्येकांची मुखे रक्तवर्ण आहेत तर कित्येकांची सुवर्णासारखी आहे. कित्येकांच्या शेपट्या लांब आहेत. कित्येक शुद्ध स्फटिक मण्यांप्रमाणे आहेत. कित्येक राक्षसासारखे आहेत. युद्धाची इच्छा धरून गर्जना करीत चोहोबाजूंनी येत आहेत. प्रभो! हे सर्व आपल्या आज्ञेप्रमाणे वागणारे आहेत. हे फळे आणि मुळे भक्षण करून राहणारे आहेत. ह्यापैकी जांबवान नावाचा अस्वलांचा राजा मोठा बुद्धिमान असून माझ्या मंत्र्यांमध्ये श्रेष्ठ आहे. हा कोट्यावधि अस्वलांचा नायक आहे. हा हनुमान मोठा सत्त्वशील आणि पराक्रमी म्हणून सर्वत्र सुप्रसिद्ध आहे. हा वायुपुत्र अत्यंत तेजस्वी, मोठा मंत्री आणि बुद्धिमंतांमध्ये श्रेष्ठ असा आहे. नल, नील, गवय, गवाक्ष, गंधमादन, शरभ, मैंद, गज, पनस, वलीमुख, दधिमुख, सुषेण, तार, महागुणी व बलाढय हनुमंताचा पिता केसरी, हे सर्व माझ्या सेनेतील मुख्य वीर मी तुला सांगितले. हे सर्व मोठे धैर्यसंपन्न महावीर्यशाली आणि इंद्रासमान पराक्रमी असून प्रत्येक कोटिकोटि वानरगणांचा नायक आहे. हे सर्व देवांचे अंशावतार आहेत. हा अंगद नावाचा भाग्यशाली पुत्र पहा. ह्याची सर्वत्र प्रसिद्धी आहे. हा वीर शक्तीमध्ये वालीसारखाच असून राक्षससैन्याचा नाश करणारा आहे. हे दुसरेही अनेक वानरवीर तुझ्याकरिता जीव देण्यास तयार आहेत. पर्वतशिखरांनी हे युद्ध करणारे असून शत्रूचा घात करण्याच्या कामी तरबेज आहेत. रघुश्रेष्ठा! आज्ञा कर. हे सर्व तुझ्या स्वाधीन आहे.’’
रामाने सुग्रीवाला आलिंगन दिले. आनंदाश्रूंनी त्याचे डोळे भरून आले. तो सुग्रीवाला म्हणाला, ‘‘माझ्या कार्याचे महत्त्व केवढे आहे, हे तुला चांगलेच माहीत आहे. जर तुला इष्ट असेल तर सीतेच्या शोधकार्यात ह्यांची योजना कर.’’ रामाचे भाषण ऐकून सुग्रीवाच्या अंतःकरणाला संतोष वाटला. त्या वानरश्रेष्ठाने महाबलाढ्य असे वानर सर्वत्र पाठविले. सर्व दिशांना वानर सत्त्वर पाठविल्यावर दक्षिणेकडे महाबलवान असे युवराज अंगद, जांबवान, महाबलिष्ठ हनुमान, नल, सुषेण, शरभ, मैंद आणि द्विविद ह्यांना पाठविले आणि त्यांना म्हणाला की, ‘‘तुम्ही प्रयत्नपूर्वक जानकीसतीचा शोध लावावा आणि माझी आज्ञा लक्षात ठेवून एक महिन्याच्या आत सर्वांनी परत यावे. सीतेचा शोध न लावता महिन्यापेक्षा एक दिवस जरी तुमचा जाईल तर त्याबद्दल हे वानरवीरांनो, तुम्हाला मृत्युची शिक्षा दिली जाईल.’’ ह्याप्रकारे महापराक्रमी वानरांना देशोदेशी पाठवून सुग्रीव रामाला वंदन करून त्याच्या जवळ बसला.
मारुती जात आहे असे पाहून राम त्याला म्हणाला, ‘‘माझ्या नावाची अक्षरे कोरलेली ही सुंदर अंगठी खुणेसाठी ठेवून एकांतात सीतेला दे. हे कपिश्रेष्ठा, ह्या माझ्या कार्यात तूच प्रमाण, सर्वकर्ता आहेस. तुझे बल केवढे आहे ते मला ठाऊक आहे. तू जा, तुला मार्ग सुखकारक होवो.’’
अशाप्रकारे कपिराजाने पाठविलेले अंगद वगैरे वानर सीतेच्या शोधकार्यास्तव सर्वत्र भ्रमण करू लागले. फिरता फिरता विंध्यारण्यामध्ये पर्वतासारख्या भयंकर आकाराचा, मृग, हत्ती इत्यादि पशू भक्षण करणारा एक राक्षस त्यांना दिसला. हा रावण असावा असे कित्येक वानरवीरांस वाटून त्यांनी मुष्टिप्रहारांनी त्याचा एका क्षणात वध केला. त्यानंतर ‘हा रावण नाही’ असे म्हणून ते दुसऱ्या एका मोठ्या वनात गेले. त्या सर्व वानरश्रेष्ठांना तहान लागली होती. त्यांना तेथे कोठेही पाणी मिळाले नाही. त्या महारण्यात फिरत असता त्यांचा कंठ, ओष्ठ, तालु इ. शुष्क होऊन गेले. शेवटी गवत व झुडुपे ह्यांनी आच्छादित अशी एक मोठी गुहा त्यांना दिसली. त्या गुहेतून ज्यांचे पंख भिजलेले आहेत असे क्रौंच आणि हंस पक्षी बाहेर आलेले त्यांनी पाहिले. त्यावरून ‘येथे पाणी असलेच पाहिजे. आपण ह्या महागुहेत जाऊ या’ असे म्हणून हनुमान सर्वप्रथम आत शिरला. त्यामागून परस्परांचे बाहू धरून सगळे मोठ्या उत्सुकतेने आत शिरले. अंधारातून बरेच लांब गेल्यानंतर स्फटिकतुल्य उदकाने पूर्ण अशी सरोवरे त्या वानराधिपतींना दिसली. तसेच पिकलेल्या फलभाराने वाकलेले, द्रोण मापाने मकरंद स्त्रवणारे, कल्पवृक्षाप्रमाणे अनेक वृक्ष तेथे होते. तसेच सकल साधनांनीयुक्त, रत्नवस्त्रादिकांनी भरलेली, दिव्य भक्ष्य पदार्थांनी युक्त सिद्ध परंतु मनुष्यविरहित अशी घरे सुद्धा दिसली. ते पाहून सर्व वानर आश्चर्यचकित झाले. तेथे एका मंदिरामध्ये दिव्य सुवर्णासनावर ध्यान करीत बसलेली एक योगिनी स्त्री त्यांनी पाहिली. तिची कांति उज्ज्वल होती. तिने वल्कले परिधान केली होती. ती अंतर्ध्यानी मग्न झाली होती. त्या महाभाग्यशाली स्त्रीला भीत भीत परंतु भक्तिपूर्वक त्या वानरांनी नमस्कार केला.
त्या वानरांना पाहून ती देवी त्यांना म्हणाली, ‘‘तुम्ही कशाकरिता आला आहात? तुम्ही कोठून आलात व तुम्ही कोणाचे दूत आहात? ह्या माझ्या स्थानाला तुम्ही का त्रास देत आहात?’’ ते ऐकून हनुमंत म्हणाला, ‘‘देवि! मी सांगतो, ते ऐक. दशरथ नावाचा ऐश्वर्यसंपन्न व सामर्थ्यवान असा अयोध्येचा राजा होता. त्याचा भाग्यशाली ज्येष्ठ पुत्र राम नावाने प्रसिद्ध आहे. पित्याची आज्ञा मान्य करून पत्नी आणि कनिष्ठ बंधुसह तो वनवासात गेला असता दुष्ट रावणाने त्याच्या साध्वी स्त्रीचे हरण केले. नंतर राम कनिष्ठ बंधुसह सुग्रीवाकडे आला. सुग्रीवाने मित्रकार्य करण्यासाठी ‘सीताशोध कार्य करा’ असे सांगितले. म्हणून आम्ही वनात जानकीचा शोध करीत असता तहान लागली म्हणून पाणी पिण्याची इच्छा करीत दैवयोगाने ह्या भयंकर गुहेत शिरलो. हे कल्याणी, तू कोण आहेस आणि येथे का राहतेस ते आम्हाला सांग.’’
वानरांना तेथे पाहून त्या योगिनीला संतोष वाटला. त्यांना भूक लागलेली आहे हे जाणून ती म्हणाली, ‘‘फळे-मुळे यथेच्छ भक्षण करा. अमृतासारखे गोड पाणी प्या. नंतर इकडे या. मग मी माझा वृत्तांत मुळापासून तुम्हाला सांगते.’’ ‘‘ठीक आहे’’ असे म्हणून त्या सर्व वानरांनी फलभक्षण केले व जलप्राशन केले. त्यांना खूप आनंद झाला. नंतर ते देवीजवळ जाऊन हात जोडून उभे राहिले. तेव्हा ती दिव्यरुपधारिणी योगिनी हनुमंताला म्हणाली, ‘‘पूर्वी विश्वकर्म्याची हेमा नावाची अत्यंत रुपवान अशी एक कन्या होती. त्या स्त्रीने आपल्या नृत्याने शंकराला संतुष्ट केले. शंकराने प्रसन्न होऊन तिला हे मोठे दिव्य नगर अर्पण केले. ती सुंदरी हजारो वर्ष सहस्त्रकालपर्यंत येथे राहिली. मी मात्र तिची मैत्रीण म्हणून रहात असे. मोक्षाची इच्छा धरून मी विष्णुच्या आराधनेत तत्पर असते. मी दिव्य नामक गंधर्वाची कन्या असून माझे नाव स्वयंप्रभा आहे. ब्रह्मलोकी जाताना हेमा मला म्हणाली, ‘‘तू येथेच राहून तप कर. येथे कोणतेही प्राणी रहात नाहीत. साक्षात निर्विकार नारायण, विष्णु त्रेतायुगामध्ये दशरथपुत्र होऊन पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी म्हणून अरण्यात भ्रमण करतील. त्याच्या स्त्रीचा शोध करीत करीत वानर तुझ्या गुहेत येतील. त्यांचे प्रयत्नपूर्वक आदरातिथ्य कर आणि मग रामाकडे जाऊन त्याची स्तुती कर. जेथे योगीजन जातात त्या सनातन अशा विष्णुपदाला तू जाशील.’’ आता मी रामदर्शन करण्यासाठी त्वरेने येथून जाण्याची इच्छा करीत आहे. तुम्ही डोळे मिटा म्हणजे गुहेच्या बाहेर जाल. वानरांनी डोळे मिटताच ते तत्काळ पूर्वी ज्या वनात होते तेथे येऊन पोहोचले. ती योगिनी सुद्धा ही गुहा सोडून शीघ्र रामाजवळ आली. तेथे सुग्रीवासहित राम व लक्ष्मण ह्यांचे तिला दर्शन झाले. त्या सुबुद्ध स्त्रीने रामाला प्रदक्षिणा घातली. तिने रामाला अनेकवेळा प्रणाम केला. तिच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. तिचा कंठ दाटून आला. ती रामाला म्हणाली, ‘‘राजेन्द्रा! मी तुझी दासी असून तुझ्या दर्शनाकरिता येथे आले आहे. तुझे दर्शन व्हावे म्हणून कित्येक सहस्त्र वर्षेपर्यंत गुहेत राहून मी खडतर तप केले. ते माझे तप आज फळास आले आहे. मायेच्या पलीकडे असणारा, सर्व प्राण्यांच्या आतबाहेर राहूनही कोणाला न दिसणारा असा जो तू त्या तुला मी नमस्कार करते. एखादे रूप धारण करणारा नट खऱ्या रुपाने जसा ओळखला जात नाही त्याप्रमाणे योगमायेच्या पडद्याने आच्छादित होऊन मनुष्यरुपाने तू वागत आहेस. म्हणून अज्ञानी लोकांना तू ओळखू येत नाहीस. महाभगवत् भक्तांचा भक्तियोग सिद्ध करण्यासाठी तू अवतार घेतला आहेस. भगवन्! मी तमोगुणी स्त्री तुझे यथार्थ रुप कसे जाणणार? हे रघुत्तमा! लोकांमध्ये तुझे यथार्थ स्वरूप जाणणारे कोणी असल्यास असोत, माझ्या हृदयप्रदेशी तुझे हेच रूप सर्वदा प्रकाशित होवो. रामा! तुझ्या चरणयुगुलाचे आज मला दर्शन झाले. हे चरणयुगुल पाहिल्याने मोक्ष मिळतो. संसारसमुद्र दृष्टिपार होतात आणि सन्मार्ग दिसू लागतात. हे आदिदेवा! तू निर्धनांचे सत्पुरुषांचे धन, आनंदाचा ठेवा आहेस. जे लोक धन, पुत्र, स्त्री इत्यादि ऐश्वर्याने गर्विष्ठ झालेले असतात ते तुझे स्तवन करण्यास योग्य नाहीत. प्रवृत्तिमार्गापासून, संसारापासून तू निवृत्त आहेस. तू साधुपुरुषांचे धन आहेस. तू स्वस्वरुपाच्या ठिकाणी रममाण होणारा आहेस. गुणरहित आहेस तरी तू गुणात्मक आहेस. तू कालरुपी आहेस. तू सृष्टीचे पालन करणारा आहेस. तू आदिमध्यान्तरहित आहेस. तू सर्वत्र समदृष्टीने वागणारा असून तू परमपुरुष आहेस असे मी मानते. देवा! तू मनुष्याचे अनुकरण करीत आहेस. ही गोष्ट कोणालाही कळत नाही. तुला कोणी प्रिय नाही, शत्रू नाही किंवा ह्याहून वेगळा उदासीन असा कोणी नाही. तरी तुझ्या मायेने ज्यांची ज्ञानशक्ती मोहित झाली आहे, ते तशा प्रकारची तुझ्याविषयी भावना करतात. तू जन्मरहित अकर्ता, ईश्वर आहेस. तरीही देव, पशूपक्षी, मनुष्य इत्यादि योनीत जन्म घेऊन ती ती कर्मादिके आचरण करीत असतो. ते तुझे त्या त्या जातीचे यथार्थ अनुकरण होय. तू अक्षर असूनही जन्म घेतोस. ह्याचे कारण असे सांगतात की तुझ्या भक्तांना कथाश्रवणसिद्धि प्राप्त करून द्यावी असे तू इच्छितोस. कित्येक लोक ‘कोसलराजाला, दशरथाला त्याच्या तपाचे फळ द्यावे म्हणून तू अवतरलास’ असे म्हणतात. तर दुसरे लोक ‘कौसल्येच्या प्रार्थनेवरून तू जन्माला आला आहेस’ असे सांगतात. कित्येक म्हणतात दुष्ट राक्षसांपासून झालेला पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी ब्रह्मदेवाने प्रार्थना केल्यावर प्रभु मनुष्यरुपाने जन्माला आला. हे रघुनंदना! तुझ्या कथा जे कोणी ऐकतात किंवा गातात त्यांना तुझ्या चरणकमलाचे दर्शन होते आणि हे तुझे चरणकमल म्हणजे संसारसागर तरून जाण्याची उत्तम नौकाच होय. देवा! तू गुणांचा आधार असूनही गुणरहित आहेस. अशा तुला मायागुणांनी बद्ध होत्साती मी कशी जाणू शकणार? तसेच स्तुतीला अविषय अशा तुज सर्वेश्वराची स्तुती तरी मी कशी करणार? म्हणून धनुष्यबाण हाती धरणाऱ्या, बंधु लक्ष्मण आणि सुग्रीवादि वानरवीर ह्यांनी परिवेष्टित अशा रघुश्रेष्ठाला मी नमस्कार करते.’’
अशा प्रकारे त्या योगिनीने स्तुती केली असता शरणागताची पापे हरण करणारा तो रघुश्रेष्ठ श्रीराम प्रसन्न झाला आणि त्या आपल्या भक्त अशा योगिनीला म्हणाला, ‘‘तुझ्या मनात काय इच्छा आहे?’’ त्यावर ती भक्तिपूर्वक रामाला म्हणाली, ‘‘हे भक्तवत्सला! माझा जन्म कोणत्याही योनीत झाला तरी माझी भक्ति तुझ्या ठिकाणी अढळ असावी एवढे प्रभो मला दे. संसारी लोकांची संगत न घडता सर्वदा तुझ्या भक्तांचा सहवास मला घडावा तसेच माझ्या जिव्हेकडून सर्वदा ‘राम राम’ असा भक्तिपूर्वक जप होत रहावा. सीता आणि लक्ष्मण जवळ आहेत, हातात धनुष्यबाण धरले आहे, पीतांबर परिधान केला आहे, मस्तकाला मुकुटाने विशेष शोभा आली आहे, बाहुभूषणे, नुपुरे, मोत्यांचे हार, कौस्तुभ आणि कुंडले ह्यांनी जे विराजमान झाले आहेत अशा त्या तुझ्या सावळ्या रुपाचे चिंतन माझे अंतःकरण करीत राहो. प्रभो रामा! ह्याहून अन्य कोणताही वर मला नको.’’
श्रीराम म्हणाला, ‘‘महाभागे! तू म्हणतेस तसेच होईल. आता तू बदरीवनाला जा. तेथे माझे चिंतन करीत राहा. म्हणजे ह्या पंचभौतिक शरीराचा त्याग करून लवकरच मला परमात्म्याला पावशील.’’ रघुश्रेष्ठ रामाचे ते अमृततुल्य भाषण ऐकून ती स्वयंप्रभा लगेचच बदरीवनाला गेली. पुण्यस्थळी गेली. तेथे बोरीच्या झाडांच्या अनेक राई होत्या. तेथे अंतःकरणात रघुपतीचे स्मरण करीत ती तेथे राहिली आणि अंती शरीराचा त्याग करून परम पदाला पोचली.
इति श्रीमदध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे किष्किन्धाकाण्डे षष्ठः सर्गः।